परीक्षेसाठी गरोदर पत्नीला दुचाकीवर घेऊन 1200 किलोमीटरचा प्रवास

धनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम

फोटो स्रोत, RAVI PRAKASH/BBC

फोटो कॅप्शन, धनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम

झारखंडच्या धनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम यांची चर्चा पूर्ण देशभरात सुरू आहे. या दोघांनी परीक्षा देण्यासाठी चक्क 1200 किलोमीटरचं अंतर दुचाकीवर पार केलं. या प्रवासाबद्दल दोघांचंही कौतुक होताना दिसत आहे.

धनंजय हे झारखंडमध्ये गोड्डाजवळ जसिडिह गावात राहतात. पत्नी सोनी यांची डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्यूकेशनची परीक्षा ग्वाल्हेरला होणार होती.

इतर वेळी त्यांनी हा प्रवास रेल्वेने केला असता. पण लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद आहेत. त्यातच त्यांच्या गावातून ग्वाल्हेरला जाण्यासाठी एकच रेल्वे आठवड्यातून एकच वेळ सुरू आहे.

त्यामुळे धनंजय आणि सोनी यांच्याकडे रस्त्यामार्गे जाण्याचाच पर्याय शिल्लक होता.

कार किंवा इतर गाड्यांनी जाणं त्यांना महाग पडलं असतं. त्यामुळे धनंजय आणि सोनी यांनी दुचाकीवर ग्वाल्हेरला जाण्याचा निर्णय घेतला.

धनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम

फोटो स्रोत, RAVI PRAKASH/BBC

दागिने गहाण ठेवून व्याजाने दहा हजार रुपये घेतले आणि प्रवासाला सुरुवात केली.

सोनी सध्या सात महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा प्रवास धोकादायक असाच होता. तरी फक्त परीक्षा देण्यासाठी त्यांनी हा धोका स्वीकारला.

धनंजय आणि सोनी गोड्डाच्या गंगटा वस्तीमधून 28 ऑगस्ट रोजी निघाले. 30 तारखेला दुपारी ते ग्वाल्हेरला पोहोचले.

या दरम्यान त्यांनी दोन रात्री रस्त्याच्या कडेलाच घालवल्या. पावसात भिजले, कधी उन्हाने त्यांना घामाघूम केलं. पण त्यांनी प्रवास थांबवला नाही.

कहाणी धनंजय यांच्याच शब्दांत..

धनंजय हांसदा यांना कोणत्याही परिस्थितीत पत्नीला परिक्षेला बसवायचं होतं.

ते सांगतात, "याच हट्टामुळे आम्हाला ताकद मिळाली आणि आम्ही रस्त्याने जात राहिलो. आयुष्यात पहिल्यांदाच दोन दिवसांत साडेतीन हजार रुपयांचं पेट्रोल विकत घेतलं. आम्ही गप्पा मारत स्कूटी चालवत राहिलो. आता सोनी परीक्षा देत आहे. 1 ते 11 सप्टेंबरदरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर आम्ही घरी गोड्डाला परत जाणार आहोत, पण हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहणार आहे."

धनंजय हांसदा बीबीसीशी बोलताना म्हणाले, "गोड्डाहून आम्ही सकाळी आठ वाजता निघालो. भागलपूरपर्यंत रस्ता प्रचंड खराब होता. स्कूटीला धक्के बसत होते. सोनी गरोदर होती, तिला काही होणार तर नाही ना, म्हणून मला भीती वाटत होती. रस्त्यात कित्येक खड्डे होते, त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं होतं."

"कसं तरी आम्ही भागलपूरपर्यंत आलो. तिथं बसबद्दल विचारलं तर एक व्यक्ती लखनऊला जाण्यासाठी पाच हजार रुपये मागत होता. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही स्कूटीवरच ग्वाल्हेरला जाण्याचा निर्णय घेतला.

धनंजय हांसदा और सोनी हेंब्रम

फोटो स्रोत, RAVI PRAKASH/BBC

"पत्नीला मागे बसून चक्कर येऊ नये यासाठी तोंडावर फडकं बांधून मागे बसण्यास सांगितलं. भागलपूरला रस्त्याच्या किनाऱ्यावर पुराचं पाणी साचलं होतं. त्यातच पाऊस सुरू होता. सलग काही तास गाडीवर बसल्यानंतर पत्नीच्या पोटात दुखू लागलं होतं. 28 तारखेच्या रात्री मुजफ्फरपूरमध्ये एका लॉजमध्ये आम्ही थांबलो. तेव्हा तिच्या पोटाची मालिश केल्यानंतर तिला बरं वाटलं.

"दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पावसामुळे कपडे भिजले होते. लखनऊला पोहोचता-पोहोचता खूप थकलो. आम्ही लॉज किंवा हॉटेल मिळतं का, ते शोधलं. पण हायवेवर काहीच नव्हतं. त्यामुळे लखनऊहून आग्र्याला जाणाऱ्या रस्त्यावरच्या टोल नाक्याजवळ एका झाडाखाली रेनकोट आणि चादर खाली पसरवून आम्ही झोपलो. अशा प्रकारे आम्ही दुसरी रात्र काढली.

"तिसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी चार वाजता आमचा प्रवास सुरू झाला. या दिवशी कडक ऊन होतं. रस्त्यात एखाद्या हॉटेलवर थांबणं, चहा-नाश्ता-जेवण करणं, अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू होता. मजल दरमजल करत आम्ही 30 तारखेला दुपारी दोन वाजता ग्वाल्हेरला पोहोचलो. पण त्यावेळी पत्नीची तब्येत बिघडली होती. तिला बारीक ताप होता.

"तिला खोकला येईल का, तिला कोरोना झालाय म्हणून परीक्षेला बसवण्यास नकार तर देणार नाहीत ना, अशी भीती माझ्या मनात होती. मेडिकलमधून औषध घेतलं. गरम पाणी दिलं. जेवण केल्यानंतर तिला थोडं बरं वाटलं.

"दरम्यान, विजय राठोड नामक एका पत्रकारानेसुद्धा माझी मदत केली. सोनी आता परीक्षा देऊ शकली म्हणून माझ्या कष्टांना फळ मिळालं."

घरच्यांनी थांबवलं नाही?

मूळचे बोकारोचे असलेले धनंजय हांसदा गोड्डामध्ये आपल्या पत्नीच्या मामींच्या घरी राहतात.

गोड्डामध्ये राहणाऱ्या त्यांच्या मामी सुशीला किक्सू यांनी धनंजय आणि सोनीला गाडीवर जाण्यापासून थांबवलं. पण त्यांनी त्यांचं काही एक ऐकलं नाही, असं सुशीला यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

सुशीला किक्सू

फोटो स्रोत, RAVI PRAKASH/BBC

फोटो कॅप्शन, सुशीला किक्सू

"गाडीने ग्वाल्हेरला जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आम्ही नकार देऊनसुद्धा ते स्कूटीने गेले. आता दोघं व्यवस्थित घरी परत यावेत, तेव्हाच आमचा जीवात जीव येईल," असं त्या म्हणाल्या.

परीक्षा चुकली असती तर काय झालं असतं?

धनंजय सांगतात, "परीक्षा चुकवण्याचा प्रश्नच येत नाही. मी फक्त तिसऱ्या वर्षापर्यंत शिकलो. वडिलांची नोकरी गेली होती. पाच भावा-बहिणींमध्ये मीच मोठा. त्यामुळे चौदाव्या वर्षीच कामाला लागलो.

"मागच्या वर्षी माझं लग्न झालं. मी शिकलो नाही पण पत्नीला शिक्षण पूर्ण करायला लावीन, असं मी ठरवलं होतं. तिला शिक्षक व्हायचं आहे. त्यामुळे ही परीक्षा महत्त्वाची होती. डिलेट पास झाल्यानंतर तिला नोकरी मिळू शकते. तिला तिचं स्वप्न पूर्ण करायची आहेत."

सोन्यासारखा नवरा

सोनी आणि धनंजय या दोघांचंही आयुष्य एकसारखंच राहिलं. दोघांचेही वडील कमी वयात गेले. पण धनंजयसारखा पती मिळाल्यामुळे सोनी आता स्वतःला नशीबवान मानते. तिला शिक्षक होण्यासाठी पतीने इतका मोठा धोका पत्करला. सर्वच जण असं करू शकत नाहीत.

धनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम

फोटो स्रोत, RAVI PRAKASH/BBC

फोटो कॅप्शन, धनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम यांचं घर

सोनी हेंब्रमशी सुद्धा बीबीसीने बातचीत केली. ती सांगते, "लहानपणापासून माझं शिक्षक बनायचं स्वप्न होतं. लग्नानंतर मी माझ्या पतीला याबाबत सांगितलं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मला पाठिंबा दिला. मला माझ्या पतीचा अभिमान आहे. मला सोन्यासारखा नवरा मिळाला आहे. त्यांच्या प्रेमावर मला विश्वास आहे. यामुळे स्कूटीवर जातानाही मी बिनधास्त होते. आमच्या एकमेकांवरच्या प्रेमामुळेच आम्ही हा लांबचा आणि धोकादायक प्रवास सहजपणे पूर्ण केला."

आता धनंजय काय करतील?

धनंजय आणि सोनी यांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने ग्वाल्हेरच्या डीडी नगर परिसरात एक खोली भाड्याने घेतली आहे.

त्यासाठी 15 दिवसांचे 1500 रुपये त्यांना द्यावे लागणार आहेत.

सध्या हीच खोली त्यांच्यासाठी आधार आहे. पण पुढचा प्रवास रेल्वे किंवा कारने करावा, असं धनंजय यांना वाटतं. त्यांना त्यांच्या पत्नीला पुन्हा स्कूटीच्या प्रवासाचा त्रास होऊ द्यायचा नाही.

धनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम

फोटो स्रोत, RAVI PRAKASH/BBC

फोटो कॅप्शन, धनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम

यासाठी झारखंड सरकारने मदत करावी, असं त्यांना वाटत होतं. पण तोपर्यंत अदानी समूहाने त्यांच्यासाठी विमानाच्या तिकीटाची सोय केली, असं धनंजय यांनी बीबीसीला सांगितलं.

ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकाऱ्यांची मदत

या काळात ग्वाल्हेर प्रशासनानेही त्यांची मदत केली. जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी त्यांना पाच हजार रुपयांची मदत केली तसंच जेवणाची सोयही केली.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "सोनी यांची अल्ट्रासाऊंड (UGC) चाचणी रविवारी करण्यात येईल. त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाईल. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना त्यांची देखभाल करण्यास सांगितलं आहे. ग्वाल्हेरमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ."

ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह

फोटो स्रोत, RAVI PRAKASH/BBC

फोटो कॅप्शन, ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह

धनंजय हांसदा यांनी या मदतीबाबत आभार मानले. यामुळे थोडीफार मदत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

धनंजय काय करतात?

धनंजय हांसदा लॉकडाऊनपूर्वी अहमदाबादमध्ये आचाऱ्याची नोकरी करत होते. लॉकडाऊनमध्ये काम बंद पडल्यामुळे ते आपल्या गावी परतले.

सध्या अनेक पत्रकार त्यांना फोन करत असल्याचं धनंजय यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांत धनंजय आणि सोनी यांची प्रेमकहाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

त्यांच्या फोनच्या कॉलरट्यूनवरचं गाणं आहे, "मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से...'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)