कोरोना पुणे: 9 वी ते 12 वीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरू करण्याची पालिकेची परवानगी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
पुणे महानगरपालिका हद्दीतील 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्याची परवानगी पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी काढले. वर्ग सुरू करताना शासनाच्या नियमांचे पालन करण्याने बंधनकारक असणार आहे.नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. कोव्हिडची परिस्थिती पाहून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते.
पुण्यातील परिस्थिती पाहून शाळा 3 जानेवारीपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला होता. आता परिस्थिती काहीशी नियंत्रणात असल्याने 4 जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.वर्ग सुरू करताना शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन शाळा आणि महाविद्यालयांना करावे लागणार आहे. शाळेत स्वछता राखणे तसेच निर्जंतुकीकरण करने बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांची थर्मल गन ने तसेच पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करणे आवश्यक आहे.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोव्हिड चाचणी करणे बंधनकारक आहे. एका बाकावर एक अशी बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना सादर करावी लागणार आहे. आदी नियमांचे पालन शाळांना करावे लागणार आहे.
ऑगस्टमध्ये पुण्यात कोरोनाची स्थिती कशी होती?
पुण्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी (21 ऑगस्ट) माध्यमांना सांगितलं.
एकीकडे पुण्यासाठी जम्बो हॉस्पिटलसारख्या सुविधा उभारत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे आता पुण्यात कोरोनाचा पीक आला आहे, असं खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच म्हटलं आहे.
त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ का होत आहे, यामागची कारणं काय आहेत, हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
सुरुवातीला राजेश टोपे नेमकं काय म्हणाले, ते पाहूया.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"पुण्यात कोरोना व्हायरसच्या पीकची परिस्थिती सध्या आली आहे. ज्यामध्ये वाढ दिसत आहे, तो कुठेतरी खाली येईल, असा विश्वास आहे. कोरोनाबाबत सरकारनं मुंबई, मालेगाव, धारावी या भागांचा जो अभ्यास केला त्यातून एक गोष्ट लक्षात येते, की कोरोनाचा एक पीक येतो आणि पीकनंतर तो खाली जातो. त्याअनुषंगानं पुण्यात पीकची परिस्थिती सध्या आलेली आहे," असं राजेश टोपे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "पुण्यात ऑक्सिजनशिवायचे ICU बेड्स 13,308, ऑक्सिजन बेड 3,017, व्हेंटिलेटरशिवायचे ICU बेड्स 360 आणि 491 व्हेंटिलेटर्स आहेत. त्यामुळे पुण्यात बेड्स उपलब्ध नाहीत, असं नाही. याशिवाय 850 बेड्सची जम्बो फॅसिलिटी उपलब्ध करून दिली जात आहे."
पुण्यात नेमकं काय चुकलं?
प्रशासनाच्या विभागांमध्ये कोणताही समन्वय नसणे, हे पुण्यात कोरोनाचा पीक येण्याचं कारण असल्याचं सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला पेशंट मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात सापडला. असं असतानाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरकारनं काहीच केलं नाही. हा सगळा काळ अक्षरश: वाया गेला. त्यानंतर लॉकडाऊनमध्येही लोक बाहेर पडताना दिसले. कारण महसूल आणि पोलीस खात्यात कोणताही समन्वय नव्हता. त्यामुळे सरकारचे आदेश असतानाही लोक रस्त्यावर येत असतील तर ते प्रशासनाचं अपयश आहे."

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

फडणीस पुढे सांगतात, "मुंबईत पहिलं जम्बो हॉस्पिटल उन्हाळ्यात उभारलं गेलं. पुण्यात पावसाळा आला तरी ते अजून पूर्ण झालेलं नाहीये. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने सरकार आणि प्रशासन सगळेच गप्प होते. जूनमध्ये खासगी हॉस्पिटल ताब्यात घ्यायची प्रक्रिया सुरू केली. याचा अर्थ सुरुवातीचे तीन महिने वाया गेले. पुण्यात ससूनसारखं रुग्णालय, बालेवाडी सारखं मैदान असतानाही त्याचा वापर करता आला नाही."

फोटो स्रोत, ANI
कोरोनाचा सामना करण्यासाठी पुण्यात 3 जम्बो हॉस्पिटल उभारण्याचं सरकारनं घोषित केलं आहे. पण, अद्याप पहिल्याच जम्बो हॉस्पिटलची उभारणी पूर्ण झालेली नाही. 19 ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण होईल, असं प्रशासनानं सांगितलं होतं, नंतर ती डेडलाईन 22 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
"आज पुण्यात अशी परिस्थिती आहे, की एखाद्याला कोरोना झाला, तर नेमकं जावं कुठं, हेही ठाऊक नाही. IT हब म्हणून पुण्याचा उल्लेख केला जातो. मग एखादं APP तयार करून, तंत्रज्ञानाचा वापर करून होम आयसोलेशन किंवा कोरोनासंबंधीच्या माहितीचा व्यवहार त्यावर करायला काय हरकत आहे?" असा सवाल फडणीस पुढे करतात.
'टेस्टिंग कमी'
इंडियन मेडिकल असोसिएशचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, पुण्यात कोरोनाविषयी हवी तितकी जागरुकता झाली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी सांगितलं, "पुण्यातील आरोग्य क्षेत्रात आधीपासूनच कोरोनाविषयी उदासीनता दिसून आली. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाही. जे झाले ते फक्त सोशल मीडियावर. त्यामुळे मग झोपडपट्टी किंवा गरीब वर्गापर्यंत जागरुकता दिसली नाही.
"दुसरं म्हणजे पुण्यात टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे. दररोज 15,000 टेस्टिंगची क्षमता असतानाही 6 ते 7 हजार टेस्टिंग केलं जात आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचाही मुद्दा आहे. एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला, की त्याच्या नातेवाईकांना स्वत: टेस्टिंग करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीये.
"तिसरं म्हणजे पुण्यात सिरो सर्व्हे करण्यात आला. त्यात दिसून आलं की 50 टक्क्यांहून अधिक लोकांनी टेस्टिंग केली नाही. आता ही माणसं दरम्यानच्या काळात कितीतरी लोकांना भेटली असतील, त्यामुळे कोरोनाचे रुग्णही वाढत जातील."
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुण्याचा पहिला सिरो सर्व्हे करण्यात आला आहे. पुण्यातील 1664 व्यक्तींची सॅम्पल्स कलेक्ट करण्यात आली आहे. यापैकी 51.5 टक्के लोकांमध्ये कोरोना व्हायरससाठी लढण्याच्या अँटिबॉडीज आढळून आल्या आहे.
पुण्यासाठी जमेच्या बाजू
पुण्यातील कोरोना रुग्णांची माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्याविषयीच्या काही जमेच्या बाजू सांगितल्या.

फोटो स्रोत, EPA
ते म्हणाले, पुण्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 79 टक्के आहे. तसंच मृत्यूदरही कमी आहे. तो 2.35 च्या दरम्यान आहे.
याविषयी पत्रकार अद्वैत मेहता यांनी सांगितलं, "पुण्यात कोरोना बाधितांचा रेट 20 ते 21 टक्क्यांवर आला आहे, हे खरं आहे. पण, पुण्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. पुणे जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच पुण्यातील रुग्णांचा मृत्यूदरही कमी आहे. त्यामुळे पुण्यात कुणाचं काही चुकलंय असं म्हणता येणार नाही."
"पण, हेही तितकंच खरं आहे पुण्यासारख्या शहरात जम्बो हॉस्पिटल उभारणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. फार पूर्वीच महापालिकेची जी अनेक दवाखाने बंद आहेत, त्यामधील पदं भरायला हवी होती. आरोग्य सुविधांवर भर देणं गरजेचं होतं."
प्रशासन काय करतंय?
पुण्यातील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर आम्ही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही.
असं असलं तरी पुण्यातील परिस्थितीविषयी बोलताना त्यांनी बीबीसी मराठीला गुरुवारी सांगितलं होतं, "मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरं वेगवेगळी आहेत. दोन्ही शहरांत कोरोनाचा जो प्रसार झाला त्याचं स्वरूप वेगळं आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील कोरोनाच्या स्थितीची तुलना योग्य नाही. पुण्यात उपलब्ध असलेल्या शासकीय तसंच खासगी सुविधेच्या आधारे आम्ही परिस्थिती निश्चितपणे हाताळलेली आहे."

फोटो स्रोत, Hindustan Times
याव्यतिरिक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुण्यात बैठक घेऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी बैठका घेऊन आरोग्य यंत्रणेला आदेश दिले आहेत.
शुक्रवारीही अजित पवार यांनी कोरोनाविषयी बैठक घेतल्याची माहिती ट्वीट करून दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्यांनी म्हटलं, "पुण्यातील कोरोनाच्या व्यवस्थापन आणि नियोजनाविषयी बैठक घेतली. पुणे आणि पिंचरी चिचवड शहरी भाग तसंच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी परिणामकारक उपाय योजण्याचे आदेश दिले. तसंच बेड्सची कमतरता जाणवणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचनाही केली."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








