संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा, भाऊ मुख्यमंत्री झाल्यानं पोटदुखी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) भाऊ मुख्यमंत्री झाल्यानं पोटदुखी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
"गेली 15 वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे," असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात बोलत होते. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
संजय राऊत म्हणाले, "आज लोक पेटवा-पेटवीची भाषा करतायेत, आमचं संपूर्ण आयुष्य गेलं, सवाल ये नही की बस्ती मे आग कैसे लगी, सवाल ये हे की बंदर के हात माचीस किसने दी. पण माचिस देऊन पण उपयोग नाही, ती पेटायला काही तयार नाही. सर्व दारुगोळा शिवसेनेकडे आहे."
"शिर्डी, पंढरपूर याठिकाणी लोकांना आज काकड आरती करता नाही आली. हजारो भाविक याला मुकले. यांच्यामुळे हिंदूंचा गळा आवळला गेला," असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंच्या भोंगेबंदीच्या मागणीवर निशाणा साधला.
सेनेला संपवण्यासाठी भाजपकडून सुपाऱ्या दिल्या जातात आणि त्या स्वीकारल्या जातात, असा आरोप नाव न घेता संजय राऊतांनी केला.
2) कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार - अमित शाह
कोरोना संपल्यावर लगेच CAA कायदा लागू करणार असल्याचं विधान भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. ते पश्चिम बंगालमध्ये बोलत होते. हिंदुस्तावन टाइम्सनं ही बातमी दिलीय.
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष CAA कायद्याबद्दल अफवा पसरवत असल्याचंही अमित शाह म्हणाले. तसंच, त्यांनी यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

फोटो स्रोत, Twitter/Amit Shah
अमित शाह म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये भाजपशासित राज्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जास्त आहेत, कारण ममता बॅनर्जी सरकारनं इंधनावरील स्थानिक कर कमीच केले नाहीत. पश्चिम बंगाल एकमेव राज्य आहे, जिथं पेट्रोल 105 रूपये लिटर आहे."
विधानसभा निवडणुकीनंतर अमित शाह यांचा हा पश्चिम बंगालमधील पहिला दौरा होता.
3) ऑक्टोबरपासून दिल्लीत मोफत वीज बंद होणार
येत्या 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत मोफत वीज बंद होणार आहे. जो मागेल, त्याला अनुदान दिले जाईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीय.
दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाची काल (5 मे) बैठक पार पडली. त्यात वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

फोटो स्रोत, Twitter
दिल्लीत सध्या 200 यूनिटपर्यंतची वीज मोफत देण्यात येते. तसंच, 400 यूनिटपर्यंतच्या विजेसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येतं.
केजरीवाल सरकारनं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 340 कोटींचा निधी केवळ ऊर्जा क्षेत्रासाठी राखून ठेवला आहे. स्पेशल इलेक्ट्रिसिटी सबसिडी स्कीमसाठी यातला निधी वापरला जाणार आहे.
4) 12 दिवसांनंतर राणा दाम्पत्याची भेट, अश्रूंचा बांध फुटला!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांची 12 दिवसांपूर्वी तुरुंगात रवानगी झाली होती. अखेर दोघेही जामिनावर बाहेर आले आहेत. लोकमतनं ही बातमी दिलीय.
तुरुंगातून सुटका होताच नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. रक्तदाब, मणक्याचा त्रास होत असल्यानं नवनीत राणांनी रुग्णालय गाठलं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचे पती रवी राणा त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. रवी राणांना पाहून नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. त्या रडू लागल्या.
रवी राणांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. आज सुटका झाल्यानंतर त्यांनी लिलावती रुग्णालय गाठलं आणि पत्नीची विचारपूस केली. बरेच दिवसांनंतर दोघांची भेट झाली. रवी राणांना पाहून नवनीत राणा ढसाढसा रडल्या.
5) मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार - दानवे
"ब्राह्मण समाज सर्व समाजाला दिशा देणारा आहे. केवळ नगरसेवक, नगराध्यक्ष या पदांवर काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाला आता आपण पाहू नये. अशा एवढ्या छोट्या अपेक्षा व्यक्त करू नका. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत," असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं.
परशुराम जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
"जातीपातीचे लोण राजकारणात आता मोठ्या प्रमाणात आले आहे. हे वास्तव नाकारून आता चालणार नाही. जात एकसंघ असली पाहिजे, तसे पूर्ण समाजाला एकत्र ठेवणारा नेता असावा. तसे नेतृत्व आपण निर्माण केले पाहिजे," असंही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








