राहुल गांधी महत्त्वाच्या प्रसंगी कायम परदेशात का जातात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इतक्या महत्त्वाच्या क्षणी राहुल गांधी परदेशात का गेले…?
या प्रश्नाचं उत्तर देणं काँग्रेस पक्षासाठी अजूनही जरा अवघडच आहे.
याचं कारण असं की राजकीय आयुष्यापेक्षा खाजगी आयुष्याला अधिक महत्त्व देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी अनेकवेळा राहुल गांधी कधी एकटे तर कधी सहपरिवार वाढदिवसापासून ते नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परदेशात गेले आहेत.
अनेकदा काँग्रेस पक्षाला राहुल गांधी यांच्या परदेश वाऱ्यांमुळे राजकीय नुकसानही सोसावं लागलं आहे. मात्र, तरीही राहुल गांधी यांचे परदेश दौरे काही कमी झाले नाही.
प्रियंका गांधींचं मौन
28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या 136 व्या स्थापना दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी दोघेही गैरहजर होते.
या कार्यक्रमाचा आदल्या दिवशीच राहुल गांधी इटलीला रवाना झाले, तर सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाची जबाबदारी प्रियंका गांधी यांना उचलावी लागली.

फोटो स्रोत, Ani
मात्र, कार्यक्रमाला राहुल गांधी का आले नाही, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता त्या निघून गेल्या. तर दुसरीकडे रणदीप सूरजेवालांसह इतर सर्वच काँग्रेस नेते बचावात्मक पवित्र्यात दिसले.
राहुल गांधी आजारी आजीला भेटायला इटलीला गेल्याचं सांगण्यात आलं. मात्र, ही माहितीसुद्धा काँग्रेसने अधिकृतपणे दिली नाही.
या बातमीनंतर भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका सुरू केली. त्यामुळे राहुल गांधी वारंवार असं का करतात, हा प्रश्न उपस्थित होतो.
'दरवर्षी जवळपास 65 परदेश वाऱ्या'
राहुल गांधी दरवर्षी जवळपास 65 परदेश दौरे करतात. 2015 ते 2019 या कालावधीत राहुल गांधी यांनी 247 वेळा परदेश प्रवास केल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं आहे.
एसपीजीला न सांगता करण्यात आलेले हे दौरे आहेत. याचाच अर्थ राहुल गांधी यांच्या एकूण परदेश प्रवासांची संख्या यापेक्षा अधिक आहे.
मात्र, जी माहिती गृहमंत्रालयाकडून मिळाली आहे केवळ त्याचा विचार केला तर राहुल गांधी यांनी दरवर्षी 65 परदेश दौरे म्हणजेच महिन्याला 5 हून जास्त परदेश दौरे केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2019 साली संसदेत ही माहिती दिली होती.
पण, राहुल गांधी कितीवेळा परदेशात जातात, हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तर पक्षाला राहुल गांधी यांची नितांत गरज असते त्याच वेळी ते परदेशात का जातात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
अनेकदा तर केवळ राहुल गांधी उपस्थित राहू शकत नाहीत, या एका कारणामुळे काँग्रेस पक्षाला त्यांचे कार्यक्रम किंवा राष्ट्रीय अभियान स्थगित करावे लागले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते कर्नाटकात आघाडी सरकारच्या खातेवाटपावेळीसुद्धा राहुल गांधी परदेशातून परतण्याची प्रतीक्षा करावी लागली होती.
जेव्हा राहुल गांधी राजकीय अॅक्शन सोडून परदेशात जातात…
2019 साली राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याविरोधात संपूर्ण देशात ठिकठिकाणी निदर्शनं सुरू होती. काँग्रेस पक्षानेही या कायद्याचा विरोध केला. मात्र, त्याचवेळी राहुल गांधी दक्षिण कोरियाला गेले होते.
पक्षाने हा पूर्वनियोजित दौरा असल्याचं सांगितलं असलं तरी यामुळे काँग्रेसवर बरीच टीका झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
2018 सालीदेखील कर्नाटक निवडणुकीनंतर लगेचच राहुल गांधी सोनिया गांधींसोबत परदेशात गेले होते. ते परदेशात असल्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-संयुक्त जनता दल आघाडीच्या खातेवाटपाला उशीर झाला.
2016 साली नववर्षानिमित्ताने राहुल गांधी पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना परदेशात गेले होते. त्यावेळीसुद्धा पंजाब काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये नाराजाची सूर स्पष्ट जाणवला होता.
राहुल गांधी यांच्यावर टीकेचा काही परिणाम होतो का?
गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं वार्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार अपर्णा द्विवेदी यांच्या मते राहुल गांधी टीका आणि समीक्षा यांच्या खूप पुढे गेले आहेत.
त्या म्हणतात, "राहुल गांधी यांच्यावर टीकेचा परिणाम होत नाही, असं दिसतं. मग ती टीका बाहेरच्यांनी केलेली असो वा पक्षातल्या नेत्यांनी. 23 नेत्यांनी पत्र लिहूनही काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी, यासाठी ज्याप्रमाणे त्यांच्या मागे लागला त्यावरून तरी असं वाटतं की आपल्याशिवाय पक्षाचं पान हलत नाही, असं राहुल गांधी यांना वाटत असावं."
"भाजपचं म्हणाल तर भाजप गेली 7-8 वर्ष राहुल गांधी यांना 'पप्पू' सिद्ध करण्यासाठी जंगजंग पछाडत आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळालं आहे. मात्र, कधी पक्षाची कामगिरी तर कधी संवादाचा अभाव असल्याने काँग्रेस पक्ष कधीच याचा म्हणावा तसा विरोध करू शकला नाही. त्यामुळे पक्ष आपण म्हणू तसाच वागेल, असं राहुल गांधी यांना वाटू लागलं आहे. त्यांनी प्रियंका गांधी यांनाही जबाबदारी द्यायला सुरुवात केली आहे."

फोटो स्रोत, Ani
जबाबदारीविषयी बोलायचं तर राहुल गांधी यांनी स्वतःच 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा या राजीनाम्याला पूर्ण विरोध होता. मात्र, तरीही राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून गेल्या वर्षभरात स्वतः सोनिया गांधी आणि पक्षातल्या इतर अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
मात्र, राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
पक्षाच्या स्थापनादिनाच्या आदल्या दिवशी परदेशात जाणं एकप्रकारचा संकेत असल्याचंही राजकीय विश्लेषकांना वाटतं.
अपर्णा द्विवेदी म्हणतात, "राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळावी, असं जर वाटत असेल तर पक्ष कार्यकर्ते आणि नेते यांनी आपल्याला पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे, हाच संदेश देण्यासाठी राहुल गंधी स्थापना दिनाच्या ऐन आदल्या दिवशी मिलानला गेल्याचं दिसतं."
काँग्रेसचा बचावात्मक पवित्रा
या वेळी भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधल्यामुळे काँग्रेस पक्ष बॅकफूटवर आला आहे.
भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, "अर्धवेळ राजकारण आणि पूर्ण वेळ पर्यटन आणि फसवेगिरी जो नेता करेल त्याला त्याची आजी आठवते आणि जेव्हा आजीची आठवण होते तेव्हा ते कुठे जातात हे केवळ त्यांनाच ठाऊक असतं."

फोटो स्रोत, Pti
यावर काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल म्हणाले, "राहुल गांधी आपल्या आजीला भेटायला गेले आहेत. हे चुकीचं आहे का? प्रत्येकालाच खाजगी दौरे करायचं स्वातंत्र आहे. भाजप खालच्या पातळीचं राजकारण करत आहे. भाजपला केवळ एकाच नेत्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आहे आणि म्हणूनच ते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत आहेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दुसरीकडे भाजप प्रवक्ते अमिताभ सिन्हा राहुल गांधी यांच्याप्रति सहानुभूती व्यक्त करत म्हणतात, "माझ्या मते राहुल गांधी व्यक्ती म्हणून चांगले आहेत. मात्र, त्यांच्यावर चुकीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ते सामान्य आयुष्य जगण्यासाठी बनले आहेत. मात्र, केवळ आईच्या हट्टामुळे ते आज एका अशा दबावाखाली आहेत ज्यामुळे माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. अध्यक्ष असताना किंवा उपाध्यक्ष असतानादेखील त्यांनी जबाबदारीकडे गांभीर्याने बघितलं नाही. कारण त्यांचा तो मूळ स्वभावच नाही."
तर आजीच्या प्रकृतीचं जे कारण काँग्रेसने दिलं त्यावर सिन्हा म्हणतात, "भारत एक भावनाप्रधान आणि संस्कारी देश आहे. तुम्ही इथे असं काही सांगून गेलात तर तुमच्याप्रति आदर वाढतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हा राहुल गांधी यांचा स्वभाव म्हणावं, अनिच्छा किंवा अंतर्गत कलह, काहीही म्हटलं तरी देशाच्या मुख्य विरोधी पक्षाला याचं मोठं नुकसान सोसावं लागतंय.
त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यात कोणाचं ऐकलं जाईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
गांधी घराणं गांधीतर कुणाला पक्षाची धुरा देईल का की राहुल गांधी यांचीच मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू राहतील?
अडसर कोण?
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षांतर्गत एक अंतर्गत कलह सुरू झाला आहे.
सर्वसामान्य कार्यकर्ताही भेटू शकेल, अशी एखादी व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान व्हावी, असं काँग्रेसमधल्या एका गटाला वाटतं.

फोटो स्रोत, Ani
तर दुसरीकडे काँग्रेसमधले 'ओल्ड गार्ड' राहुल गांधी यांनाच अध्यक्षपद देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल.
मात्र, राहुल गांधी यांच्याकडून सक्रीय राजकारणात उतरण्याचे कुठलेच संकेत अजूनतरी मिळालेले नाहीत.
गेली अनेक वर्ष काँग्रेस आणि भाजप यांचं राजकारण बघणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी ही परिस्थिती तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी दुर्दैवी असल्याचं म्हणतात.
त्या म्हणतात, "हे बघा, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची विचारसरणी मान्य असो किंवा नसो, ते जी मेहनत करतात ती सर्वांसमोर आहे. अमित शाह यांना कोव्हिडची लागण झाली तरीसुद्धा ते कधी आसाम, कधी बंगाल तर कधी मणिपूरला दिसतात. ते सारखे दौऱ्यावर आहेत. अशावेळी लोक कुठेतरी नेतृत्त्वाची तुलना करतातच."
इतकंच नाही तर 2019 च्या निवडणुकीत 12 कोटी लोकांनी काँग्रेसला मत दिलं. त्यामुळे त्यांच्याप्रति काँग्रेसची काहीतरी जबाबदारी आहेच.
मात्र, यासोबतच पक्षाच्या भल्यासाठी सोनिया गांधी यांनी पक्षाची कमान एखाद्या बिगर-गांधी व्यक्तीच्या हातात सोपवावी का, असाही एक प्रश्न उपस्थित होतो.
यावर नीरजा म्हणतात, "एक पाऊल मागे टाकत लोकांच्या हाती नेतृत्व द्यायला हवं, हा विचार काँग्रेसने करण्याची वेळ आली आहे. कारण ही काँग्रेस पक्ष घडवण्याची वेळ आहे. जमिनीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत पक्ष उभारण्याची गरज आहे आणि यात चेहरा महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रत्येक राज्यात बूथ पातळीपासून पक्ष उभारण्याची गरज आहे. नवीन नेतृत्त्व आणायला हवं. काँग्रेसमध्ये अनेक अनुभवी नेते आहेत. त्यांना पुढे करण्याची गरज आहे. पक्षातले तरुण नेते मेहनत करू शकतात. शिवाय, गांधी घराणं पडद्यामागूनही मोठी भूमिका बजावू शकतं."
"ब्रँड काँग्रेसने पुढे येणं गरजेचं असल्याचं मला वाटतं. मोदींच्या भाजपला टक्कर देऊ शकेल, असा कुठलाच चेहरा दिसत नाही. ब्रँड काँग्रेस आणि ही काँग्रेस जर विरोधकांचा चेहरा असेल तरच काहीतरी घडू शकतं. सध्या यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव पुढे येतंय. त्या आघाडीवर काय घडतंय, बघूया."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








