जबलपूरमध्ये जातीय छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या?

फोटो स्रोत, CG KHABAR
- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, बीबीसी हिंदीसाठी, रायपूरहून
छत्तीसगढच्या जांजगीर चांपा इथे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ. भागवत देवांगण यांच्या जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या कथित जातीय छळानंतर आत्महत्येवरून निदर्शनं सुरू झाली आहेत.
डॉ. भागवत यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, गरिबी आणि खालच्या जातीतील असल्याने कॉलेजमधले सीनिअर्स त्यांचा सतत छळ करायचे आणि यामुळेच त्यांनी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
या प्रकरणात कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असला तरी अजून एफआयआर नोंदवला नाहीये.
कुटुंबीयांनी भागवत देवांगण यांच्या पाच सीनिअर्सविरोधात तक्रार केली आहे.
गेल्या 9 दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करणारे जबलपूरच्या गढा पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश तिवारी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सध्या कोव्हिड असल्याने अनेक डॉक्टरांची चौकशी होऊ शकलेली नाही. डीन आणि अंटी रॅगिंग समितीची बैठकही आहे. आवश्यक ते सर्व आम्ही करत आहोत."
भागवत देवांगण मध्यप्रदेशातील जबलपूर इथल्या नेताजी सुभाष चंद्र बोस मेडिकल कॉलेजमधून ऑर्थोपिडिक विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होते.
डॉ. भागवत देवांगण यांचे थोरले भाऊ प्रल्हाद देवांगण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "माझ्या लहान भावाने माझ्याकडे अनेकदा तक्रार केली होती की, कॉलेजमध्ये सीनिअर्स त्याची गरिबी आणि जात यावरून सतत त्याला मारहाण करतात आणि शारिरीक-मानसिक त्रास देतात. कॉलेज व्यवस्थापनालाही याची माहिती होती. मात्र, त्यांनी कधीच यात हस्तक्षेप केला नाही आणि म्हणूनच माझ्या भावाने आत्महत्या केली."
मात्र, हॉस्टेलच्या आत रॅगिंग किंवा इतर कुठल्याही प्रकारची छळवणूक झाली नसल्याचं मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलचे वॉर्डन आणि कॉलेजच्या अँटी रॅगिंग कमिटीचे सदस्य डॉ. अरविंद शर्मा यांचं म्हणणं आहे.
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने कधीही हॉस्टेलमध्ये छळवणूक होत असल्याची तक्रार केली नव्हती. डॉ. अरविंद शर्मा म्हणाले, "छळवणूक आणि रॅगिंगचा विषय विभागाशी संबंधित आहे. ज्या विद्यार्थ्यांवर आरोप करण्यात आले आहेत त्यापैकी कोण-कोण हॉस्टेलवर राहतं, हे मला तपासावं लागेल."
जातीय छळ
छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिल्ह्यातल्या राहौद या छोट्या वस्तीतील असलेले भागवत देवांगण चार भावंडांपैकी दुसऱे होते.
त्यांचे वडील वस्तीतच भाांड्यांचं दुकान चालवतात. देवांगण अति-मागास आणि अनुसूचित जातीत येतात. भागवत देवांगण अति-मागास वर्गातून होते.
सहावीपर्यंत स्थानकि शाळेत शिक्षण घेतल्यानंतर नवोदय विद्यालयात भागवत यांची निवड झाली. नवोदय विद्यालयातूनच त्यांनी 12 पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे पुण्यातल्या बायरामजी जीजीभॉय सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची निवड झाली. या कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेऊन ते डॉक्टर झाले.

फोटो स्रोत, CG KHABAR
पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांची निवड महाराष्ट्रातल्याच कॉलेजमध्ये झाली होती. मात्र, मराठा आरक्षणामुळे निवड यादी रद्द झाल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. भागवत यांनी पुढच्या वर्षी पदव्युत्तर प्रवेशाासाठी परीक्षा दिली. यात देशात ते 5500 व्या स्थानी होते. या आधारे जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना ऑर्थोपिडिक विभागात प्रवेश मिळाला.
डॉ. भागवत यांच्या भावाचं म्हणणं आहे की या वर्षी जुलै महिन्यात प्रवेशानंतर पंधरा दिवसातच भागवतने सीनिअर्स अतोनात छळ करत असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं.
भागवत यांचे थोरले भाऊ प्रल्हाद देवांगण सांगतात, "तो सांगत होता की त्याचे सीनिअर्स नर्स आणि वॉर्ड बॉयला शिवी देऊन बोलवायला सांगायचे. त्यांना मारहाण करायला सांगायचे आणि त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर सर्वांसमोर त्याला मारहाण करायचे."
प्रल्हाद यांचं म्हणणं आहे की, भागवतने आरक्षणाचा लाभ घेतलेला नव्हता आणि त्याला सामान्य वर्गातूनच प्रवेश मिळाला होता. तरीही भागवतला आरक्षणावरून चिडवलं जायचं.
प्रल्हाद पुढे सांगतात, "कॉलेजमधल्या इतर मुलांच्या तुलनेत आमची आर्थिक परिस्थिती बरी नाही. कसेबसे पैसे उभारून आम्ही त्याच्या शिक्षणाासाठी पैसे पुरवत होतो. पण त्याचे सीनिअर्स त्याला म्हणायचे की, आरक्षणातून आल्यामुळे तुला अभ्यास जमत नाही. त्याच्या आर्थिक परिस्थितीचीही ते थट्टा-मस्करी करायचे."
पूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
सगळं नीट होईल, असं सांगत हा सगळा प्रकार विभाग प्रमुख आणि हॉस्टेल व्यवस्थापनाच्या कानावर टाकण्याचा सल्ला कुटुंबीयांनी दिला होता.

फोटो स्रोत, CG KHABAR
मात्र, 24 जुलै रोजी प्रकरण किती गंभीर आहे, याची चुणूक कुटुंबीयांना मिळाली होती. त्या दिवशी कॉलेजमधून कुणीतरी त्यांना फोन करून सांगितलं होतं की, भागवत यांनी झोपेच्या गोळ्या खाल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तिथे पोहोचले तेव्हा डॉ. भागवत आयसीयूमध्ये होते. तिथेच त्यांनी सांगितलं होतं की, सीनिअर्सच्या छळामुळेच त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
यानंतर 8 दिवसांची रजा टाकून भागवत आपल्या घरी गेले होते. सुट्टी संपल्यानंतर लहान भावासोबत ते जबलपूरला परतले.
छोटे भाऊ देवी देवांगण सांगतात की, हॉस्टेलवर परतल्यानंतरही छळ सुरूच होता. त्यामुळे ते जबलपूरमध्येच राहणाऱ्या आपल्या एका मित्राकडे गेले. तीन-चार दिवस तिथे राहिल्यानंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत महिनाभराची रजा टाकली आणि घरी परतले.
आत्महत्येची बातमी
जवळपास दीड महिना घरी राहिल्यानंतर डॉ. भागवत 26 सप्टेंबर रोजी मेडिकल कॉलेजला परतले. मात्र, कामावर रुजू झाले नाहीत. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, भागवत घरून कॉलेजला परतले खरे. मात्र, सीनिअर्सची भीती त्यांच्या मनात इतकी जास्त होती की, ते काम करू शकत नव्हते.
कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, 1 ऑक्टोबर रोजी भागवत यांच्या विकास द्विवेदी नावाच्या सीनिअरचा फोन आला. त्यांनी सांगितलं, की भागवतने अजून कामावर रुजू झालेले नााही आणि ते फोनही उचलत नाहीय.
यानंतर कुटुंबीयांनी भागवत यांना फोन करून कामावर रुजू होण्यास सांगितलं. भागवत यांनीही त्यांना सांगितलं की त्यांचं विकास द्विवेदी यांच्याशी बोलणं झालं आहे आणि ते लवकरच कामावर परतणार आहेत.
डॉ. भागवत यांचे थोरले भाऊ प्रल्हाद यांच्या मते, "त्याच्या आवाजावरूनतो खूप घाबरल्याचं वाटत होतं. मी त्याला हिम्मत ठेवायला सांगितलं आणि काहीही त्रास असेल तर मला कॉल कर म्हणूनही सांगितलं."
डॉ. भागवत यांचे वडील अमृतलाल देवांगण यांनी दुपारी त्यांना बरेच फोन केले. मात्र, भागवत यांनी फोन घेतलेच नाही. त्यामुळे त्यांनी भागवत यांच्या दोन सहकाऱ्यांना हॉस्टेलच्या खोली क्रमांक 14 मध्ये जाऊन भागवत यांच्याशी बोलायला सांगितलं.

फोटो स्रोत, CG KHABAR
पोलिसांना दिलेल्या जबाबात संध्याकाळी 6 च्या आसपास हॉस्टेलचे प्रभारी आणि अँटी रॅगिंग समितीचे सदस्य डॉ. अरविंद शर्मा यांनी प्रल्हाद देवांगण यांना सांगितलं की, डॉ. भागवत यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तुम्ही ताबडतोब इकडे पोहोचा.
डॉ. भागवत यांचे थोरले आणि धाकटे भाऊ रात्री 2 च्या आसपास जबलपूरला पोहोचले. तिथे त्यांना सांगण्यात आलं की, त्यांच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी 9 वाजता पोस्ट मॉर्टम विभागात ठेवलेलं त्यांचं पार्थिव त्यांना दाखवण्यात आलं.
प्रल्हाद देवांगण म्हणतात, "भावाच्या गळ्यावर काही खुणा दिसत होत्या. त्याने गळफास घेतल्याचं सांगत होते. मात्र, त्याने खरंच आत्महत्या केली होती का, यावरही मला संशय आहे. भागवत वारंवार ज्या 5 सीनिअर्सकडून छळ होत असल्याचं सांगायचा त्या सर्वांविरोधात आम्ही पोलिसात तक्रार केली आहे."
मात्र, अशा प्रकारची कुठलीही छळवणूक केली नसल्याचं संबंधित सीनिअर्सचं म्हणणं आहे. आरोपींपैकी एक विकास द्विवेदी यांचं म्हणणं आहे की, गेल्या तीन महिन्यात त्यांचं भागवतशी नीटसं बोलणंही झालेलं नाही.
ते म्हणाले, "मी आजवर केवळ एकदा डॉ. भागवत यांना सिनॅप्सिससाठी फोन केला होता. याव्यतिरिक्त माझाा त्यांच्याशी कसलाच संपर्क नव्हता. मला विनाकारण गोवण्यात येतंय. या विषयावर मला आणखी काहीही बोलायचं नाही. पोलीस तपास करत आहेत."
'जस्टिस फॉर भागवत देवांगण'
छत्तीसगढच्या जांजगीर चंपाच्या लोकांचं म्हणणं आहे की, पोलीस या संपूर्ण प्रकरणात टाळाटाळ करत आहेत. हॉस्टेल व्यवस्थापनही सारवासारव करत आहे.

फोटो स्रोत, CG KHABAR
ज्या दिवशी डॉ. भागवत देवांगण यांचं पार्थिव घेऊन त्यांचे कुटुंबीय जांजगीर चंपाला पोहोचले त्या दिवशी शहरात लोकांनी अनेक तास निदर्शनं केली.
सोमवारी कँडल मार्चनंतर गुरूवारी (8 ऑक्टोबर) संध्याकाळीसुद्धा काँग्रेस पक्षाच्या लोकांनी निदर्शनं केली.
भागवत यांचे बालमित्र दिलीप देवांगण म्हणतात, "माझा मित्र अभ्यासात खूप हुशार होता. त्याचा असा मृत्यू होईल, याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा, अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही 'जस्टीस फॉर भागवत देवांगण' मोहीम सुरू केली आहे. छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एक लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा आमचा विचार आहे."
छत्तीसगढचे आरोग्य मंत्री टी. एस. सिंहदेव यांनी गुरुवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची विनंती केली आहे. टी. एस. सिंहदेव यांचं म्हणणं आहे की अँटी रॅगिंगचे कठोर नियम आणि दंडाची तरतूद असूनही विद्यार्थ्यांना रॅगिंगचा त्रास सहन करावा लागतोय.
जांजगीर चंपा जिल्ह्याचे एसपी पारूल माथूर यांनी म्हटलं की, जबलपूर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत. इकडे या प्रकरणाचा वेगळा तपास सुरू नाही.
या प्रकरणात कुटुंबीयांना कायदेशीर मदत देऊ करणाऱ्या उच्च न्यायालयातील वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका शुक्ला यांचं म्हणणं आहे की दलित, मागास, गरीब आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना सतत छळवणुकीचा सामना करावा लागतोय. मात्र, त्यांचं म्हणणं कुणीही ऐकत नाही.
प्रियंका म्हणतात, "सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होतो तर संपूर्ण देश यात गुंततो. मात्र, डॉ. भागवत देवांगणसारख्या हुशार डॉक्टरच्या मृत्यूवर कुणीच बोलत नाही. आपल्या देशाने देशातल्या दलित, गरीब आणि वंचितांविषयीही बोलावं, असं आम्हाला वाटतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








