ऐश्वर्या रायची चौकशी का होतेय? पनामा पेपर्स प्रकरण नक्की काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
सोमवारी, 20 डिसेंबरला समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन संसदेत भडकल्या.
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन संसदेत भडकल्याची ही काही पहिली वेळ नव्हती. पण यावेळी त्या कशामुळे चिडल्या, ते नेमकं कळू शकलं नाही.
त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सत्ताधारी बाकांमधून कुणी कमेंट केली, त्यामुळे त्यांना राग आला एवढंच कळलं. पण कुणी काय म्हटलं हे गदारोळात ऐकू आलं नाही. पण त्या चिडल्या त्याच सुमारास त्यांच्या सूनबाई आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची पनामा पेपर्स प्रकरणी एडीने चार तास चौकशी केली.
जया बच्चन संसदेत म्हणाल्या, "तुमचे वाईट दिवस लवकरच सुरू होती. तुम्ही आम्हाला बोलूही देत नसाल तर मग आमचा गळाच दाबा. तुम्हाला जे बोलायचं आहे ते समोर बोला ना, तेवढी हिंमत ठेवा."
राज्यसभेतील गोंधळानंतर जया बच्चन बाहेर आल्या आणि माध्यमांसमोर म्हणाल्या की, "असं व्हायला नको होतं. मी कुणावरही वैयक्तिक विधान करू इच्छित नाही. मात्र, ज्याप्रकारे वैयक्तिक गोष्टी बोलल्या गेल्या, त्यामुळे मी नाराज झाले होते.
पनामा पेपर्स लीकमध्ये भारतातील 500 हून अधिक नागरिकांची नावं आहेत. पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर, इडीने याआधी दोन वेळा ऐश्वर्या राय यांना नोटीस दिली होती, पण त्यावेळेस त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
आता त्यांच्यावर कोणतेकोणते आरोप आहेत हे पाहू. हे आरोप आहेत आणि बीबीसी मराठी याची स्वतंत्ररित्या पडताळणी करू शकलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ऐश्वर्या राय परदेशातल्या एका संशयास्पद कंपनीच्या संचालक आहेत, 2005 साली त्यांनी दुबईत या कंपनीची मीटिंग अटेंड केली आणि ऐश्वर्या यांचे वडीलही त्यांच्याबरोबर होते. त्यांनी ऐश्वर्याच्या वतीने कंपनीच्या कागदपत्रांवर सह्या केला. याच प्रकरणी त्यांची सलग 4 तास इडीने चौकशी केली.
जगभरातल्या काळा पैसा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक मोठमोठ्या नेत्यांची, अधिकाऱ्यांची आणि सेलिब्रिटीजची नाव पनामा पेपर्स प्रकरणी समोर आली आहेत. भारतातल्या 500 व्यक्तींची नाव या प्रकरणाशी संबधित आहेत.
असं असतानाही फक्त ऐश्वर्या राय यांची चौकशी का?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले "जया बच्चन यांच्यावरचा राग सरकार त्यांच्या कुटुंबियांवर काढत आहेत.
"जया बच्चन विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. त्यांना साथ देत आहेत. त्याचा राग सरकारच्या मनात आहे आणि त्यातूनच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ईडीमार्फत नोटिसा पाठवण्यात येत आहेत," राऊत म्हणाले.
पण एवढी सगळी वादावादी ज्या पनामा पेपर्सवरून होतेय, ते प्रकरण नक्की काय?
2016 साली पनामा नावाच्या दक्षिण अमेरिकेतल्या देशातली सर्वाधिक गुप्तता बाळगणाऱ्या लॉ-फर्म - मोझॅक फॉन्सेस्कामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात कागदपत्रं लीक झाली.
जगातली शक्तिशाली आणि पैसेवाली माणसं आपलं काळ धन लपवण्यासाठी आणि कर चोरी करण्यासाठी काय काय करतात याचे तपशील या कागदपत्रांमध्ये होते.
मोझॅक फॉन्सेस्का ही कंपनी आपल्या श्रीमंत ग्राहकांना त्यांचा बेहिशेबी पैसा लपवण्यासाठी खोटे कागदपत्रं बनवणं, खोट्या कंपन्या काढणं, वेगळ्याच नावाने पैसा फिरवणं अशा गोष्टीत मदत करायची.

पनामा पेपर्स प्रकरणात अशा अनेक खोट्या कंपन्या समोर आल्या ज्यात पैसे गुंतवले होते पण प्रत्यक्षात ती कंपनी फक्त कागदावरच अस्तित्वात होती.
यात पाकिस्तानचे नेते नवाझ शरीफ, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे जवळची व्यक्ती, आणि इतर काही देशांमधल्या राष्ट्रप्रमुखांचीही नावं होती.
भारतातल्या जवळपास 500 लोकांची नाव यात आली. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर तत्कालीन सरकारने यासाठी एक टास्क फोर्सही स्थापन केला होता.
हे पनामा पेपर्स कोणी लीक केले याबद्दल अजूनही ठोस माहिती नाही. मोझॅक फॉन्सेस्काने म्हटलं त्यांच्या सर्व्हर्सला हॅक केलं गेलं.
लीक झालेल्या कागदपत्रांची संख्या दीड कोटीहून जास्त होती. या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी जगभरातल्या 107 माध्यमसंस्था एकत्र आल्या. यात भारतातून इंडियन एक्सप्रेस ही संस्था होती.
या माध्यमसंस्थांच्या प्रतिनिधींनी मिळून एक वर्ष अभ्यास केला आणि इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ जर्नालिस्ट यांच्या माध्यमातून आपले निष्कर्ष जगासमोर मांडले.
मोझॅक फॉन्सेस्काने म्हटलं होतं की ते गेली 40 वर्षं कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर एकदाही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
करचोरी कशी होते?
बीबीसीचे व्यापारविषयक घडमोडींचं वार्तांकन करणारे जॉन्टी ब्लूम सविस्तर पण उलगडून सांगतात.
खोट्या नावाने काही कंपन्या सुरू केल्या जातात. त्यांना शेल कंपनी असं म्हटलं जातं. वरवर पाहिलं तर वाटतं की त्या कायद्याच्या कक्षेत राहून आपले व्यवहार करतायत पण प्रत्यक्षात काहीच घडत नसतं.
त्या कंपन्या काहीच करत नाही, फक्त पैसे इकडचे तिकडे होतात. हा पैसा कुठून आलाय, कोणाचा आहे हे पण या कंपन्या लपवतात. या कंपनीचे मॅनेजर असतात, वकील असतात, अकाउंटंट असतात अगदी ऑफिसची स्वच्छता करणारे लोकही असतात पण प्रत्यक्षात ते काही करत नसतात.

फोटो स्रोत, iStock
फक्त कागदावर सही करायला आणि लेटरहेडवर आपलं नाव नाव वापरायची परवानगी देण्याव्यतिरिक्त ते काही करू शकत नाहीत.
जेव्हा चौकशीसाठी आलेले अधिकारी हे शोधायचा प्रयत्न करतात की नक्की हा पैसा कोणाचा आहे, कंपनी कोण चालवतंय तेव्हा त्यांना सांगितलं जातं की कंपनीची मॅनेजमेंट सगळं पाहतेय, पण मॅनेजमेंट तर फक्त कागदावरच असते.
देशाच्या बाहेर पैसा ठेवायचा ट्रेंड का?
तुमच्या मालकीची शेल कंपनी असेल तर ती तुमच्याच देशात असायला हवी असं बिलकुल नाही. कारण तुमच्या देशातल्या शेल कंपनीचा पत्ता लावणं तपासयंत्रणांना सोपं जातं.
त्यामुळे अशा देशात शेल कंपनी असणं गरजेचं आहे ज्यांना 'चोरांचा स्वर्ग' म्हटलं जातं. जगातले लहान देश सहसा अशा जागा असतात. इथल्या बँकांमध्ये खुप गुप्तता पाळली जाते. इथे करही खूप कमी असतो.
इथे मिळणाऱ्या आर्थिक सुविधा कायदेशीर असतात. त्यामुळे करचुकवेगिरी करणाऱ्यांना पनामा किंवा ब्रिटिश व्हर्जिन आयलंड किंवा मकाऊसारख्या जागा आकर्षित करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









