नागालँड हिंसाचार : 70 वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनामागचा इतिहास काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुबीर भौमिक
- Role, कोलकाता
भारतीय सैन्याच्या गोळीबारामुळे 14 नागरिक मारले गेल्यानंतर नागँडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. प्रशासनाने इथलं इंटरनेट बंद केलंय आणि मोठ्या प्रमाणात निदर्शनं होऊ नयेत म्हणून कर्फ्यूही लावण्यात आलाय.
शनिवारी (4 डिसेंबर) नागालँडच्या मोन जिल्ह्यात सैन्याच्या एका गस्ती पथकाने मजुरांच्या एका गटावर कट्टरतावादी असल्याच्या समजातून गोळीबार केला. यामध्ये 6 जण मारले गेले.
चुकीची व्यक्ती असल्याच्या समजातून हे घडल्याचं स्पष्टीकरण सैन्याने दिलंय. पण स्थानिकांनी मात्र हा दावा फेटाळून लावलाय.
या घटनेनंतर या भागात तैनात असलेल्या सैनिकांसोबत स्थानिक गटांची झटापटही झाली. यामध्ये भारतीय सेनेच्या जवानासोबतच इतर 7 जणांचा मृत्यू झाला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
रविवारी (5 डिसेंबर) आंदोलकांनी सेनेच्या एका छावणीवर हल्ला केला यातही एका नागरिकाचा मृत्यू झाला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेमुळे 'अतीव दुःख' झाल्याचं म्हटलंय, तर नागालँडच्या राज्य सरकारने या प्रकरणाचा विशेष तपास पथक - SIT द्वारे तपास करण्याचं आश्वासन दिलंय.
गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा हिंसाचार
हिंसाचाराची ही घटना नागालँडमधल्या गेल्या काही वर्षांतल्या मोठ्या घटनांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यात कट्टरतावाद आणि जातीय हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी इथल्या निरपराध लोकांना चुकीच्या पद्धतीने लक्ष्य केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच घटना नाही.

फोटो स्रोत, CAISSI MAO
4 डिसेंबरला म्यानमारजवळच्या सीमेवर ही घटना घडली तेव्हा भारतीय सेनेच्या सोबत काम करणाऱ्या आसाम रायफल्स या अर्धसैनिक (Para Military) दलाचे सैनिक कट्टरपथीयांच्या विरोधात एक मोहीम राबवत होते.
या भागात कट्टरवादी लपून बसल्याची 'विश्वसनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती' मिळाल्यामुळेच हे सैनिक कारवाई करत होते, असं भारतीय सैन्याने म्हटलंय. अनेकदा लपून बसलेले हे कट्टरवादी हल्ला करून म्यानमारमध्ये घुसत असल्याचं सैन्याचं म्हणणं आहे.
दर आठवड्याला सुटीसाठी आपल्या घरी जाणाऱ्या कोळसा खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रकवर सैनिकांनी गोळीबार केला.
कोणतंही कारण नसताना हा गोळीबार करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. पण या कामगारांनी सहकार्य करायला नकार दिल्याने ते कट्टरतावादी असल्याचा संशय आला आणि तेव्हा गोळीबार केल्याचं सैनिकांचं म्हणणं आहे.
चुकीची ओळख
या व्यक्ती कोण आहेत याबाबत गैरसमज निर्माण झाल्याने हा गोंधळ झाल्याचं सैन्याचं म्हणणं आहे.
याबद्दल संरक्षण विषयक विश्लेषक जयदीप सैकिया म्हणतात, "हे खरंच चुकीच्या समजातून घडलेलं प्रकरण आहे. म्हणून रविवारी जेव्हा संतापलेल्या स्थानिकांच्या एका गटाने एका छावणीला आग लावली तेव्हा सैन्याने संयम बाळगला आणि गोळीबार केला नाही."

फोटो स्रोत, Getty Images
पण अशा प्रकारे गैरसमज तयार होणं हे गोपनीय सूत्रांकडून ठोस माहिती नसल्याचं लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे कट्टरतावाद्यांच्या विरोधातल राबवण्यात येणाऱ्या मोहिमेविषयीही प्रश्न निर्माण होतात. 'त्यांचा हेतू नागरिकांची हत्या करणं आणि त्यांना जायबंदी करण्याचा होता, हे स्पष्ट आहे,' असं नागालँड पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय.
ईशान्य भारताविषयी लेखन करणारे संजय हजारिका सांगतात, "हे भयंकर आणि अपमानकारक आहे."
आफ्स्पा (AFPSA) कायद्याखाली सुरक्षा यंत्रणांना मिळालेलं संपूर्ण संरक्षणं हे या अशांत भागाला न्याय मिळण्याच्या मार्गातला मुख्य अडथळा असल्याचं त्यांचं मत आहे.
आफ्स्पा म्हणजे सशस्त्र सैन्य विशेषाधिकाय कायदा हा वादग्रस्त कायदा आहे. या कायद्यानुसार सुरक्षा दलांना कट्टरवाद्याच्या विरोधात कारवाई करताना झडती घेण्याचा, जप्त करण्याचा अधिकार मिळतो. एखाद्या कारवाईदरम्यान चुकीमुळे किंवा परिस्थितीची गरज म्हणून नागरिकाला मारणाऱ्या सैनिकांनाही हा कायदा संरक्षण देतो.
या कायद्याचा अनेकदा दुरुपयोग केला जात असून यामुळे अनेक चुकीच्या हत्या झाल्याचं टीकाकार म्हणतात.
स्वातंत्र्यासोबतच सुरू झालेला संघर्ष
1950 च्या दशकापासून नागालँडमध्ये एक सशस्त्र संघर्ष सुरू आहे. नागा लोकांचा स्वतःच एक स्वायत्त प्रदेश असावा अशी या आंदोलनाद्वारे मागणी करण्यात येत आहे. यामध्ये नागालँडसोबतच आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या शेजारच्या राज्यांसोबतच म्यानमारमधले नागा लोकसंख्या असणारे प्रदेश सहभागी आहेत.
'नागा नॅशनल काऊन्सिल' या सर्वात मोठ्या नागा आंदोलक गटाने 1975मध्ये एका करारनंतर आत्मसमर्पण केलं. पण 'नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड' (NSCN) या दुसऱ्या एका गटाने या करारावर टीका केली आणि आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. चीनमधून प्रशिक्षण आणि हत्यारं मिळणाऱ्या योद्ध्यांचा NSCN मध्ये सहभाग होता.
पण टी. मुईवा यांच्या नेतृ्त्त्वाखालच्या NSCNच्या मुख्य गटाने 1997मध्ये युद्धविरामाची तयारी दाखवत केंद्र सरकारसोबत चर्चेला सुरुवात केली होती.

फोटो स्रोत, CAISSI MAO
2015 साली कराराच्या एका मसुद्यावर दोन्ही पक्षांच्या सहमतीने सह्या करण्यात आल्या. अंतिम करारासाठी हा मसुदा आधार मानला गेला. पण वेगळा झेंडा आणि वेगळी घटना या मागण्यांमुळे ही चर्चा अजूनही अडकलेली आहे. भारत सरकार आंदोलकांच्या या मागण्या ऐकायला तयार नाही.
भारतीय सैनिक NSCNच्या दुसऱ्या गटातल्या लोकांचा शोध घेत असताना 4 डिसेंबरची घटना घडली. या गटाचा मुईवा गटाच्या केंद्र सरकारसोबतच्या चर्चेला विरोध आहे आणि म्यानमारमधल्या सागिंगमधल्या तळांवरून हे गट हल्ले करतो.
म्यानमारच्या सीमेवर अनेक आंदोलक गट सक्रिय
भारत आणि म्यानमारदरम्यान 1,636 किलोमीटर्सची सीमा आहे. यात बहुतेक डोंगराळ भाग आहेत आणि इथे दोन्ही बाजूला अनेक फुटीरतावादी विद्रोही संघटनांचे तळ आहेत.

फोटो स्रोत, AFP
नागालँडच्या शेजारच्या मणीपूरमध्ये सक्रिय असणारा पीपल्स लिबरेशन आर्मी हा त्यापैकीच एक गट. PLA ने गेल्या महिन्यात आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये लष्कराचे एक कर्नल, त्यांची पत्नी आणि लहान मुलासह चार सैनिक मारले गेले होते.
लष्कराच्या जवानांना त्यांच्या कमांडरच्या हत्येचा बदला घ्यायचा होता, असं काही लोकांचं म्हणणं आहे
तर बळाचा वापर करून या प्रदेशावर वर्चस्व मिळऴण्याचा प्रयत्न करणं चुकीचं असून फुटीरतावाद्यांशी लढण्याची लष्कराची रणनीती आता जुनी झाली असल्याचं काहींचं म्हणणं आहे. विश्वसनीय माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळण्यासाठी सैन्याने तिथल्या लोकांची मन आणि विचार दोन्ही जिंकून घेण्याची गरज असल्याचं या लोकांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








