Family Planning : 'हो, मी पुरुष आहे आणि 2 मुलींच्या जन्मानंतर मी नसबंदी केली, कारण...'

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
"मीच नसबंदी करायची ठरवली, कारण मिसेसची डिलिव्हरी सिझेरियन झाली होती. दोन्ही डिलिव्हरच्या वेळेस जो काही पेन आहे, तो तिनं भोगला होता. त्यामुळे मग मीच नसबंदीची शस्त्रक्रिया करायचं ठरवलं."
परभणीतील डॉक्टर पवन चांडक सांगत होते.
भारतामध्ये कुटुंब नियोजनात पुरुषांच्या नसबंदीचं प्रमाण केवळ 0.3 टक्के इतकं आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे पुरुष नसबंदी करण्यासाठी तयार होत नाहीत. तरीही परभणीतल्या डॉ. पवन चांडक यांनी 2017च्या मे महिन्यात नसबंदी करून घेतली.
परभणीत आम्ही त्यांच्या कॉलनीमध्ये पोहोचलो तेव्हा ते आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी सायकलवर आले. ते पुढे सायकल चालवत होते आणि मागे आमची गाडी जात होती.
डॉक्टर फक्त सायकलनं प्रवास करतात, असं मला माझ्यासोबत असलेल्या स्थानिक मित्रानं सांगितलं. डॉक्टरांचं व्यवस्थित सायकल चालवणं जणू कृतीतून नसबंदीबद्दलच्या गैरसमजांना प्रत्युत्तर देत होतं, असा विचार मनात आला.
पण, 4 वर्षांपूर्वी नसबंदीचा निर्णय घेणं, त्यांच्यासाठी सोपं अजिबात नव्हतं. पत्नी आणि कुटुंबीयांना विश्वासात घेतल्यानंतरही वंशाला दिवा हवा, असे सल्ले त्यांना मिळाले. मुलासाठी एकप्रकारे सामाजिक दबाव त्यांच्यावर होता.
ते सांगतात, "माझा एक मेहुणा मला म्हणाला होता की, थांब ना यार. तू उगच घाई केलीस. तिसऱ्या मुलासाठी चान्स घेतला असता आपण. जिंतूरला अमुकअमुक डॉक्टर देतात मुलासाठी आयुर्वेदिक औषधी. घेतलं असतं तर आपल्याला मुलगा झाला असता.
"अजून एक मित्र आहेत पाथरीचे. त्यांचं म्हणणं होतं की आपला समाज आधीच अल्पसंख्याक आहे. अशापरिस्थितीत तू दोन मुलींवरच निर्णय घेणं चुकीचं आहे. किमान एक मुलगा व्हायला पाहिजे होता. किमान आपल्या घरात एक तरी वंशाला दिवा पाहिजे, मुलगा पाहिजेच."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
डॉ. पवन चांडक यांचं वय 39 आहे आणि त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर "आज ज्यांच्या घरात वंशाचा दिवा आहे, तो काय दिवे लावत आहे, ते आपण पाहतच आहोत."
त्यामुळे डॉक्टर त्यांच्या विचारावर ठाम राहिले आणि सरकारी दवाखान्यात नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली.
ते सांगतात, "शस्त्रक्रिया एकदम सिंपल होती. 10 मिनिटांची प्रक्रिया होती. एक छोटासा छेद घेतात आणि त्यातून ही प्रोसिजर पार पाडतात. त्यानंतर एक-दोन तासात त्यांनी मला सुट्टी दिली.
"नसबंदी शस्त्रक्रिया केली त्या दिवशी संध्याकाळीच मी माझ्या क्लिनिकला आलो. स्वत: स्कुटी चालवत क्लिनिकला आलो. माझं क्लिनिक एक दिवसही बुडालं नाही. माझ्या ज्या रुटीन अक्टिव्हिटी होत्या, त्या पूर्णपणे चालू होत्या, कुठेही बंद नव्हत्या."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
नसबंदी करून डॉक्टर तिथंच थांबले नाहीत. पुरुषांच्या नसबंदीविषयी अनेक गैरसमज आहेत आणि याविषयी लिहायला हवं, असा सल्ला वडिलांनी त्यांना दिला.
तो डॉक्टरांनाही पटला आणि त्यांनी लिखाण सुरू केलं. त्यांच्या या लिखाणाला चांगला प्रतिसादही मिळाला.
ते सांगतात, "मला त्या महिन्याभरात अनेक जणांचे फोन कॉल्स आले, ईमेल्स-एसएमएस आलेत. काही जण नाव न सांगता, त्यांच्या मनातील शंका विचारत होते. मी त्यांना बेधडक उत्तर द्यायचो. माझ्या समाजातील दोन-चार मित्र आहेत, त्यांनीही ही शस्त्रक्रिया केली."
तेव्हापासून आजतागायत डॉक्टर पुरुषांची नसबंदी या विषयावर सातत्यानं लिखाण करत आहेत.
पुरुषांच्या नसबंदीबाबत अनेक गैरसमज आहेत. जसं की नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यास पुरुषाच्या पुरुषत्वावर परिणाम होतो किंवा तो अवजड काम करू शकत नाहीत.
डॉ. पवन चांडक यांचा गेल्या 4 वर्षांतल्या याविषयीचा अनुभव विचारल्यावर ते सांगतात, "नसबंदी केलेल्या पुरुषाला जड कामं करता येत नाही असा गैरसमज आहे. आता मला सांगा, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर मी माझी रोजची 40 किलोमीटर सायकलिंग आहे ती करायला लागलो.
"शस्त्रक्रियेच्या तीन आठवड्यानंतर मी माझी सायकलिंग पुन्हा सुरू केली. मी एका तासात 10 ते 11 किमी पळतो. ती स्पीड रिझ्यूम केली. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर माझा आज जवळपास 40 हजार किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण झाला आहे.
"दुसरी गोष्ट वैवाहिक जीवनात काहीही त्रास होत नाही. विनाकारण गैरसमज पसरवण्यात आलेला आहे की, तुमचं सेक्शुअल लाईफ धोक्यात येतं, असं काहीही नाही. ते पण एकदम व्यवस्थित, सुरळीत चालू आहे."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
पुरुषाची नसबंदी ही स्त्रीच्या नसबंदीपेक्षा तुलनेनं सोपी आहे. असं असतानाही गैरसमज आणि सामाजिक भीतीपोटी जी पुरुष मंडळी नसबंदी करायला तयार होत नाहीत, त्यांना डॉक्टर सांगतात,
"आपली बायको गर्भाला 9 महिने तिच्या पोटात वाढवते. आपली भूमिका काय असते? आपला संबंध फक्त एका रात्रीचाच होता ना? पण ती बाई त्या बाळाला 9 महिने 9 दिवस वाढवते, बाळंतपणात बाळाला जन्म देताना होणाऱ्या कळा सोसते, बाळंतपणात आरोग्यातील चढ-उतार अनुभवते. मग मला सांगा, आज ती आपल्यासाठी एवढं करते.
मग साधी पुरुष नसबंदीसारखी सिंपल गोष्ट आपण का नाही करू शकत? मला वाटतं बायकोला जीवनभर देण्यासाठी हे एक छानसं गिफ्ट आहे, ते म्हणजे तुम्ही पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करा."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








