बाबरी मशीद विध्वंस : त्या दिवशी नेमकं काय घडलं - पत्रकारांचे अनुभव

- Author, सर्वप्रिया संगवान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"जमावाचा हल्ला काय असतो, लूट काय असते, हे मी त्या दिवशी प्रत्यक्ष बघितलं. माझ्या जबड्याला मार बसला होता."
"या घटनेविषयी मी बरंच लिखाण केलं आहे. मात्र, त्या दिवशी तिथे असताना माझ्या भावना काय होत्या, हे मला अजूनही नीटसं मांडता आलेलं नाही."
"मला तर जीवानीशी ठार मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मी कशीबशी कारच्या डिक्कीत लपून तिथून निघाले."
"या खटल्यातला मी 19 वा साक्षीदार होतो आणि माझी साक्ष 7-8 वर्षांपूर्वी नोंदवण्यात आली."
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद विध्वंसाचे साक्षीदार असणाऱ्या पत्रकारांच्या या काही प्रतिक्रिया.
सांकेतिक कारसेवेसाठी 6 डिसेंबर 1992 हा दिवस निश्चित करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, आदल्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबर रोजी गीता जयंती होती. या दिवशी कारसेवेची रंगीत तालीम ठेवण्यात आली होती.
ही कारसेवा म्हणजे एक प्रतिकात्मक पूजा होती. यात शरयू नदीतल्या वाळू आणि पाण्याने प्रस्तावित मंदिराची जागा धुण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या तारखेपर्यंत 1 लाखांहूनही अधिक कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यात महिलांचंही प्रमाण मोठं होतं.
सर्वोच्च न्यायालयाने केवळ शांततेच्या मार्गाने कारसेवा करण्याला परवानगी दिली होती. यात लोकांनी एकत्र येऊन भजन म्हणणे, पूजा करणे, याला परवानगी होती.
भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक दिवस आधी लखनऊमध्ये घेतलेल्या रॅलीत सर्वोच्च न्यायालयाच्या आज्ञेचं पूर्णपणे पालन करण्यात येईल, असं म्हटलं होतं.
मात्र, या भाषणात ते हेदेखील म्हणाले होते की, "खोदकामानंतर तिथे जे टोकदार दगड निघाले आहेत त्यावर कुणी बसू शकत नाही. त्यामुळे जमीन सपाट करावी लागेल. बसण्याजोगी करावी लागेल. यज्ञ होईल."
त्यावेळी अयोध्येतलं वातावरण कसं होतं?
बीबीसीसाठी या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार रामदत्त त्रिपाठी सांगतात की अयोध्येतलं वातावरण काही दिवसांपासूनच चिघळत होतं.
ते सांगतात, "30 नोव्हेंबरपासूनच वातावरण तापू लागलं होतं. कारसेवकांनी मजारींचीही नासधूस केली होती. बाबरी मशिदीच्या मागेच मुस्लीम लोकवस्तीही आहे. कब्रिस्तान आणि मशिदीही आहेत. बाहेरून आलेले कारसेवक बरेच आक्रमक होते. या लोकांच्या राहण्याची व्यवस्था मशिदीजवळच करण्यात आली होती."
नेते मंडळी वेगवेगळी वक्तव्यं करत असल्याने उपस्थित कारसेवकांमध्ये संभ्रमाची अवस्था होती. काही नेते सांकेतिक पूजा करायचं म्हणत होते तर काही इशाऱ्यांमध्ये वेगळंच काहीतरी सांगत होते.

फक्त वाळूने पूजा करून काही होणार नाही. काहीतर मोठं घडायला हवं, अशी काही कारसेवकांचीही इच्छा होती.
रामदत्त त्रिपाठी यांनी सांगितलं, "मी आणि बीबीसीचे पत्रकार मार्क टुली 6 डिसेंबर रोजी कारसेवकपूरममध्ये पोहोचलो तेव्हा अशोक सिंघल (विश्व हिंदू परिषदेचे नेते) यांना घेराव घालत काही कारसेवक हुज्जत घालत होते. शिवीगाळ सुरू होती. काही कारसेवक म्हणत होते की तुम्ही नेतागिरी करत आहात. हे आंदोलन तुम्हाला राजकीय अंगाने चालवायचं आहे. आम्ही तर मशीद पाडूच."
दुसरीकडे 'मरकज' या वृत्तपत्रासाठी कारसेवा कव्हर करायला गेलेले पत्रकार हिसाम सिद्दिकी यांनी सांगितलं की ते लखनऊच्या कारसेवकांना भेटले तेव्हा परिस्थिती सामान्य वाटत होती. हलकं-फुलकं वातावरण होतं. केवळ सांकेतिक पूजा असल्याचं त्या कारसेवकांचं म्हणणं होतं.
6 डिसेंबरच्या सकाळी काय घडलं?
अयोध्या-फैजाबादहून प्रकाशित होणाऱ्या 'जनमोर्चा' वृत्तपत्रात बऱ्याच काळापासून या वादाचं वार्तांकन सुरू होतं.
या वृत्तपत्राच्या पत्रकार सुमन गुप्ता फैजाबादहून अयोध्येसाठी रवाना झाल्या तेव्हा त्यांना दिसलं की, "रस्त्यात ठिकठिकाणी कॅम्प उभारले होते. मोठ्या संख्येने लोक पायीच निघाले होते. काही जण कार थांबून लिफ्ट घेत होते. कारसेवक सामान्य माणसांनाही थांबवून टिळा लावून त्यांना लाडू देत होते. त्यांना जय श्री राम म्हणायला सांगत होते."

बाबरी मशिदीच्या पूर्वेकडे जवळपास 200 फूट अंतरावर रामकथा कुंजमध्ये एका मोठा स्टेज उभारण्यात आला होता. सर्व नेते, महंत आणि साधू तिथेच होते.
आसपास असलेल्या जन्मस्थान, सीता रसोई आणि मानसभवन सारख्या इमारतींमध्येही सांकेतिक कारसेवा बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
प्रशासनाने सीता-रसोई इमारतीत केंद्र उभारलं. सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षकही तिथेच होते. डीएम-एसपीसुद्धा तिथेच होते.
मानस भवनच्या गच्चीवर पत्रकार होते. पोलिसांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही सगळी व्यवस्था बघत होते.
त्यावेळी 'राष्ट्रीय सहारा'साठी वार्तांकन करणारे पत्रकार राजेंद्र कुमार यांनी सांगितलं, "मी सकाळी सात वाजता राम जन्मभूमी परिसरात पोहोचलो. तिथे परिसरात संघाच्या लोकांनी बॅरिकेटिंग केलं होतं. ते सांगत होते इथे पूजा होईल. महिला इकडे बसतील. पोलीस कंट्रोल रूम उभारण्यात आली होती. मॉनिटरिंग करण्यासाठी कॅमेरेही बसवण्यात आले होते."
"उमा भारती, लालकृष्ण आडवाणी, कलराज मिश्र, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंघल, विनय कटियार हे नेते वादग्रस्त परिसरात कुठे पूजा करायची, त्याची व्यवस्था, याची पहाणी करत होते. त्यावेळी मी त्यांचे फोटो काढले होते. रामचंद्र परमहंसदेखील त्यांच्यासोबतच होते. सध्या खासदार असलेले लल्लू महाराज मानस भवनमध्ये पत्रकारांच्या चहा-पाण्याची व्यवस्था करत होते."
सकाळी 9 वाजेपासूनच व्यासपीठावर बैठक सुरू झाली होती. एकीकडे भाषणं सुरू होती. तर दुसरीकडे मोठ्या संख्येने कारसेवक ये-जा करत होते.
11 वाजेपर्यंत तिथे बरीच गर्दी जमली. पत्रकार हिसाम सिद्दिकी सांगतात की सकाळी त्यांनी मशिदीच्या मागच्या मैदानावर काही लोक हातात दोर आणि फावडे घेऊन बसलेले बघितलं.
हिसाम यांच्या मते, "ते लोक मराठीत बोलत होते. आमच्यासोबत 'सकाळ' वृत्तपत्राचे पत्रकार राजीव साबळे होते. त्यांनी विचारलं की हे सगळं का आणलं? तर ते म्हणाले - काही वेळात कळेलच."
'एक धक्का और दो, बाबरी को तोड दो'
व्यासपीठावर सगळे महत्त्वाचे नेते बसले होतो. यात भाजप आणि विहिंपची नेतेमंडळी होती. साधू-महंत होते.
सुमन गुप्ता सांगतात, "11 वाजेच्या आसपास अशोक सिंघल आणि त्यांच्यासोबत काही लोक येत असल्याचं मी बघितलं. ते सगळे चबूतऱ्याकडे जात होते. हे लोक दिसताच कारसेवक बाबरी मशिदीवर चढू लागले.
"मशिदीच्या मागच्या बाजूला उतार होता. त्या बाजूला सुरक्षेसाठी म्हणून लोखंडी कुंपण टाकलं होतं. मात्र, लोक त्याच लोखंडी पाईपवरून चढले आणि तोड-फोड सुरू केली. कारसेवेच्या ठरलेल्या वेळेच्या आधीच लोक बाबरी मशिदीवर चढले होते."
रामदत्त त्रिपाठींनी सांगितलं की 200-250 लोक मशिदीच्या दिशेने धावले आणि परिसरात मोठ-मोठ्याने घोषणाबाजी सुरू झाली. कारसेवकांच्या ठिकाणी कॅम्प उभारले होते. त्यामुळे तिथे फावडे, कुऱ्हाडी असे अवजारंही होते. काही लोक हे अवजार घेऊन धावले.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीसाठी या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी पोहोचलेले पत्रकार कुर्बान अली यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांना थांबवण्याचाही प्रयत्न केला.
"सुरुवातीला लालकृष्ण आडवाणींनीही प्रयत्न केला. मात्र, तिथे उमा भारती आणि साध्वी ऋतंभराही होत्या आणि त्या आनंद साजरा करत होत्या."
ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान सांगतात, "काही जण 'एक धक्का और दो, बाबरी को तोड दो', अशी घोषणाबाजीही करत होते."
दोन वाजेच्या आसपास पहिला घुमट पाडण्यात आला. हा घुमट पाडायला बराच वेळ लागला होता. मोठ-मोठ्या आणि जाड दोरांनी घुमट ओढून ते पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. काही लोक अवजारांनी पाया खोदत होते.

पहिला घुमट पडला तेव्हा काहीजण त्याखाली दबल्याच्याही बातम्या आल्या.
हिसाम सिद्दिकी सांगतात, "मी बघितलं की कुणाच्या हातून रक्त येतंय, कुणाचा हात तुटलाय, कुणावर मलबा पडलाय. मात्र, तरीही हे लोक पूर्ण ताकदिनीशी मशीद तोडत होते."
हिसाम सांगतात की, "एकीकडे काही कारसेवक मशिदीवर चढत होते, तोडत होते आणि दुसरीकडे काही कारसेवक पत्रकारांना शोधत होते. इथून कुठलीच बातमी बाहेर पडता कामा नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते."
विशेषतः ते पत्रकार ज्यांच्याकडे कॅमेरे होते.
'पत्रकारांना बेदम मारहाण'
राजेंद्र कुमार सांगतात, "जमावाचा हल्ला काय असतो, लूट काय असते, हे मी त्या दिवशी बघितलं."
ते पुढे सांगतात, "मी फोटो काढायचा प्रयत्न केला तेव्हा कारसेवकांनी मला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. इतर काही पत्रकारांनाही मारहाण होत असल्याचं मी बघितलं. मला इतकं मारलं होतं की माझ्या जबड्याला जबर मार बसला होता."
बीबीसीच्या टीमसोबतही असंच घडलं. बीबीसीचे मार्क टुली यांच्यासोबत असणारे रामदत्त त्रिपाठी आणि कुर्बान अली या दोघांनीही याचे पुरावे दिले आहेत.

कुर्बान अली यांनी सांगितलं, "आम्ही मार्क टुली यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात जमावातूनच कुणीतरी ओरडलं की आता कारसेवा सुरू आहे यांना मारू नका. नाहीतर कारसेवेत विघ्न येईल. त्यामुळे आम्हाला जवळच्याच एका मंदिरात नेऊन डांबण्यात आलं. 3-4 तास आम्हाला तिथेच डांबून ठेवण्यात आलं होतं. दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो."
'जनमोर्चा'च्या पत्रकार सुमन गुप्ता यांनीही त्यांचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की त्यांचे कपडेही फाटले. त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, अचानक दोन लोक हात बांधून आले आणि ज्या कारसेवकांनी त्यांना पकडून ठेवलं होतं ते त्यांच्यामधून पळून गेले."
यानंतर त्या लोकांचं लक्ष दुसरीकडे असल्याचं बघून सुमन गुप्ता एका घरात जाऊन लपल्या.
निर्मला देशपांडे नावाच्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी सुमन गुप्तांना त्यांच्या कारच्या डिक्कीत लपवून सुखरूप फैजाबादला सोडलं होतं.
हिसाम सिद्दीक म्हणतात, "मी या घटनेवर बरंच लिखाण केलं आहे. मात्र, त्यावेळी तिथे असताना माझ्या काय भावना होत्या, हे मला अजूनही नीटसं मांडता आलेलं नाही."
पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून तोडले जात होते.
मात्र, इतकं सगळं घडत असताना पोलीस प्रशासन काय करत होतं?
'ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ हैं'
राजेंद्र कुमार सांगतात की कारसेवकांनी मशिदीवर चढायला सुरुवात केली त्यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी जी तत्परता दाखवायला हवी होती ती सुरुवातीचे दोन-तीन मिनिटंच होती.
ते सांगतात, "मी बघितलं लोक चढतच होते. मात्र, त्यांना थांबवण्यासाठी जे करायला हवं होतं ते करण्यात आलं नाही."
काही पोलीस कर्मचारी मशिदीच्या सुरक्षेसाठी आधीपासूनच तैनात होते. त्यादिवशी सीआरपीएफचे जवानही होते. मात्र, कारसेवकांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. काही मिनिटातच ते तिथून निघून गेले.

ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान या खटल्यात साक्षीदारही होते. त्यांनी स्वतः सीआरपीएफच्या एका डीआयजींना मशिदीतून पळून जाताना बघितलं.
जमाव पांगवण्यासाठी हवेत गोळीबार किंवा इतर कुठलेही उपाय करण्यात आले नसल्याचं तिथे उपस्थित पत्रकारांचं म्हणणं आहे.
कुर्बान अली सांगतात, "तिथे असलेले डीएम किंवा एसएसपी त्यांनाही एक सॉफ्ट कॉर्नर होता. बाबरी मशीद पाडत असताना डीएम आणि एसएसपी बसून चहा पीत असल्याचं मी बघितलं. पुढे हेच एसएसपी जवळच्याच मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून निवडून गेले."
त्यांनी सांगितलं, "प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट प्रवीण जैन 2-3 दिवसांपासून तिथे होते. 6 डिसेंबरपूर्वी झालेल्या रंगीत तालमीचे फोटोही त्यांनी काढले होते. यावेळी मशीद पाडायचीच, असं ठरवूनच कारसेवक तिथे आले होते आणि त्यांना याची कसलीच भीतीही नव्हती.
कारण त्यांना सरकारकडून अपेक्षा होती. तिथे 'ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है', अशी घोषणाबाजीही करण्यात आली होती. 2 वर्षांपूर्वी 1990 साली मुलायम सिंह सरकारच्या काळात जी कारवाई करण्यात आली होती ती कारवाई यावेळी केली जाणार नाही, याची त्यांना खात्री होती."
केंद्राने पाठवलेलं सुरक्षा दल दिवसभर आलंच नाही
केंद्राने सेंट्रल पोलीस फोर्सच्या (CPF) 200 तुकड्या पाठवल्या. मात्र, ते सगळे अयोध्येच्या बाहेर फैजाबाद कँटमध्ये थांबले होते. राज्य सरकारच्या आदेशावरच ते कारवाई करणार होते.

रामदत्त त्रिपाठी यांनी सांगितलं, "सेंट्रल फोर्सला वायरलेसहून माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मॅजिस्ट्रेटला सांगितलं की तुम्ही आदेश द्या. कारण आदेश मिळाल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. मात्र, राज्य सरकार किंवा मॅजिस्ट्रेट कुणीच त्यांना आदेश दिले नाही. तिथे लाठ्या-काठ्या, गोळ्या चालवायच्या नाहीत. इतर कुठले उपाय करायचे ते करा, असं सांगण्यात आलं. रॅपिड अॅक्शन फोर्सचे कमांडर बी.एम. सारस्वत यांनी स्वतः हे सांगितलं होतं."
रामदत्त यांनी एक प्रशासकीय मुद्दाही मांडला. कायदेशीर प्रक्रियेनुसार शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी डीएम आणि पोलिसांची असते. त्यामुळे त्यांना कुणालाही विचारण्याची गरज नव्हती. मात्र, ते मुख्यमंत्री काय म्हणतात, भाजप काय म्हणतं, याची वाट बघत होते. त्यामुळे त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं स्पष्ट दिसतं.
रामदत्त सांगतात, "तिथे मुरादाबादचे जिल्हा न्यायाधीश प्रेम शंकर यांची ड्युटी होती. 6 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजेपर्यंत सगळं सामान्य असल्याचं त्यांचं म्हणणं होतं."
केंद्राने पाठवलेली सुरक्षा दिवसभर तिथे पोहोचलीच नाही. 4-5 वाजेपर्यंत सर्व घुमट पाडण्यात आले.
उमा भारती यांचा एक फोटोही त्यावेळी वर्तमानपत्रांमध्ये छापून आला होता. यात आपला आनंद व्यक्त करताना त्या मुरली मनोहर जोशी यांच्या पाठीवर चढल्या होत्या.
पत्रकारांनी सांगितलं की मशीद पाडल्यानंतर नेत्यांपैकी कुणीच मशिदीकडे फिरकलं देखील नाही. इतकंच कशाला लल्लूजी महाराजही दिसले नाहीत.
...आणि जमीन सपाट झाली
राजेंद्र कुमार यांनी सांगितलं, "मशीद पाडल्यानंतर कारसेवक दगड बाजूला करताना दिसले. जमीन सपाटीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. रामचंद्र परमहंस यांच्या देखरेखीखाली सगळं सुरू होतं. संध्याकाळपर्यंत कुंपण घालण्याची चर्चा सुरू होती."

फोटो स्रोत, Getty Images
रामदत्त त्रिपाठी यांनी सांगितलं की रामललाची जी मूर्ती तिथे बसवण्यात आली होती ती उचलून दोर, बांबू आणि तंबूच्या मदतीने एक तात्पुरतं मंदिर उभारण्याचं काम सुरू झालं होतं.
कुर्बान अली यांनी सांगितलं की त्यावेळचा सरकारी मीडिया म्हणजे ऑल इंडिया रेडियोने बातमी चालवली की वादग्रस्त वास्तूचं' थोडं नुकसान' झालं आहे. मात्र, तेच बीबीसी ऊर्दूवर बातमी होती की आता तिथे काहीच उरलेलं नाही. आहे तो फक्त मलबा.
7 डिसेंबरला काय घडलं?
पत्रकार राजेंद्र कुमार यांनी सांगितलं, "दुसऱ्या दिवशी मी गेलो तेव्हा सीमा आखण्याचं काम सुरू होतं. संध्याकाळपर्यंत काम पूर्णही झालं. मात्र, रात्री 11 वाजेनंतर लोक तिथून निघू लागले. कारण त्यांना सांगण्यात आलं होतं की कुठल्याही क्षणी पोलीस येतील. काही साधू-संतांनी स्वतःला अटकही करून घेतली. 7 तारखेला या लोकांनी संपूर्ण ताबा घेतला होता."

फोटो स्रोत, Getty Images
हिसाम सिद्दिकी सांगतात की कारसेवक 7 तारखेलाच तिथून निघू लागले होते. कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. आता सीआरपीएफने परिसर आपल्या ताब्यात घेतला होता.
8 डिसेंबर 1992 रोजी छापून आलेल्या एका फोटोविषयी सांगताना कुर्बान अली म्हणाले, "हा फोटो एका सीआरपीएफ जवानाचा होता जो सर्वांत आधी तिथे पोहोचला होता. त्या तात्पुरत्या मंदिरासमोर त्याने हात जोडून पूजाही केली होती."
कारसेवकांचा उन्माद
शरत प्रधान सांगतात, "संपूर्ण भारतातून कारसेवक आले होते. माईकवरून घोषणा सुरू होत्या की आता आंध्र प्रदेशातून कारसेवक येत आहेत, आता पश्चिम बंगालचे कारसेवक येत आहेत. आता ओरिसातून येत आहेत, हरियाणातून येत आहेत. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर कारसेवक आले होते. शिवसैनिकही मोठ्या संख्येने आले होते."

फोटो स्रोत, Getty Images
पत्रकारांच्या मते कारसेवकांनी फक्त मशिदीची तोडफोड केली नाही तर मशिदीच्या मागे असलेल्या मुस्लिम मोहल्ल्यातही हिंसाचार केला.
लोकांची घरं जाळली. लोकांना मारहाण केली. या दंगलीत काही लोकांचा जीवही गेला.
रामदत्त त्रिपाठी यांनी सांगितलं, "स्थानिक मुस्लिमांचं म्हणणं होतं की हा हिंसाचार बाहेरून आलेल्या लोकानी केला आहे. कारण स्थानिक हिंदुसोबत त्यांचे चांगले संबंध होते. मंदिर आंदोलनाचे कर्ते-धर्ते असणाऱ्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. स्थानिक हिंदुनी त्यांचे प्राण वाचवल्याचं त्यांचं म्हणणं होतं."
'एवढ्यात सगळं संपलेलं नाही'
हिसाम सिद्दिकी यांचं म्हणणं आहे की बरेच कारसेवक आणि काही साधू रडतानाही दिसले. 'तोंड दाखवायला जागा उरली नाही', असं ते म्हणत होते.
राजेंद्र कुमार सांगतात की कारसेवक मारहाण करत होते तेव्हा एका वृद्धाने त्यांना वाचवलं आणि त्यांना जमावापासून दूर घेऊन गेले.
कुर्बान अली सांगतात त्यावेळी एक पागलदास महाराज होते. ते पखवाज वाजवायचे. जे काही घडलं त्याचा त्यांना जबर धक्का बसला होता. ते दिवसभर 'हे काय करून बसलात', असं पुटपुटत असायचे.
कुर्बान अली म्हणाले, "मला ही अपेक्षा होती की विविधतेने नटलेला हा देश हा झटका सहन करेल आणि हे खरंही ठरलं. कारण तीन दिवसांनंतर दिल्लीतल्या इंडिया गेटवर मोठ्या संख्येने एकत्र येत लोकांनी बाबरी मशीद विध्वंसाचा निषेध केला. यात बिगर-मुस्लिमांची संख्या मोठी होती. या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तेव्हा वाटलं की एवढ्यात सगळं संपलेलं नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








