कर्नाटक दलित अत्याचार : 'इथे उच्चवर्णीयांचेच केस कापले जातात', असं सांगत दलित तरुणांना मारहाण

हनुमंता

फोटो स्रोत, Hanumantha

फोटो कॅप्शन, हनुमंता
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बंगळुरूहून, बीबीसी हिंदीसाठी

"तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला जिवंत पेटवून देऊ, अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली. आम्ही कुठेही राहिलो, काहीही केलं तरी आम्हाला कायमच धोका असेल. त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला."

कर्नाटकच्या एका गावात गेल्या सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या हनुमंता यांचे हे शब्द आहेत. आत्महत्येचा विचार का आला, याचं उत्तर देताना त्यांनी ही उद्विग्नता व्यक्त केली. 27 वर्षीय हनुमंता यांच्यासह त्यांचा 22 वर्षांचा पुतण्या बसवा राजू यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण दोघंही त्यातून बचावले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वादातून हनुमंता आणि राजू यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तो वाद केस कापण्यावरून सुरू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे.

कर्नाटकमधील कोप्पल जिल्ह्यात असलेल्या होसाहळ्ळी गावातील ही घटना आहे. तो रविवारचा दिवस होता. केस कापणाऱ्याने त्यांना सर्वांत आधी विचारलं, "तुम्ही इथं का आला आहात? आम्ही फक्त लिंगायतांचेच (उच्चवर्णीय आणि गावात दबदबा असलेली जात) केस कापतो. ही जागा होलेयांसाठी (दलित समुदाय) नाही."

या प्रकारानंतर गावातील लोक घराबाहेर आले.

हनुमंता यांनी याबाबत पुढं सांगितलं, "ते आमच्यावर ओरडायला लागले - तुम्ही इथं कशासाठी आला आहात? ही आमची जागा आहे. आमची खासगी जागा आहे. आम्ही केस का कापू शकत नाही, असं विचारल्यावर त्यांनी आम्हाला धक्काबुक्की सुरु केली आणि नंतर आम्हाला खूप मारलं."

"आमच्या तुलनेत त्यांची संख्या खूप जास्त होती. आम्ही दोघंच होतो आणि ते 20 पेक्षाही जास्त होते. आम्ही त्यांना तक्रार करू असं म्हटलं तर, जे करायचं ते करून घे, असं ते म्हणाले."

हनुमंता यांनी जे काही सांगितलं ते एका व्हिडिओवरुनही सिद्ध होतं. ही घटना घडली तेव्हा शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

बीबीसी बरोबर बोलताना हनुमंता म्हणाले , "आमच्यातील एका मुलानं घटनेचा काही भाग मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केला होता."

दलितांची केवळ 20 घरं, लिंगायतांची 500

हनुमंता आणि बसवाराजू दोघंही एकाच गावात राहतात. आपण दलित कॉलनीमध्ये राहत असल्याचं हनुमंतानं सांगतात.

इथे दलितांची केवळ 20 घरं आहेत. तर लिंगायतांची 500 घरं आहेत. गावात मुस्लिमही राहतात पण त्यांची लोकसंख्या फार जास्त नाही आणि ते कशातही हस्तक्षेपही करत नाहीत.

व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट

फोटो स्रोत, Hanumantha

फोटो कॅप्शन, व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट

हनुमंता आणि त्यांचा पुतण्या हे दोघं आधी केस कापण्यासाठी जवळच्या येलबुर्गा तालुक्यामध्ये गेले होते. पण तिथे लॉकडाऊनमुळं सर्वकाही बंद होतं. त्यामुळं ते गावामध्ये परतले आणि एका मोठ्या घराजवळ केस कापणाऱ्या व्यक्तीकडे गेले.

कोप्पलचे पोलिस अधीक्षक टी. श्रीधर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "या दोन तरुणांना केस कापायचे होते आणि त्याच विषयावरून हा वाद सुरू झाला. ज्याचं घर होतं त्यानं म्हटलं की, केस कापणारे ज्याठिकाणी केस कापत आहेत ते त्यांचं घर आहे, इथे या दोघांचा (हनुमंता आणि बसवाराजू) काही संबंध नाही."

मुद्दा किरकोळ नाही

केस कापण्याचा हा मुद्दा अगदीच 'किरकोळ' वाटत असला तरी प्रत्यक्षात तसं नाही.

रायचूर येथील दलित संघाचे एम. आर. भेरी यांनी बीबीसी बरोबर बोलताना याबाबत माहिती दिली, "गावामध्ये दलितांसाठी केस कापणं ही एक समस्याच बनली आहे. मागासवर्गीयांमध्ये मोडत असलेल्या न्हावी समाजातील केस कापणाऱ्यांना, त्यांनी जर दलितांचे केस कापले तर इतर गिऱ्हाईकं त्यांच्याकडं येणार नाही, अशी चिंता असते."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Arun Sharma/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

एक काळ होता जेव्हा एकाच विहिरीतून पाणी भरण्यावरुन वाद होत होते, याचीही आठवण यावेळी भेरी यांनी करून दिली.

ते म्हणाले की, "जेव्हा नळाद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू झाला तेव्हा ही समस्या संपुष्टात आली. पण जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं, तर बहुतांश ग्रामीण भागांमध्ये अजूनही हॉटेलमध्ये दलितांना पाणी किंवा चहा हा प्लास्टिकच्या कपमध्येच दिला जातो. पण उच्चवर्णीय किंवा दबदबा असलेल्या जातीतील लोकांना वेगळी वागणूक मिळते."

केस कापणाऱ्यांप्रमाणेच मागास वर्गातील इतर लोक आणि मुस्लिम समाजातील लोक एकतर गावातील उच्चवर्णीयांच्या पाठिशी असतात किंवा त्यांनी मौन बाळगलेलं असतं.

यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना

दलित संघाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायचूर जिल्ह्यामधील मान्वी तालुका, बगलकोट जिल्ह्यातील हुंगुंड तालुका आणि इतर ठिकाणीही अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

म्हैसूर जिल्ह्याच्या नांजंगुड तालुक्यात डिसेंबर 2020 मध्ये नायक समुदायानंही अशाच प्रकारे आक्षेप घेतला होता. नायक समुदाय हा अनुसूचित जमातींमध्ये मोडतो. पण म्हैसूर जिल्ह्यात हा समुदाय वर्चस्व आणि दबदबा असलेला समुदाय आहे. गावातील इतर मागास जातींच्या लोकांनीही तेव्हा नायक समुदायाला पाठिंबा दर्शवला होता.

भेरी सांगतात की, "या कारणामुळेच दलित समुदायातील तरुणांना शहरात जाऊन केस कापण्याचा सल्ला दिला जातो. तिथं भेदभाव होत नाही. पण दलित तरुणांमध्ये होत असलेल्या जनजागृतीमुळे आता ते अशा जुन्या प्रथा, परंपरांवर प्रश्न उपस्थित करत आहेत."

हनुमंता आणि त्याच्या पुतण्याला झालेल्या मारहाण प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच अनुसुचित जाती आणि जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, प्रत्यक्ष स्थितीचं वर्णन करताना हुनमंता सांगतात की, "दलित आजही गावामध्ये इकते-तिकडे फिरू शकत नाहीत. इतर समुदायाचे लोक आमच्याशी बोलत नाही. आम्ही रोजंदारीवर जगणारे, शेतात मजुरी करणारे लोक आहोत. त्यामुळे कामासाठी आमच्या समुदायाचे लोक आता शेजारच्या गावांमध्ये जायला लागले आहेत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)