नवाब मलिकः मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रच लढावी #5मोठ्याबातम्या

नवाब मलिक

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मुंबई मनपा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रच लढावी - नवाब मलिक

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं उघड झालंय. एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना राष्ट्रवादीने मात्र एकत्रित निवडणूक लढण्याची भूमिका मांडलीय. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक म्हणाले, "राज्यात सरकार म्हणून एकत्र काम करत असताना मुंबई महापालिका निवडणूक देखील एकत्रच लढली जावी."

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही हीच भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक

फोटो स्रोत, Getty Images

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात बैठक झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली.

यावेळी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवरही नवाब मलिक यांनी भाष्य केले. "आता काँग्रेस नेते बोलत राहात आहेत, पण त्याबाबत अधिकृत चर्चा सुरु झालेली नाही. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं, पण काँग्रेसची भूमिका ते ठरवतील. पण आमची भूमिका स्पष्ट आहे," असं मलिक म्हणाले.

2. कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्रानं करावा - राजेश टोपे

कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च हा केंद्र सरकारनं करायला हवा, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. जालन्यात ते माध्यमांशी बोलत होते. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

लशीकरणासाठीच्या कोल्ड चेन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल, असा अंदाजही टोपेंनी व्यक्त केला आहे.

राजेश टोपे

फोटो स्रोत, Twitter/@rajeshtope11

दुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी मोफत लशीची मागणी केली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

"पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे, अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेदेखील केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि किमान गरीब आणि मध्यमवर्गीयांना ही लस मोफत देता येईल," असं फडणवीस म्हणाले.

3. सहकारी बँकांचे सक्तीने खासगीकरण होऊ देणार नाही - गडकरी

सहकार क्षेत्राला पाठबळ देण्याचंच केंद्र सरकारचे धोरण असून, सहकारी बँकांचे सक्तीने खासगीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Twitter/@nitin_gadkari

महाराष्ट्रातील सहकारी बँकांना केंद्र सरकारचे अर्थ आणि सहकार खाते, रिझव्‍‌र्ह बँक, नाबार्ड आणि राज्य सरकार या पातळ्यांवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारचा प्रतिनिधी या नात्याने एक दुवा म्हणून काम करण्याचे आश्वासन यावेळी नितीन गडकरी यांनी दिलं.

सहकारी बँकांनी दिल्लीतील धोरणकर्त्यांवर आपला प्रभाव किंवा वजन वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता असून खासगी बँकांबरोबर स्पर्धेला सक्षम, तसंच कायम तयार राहिलं पाहिजे, असं गडकरींनी स्पष्ट केलं.

4. औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणींचं नाव द्या - आठवले

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र सरकारनं संमत केला असताना, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेणींचं नाव देण्याची मागणी केली आहे. दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

"अजिंठा-वेरूळ या दोन्ही बौद्ध संस्कृतीच्या लेण्या असून जागतिक वारसास्थळ आहेत. आठ जागतिक आश्चर्यस्थळांपैकी एक आहेत. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला लेण्याचंचं नाव द्यावं," असं आठवलेंनी म्हटलं.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही, त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये, असंही मत आठवलेंनी मांडलं.

5. माझ्यावर हसणारे आता रडतायेत - कंगना राणावत

"जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा प्रत्येकजण माझी चेष्टा करत होते. पण आता माझे यश पाहून ते लोक रडत आहेत," असं कंगना रणावातनं ट्विटरवर म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

कंगनानं हे नेमकं कुणाला उद्देशून म्हटलंय, हे तिने लिहिले नाही. मात्र, काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्या एका ट्वीटला उत्तर देताना तिने हे ट्वीट केलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पवन खेरा यांनी कंगनाच्याच एका ट्वीटला टोमणा मारत, 2021 मध्येही करमणुकीची कमतरता नसल्याचं म्हटलं. त्यावर कंगनानं उत्तर दिलं.

पवन खेरांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगना म्हणाली, "मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा प्रत्येकजण माझ्यावर हसत होता. माझ्या बोलण्याची पद्धत, माझे केस, माझे कपडे आणि माझ्या इंग्रजीवर हे सर्व लोक हसायचे. मात्र आता ते सर्व लोक रडत आहेत आणि मी हसत आहे हा हा हा…"

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)