संजय राऊत : माझ्या मुलीच्या लग्नात डेकोरेशन करणाऱ्याला EDने बंदुकीचा धाक दाखवला

फोटो स्रोत, Getty Images
ED च्या माध्यमातून देशात क्रिमिनल सिंडिकेट चालवलं जात आहे. मी पाठवलेलं पत्र हे फक्त माहितीसाठी होतं. ते ट्रेलरही नाही. आणखी खूप गोष्टी उघड करणार आहे, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
आज (9 फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
असंवैधानिक पद्धतीने ED आणि इतर तपास संस्थांचा वापर भाजप करत आहे. ED कडून गनपॉईंटवर लोकांना धमकावलं जातं, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
ED चे स्वतःचेच आर्थिक घोटाळे आहेत. ते ठाकरे-पवार कुटुंबीयांना बदनाम करण्याचं काम करत आहेत, त्यांची संपूर्ण पोलखोल करावी लागेल. त्यासाठी देशभरातील सर्व मोठ्या नेत्यांशी आपली चर्चा झाली आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
तत्पूर्वी, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यास मदत करा, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकी देत आपल्यावर कारवाई करण्यात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
यासंदर्भात राऊत यांनी एक पत्र उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिलं असून त्याची एक प्रत त्यांनी ट्विटरवरसुद्धा पोस्ट केल्याचं दिसून येतं.
काल (मंगळवार, 8 फेब्रुवारी) रात्री 11 वाजून 26 मिनिटांनी याबाबतचं ट्वीट राऊत यांनी केलं.
आपल्या या पत्रात राऊत यांनी केंद्र सरकार तसंच ईडी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांचं उपराष्ट्रपतींना पत्र
सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने EDकडून आपले कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ED आणि इतर तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.
एकूण 11 मुद्द्यांमध्ये राऊत यांनी त्यांचं गाऱ्हाणं उपराष्ट्रपती नायडू यांच्यासमोर मांडलं आहे.
ED सारख्या तपास यंत्रणांचा विरोधात वापर
मी तीन दशकांपूर्वी शिवसेनेत माझं राजकीय करिअर सुरू केलं. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना सत्तेत आहे.
पूर्वी शिवसेना 25 वर्षे भाजपसोबत युतीमध्ये होती. दोन्ही पक्षांनी मिळून सरकारही स्थापन केलं होतं. पण काही मतभेदांमुळे दोन्ही पक्ष वेगळे झाले. पण त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांना शिस्तबद्ध पद्धतीने लक्ष्य केलं जात आहे.
त्यासाठी ED आणि त्यासारख्या इतर तपास यंत्रणांचा विरोधात वापर केला जात आहे, असं राऊत म्हणाले.
स्वतंत्र विचारसरणी जपण्याचा आम्हाला अधिकार
राऊत पुढे म्हणतात, "आम्हाला आमची वेगळी आणि स्वतंत्र विचारसरणी जपण्याचा अधिकार आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत ती मिळतीजुळती असण्याची गरजही नाही.
पण, त्या कारणामुळे आमचे खासदार, त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय यांना तपासाच्या नावाखाली धमकावणं, त्रास देणं, अटक करणं, असे प्रकार करू नयेत.
सरकार पाडण्यासाठी मदत करा, अन्यथा..
एका महिन्यापूर्वी काही लोक माझ्याकडे आले होते. महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. सरकार पाडण्यात मी भूमिका बजावावी आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. पण मी तसं करण्यास स्पष्ट नकार दिला.
त्यावेळी त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकी मला देण्यात आली. एका माजी रेल्वे मंत्र्याप्रमाणे आमचे हाल करू, असंही मला धमकावण्यात आलं.

फोटो स्रोत, facebook
माझ्याव्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील PMLA कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली.
माझी आणि माझ्या कुटुंबीयांची अलिबागमध्ये जमीन आहे. ती आम्ही 17 वर्षांपूर्वी खरेदी केलेली आहे. ही जमीन केवळ एक एकर इतकीच आहे.
आम्ही जागा ज्याच्याकडून खरेदी केली, त्यालाही धमकावलं जात आहे. व्यवहारादरम्यान मी वाढीव रोख रक्कम दिली, असा जबाब देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात आहे. 2012-13 दरम्यान आम्ही केलेल्या इतर व्यवहारांबाबतही असाच प्रकार सुरू आहे.
ED अधिकारी या लोकांना कॉल करतात, त्यांची संपत्ती जप्त करण्याची धमकी देतात. माझ्या सगळ्या संपत्तीची नोंद मी माझ्या प्रतिज्ञापत्रात केलेली आहे.
इतक्या वर्षांत आतापर्यंत कधीच मला याबद्दल विचारलं गेलं नव्हतं. पण आता अचानक यामध्ये ED ने रस दाखवणं सुरू का केलं, असा सवाल राऊत यांनी विचारला.
मुलीच्या लग्नाशी संबंधित व्यक्तींनाही धमकी
नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात डेकोरेशन व इतर कामांचे ऑर्डर घेतलेल्या लोकांनाही ED आणि इतर संस्थांकडून धमकावलं जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

फोटो स्रोत, Social media
या लग्नातील खर्चासाठी आपल्याला 50 लाख रुपये रोख स्वरुपात देण्यात आले, असा जबाब नोंदवण्याचा दबाव या व्यावसायिकांवर टाकण्यात येत आहे.
संजय राऊत यांनी आरोप करताना म्हटलंय.
"माझ्या मुलीच्या लग्नासंदर्भात फुलवाल्याला, डेकोरेशन करणाऱ्याला उचलून आणलं. हे काय ईडीचं काम आहे. पैसे किती घेतले अशी विचारणा केली. त्यांनी पैसे घेतले नाही असं सांगितलं.
"आमच्या कुटुंबात चांगलं नातं आहे. या मुलीला जन्म झाल्यापासून मी लहानाची मोठी होताना पाहिलं आहे. तिच्या लग्नात डेकोरेशनचे कसे पैसे घेणार असं तो म्हणाला. त्यावर त्याला गन पॉईंटवर आत टाकेल असं सांगितलं," असं संजय राऊत म्हणाले.
"ही दादागिरी काही कामाची नाही. ही दादागिरी आहे पण मुंबईचा दादा शिवसेना आहे," असं राऊत यावेळी म्हणाले. याचे सुत्रधार कोण आहेत, ईडी ऑफिसमध्ये कोण बेकायदेशीरपणे जाऊन बसतात आणि ऑपरेट करतात हे समोर येईल, असंही राऊत म्हणाले.
दोन तीन असे लोक आहेत जे ईडीला आदेश देतात काय करायचं काय नाही, कोणाला त्रास द्यायचा हे सांगतात. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करत आहे, आणि मला काय सांगायचं आहे हे, त्यांना माहिती आहे, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
आजपर्यंत 28 जणांवर कारवाई
ED आणि इतर संस्थांकडून आजपर्यंत 28 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, असा दावाही संजय राऊत यांनी या पत्रात केला.
या लोकांना ED कार्यालयात येण्यास भाग पाडलं गेलं. चुकीच्या पद्धतीने त्यांची तासनतास चौकशी करण्यात आली.
मला धडा शिकवण्यासाठीच अशा प्रकारची कारवाई करण्याची सूचना वरिष्ठांकडून मिळत असल्याचं ED मधील काही अधिकाऱ्यांनी अनेकांसमोर मान्य केलं, असंही राऊत म्हणाले.
मी घाबरणार नाही
इतका सगळा त्रास दिला जात असला तरी मी घाबरणार नाही. सभागृहात आणि सभागृहाबाहेर मी सत्य बोलत राहीन.
राज्यसभेचा सदस्य तसंच एक सामान्य नागरिक म्हणूनही मला तो अधिकार आहे, असंही राऊत यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









