बिग बॉस-अभिजीत बिचुकले: थेट सलमान खानविरोधातच थोपटले दंड

अभिजीत बिचुकले

फोटो स्रोत, ABHIJIT BICHUKALE/FACEBOOK

बिग बॉस हिंदी मधून अभिजीत बिचुकले अखेर घराबाहेर पडले घराबाहेर आल्यानंतर त्यांनी सलमान खान वर आपला राग व्यक्त केला. सलमान कार्यक्रमा दरम्यान खूपच पर्सनल झाला होता, असं बिचुकलेंचं म्हणणं आहे.

बिग बॉस च्या फायनल भागाचे निमंत्रण आल्याने आताच या विषयावर वक्तव्य करणार नाही मात्र लवकरच आपण याबाबत पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचंही बिचुकले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत अनेक निवडणुका लढवणाऱ्या अभिजीत बिचुकले यांनी बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती. त्यांच्यासोबत अभिनेत्री रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्य या देखील वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून बिग बॉसच्या घरात आले होते.

शनिवारी (20 नोव्हेंबर) 'वीकेंड का वार स्पेशल'ला आलेले अभिनेते महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत हे तीन नवीन स्पर्धक मंचावर आले.

मंचावर आल्यावर स्वतःची ओळख करून देताना अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं की, मी आर्टिस्ट आहे, लेखक आहे, कवी, गायक आहे. आणि एके दिवशी मी देशाचा पंतप्रधानही होईन.

या घरात संस्कार कमी आहेत, असंही अभिजीत यांनी म्हटलं. जिथं संस्कार नाहीत तिथे तुम्ही का आला आहात, असं देवोलिनानं विचारल्यावर अभिजीत यांनी म्हटलं की, संस्कार शिकवायला.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. साताऱ्याचे असलेल्या बिचुकले यांनी पोलिसांनी बिग बॉसच्या घरामधूनच अटक केली होती. महिनाभर कोठडीत राहिल्यानंतर अभिजित यांची पुन्हा बिग बॉस हाऊसमध्ये एन्ट्री झाली.

2015 मध्ये हा खटला दाखल करण्यात आला होता. बिचुकले यांच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आवटी यांनी त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तिघांचे पथक मुंबईत दाखल झाले आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने त्यांना 21 जूनला गोरेगाव परिसरात बिग बॉस मराठीच्या घरातून म्हणजे स्टुडिओतून बिचुकले यांना अटक करण्यात आली होती.

कोण आहेत अभिजीत बिचुकले?

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले बिचुकले सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. पण गेली काही वर्षं ते राजकारणात नशीब आजमावताना दिसत आहेत. 2004 पासून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आतापर्यंत नगरपालिका ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावलं आहे. सातारा शहरात गुरुवार पेठ परिसरात बिचुकले राहतात.

अभिजीत बिचुकले

फोटो स्रोत, Facebook/Abhijit Bichukale

बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. पण आजवर एकही निवडणूक ते जिंकू शकले नाहीत. तरीही 2019 च्या लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याचं बॅनर सातारा इथं लावलं होते. '2019चा मुख्यमंत्री मीच ठरवणार' असंही या बॅनरवर लिहिलं होतं.

अभिजीत बिचुकले यांच व्यक्तिमत्त्व नेमकं कसं आहे? हे जाणून घेताना सातारा इथले स्थानिक पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांनी दहा वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगितला. 2009 साली उदयनराजे भोसले पहिल्यांदाच खासदार झाले. त्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या उदयनराजेंच्या विरोधात अभिजित बिचुकलेंनी एक याचिका दाखल केली होती.

बिचुकलेच्या एका तक्रारीमुळे जिल्हा प्रशासनाचे निवडणुकांचे गणित कोलमडलं होतं. न्यायालयीन प्रक्रियेमुळे सर्व ईव्हीएम आणि त्यातील अंतर्गत प्रणाली सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवावी लागणार होती. त्याचा वापरच करता येणार नव्हता. दुसरे ईव्हीएम उपलब्ध करणे अशक्य होते. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी आंध्र प्रदेशहून ईव्हीएम मागवून घ्याव्या लागल्या होत्या. अर्थात बिचुकलेंची तक्रार चहाच्या पेल्यातील वादळ ठरलं होतं, असं मोहन पाटील सांगतात.

अभिजित बिचुकले यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र एकाही निवडणुकीत त्यांना यश मिळालेलं नाही. पण निवडणुकीला उभं राहणं आणि प्रचाराच्या पद्धतीने ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

'महाराष्ट्राचा 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरविणार..!' अशा आशयाचे बॅनर साताऱ्यात पाहायाला मिळाले. त्यावर बिचुकले यांच्या अतिआत्मविश्वासाची खिल्ली उडवली गेली. सातारा पालिकेतील एक कर्मचारी, लोकसभा उमेदवारी ते 'बिग बॉस-2' पर्यंतचा त्यांचा प्रवास अनाकलनीय म्हणावा लागेल, असंही मोहन पाटील यांना वाटतं.

अभिजीत बिचुकले

फोटो स्रोत, ABHIJIT BICHUKALE/FACEBOOK

'कवी मनाचा नेता अशी स्वतःची ओळख सांगणारे बिचुकले आपल्या पत्नी अलंकृता यांची ओळख 'बेळगाव, कारवार-निपाणीसह अखंड महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब' अशी करून देतात असं त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितलं.

बिचुकलेंची राष्ट्रपती पदासाठी मागणी

नगरसेवक ते खासदार निवडणूक लढवणारे अभिजित बिचुकले यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राची अजूनही चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती पदासाठी पत्र लिहून 'भारताचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही माझेच नाव घोषित करावे,' अशी विनंती केली होती.

सांगली इथं पंतगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम यांच्या बिनविरोध निवडीपेक्षाही विरोधी उमेदवार म्हणून बिचकुलेंच्या माघारीचीच चर्चा सर्वाधिक झाली.

अभिजित बिचुकले यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, अभिजित बिचुकले यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र

साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शब्द अंतिम असला तरी त्यांचा बिचुकले त्यांचा विरोध करताना दिसतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उदयनराजे यांनी आपण फक्त बिचुकले यांना घाबरतो अशी मिश्कील टिप्पणी केली होती.

अभिजित बिचुकलेंनी एकदा सातारा इथून स्वतः तर सांगलीतून पत्नी अलंकृता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. पण सांगलीतील अर्ज भरताना डिपॉजिट म्हणून त्यांनी चक्क साडेबारा हजार रुपयांची चिल्लर दिली आणि ती मोजताना अधिकाऱ्यांना घाम फुटला होता, असं मोहन पाटील सांगतात.

अभिजीत बिचुकले यांनी 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील निवडणूक लढवली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)