ONGC नं तौक्ते चक्रीवादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं? P305 बुडण्यामागे दोषी कोण?

फोटो स्रोत, defence pro
- Author, जान्हवी मुळे आणि अमृता दुर्वे,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मुंबईजवळच्या समुद्रात P 305 हा बार्ज बुडाला आणि किमान 60 जणांचा मृत्यू झाला तर 186 जणांना नौदलानं सुरक्षित बाहेर काढलं. पण हे जहाज तौक्ते चक्रीवादळ आलेलं असताना भर समुद्रात काय करत होतं, असा प्रश्न निर्माण झालाय.
या जहाजाबरोबरच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ONGC च्या प्रकल्पांवर काम करणारी एकूण चार जहाजं 600 हून अधिक कर्मचाऱ्यांसह समुद्रात भरकटली होती.
काय चुकलं आणि ही दुर्घटना कशामुळे घडली, हे शोधून काढण्यासाठी आता केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयानं उच्चसदस्यीय समिती स्थापन केली आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष?
हवामान खात्यानं 11 मे रोजी संध्याकाळीच अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका असल्याचं जाहीर केलं होतं आणि 15 मे पर्यंत सर्व बोटींनी किनाऱ्यावर यावं अशी सूचना केली होती. तटरक्षक दलानं दिलेल्या माहितीनुसार चार हजारांहून अधिक मच्छीमारी करणाऱ्या बोटी बंदरात परतल्या होत्या.
ओएनजीसीला सगळी जहाजं बंदरात सुरक्षित ठिकाणी आणावीत, असा इशारा तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. 11 मे आणि 13 मे रोजी तशी सूचना करण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसचं हे वृत्त सांगतं.
पण या इशाऱ्यांनंतरही P-305 हे जहाज समुद्रातच होतं आणि बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला (ऑईल रिग) बांधून ठेवण्यात आलं होतं.
वादळाच्या तडाख्यात तिथून सुटून हे जहाज पाण्यात भरकटू लागलं आणि पुढची दुर्घटना घडली, असं जहाजावरील वाचलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.
हे जहाज किनाऱ्यावर न आणता एका प्लॅटफॉर्मला बांधून ठेवण्यात आलं होतं, यावरही तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, defence pro
'दास ऑफशोअर' चे संस्थापक आणि सागरी अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारे अशोख खाडे सांगतात,
"चक्रीवादळाचा इशारा आहे, वाऱ्याचा वेग एवढा जास्त असण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत समुद्रातील तेल उत्खनन करणाऱ्या प्लॅटफॉर्मजवळ कुठलीही हेलकावे खाईल अशी गोष्ट ठेवू नये असा नियम आहे. कारण ती प्लॅटफॉर्मला धडकण्याचा आणि त्यातून मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतो."
जेव्हा पहिली सूचना मिळाली, तेव्हाच जहाज किनाऱ्यावर आणलं असतं, तर कोणाचाच जीव गेला नसता, असं खाडे यांना वाटतं.
दास ऑफशोअरचे तीन बार्जही गेल्या आठवड्यात समुद्रात होते, पण वादळाचा इशारा मिळाल्यावर ते किनाऱ्यावर परतले होते. अशोक खाडे सांगतात, "माझा एक बार्ज अफकॉनसोबत आणि दोन L&T कंपनी सोबत काम करत होते. एलएनटीला जसा इशारा मिळाला, तसं ते तिथून निघाले आणि सुरक्षित स्थळी नांगर टाकून थांबले. त्यांना काहीच झालं नाही."
15 मे नंतरही जहाज समुद्रात का राहिलं?
साधारणपणे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व काळापासून समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या बोटी समुद्रात जात नाहीत.

फोटो स्रोत, defence pro
अशोक खाडे सांगतात, "15 मे हा आमच्यासाठी कामाचा शेवटचा दिवस असतो. त्यानंतर अरबी समुद्रात काम करायचं नाही, उभंच राहायचं नाही असा नियम आहे. जर काही दिवस समुद्र शांत असेल, तर आणखी काही दिवस थांबण्याची रिस्क घेतली जाते."
पण इथे 11 मे रोजी वादळाचा इशारा देण्यात आला होता. तरीही P 305 हे जहाज किनाऱ्यावर का आलं नाही? ते किनाऱ्यावर आणण्याची जबाबदारी कोणाची होती?
जबाबदारीवरून टोलवाटोलवी
P 305 हा एक निवासी बार्ज होता, म्हणजे तेलक्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय या जहाजावर करण्यात आली होती.
पण त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, यावरून टोलवाटोलवी होताना दिसते आहे. जिथे हे जहाज काम करत होतं, तो प्रकल्प ओएनजीसीचा आहे. मात्र ओएनजीसीनं या प्रकल्पाचं कंत्राट AFCONS या कंपनीला दिलं आहे, जी शापूरजी पालनजी ग्रुपमधली कंपनी आहे.
AFCONS नं हे जहाज ड्युरामास्ट या कंपनीकडून चार्टर केलेलं होतं, असं जाहीर केलं आहे.
सागरी वाहतूक आणि तेलक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते मुख्य कंत्राटदार म्हणून प्राथमिक जबाबदारी ओएनजीसीला जबाबदारी नाकारता येणार नाही.
अशोक खाडे सांगतात, "जेव्हा धोक्याची सूचना मिळाली, तेव्हाच तिथून निघायला हवं होतं. ओएनजीसीनं सर्वांना तिथून बाहेर काढायला हवं होतं. त्यांनी काय दक्षता घेतली, ओएनजीसीनं त्यांना काही सांगितलं होतं का, Afcon काही सांगितलं होतं का, हे तपासानंतरच कळेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








