काँग्रेसमधल्या बदलाच्या वार्यांचा पक्षाला किती फायदा होईल?

फोटो स्रोत, Twitter
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
सध्या काँग्रेस पक्षात अनेक संघटनात्मक बदल होताना दिसतायेत. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील एच. के. पाटील यांची महाराष्ट्राच्या प्रभारी पदी निवड करण्यात आली.
19 डिसेंबर 2020 ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली.
त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदीही बदल होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी 4 जानेवारीला दिल्लीचा दौरा केल्यानंतर या चर्चा आणखी जोरात सुरू झाल्या. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चाही काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात सुरू आहे. हे खरंच असं असेल तर काँग्रेसचं राज्यातलं नवीन नेतृत्व कोण असेल? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, बाळासाहेब थोरात किंवा काँग्रेस हायकमांडकडून राजीनाम्याबद्दल अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीनं काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजिनाम्याचं वृत्त फेटाळलं. पण पक्षश्रेष्ठींनी योग्य तो निर्णय घ्यावा असं ते सांगू शकतात अशी शक्यता मात्र ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
राजीनाम्याचं कारण काय असू शकेल?
बाळासाहेब थोरात हे विद्यामान प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते आणि महसूल मंत्री आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नियमानुसार एकावेळी दोन संघटनात्मक पदांची जबाबदारी एकाच व्यक्तीला देता येत नाही. त्यासाठी बाळासाहेब थोरात यांना किमान एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळेच थोरात हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोणाची नावं चर्चेत?
बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांची नावं चर्चेत आहे. त्यामध्ये राजीव सातव, यशोमती ठाकूर, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण ही नावं चर्चेत आहेत. पण मग यामध्ये नेमकं कुणाचं पारडं अधिक जड आहे?

फोटो स्रोत, Twitter/Yashomati Thakur
हाच प्रश्न आम्ही जेष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांना विचारला. ते सांगतात, "काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे आता नवीन अध्यक्ष म्हणजे थोडक्यात राहुल गांधींचा कँपच ठरवेल असं दिसतंय. राहुल गांधी यांच्या मर्जीतील राजीव सातव आणि यशोमती ठाकूर यांची नावं सातत्याने यापदासाठी घेतली जातात.
"पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षनेतृत्वाच्या सातत्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्याचबरोबर पक्षसंघटना उभी करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांना आतापर्यंत फारसं यश मिळालेलं दिसलं नाही. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचं कॉंग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी फारसं पटलेलं नाही. त्यामुळे हा समन्वय टिकवून ठेवण्यासाठी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विचार केला जाईल. त्यामुळे नव्या रचनेत त्यांना फार स्थान लगेच मिळेल असं वाटत नाही.
"नाना पटोले विदर्भातील चेहरा आहे. पण त्यांना विधानसभा अध्यक्षपदावरून आताच खाली उतरवणं धोकादायक ठरू शकेल का? याचाही विचार केला जाईल," असं आंबेकर सांगतात.
संघटनात्मक बदलाने फरक पडला?
2008 साली माणिकराव ठाकरे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. 2009 साली विधानसभा निवडणुका होत्या. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 82. जागांवर विजय मिळाला होता. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. कॉंग्रेसला 42 जागांवर समाधान मानावं लागलं. माणिकराव ठाकरे यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ 2015 पर्यंत कायम राहीला.

फोटो स्रोत, Twitter
2015ला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकच उमेदवार निवडून आणता आला. अशोक चव्हाण स्वतःही निवडणुकीत पराभूत झाले. त्याची जबाबदारी घेत म्हणून अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. पण त्यावेळी 'लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होऊ नये त्यासाठी मतदारसंघात लक्ष देणं गरजेचं आहे' असं चव्हाण यांनी हायकमांडला सांगितलं होतं. त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना हे कबूल केले होतं.
परिणामी ऐन विधानसभा निवडणुकांच्याआधी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर देण्यात आली. त्याच्या बरोबरीला 4 कार्याध्यक्षसुद्धा नेमण्यात आले. राज्याच्या काँग्रेसमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला.
सलग आठ वेळा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचणाऱ्या थोरात यांचा अनुभव दांडगा आहे. राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापनेत थोरात यांचीही महत्त्वाची भूमिका होती.
पण काँग्रेसने गेल्या 5-6 वर्षांमध्ये राज्याच्या पक्ष संघटनेमध्ये केलेल्या बदलांचा किती फायदा झाला?
जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई याबाबत सांगतात, "यापूर्वी कॉंग्रेस देशभरात इतकी ताकदवान होती की प्रदेशाध्यक्ष कोण आहे याचा फरक कॉंग्रेसला कधी पडला नव्हता. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्याने प्रदेशाध्यक्ष असाताना तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क करून कॉंग्रेसची संघटना मजबूत करण्याचं काम केलं होतं. आता कॉंग्रेसला तळागाळापासून संघटना मजबूत करणाऱ्या आक्रमक प्रदेशाध्यक्षाची गरज आहे."
नव्या प्रदेशाध्यक्षासमोर कोणती आव्हानं असतील?
कॉंग्रेससमोर सध्या पक्ष संघटना बांधणीचं मोठं आव्हान आहे.
त्याचवेळी चार महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची मुंबई महापालिकेची निवडणूक कॉंग्रेसने स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केल आहे. त्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी जे करणं गरजेचं आहे त्याची सुरवात कॉंग्रेसने केलेली आहे असं विश्लेषकांना वाटतं.
"ग्रामीण भागात कॉंग्रेसला चांगलं स्थान आहे. ग्रामीण भागातले विषय विशेषत: शेतकऱ्यांचे विषय हाताळणारी व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी असायला हवी," असं जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
ते पुढे सांगतात "महाविकास आघाडीतला समन्वय साधणं, तरूणाईची मोट नव्याने बांधणं, आक्रमकपणे भूमिका घेणं ही महत्वाची आव्हानं कॉंग्रेस पुढे असतील. तरूणाई सर्वाधिक आक्रमक भूमिका घेणाऱ्या पक्षाकडे आकर्षित होते. त्यामुळे तरूणाई, महिला यांच्याबरोबर ग्रामीण भागातील मुद्यांवर काम करून पुन्हा कॉंग्रेस पक्षाला मोठं करण्याचं आव्हान कॉंग्रेस पुढे असेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








