कोरोना : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले 5 महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांचे अर्थ

फोटो स्रोत, Ani
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30एप्रिल) महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी तरुणांचं लसीकरण, कडक लॉकडाऊन, केंद्र सरकारकडून असलेल्या अपेक्षा, राज्य सरकार करत असलेली तयारी अशा अनेक बाबींविषयी माहिती दिली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले 5 महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांचे अर्थ आपण इथं जाणून घेणार आहोत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
1. उद्यापासून तरुणांचं लसीकरण
उद्यापासून 18-44 वयोगटातील लसीकरण जशा लशी मिळतील तसं सुरू करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पण, यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मात्र 1 मेपासून लसीकरण शक्य नाही, असं जाहीर केलं होतं.
आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, सध्या सरकारकडे फक्त 3 लाख डोसेस आहे. या महिन्यात 18 लाख डोसेस मिळतील.
आता महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेलचा विचार केला तर हे 3 लाख आणि 18 लाख डोसेस खूप कमी असल्याचं दिसून येतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 मेपासून लसीकरणाची घोषणा केली त्याप्रमाणे राज्य सरकार लसीकरण करणार असलं तरी सरकारकडे पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध नाहीयेत, हे यातून स्पष्टपणे दिसून येतं.
2. 'एक चेकने 12 कोटी डोस घेणार'
केंद्राने लसीकरण करण्याची जबाबदारी सरकारवर टाकली आहे. आपल्याला 12 कोटी डोस लागतील. पण, जीव महत्त्वाचा आहे. आपली एकरकमी पैसे देऊन लस घेण्याची तयारी आहे. यासाठी 6500 कोटींचा चेक देऊन 12 कोटी डोसेस घ्यायची तयारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
पण, उद्धव ठाकरेंना ही रक्कम एकरकमी द्यावी लागणार नाही कारण कोणतेही लस उत्पादक लगेच लस देऊ शकत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय.
आम्ही ज्यांना ज्यांना लस मागतोय, ते आम्हाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, असंह टोपे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी याविषयी बीबीसी मराठीला सांगितलं होतं, लसीकरणासाठी एक वर्ष लागेल कारण लसीचा साठा उपलब्ध नाहीये.
त्यामुळे जरी एकरकमी मदत करण्याचं मुख्यमंत्री म्हणत असले तरी तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही.
एक मात्र आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही 1 मेपासून तरुणांना लसीकरणाची घोषणा करून सामान्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images /RICARDO ARDUENGO
3. तिसरी लाट
"आपण तिसऱ्या लाटेची तयारी करतोय. जाणकार सांगत आहेत की तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट बनवतोय. खाटा वाढवतोय. दुसरी लाट एवढी मोठी येईल असं वाटलं नव्हतं. तिसऱ्या लाटेत अर्थचक्र थांबवायचं नाही.
"सगळ्या जगात लाटांमागून लाटा येत आहेत. एकूण लाटा किती येणार, हे आपण किती काळजी घेतोय यावर अवलंबून आहे. तिसरी लाट आली तरी त्याचे घातक परिणाम होऊ देणार नाही. यासाठी प्रयत्न करतोय," असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे तिसऱ्या लाटेसाठी जनतेनं मानसिक तयारी करण्याचं आवाहन केलं आहे.
4. 'कडक लॉकडाऊन नाही'
"आहे त्यापेक्षा कडक लॉकडाऊन का लावू नये, असं कोर्टाने विचारलं. पण आहे त्यापेक्षा कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही. शक्यता वर्तवली जात होती की 9-10 लाख रुग्ण आले असते. आपण माझं ऐकलं, संयम दाखवला. आपण 6-6.50 लाखांवर स्थिरावलो. रुग्णसंख्या कमी होत नाहीये, पण वाढही होत नाहीये," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यातून त्यांनी राज्यात सध्या तरी कडक निर्बंध लादले जाणार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे.
5.भाजपला टोला
"लॉकडाऊन लावत असताना काही जण म्हणत होते की लॉकडाऊन करू नका, पण आता लॉकडाऊनचा कसा फायदा झाला ते आपल्याला दिसत आहे, रुग्णसंख्या स्थिरावत आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे.
कारण लॉकडाऊन करू नका, अशी भूमिका भाजपनं घेतली होती.
"ही राजकारण करण्याची वेळ नाहीये, मी राजकीस सभा घेऊन उत्तर देईन. जे खोटं पसरवतात, त्यांना उत्तर देईन," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








