उद्धव ठाकरे: 'आम्ही केंद्राला सांगत होतो त्यावेळी मजुरांना जाऊ दिलं असतं तर आता परिस्थिती वेगळी असती'

उद्धव ठाकरे

सध्याच्या घडीला ज्या वेगाने राज्यातली रुग्णांची आकडेवारी वाढतेय त्यावरून आपण संसर्गाच्या 'पीक'च्या जवळ असल्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय.

लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. यासोबतच सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आरोप, लॉकडाऊन या सगळ्यांविषयी त्यांनी या मुलाखतीत चर्चा केलीय.

महाराष्ट्र संसर्गाच्या शिखराजवळ

राज्यातल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "महाराष्ट्रात आपण एकतर पीकवर आहोत, किंवा त्याच्या जवळ चाललो आहोत. कारण ज्या पद्धतीने पटापट आकडे वाढतायत ते बघितल्यानंतर आपण त्या शिखराच्या जवळ आहोत, अशी एक शक्यता आहे. तसं असेल तर ते बरं आहे. आता परिस्थिती आपण नियंत्रणात ठेवू शकतो. पुढचे 8-10 दिवस याच रेंजमध्ये आकडेवारी राहून मग ती खाली येईल."

कोरोना
लाईन

यासोबतच पहिल्या दिवसापासूनच आपली लष्कराकडून 'मार्गदर्शन' घेण्याची तयारी होती आणि त्यात काहीही गैर नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

केंद्राचा लॉकडाऊन

केंद्र सरकारने पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा राज्यांना त्याची कल्पना देण्यात आली नव्हती असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. यानंतरही स्टेशन्सवर होणारी गर्दी पाहता आपणा ट्रेन्स देण्याची विनंती केंद्राला केली होती, ती तेव्हा मान्य झाली असती तर आताच्या अयोग्य वेळी स्थलांतर झालं नसतं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

कोरोनाची चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

उद्धव ठाकरे म्हणाले, "कुर्ला टर्मिनस आणि इतर ठिकाणी होणारी गर्दी पाहता ट्रेन्स द्या अशी विनंती केंद्राला केली होती. आम्ही त्यांचा खर्च करतो. आम्ही कोणाला जा सांगत नाही, पण कोणाला जायचं असेल, गावी सुरक्षित वाटत असेल, तर तेव्हा जर का त्यांना गावी जाऊ दिलं असतं. तर आता ज्या ट्रेन्स अर्ध्या किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेने चालवाव्या लागत आहेत, तेव्हा असं झालं नसतं. सगळे लोक सुखरूप घरी गेले असते, जिथल्या तिथे राहिले असते. आणि आत्ता अयोग्य वेळी जे स्थलांतर होतंय, वा झालंय ते थांबलं असतं आणि याचा प्रसार अधिक नियंत्रणात राहिला असता."

प्रशासनाचा अनुभव आणि विरोधकांची टीका

मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नाही किंवा मुख्यमंत्री दिसत नाहीत या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीदरम्यान उत्तर दिलं. ते म्हणाले, "प्रशासनाचा अनुभव नाही, म्हणून मी काम करू शकतोय. ज्यांना अनुभव आहे, ते अनुभवसंपन्न लोक गोंधळून आरोप करतायत. मला अनुभव नसल्याचा फायदा आहे. त्यामुळे मी मोकळेपणाने काम करू शकतोय. माझ्याकडे बॅगेज नाही. मी मोकळेपणाने सूचना ऐकतोय, मला जे वाटतंय त्या सूचना देतोय. मला आत्मविश्वास आहे, मी गोंधळलेलो अजिबात नाही."

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.

मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या अंमलाखाली काम करतात या टीकेलाही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

"अधिकाऱ्यांच्या अंमलाखाली काम करत असेन, तर चूक काय केली? ते दाखवून द्या. मी कोणाच्या अंमलाखाली काम करतोय? ते म्हणण्यापेक्षा मी चूक काय केली ते दाखवा. रेडिओवर नाटकं आणि श्रुतिका होतात त्यात कुठे अॅक्शन दिसते?

"मी चित्रपट सृष्टीतला हिरो नाही. मी दिसून काय करू? मी नुसता दिसत राहिलो, फिरत राहिलो आणि काम काहीच केलं नाही तर? माझं काम दिसलं पाहिजे, माझं काम बोललं पाहिजे. माझं काम दिसतंय आणि ते बोलतंय."

केंद्र आणि इतर राज्यांशी समन्वय

जिथली सेवा बंद करायची वा सुरू करायची आहे तिथल्या राज्याशी सल्लामसलत होणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विमानसेवा सुरू करायला आपला विरोध का होता, याविषयीचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे.

लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images

याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं, "मी विमानं सुरू करायला सुरुवातीला विरोध केला होता. विमानतळ सुरू करणं हे एक इंडस्ट्री सुरू करण्यासारखं असतं. यात अनेक लोकांचा समावेश असतो. हे सगळे येणार-जाणार कसे आणि कुठून? कारण 31 मे पर्यंत मोदीजींनीच लॉकडाऊन केलेला आहे.

"विमानातून आलेले लोकं त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे, त्यासाठीच्या सूचना काय आहे, हे सगळं करून मग त्यासाठीची एक तारीख जाहीर करणं योग्य असल्याचं माझं मत होतं. पण त्यानंतर मुंबई महत्त्वाचं केंद्र असल्याने मुंबई बंद राहिल्यास येणाऱ्या - जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. हा सगळा विचार करून मर्यादित स्वरूपात विमानं सुरू करण्यात आली. टाळेबंदी प्रमाणेच हा निर्णय घेताना राज्यांना विचारात घेण्यात आलं नाही."

आरोग्य यंत्रणेबद्दल

आरोग्य सुविधांकडे आपण थोडंसं दुर्लक्ष केलं हे वास्तव असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मुलाखतीदरम्यान म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, "हे कटू सत्य स्वीकारायला हवं, कारण ते दिसतंय. ग्रामीण भागामध्येच काय मुंबईतही आज बेड न मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. एवढ्या मोठ्या अराजकाची आपण कल्पना केली नव्हती.

उद्धव

फोटो स्रोत, Twitter

"आपल्याला बेड्स लागतील अशी कल्पना आपण केली नव्हती, पण ते आज लागतायत. गेल्या महिन्यात मुंबईत फक्त 900 बेड्स होते. आता ते आपण 4000 च्या आसपास नेलेले आहेत. येत्या काही दिवसांत मला ही संख्या 15,000 पर्यंत न्यायची आहे. माझ्या पुढच्या काळात आरोग्य व्यवस्था प्राथमिकता असेल, त्याला प्राधान्य असेल."

शाळांविषयी

15 जूनपासून शाळा सुरू होणार का, याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "शाळा सुरू करता येणं थोडं अवघड दिसतंय. त्यामुळेच शाळा सुरू न करता शिक्षण कसं सुरू करता येईल हा महत्त्वाचा भाग आहे. त्याबद्दल विचार सुरू आहे. ऑनलाईन, ई लर्निंग, टीव्ही चॅनल सुरू करणं याविषयी बोलणी सुरू आहेत. मोबाईल कंपन्यांशी बोलून अधिकचा डेटा देता येईल का, याविषयीची बोलणीही सुरू आहेत. वर्गाशिवाय शाळा कशा सुरू करता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत." डॉ. माशेलकरांसारख्या तज्ज्ञांशी बोलून यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

यासोबतच 1 जून नंतरसाठीच्या गाईडलाईन्सवर काम करण्यात येत असल्याचंही या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)