देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर प्रवीण चव्हाण म्हणाले-सरकार माझं नाही, मी सरकारमध्ये नाही. #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.सरकारशी संबंध नाही- प्रवीण चव्हाण
"सरकार माझं नाहीये. मी सरकारमध्ये कधीही नाहीये. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा राजकारणी किंवा त्यांच्या जवळचा नाहीये. राजकारणामध्येसुद्धा नाहीये. माझ्या पूर्ण कालावधीत साधा ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा आमदार-खासदार या कोणत्याही निवडणुकांमध्ये मी नाहीये. त्यामुळे सरकारशी माझा संबंध असण्याचा माझा प्रश्नच येत नाही", असं सरकारी वकील प्रवीण चव्हाण म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनसंदर्भात खुलासा केला. त्यासंदर्भात चव्हाण बोलत होते. 'मुंबई तक'ने ही बातमी दिली आहे.
चव्हाण म्हणाले, "हे सर्व टेम्परिंग आहे किंवा जो काही आवाज वगैरे आहे ते आज नाही तर उद्या बाहेर येणारच आहे ना. हे पाहा माझं म्हणणं असं आहे की अजून व्हीडिओ पाहिलेला नाही. मी त्यातील ऑडिओ अद्याप ऐकलेले नाहीत. सीबीआयची चौकशी किंवा कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही. चौकशी कोणती करायची हे सरकार ठरवणार".
"या प्रकरणात काहीच तथ्य नाही. या प्रकरणात चौकशी झाली तरी माझी काही हरकत नाही. अनिल गोटेंची एक केस पुण्यात सुरू आहे. त्यासाठी त्यांना सल्ला हवा होता. पण माझ्याकडे वेळ नसल्याचं मी त्यांना सांगितलं. अनिल देशमुखांनासुद्धा कधीच भेटलेलो नाही", असं चव्हाण म्हणाले.
2.निवडणूक आयोगाचा अधिकार घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनाबाह्य- आंबेडकर
"राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार स्वत:कडे घेण्याचा घेतलेला निर्णय घटनाबाह्य असून, असे करता येत नाही. राज्य सरकारकडून अपप्रचार केला जातोय की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले. मात्र, हे खोटे असून राज्य व केंद्र सरकारमुळे हे आरक्षण रद्द झाले आहे", असं स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, FACEBOOK
मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ओबीसींचा इम्पीरिकल डेटा मागितला होता, तो न दिल्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. या चार पक्षांना मतदान करणे बंद करून ओबीसींनी सत्ता हातात घेतली पाहिजे तरच आरक्षण टिकेल. महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवारी विधानसभेत मंजूर केलेले हे विधेयक घटनाबाह्य आहे.
प्रशासकाच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा कुठलाही अधिकार राज्यघटनेने दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा व शिवसेना हे चोरांचे सरकार असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली".
3. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल जॅमर बसवावेत- अखिलेश
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी स्थळाभोवती मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.
सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मतमोजणी ठिकाणाभोवती मोबाईलद्वारे हॅकिंगचे प्रकार घडू शकतात, अशी चिंता समाजवादी पक्षाने व्यक्त केली आहे. म्हणून मतमोजणी स्थळाभोवती मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसोबतच संपूर्ण राज्यातील सर्व जागांवर मतदान पूर्ण झाले. यूपीमध्ये 403 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. 10 मार्चला निकाल आहे.
सोमवारी मतदान संपल्यानंतर विविध एजन्सी आणि वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचं भाकीत करण्यात आलं आहे. एक्झिट पोलच्या सर्व आकड्यांमध्ये अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष हा बहुमताच्या आकड्यांपासून दूर असल्याचे दिसत आहे. मात्र अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाला 300 जागा मिळणार असल्याचा दावा केला
4. 2024च्या सार्वजनिक निवडणुकांमधून भाजपला हद्दपार करायचे आहे-ममता बॅनर्जी
"भाजप हा दंगाबाज आणि भ्रष्ट पक्ष आहे. त्यांना लोकशाही नष्ट करायची आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. 2024 च्या सार्वजनिक निवडणुकांमधून भाजपला हद्दपार करायचे आहे", असा सल्ला त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
पक्षाच्या राज्य समितीच्या बैठकीला संबोधित करताना तृणमूलच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलत होत्या. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
5. कुणाला घाबरत नाही, जे करायचं ते उघडपणे करतो-सतेज पाटील
"मी 96 कुळी मराठा आहे, शत्रुत्व पत्करलं तर ते उघडपणे पत्करतो. कुणाला घाबरत नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 'आमचं ठरलंय' म्हणत मी उघड भूमिका घेतली होती हे जिल्ह्याला ठाऊक आहे", असं सांगत सतेज पाटलांनी आमदार प्रकाश आवाडे यांना प्रत्युत्तर दिलंय.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊन दोन महिने झाले असले तरी या निवडणुकीनंतर सुरू झालेलं राजकारण अजूनही थांबलेलं नाही. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
"जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तुम्ही आमचा कार्यक्रम केला, आम्ही सुद्धा वेळ येईल तेव्हा बघू", असं म्हणत एक प्रकारे आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना डिवचलं. इतकंच नाही तर विकास कामाचे उद्घाटन आणि इचलकरंजी परिसरात वाढलेली गुन्हेगारी यावरूनही त्यांनी सतेज पाटील यांना लक्ष्य केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








