गुप्तेश्वर पांडे : सुशांत प्रकरणी चर्चेत आलेल्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालकांना भाजपकडून उमेदवारी?

फोटो स्रोत, FACEBOOK/GUPTESHWAR PANDEY
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी 22 सप्टेंबरला पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत असल्याचं जाहीर केलं.
गुप्तेश्वर पांडे हे फेब्रुवारी 2021 मध्ये निवृत्त होणार होते, पण त्यांनी पाच महिनेआधी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडे यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
गुप्तेश्वर पांडे हे राजकारणातून त्यांची सेकंड इनिंग सुरू करतील अशी शक्यता आहे. पांडे यांच्या स्वेच्छानिवृत्तीवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब करताच त्यांच्यावर तयार केल्या गेलेल्या गाण्याचा व्हीडीओ समोर आला आहे.
पण महाराष्ट्र पोलीसांची बदनामी करणार्या गुप्तेश्वर पांडे यांना भाजप उमेदवारी जाहीर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यानिमित्ताने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राजकारणातील प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी गुप्तेश्वर पांडे चर्चेत आले. पांडे यांनी मुंबई पोलिसांवर उघडपणे टीका केली होती.
"महाराष्ट्र पोलिसांना जर इतका अभिमान असेल, तर त्यांनी 50 दिवसांत या प्रकरणात काय तपास केला, हे सांगावं. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांशी संवाद पूर्णपणे थांबवला आहे. त्याचबरोबर बिहारचे एसपी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले तर त्यांना जबरदस्तीने क्वारंटाईन करण्यात आलं. महाराष्ट्राचे गृहसचिव फोन घेत नाहीत. बिहार पोलिसांना सहकार्य केलं जात नाहीये," असे आरोप गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची चौकशी मुंबईत व्हावी अशी मागणी केली होती. त्याचबरोबर बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीय बनतोय अशी भीतीही या याचिकेमध्ये व्यक्त केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
याबद्दल बोलताना पांडे यांनी म्हटलं होतं, "रिया चक्रवर्तीची बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल बोलण्याची लायकी नाही."
'त्या' कामाचं आता बक्षीस मिळतंय?
गुप्तेश्वर पांडे यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे यांच्यावर महाराष्ट्र बरीच टीका झाली होती. गुप्तेश्वर पांडे यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयावर शिवसेना आणि कॉंग्रेसने टीका केली आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, "गुप्तेश्वर पांडे राजकारणात जातील, हे मला माहीत होतं."
संजय राऊत यांनी म्हटलं, "IPS अधिकार्यांची एक प्रतिष्ठा असते, पण पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ज्या पद्धतीने विधानं केली तेव्हा असं दिसलं की, ते कोणता तरी राजकीय अजेंडा चालवत आहेत. आता त्यांना त्यांचं बक्षीस मिळतंय."

फोटो स्रोत, GUPTESHWAR PANDEY TWITTER
कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, "सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करणार्या गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आणि तो तात्काळ मंजूरही झाला? वास्तविक पाहता यासाठी तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागते. पण पांडे यांच्यावर मेहेरबान होत त्यांचा अर्ज तात्काळ मंजूर केला गेला. भाजपकडून त्यांना आणखी मोठं बक्षीस मिळण्याची चिन्ह आहेत."
'मी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही'
गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीनंतर बोलताना राजकारणात येत असल्याचं अद्याप जाहीर केलेलं नाही.
"मी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षात सामिल झालेलो नाही आणि त्याबाबत मी अजून तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. सामाजिक कार्याचा प्रश्न असेल तर ते मी राजकारणात प्रवेश न करताही करू शकतो," असं पांडे यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/GUPTESHWAR PANDEY
पण यातली विसंगती म्हणजे स्वेच्छानिवृत्तीनंतर लगेच गुप्तेश्वर पांडे यांच्यावर चित्रित केलेल्या एका गाण्याचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. हा व्हीडीओ राजकीय प्रचारासाठी असल्याचं बोललं जातय. बिहारचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गुप्तेश्वर पांडे यांच्या भाजप उमेदवारीबद्दल विचारलं असता त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
प्रशासकीय अधिकारी आणि राजकारण
प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणाचा खूप जवळचा संबंध आहे. याआधीही अनेक प्रशासकीय अधिकार्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. काहींनी निवृत्तीनंतर तर काहींनी सेवेचा राजीनामा देऊन राजकारण स्वीकारलं.
सत्यपाल सिंग, व्ही. के. सिंग, उत्तम खोब्रागडे अशी अनेक नावं आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपने माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना निवृत्तीनंतर लगेच राज्यसभेची खासदारकी देऊ केली.
सरन्यायाधीशपदी असताना गोगोई यांच्याकडे अयोध्या प्रकरण, रफाल विमान घोटाळा, आसाममधील एनआरसी असे अनेक महत्त्वाचे खटले होते. ज्याचे निकाल सरकाच्या बाजूने लागले होते. त्यामुळे गोगोई यांच्या राज्यसभा खासदारकीबाबत टीका झाली. गुप्तेश्वर पांडे प्रकरणीही अशीच टीका होत आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/GUPTESHWAR PANDEY
महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक सुनिल चावके सांगतात, "याआधीही अनेक सनदी अधिकार्यांना राजकारणात आणलं गेलं. पण भाजपकडून अशा प्रकरणात अनेकदा नियम डावलून या गोष्टी उघडपणे केल्या गेल्या. गुप्तेश्वर पांडे यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज 24 तासांत कसा मंजूर करण्यात आला? तीन महिन्यांची नोटीस का नाही मागितली. इतर अधिकाऱ्यांना हा न्याय मिळतो का? असे अनेक प्रश्न आहेत.
"पांडे यांनी मुंबई पोलीसांबाबत केलेली विधानं आणि त्यानंतर बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची स्वेच्छानिवृत्ती घेणं. हे सर्व पूर्वनियोजित असल्याचं चित्र आता दिसतय. त्यांनी जी विधानं केली त्यामागे राजकीय अजेंडा असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे. आता ते भाजप किंवा जेडीयूमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यावेळी हे चित्र अधिक स्पष्ट होईल," चावके सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








