पश्चिम बंगाल निवडणूक : ममता बॅनर्जी यांना असदुद्दिन ओवेसी आणि MIMचं किती आव्हान?

ममता

फोटो स्रोत, ANI

    • Author, प्रभाकर मणी तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, मालदा/मुर्शिदाबादहून

"मुस्लिम मतदारांना अजून मत देता येत नाही. जे करायला हवं त्याच्या अगदी उलट करतात. या समाजातले लोक अजूनही मागास आहेत. आमच्यासाठी देशहित सर्वोच्च आहे. आम्ही त्यालाच मत देऊ जो देश उत्तमरित्या चालवू शकेल."

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

पश्चिम बंगालमधल्या नादिया जिल्ह्यतल्या प्लासीमध्ये हायवेलगत दुकान चालवणारे अब्दुल वहाब शेख अत्यंत खुबीने आपलं म्हणणं मांडतात. त्यांनी बरीच वर्षं आखाती देशांमध्ये कामं केलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 27 ते 30 टक्के मुस्लिम मतदारांसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.

असदुद्दीन ओवेसी यांच्याशिवाय फुरफुरा शरीफचे पिरजादा अब्बास सिद्दिकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंटसुद्धा (ISF) निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे या समाजाच्या मतदारांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे.

मात्र, हे दोन्ही पक्ष निवडणुकीत उतरले तरी फारसा फरक पडणार नाही, असं अनेकांना वाटतं. मात्र, मुस्लीम मतांमध्ये काही प्रमाणात फूट पडण्याची शक्यता असल्याचंही काहींना वाटतं.

30% मुस्लीम मतदारांचं महत्त्व

राज्यात गेल्या कमीत कमी 5 वर्षांत झालेल्या सर्वच निवडणुकीत मुस्लीम मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरलीय. याच समाजाचे मतदार सत्तेची धुरा कुणाच्या हातात जाणार, हे ठरवत असतात.

अब्दुल बहाव शेख

फोटो स्रोत, PM Tiwari/BBC

फोटो कॅप्शन, अब्दुल बहाव शेख

पूर्वी डाव्या आघाडीला या मतदारांची बरीच मदत झाली. मात्र, गेल्या दशकभरापासून या मतदारांवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा कब्जा आहे. मात्र, यावेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी ओवैसी यांचा पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांच्या उपस्थितीमुळे तृणमूल काँग्रेसची ही व्होटबँके संकटात सापडली आहे.

हुगली जिल्ह्यातली फुरफुरा शरीफ अल्पसंख्याकांचं पवित्र स्थान आहे. इतकंच नाही तर दक्षिण बंगालमधल्या जवळपास अडीच हजार मशिदींवर त्यांचं नियंत्रण आहे.

निवडणुकीच्या काळात फुरफुरा शरीफचं महत्त्व बरंच वाढतं. डावे असो, तृणमूल काँग्रेस असो की काँग्रेस सर्वच पक्षांतले नेते समर्थन मिळवण्यासाठी इथे येत असतात.

ओवेसींचा पक्ष या निवडणुकीत किती प्रभाव पाडू शकेल या प्रश्नाचं उत्तर नंतर मिळेलच. मात्र, राज्यातली जातीय गणितं बघता त्यांचं मैदानात उतरणंही खूप महत्त्वाचं असणार आहे.

2011 सालच्या जनगणेनुसार पश्चिम बंगालच्या एकूण लोकसंख्येपैकी 27.01 टक्के जनता मुस्लीम आहे. आता ही आकडेवारी 30 टक्क्यांच्या आसपास आहे.

राज्यातल्या मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर आणि दक्षिण 24 परगाना जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदारांची आकडेवारी 40 टक्क्यांहूनही अधिक आहे.

काही भागात तर ही आकडेवारी याहीपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ मुर्शिदाबादमध्ये 70 टक्के मतदार मुस्लीम आहेत तर मालदामध्ये 57% मतदार मुस्लीम आहेत.

मुर्शिदाबाद आणि मालदा मिळून विधानसभेच्या एकूण 34 जागा आहेत. हे जिल्हे बांगलादेश सीमेलगत आहेत. विधानसभेच्या 294 जागांपैकी 100 ते 110 जागांवर याच समाजातली मतं महत्त्वाची भूमिका बजावतात.

मुर्शिदाबाद-मालदाच्या मुस्लिमांचं म्हणणं तरी काय?

राज्यातलं मुस्लीम राजकारण समजून घेण्यासाठी आणि या समाजातील मतदारांच्या कलाचा अंदाज घेण्यासाठी मुर्शिदाबाद आणि मालदा सर्वोत्तम ठिकाणं आहेत. या दोन्ही ठिकाणांच्या मुस्लिमांची लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी अल्पसंख्यक हा शब्दप्रयोग चुकीचा वाटू शकतो. खरंतर या जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत.

मालदा

फोटो स्रोत, PM Tiwari/BBC

कोलकात्याहून मुर्शिदाबाद आणि मालद्यासाठी रवाना होताना सर्वांत आधी आम्ही थांबलो प्लासीमध्ये. कोलकात्याला उत्तर बंगालशी जोडणाऱ्या हायवे-34 लगत हे शहर वसलं आहे. या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

23 जून 1757 साली मुर्शिदाबादचे तत्कालीन नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धाने पुढची जवळपास 200 वर्षं देशावर इंग्रजांनी राज्य केलं.

प्लासीच्या युद्धाने देशाचं भविष्य आणि इतिहास बदलून टाकला, असं म्हणणं योग्य ठरेल. या युद्धात सिरजुद्दौला यांचा इंग्रजांच्या हातून दारूण पराभव झाला. या युद्धात त्यांचे सेनापती मीर जाफर यांनी केलेल्या विश्वासघाताची भूमिका किती महत्त्वाची होती, हे सर्व इतिहासात तपशीलवार दिलं आहे.

'इथे ओवेसींमुळे काही फरक पडणार नाही'

आखाती देशांमध्ये एका अमेरिकी कंपनीत अनेक वर्षं नोकरी केल्यानंतर आपल्या गावी परतलेले अब्दुल वहाब शेख यांचं प्लासीमध्ये किराणा दुकान आहे.

ते म्हणाले, "इथे हिंदू-मुस्लीम हा काही मुद्दा नाही. जे नेते स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलतात ते देश चालवू शकत नाहीत. त्यामुळे यावेळी मुस्लीम मतदार सर्व पर्याय लक्षात घेऊनच मतदान करेल."

मुर्शिदाबाद

फोटो स्रोत, PM Tiwari/BBC

प्लासीमध्येच मोबाईल दुकान चालवणारा तरूण मोईनुद्दीन शेख म्हणतो, "आमच्या अडचणी समजून घेऊन या समाजाच्या हिताशी संबंधित मुद्दे उचलणाऱ्यालाच यावेळी मुस्लीम मतदार मत देतील. जो उत्तम पद्धतीने शासन करण्यास सक्षम असेल, आम्ही त्यालाच मत देऊ."

प्लासीहून मुर्शिदाबादचं जिल्हा मुख्यालय असलेल्या बरहमपूरला पोहोचलो. तिथल्या लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. भागीरथी नदीकाठी वसलेल्या या शहरात अनेक समस्या आहेत.

नदीवर हायवेचा एकच पूल आहे. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन नावेतून नदी ओलांडावी लागते. त्यामुळे बरेच अपघात होत असतात.

शहरात वाहतूक कोंडीची समस्याही मोठी आहे. लोकांनाही त्याची इतकी सवय झालीय की कुणी बोलतही नाही.

शहरातल्या लालबाग भागातल्या हजारदुआरी महालात सहकुटुंब फिरायला आलेले शमसाद सांगतात, "मत कुणाला द्यायचं, हे अजून ठरवलेलं नाही. पण, कुणीही जिंकलं तरी आमच्या समस्या जैसे थेच असतात."

ओवेसी आणि ISF चं वास्तव लोकांना ठावुक असल्याचं मुस्लीम नेते आणि जिल्ह्यातल्या लालबाग मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उम्मेदवार मोहम्मद अली सांगतात.

ते म्हणतात, "धर्माच्या आधारावर फाळणी होऊनदेखील केवळ भाषेच्या मुद्द्यावर पूर्व पाकिस्तानने स्वतंत्र राष्ट्र स्थापलं. यावरूनच ऊर्दूभाषिक आणि बांगलाभाषिक मुस्लिमांमध्ये खूप फरक असल्याचं स्पष्ट होतं आणि म्हणूनच ओवेसी यांचा इथे काहीही प्रभाव पडणार नाही."

यात्री

फोटो स्रोत, PM Tiwari/BBC

बरहमपुरातल्या एका मशिदीचे मौलाना शहाजहां शेख म्हणतात, "इथे ISF चा परिणाम होणार नाही आणि ओवेसींचासुद्धा. ओवेसी यांचा पक्ष तर जेमतेम 10% लोकांना माहिती असेल. तर ISF ला एक टक्क्यांहून जास्त लोकांना माहिती नसेल."

दुसऱ्या एका मशिदीचे इमाम रकीब म्हणतात, "ओवेसी यांचा पक्ष गेल्या काही दिवसांपासून इथे सक्रीय असला तरी इथे त्यांच्या किंवा ISF चा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही. इथे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांचाच प्रभाव आहे."

'प्रभाव नाही तर ममता त्यांची चर्चा का करतात?'

जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार सुकुमार महतो यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात, "ओवेसी किंवा ISF निवडणुकीत मुद्दा नाहीत, असं इतर पक्षातले नेते म्हणत असले तरीदेखील मुर्शिदाबाद, मालदा आणि इतर मुस्लीम-बहुल भागांमध्ये हा एक मोठा फॅक्टर आहे."

तर दुसरीकडे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे जिल्हा प्रभारी असादुल शेख बंगालमध्ये आमच्या पक्षाचा प्रभाव नाही, असा दावा ममता बॅनर्जी करत असतील तर त्या प्रत्येक रॅली आमच्या पक्षाचा मुद्दा का उचलतात, असा सवाल करतात.

शेख म्हणतात, "आम्हाला रॅलीची परवानगी देण्यात येत नाही. कोलकात्यामध्ये ओवेसींनाही रॅलीची परवानगी नाकारली. पक्षाच्या नेत्यांविरोधात खोट्या केसेस का लावण्यात येत आहेत? इथे आमचा प्रभावच नाही तर ममता बॅनर्जी यांना कशाची भीती वाटतेय?"

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)