फ्रॉड लग्न : ‘अडीच लाख रूपये देऊन सून आणली आणि लग्नानंतर पाचच महिन्यात पळून गेली’

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
नाशिकच्या पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयाबाहेर तीन माणसं थांबलीयेत. कडक उन्हात दूरवरून तिथे आलीयेत. त्या तिघांपैकी दोन साठी उलटलेले नवरा-बायको आहेत आणि एक अजून साठी उलटलेले गृहस्थ.
तिघांची एकच तक्रार आहे, तीच सांगायला ते पोलीस अधिकाऱ्यांकडे आलेत. मीही खरंतर त्याचसाठी पोलिसांना भेटायला आलेय.
हे तिघं माणसं केबिनमध्ये गेल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी मलाही बोलावलं. त्या लोकांच्या ज्या कैफियती होत्या, ते ऐकून घेणं माझं काम होतं.
"आम्हाला फसवलं त्या माणसाने," त्या दांपत्यातली महिला म्हणते. त्यांचा आवाज भरून आलेला असतो. कडक उन्हात हे दोघं सिन्नर तालुक्यातून दुचाकीवर नाशिक शहरात आलेत.
"त्या पोरीने पैसे घेतले, दागिने घेतले आणि पळून गेली, ती परत आलीच नाही. आता मुलगा माझा वेड्यासारखा करतो. त्याला किती धक्का बसला असेल. चिडतो, रागवतो, मारायला अंगावर धावतो," त्या आजी पुढे म्हणतात.
याच सुमारास एक व्हीडिओही माझ्या पहाण्यात आला होता, ज्यात लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर लग्न लागताना दिसत होतं.
अक्षरशः दहा-बारा माणसं रस्त्यावर उभी आहेत, मोबाईलवर मंगलाष्टकं सुरू आहेत आणि घाईघाईत लग्न लागतंय. नाटकातलं खोटं खोटं लग्नपण यापुढे ऑथेंटिक वाटावं.
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल मी कशाबद्दल बोलतेय. दोन दिवसात मुलगी पाहून घाईने केलेलं लग्न, मुलाकडच्या लोकांवर पैसै देण्याचा दबाव, अनेकदा मुलीच्या नातेवाईकांचाही पत्ता नाही आणि लग्नानंतर काही महिन्यातच मुलगी गायब. महाराष्ट्रातली अनेक मुलं आणि त्याचे आईवडील लग्नाच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या रॅकेटला बळी पडत आहेत.
अशा अनेक बातम्या सतत कानावर पडत आहेत, पण तरी फसवणुकीचे प्रकार थांबत नाहीत. याच गोष्टींचा सविस्तर शोध घेण्यासाठी मी आणि माझा सहकारी मयांक भागवत प्रयत्न करत होतो.
तिथे आलेल्या दुसऱ्या गृहस्थांशी बोलले. हे सरकारी नोकरीत निवृत्त झालेले आहेत. त्यांचीही फसवणूक झालीये. एजंटने मुलगी शोधून देतो असं सांगितलं, लग्न लागलं आणि मुलगी नंतर घरातून पळून गेली.
या गृहस्थांकडून एजंटने साडेतीन लाख रूपये घेतले असं त्यांचं म्हणणं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
कोणत्या परिस्थितीत हे लग्न झालं, हे लोक एजंटपर्यंत का केले, बळी कसे पडले हे मी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण लोकलज्जेस्तव ही माणसं ऑन कॅमेरा माध्यमांशी बोलायला तयार नाहीत. म्हणूनच त्यांची ओळखही आम्ही इथे जाहीर करत नाही आहोत.
सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले गृहस्थ, आपण त्यांना विठ्ठलराव म्हणू, नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्याचे आहेत.
त्यांना आपल्या मुलासाठी मुलगी मिळत नव्हती, मुलाचं वय वाढत चाललं होतं. मुलाचा काही वर्षांपुर्वी अपघात झाला होता त्यामुळे तो थोडा अधू आहे. याच कारणामुळे लग्न जमत नव्हतं.
मुलाच्या लग्नाचं टेंशन इतकं जास्त होतं की शेवटी त्यांनी एजंटचा सहारा घेतला.
"त्यांनी आम्हाला सांगितलं की बीड जिल्ह्यातली मुलगी आहे. मुलगी आम्ही नाशिकमध्येच एजंटच्या घरी पाहिली. तिचं घर वगैरे पाहायचा प्रश्नच आला नाही. त्याने सांगितलं की लवकर निर्णय घ्या नाहीतर तिच्यासाठी दुसरीकडून होकार आहे. घाईघाईत लग्न ठरलं," विठ्ठलराव म्हणतात.
ते सांगतात, "थेट लग्नाच्या दिवशी आम्हाला अंबेजोगाईला नेलं. एका बंद घरापुढे गाडी उभी करून म्हणे हेच मुलीचं घर. मुलीचे फारसे नातेवाईकही नव्हते लग्नाला. घाईघाईत लग्न झालं आणि आम्ही परत आलो. लग्न झाल्यानंतर तीनच महिन्यात ती मुलगी पळून गेली."
या प्रकरणी नाशिक पोलिसांनी अंबेजोगाईला जाऊन तपास केला पण ती सापडली नाही.
सिन्नरहून जे नवराबायको आले त्याचीही काहीशी अशीच कथा. दुष्काळी भागातली कोरडवाहू जमीन आहे आणि मुलाला पक्की नोकरी नाही म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं.
हे कुटुंब तसं गरीब आहे. एजंटने त्यांच्याकडे एक लाख रूपये आणि एक तोळा सोनं मुलीच्या अंगावर घाला अशी मागणी केली.
इथून तिथून पैसै जमा करून या कुटुंबाने लग्न लावलं आणि मुलगी काही दिवसातच घर सोडून, दागिने घेऊन पळून गेली.
या कुटुंबांना दुःख आहे आपल्या मुलांचे संसार उद्धवस्त झाल्याचं. दोन्ही कुटंबातली मुलं, ज्यांचं लग्न झालं होतं आणि ज्यांच्या बायका पळून गेल्या, मानसिक तणावाखाली आहेत. कुटुंबाचं म्हणणं आहे की ते आता वेड्यासारखं वागतात, त्यांच्या भावनांवर नियंत्रण नाहीये, त्यात लोकांचे टोमणे ऐकून ते काही बरंवाईट करतील का याची भीती आहे.

या दोन्ही मुलांना मानसोपचारतज्ज्ञांची ट्रीटमेंट सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातलं असंच एक तिसरं कुटुंब पेठ तालुक्यातलं. मी यांच्या घरीच गेले होते. घरची थोडीफार शेती आणि शिवणकामाचा व्यवसाय.
त्यांचा मुलगा विकी (बदलेललं नाव) याचं मागच्या वर्षी लग्न झालं. त्यांनी या लग्नासाठी अडीच लाख खर्च केला. एजंटला दोन लाख दिले आणि मुलीच्या अंगावर एक तोळा सोनं घातलं.
एजंटच्या सांगण्यावरून त्यांनी लग्न स्वतःच्याच मळ्यात केलं आणि मंडप, जेवण-खाण सगळा खर्च त्यांनीच केला.
"लै वाईट वाटतं, आता या मुलाकडं बघवत नाही. आपण तर बोलून टाकतो पण मुलगा नाही ना बोलत. नाही बोलणार. त्याच्या मनाला किती वाईट वाटत असेल. एक तर मुली मिळता मिळत नाहीत आणि या माणसाने आम्हाला फसवलं," विकीच्या आई हुंदके देत म्हणतात.
विकीचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्न अयशस्वी ठरलं, त्याचं वयही वाढत चाललं होतं त्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती.
अशात एका लग्नाला गेल्यानंतर या कुटुंबाला एका एजंटविषयी माहिती मिळाली जो मुलांची लग्न जुळवून देतो.
विकीचे काका म्हणतात, "आता आम्हाला पण आमच्या मुलाचं लग्न करायचं होतं तर आम्ही त्याच्याकडे गेलो. तर म्हणे मी मुलीचे हे एवढे एवढे पैसे घेतो. मी दोन लाख रूपये या मुलीचे घेईन आणि इतर खर्च तुम्हाला करावा लागेल. सोन- नाणं, दागिने करावे लागतील."
मुलगी पाहून आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी लग्न झालं.
लग्नाच्या दिवशीही मुलीकडून कोणीच आलं नव्हतं. फक्त दोन एजंट, त्यांच्या बायका आणि ती मुलगी असे पाच जण आले होते.
"तिला सजवलं पण माझ्या मुलींनी," विकीच्या आई म्हणतात.
या एजंटने त्यांना ताकीद दिली होती की लग्न लागण्याच्या आधी पैसे दिले पाहिजेत.
"तो म्हणाला की मी फोन पे घेणार नाही, चेक घेणार नाही, मला कॅश पैसे लागतील, तेही टाळी लागण्याच्या आधीच. मला त्याचं वाटप करावं लागतं, काही पैसे मुलीच्या घरच्यांनाही द्यावे लागतात," विकीचे काका पुढे सांगतात.
या कुटुंबाचं म्हणणं आहे की सुरुवातीचे काही दिवस ही मुलगी एकदम चांगली वागली.
"आम्हाला वाटलं आम्हाला किती भारी पोर मिळाली. मला घरात काही काम करू द्यायची नाही. एकदिवस तिने घरातल्या सगळ्या गोधड्या काढल्या आणि हाताने धुतल्या. घरात काम करत होती," विकीच्या आई म्हणतात.
पण काही दिवसांनी मुलीच्या वागण्यात बदल झाला.
"ती घरात भांडण करायला लागली. सारखी फोनवर बोलायची, पाच महिने झाले, मला इथून काढा. मी माझे पैसे फेडले आहेत. घरच्यांना धमकी द्यायची की मी गच्चीवर जाऊन जीव देईन मला जाऊ द्या," विकी म्हणतो.

"तिच्या सांगण्यावरून शेतीच्या वाटण्या केल्या, तिला गाडी घेऊन दिली, शिलाई मशीन घेऊन दिली, पण तिच्या मनात वेगळंच काहीतरी होतं," विकीच्या आईचा आवाज पुन्हा भरून येतो.
शेवटी मुलीने खरंच जीवाचं काही बरंवाईट केलं तर काय या भीतीने हे कुटुंब तिला एजंटकडे सोडून आलं. त्यानंतर ती मुलगी गायब झाली. तिचं दुसरं लग्न लावून दिलं असावं अशी या कुटुंबाला शंका आहे. . पण या एजंटने मात्र नाशिक जिल्ह्यातल्या आणखी तीन कुटुंबांना फसवल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी साहेबराव गिते आणि संतोष फड यांना अटक झाली तर दुसऱ्या एका प्रकरणात मुलीच्या आईला अटक झाली आहे.
राज्यभर अशा घटना घडत आहेत. हे रॅकेट चालवणाऱ्या लोकांची मोड्स ऑपरेंडी काय आहे याबाबती आम्ही पोलिसांशी बोललो.
नाशिक ग्रामीणचे एसपी सचिन पाटील म्हणाले की, "हे एजंट असे कुटुंब हेरतात ज्यांच्या मुलांचं लग्न जमत नाहीये. मुलांचं लग्न न ठरण्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. मुलांचं वय कधी कधी जास्त असतं. दुसरी गोष्ट आपल्या समाजात मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे, त्यामुळे मुलांचं लग्न ठरताना उशीर होतो. अशा वेळेला आई वडिलांची चिंता वाढून जाते मग कोणी एजंट आला आणि म्हणाला की मी लग्न ठरवून देतो तर अशा वेळेला तर एजंटवर पटकन विश्वास ठेवतात."
दुसरीकडून हे एजंट अशा घरातल्या मुली आणतात ज्यांच्या घरचे गुन्हा करायला तयार असतात.
"आपण मुलीच्या आईला, आरोपीला आपण अटक केली तेव्हा तिने सांगितलं की परिस्थितीमुळे ते या गुन्ह्यात सहभागी झाले. मुलीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी होतं ही देखील पोलीसांच्या दृष्टीकोनात गंभीर बाब होती," पाटील म्हणतात.
पण लोकलज्जेस्तव गुन्हे दाखल होत नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आणि फसवणूक झाली तर लगेच पोलिसात तक्रार करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
अनेक प्रकरणातल्या मुली मराठवाड्यातून आल्या आहेत अशी माहिती आम्हाला पोलिसांनी दिली.
या प्रकरणी आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. मराठवाड्यात ऊसतोड कामगार महिलांबरोबर काम करणाऱ्या मकाम या संस्थेच्या सीमा कुलकर्णी म्हणाल्या की, "अशी प्रकरण आमच्यासमोर तर आली नाहीयेत. पण यात मुलींचं शोषण होतं असल्याचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. कोव्हीडच्या काळातही आर्थिक चणचणीमुळे मराठवाड्यात अनेक बालविवाह झाले. हा ट्रॅफिकिंगच्या मोठ्या रॅकेटचाही भाग असू शकतो."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








