कोरोना व्हायरस: चहा प्यायल्यानं कोव्हिड-19ची लागण होत नाही का?

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. पण या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय आणि उपचार याबद्दलच्या इनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत.

व्हायरसपासून बचावाचे अनेक चुकीचे सल्ले सध्या दिले जातायत. बीबीसी न्यूजने यापैकी काही सल्ल्यांची पडताळणी केली.

पेपर कपमध्ये चहा पिणं

चहाचा एक कप तुम्हाला या व्हायरसच्या संसर्गापासून रोखू शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. यामध्ये चीनच्या डॉक्टर ली वेन्लियांग यांचा दाखला देण्यात आलाय.

डॉ. ली हे यांनी जगाला सर्वांत आधी या व्हायरसचा धोका सांगितला होता आणि याच व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू झाला, असंही या मेसेजमध्ये म्हटलं गेलंय.

कोरोना
लाईन

चहामध्ये आढळणारा मिथाइलजेन्थाइन हा घटक व्हायरसची तीव्रता कमी करत असल्याचं डॉ. वेन्लियांग यांनी आपल्या केस फाईलमध्ये लिहिलं होतं, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय. शिवाय या माहितीच्या आधारेच चीनच्या हॉस्पिटल्सनी कोव्हिड-19 च्या रुग्णांना दिवसातून 3-4 वेळा चहा द्यायला सुरुवात केल्याचं ही यात म्हटलंय.

बीबीसीने याविषयी तपासणी केली तेव्हा कळलं की मिथाईलजेन्थाइन नावाचा हा घटक चहासोबतच कॉफी आणि चॉकलेटमध्येही असतो. पण डॉ. वेन्लियांग याविषयी काही संशोधन करत होते, याविषयीचा कोणताही पुरवा मिळाला नाही. ते या व्हायरसविषयीचे तज्ज्ञ नव्हते. ते नेत्रतज्ज्ञ होते.

शिवाय, चीनच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोव्हिड 19च्या रुग्णांना आवर्जून चहादेखील दिला जात नाहीये.

चहाचं सेवन कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखू शकतं, हा दावा चुकीचा आहे.

गोमूत्र आणि शेण

अनेक रोगांवरचा इलाज म्हणून भारतामध्ये गोमूत्र आणि शेण वापरण्याचे उपाय सूचवले जातात.

भाजप खासदार सुमन हरीप्रिया

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, भाजप खासदार सुमन हरीप्रिया

भारतीय जनता पक्षाच्या खासदार सुमन हरीप्रिया यांनीही कोरोना व्हायरसवरचा उपाय म्हणून गोमूत्र आणि शेण वापरण्याचा सल्ला दिलाय. त्या म्हणाल्या, "गाईच्या शेणाचे अनेक फायदे आहेत. मला वाटतं की याने कोरोना व्हायरसही संपुष्टात आणता येईल. गोमूत्रही फायदेशीर ठरू शकतं."

गोमूत्राच्या तथाकथित 'अँटी बॅक्टेरियल' गुणधर्मांविषयी यापूर्वी संशोधन झालेलं आहे.

कोरोना व्हायरसवरचा इलाज म्हणून गोमूत्राचा प्रचार करण्यासाठी एका हिंदुत्त्ववादी गटाने दिल्लीमध्ये गोमूत्र प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण इंडियन व्हायरोलॉजिकल सोसयटीच्या डॉ. शैलेंद्र सक्सेना यांनी बीबीसीला सांगितलं, "गोमूत्रामध्ये अँटी व्हायरल गुण असतात याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही."

ते म्हणतात, "गाईच्या शेणाच्या वापराचा उलट परिणाम होऊ शकतो. कारण जर त्यामध्ये कोरोना विषाणू असेल तर तो तिथून माणसांत येऊ शकतो."

अल्कोहोल फ्री सॅनिटायझर

काऊपॅथी हा ब्रँड 2018 पासून गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या साबणासोबतच अल्कोहोल फ्री हँड सॅनिटायझरची ऑनलाईन विक्री करत आहे. यामध्ये देशी गायीचं गोमूत्रं मिसळलं जातं.

सध्यातरी ही उत्पादनं 'आऊट ऑफ स्टॉक' असल्याचं ऑनलाईन दिसतंय. या उत्पादनाच्या पेजवरच्या माहितीनुसार, "मागणी वाढल्याने आम्ही प्रत्येक ग्राहकाला किती वस्तू मिळतील याची मर्यादा ठरवलेली आहे, म्हणजे सगळ्या ग्राहकांना उत्पादनं मिळू शकतील."

तर लोकांनी घरच्या घरीच हर्बल हँड सॅनिटायझर तयार करावं असा सल्ला दुसरीकडे बाबा रामदेव यांनी एका हिंदी न्यूज चॅनलवरून दिलाय.

गुळवेल (Tinospora cordifolia), हळद आणि तुळशीच्या पानांचं सेवन केल्याने कोरोना व्हायरस रोखण्यास मदत होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पण अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरणं गरजेचं असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अमेरिकेच्या डिसीज कन्ट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी)ने म्हटलंय.

अगदी व्होडकाममध्येही फक्त 40 टक्के अल्कोहोल असल्याने घरी तयार करण्यात आलेलं हँड सॅनिटायझर प्रभावी ठरणार नाही, असं लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या प्राध्यापक सॅली ब्लॉमफिल्ड सांगतात.

शाकाहार

लोकांनी मांस खाऊ नये असं आवाहन हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांनी ट्वीट केलं होतं, "शाकाहार अवलंबा. विविध प्राण्यांचं मांस खाऊन मानवतेसाठी धोका ठरणाऱ्या कोरोना व्हायरससारखे विषाणू जन्माला घालू नका."

तर मांसाहार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठीच कोरोना व्हायरस आला असल्याचा दावा एका हिंदुत्त्ववादी गटाने केला.

यानंतर अंडी आणि चिकनची विक्री कमी झाल्याचं पशुधन उत्पादनाचं काम सांभाळणाऱ्या मंत्रालयाने म्हटलं. यानंतर यासगळ्या गोष्टींचं खंडन करत भारत सरकारच्या फॅक्ट चेकिंग सर्व्हिसने याबद्दल पोस्ट केलं.

याविषयीचा कोणताही पुरावा भारतीय खाद्य नियामकांना आढळला नसल्याचं सरकारचे मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलंय. ते म्हणाले, "मासे, चिकन वा अंडी खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस पसरत नाही. कोंबडी आणि माशांसोबतच अंडी हा प्रथिनांचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. म्हणूनच न घाबरता याचं सेवन करा."

कोरोनापासून बचाव करणाऱ्या गाद्या

कोरोनापासून एखादी गोष्ट तुमचं रक्षण करते, असं सांगून आता व्यापारी काही गोष्टी विकत आहेत.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना व्हायरस

उदाहरणार्थ, 'अँटी कोरोना व्हायरस गाद्यां'ची 15 हजारांना विक्री होतेय. याच्या जाहिराती वर्तमान पत्रात देण्यात आल्या होत्या. अरिहंत मॅट्रेसेसचे कार्यकारी संचालक अमर पारेख यांनी बीबीसीला सांगितलं," या गाद्या अँटी फंगल(बुरशी न येणाऱ्या), अँटी अलर्जिक (अॅलजी विरोधी), डस्टप्रूफ (धूळ न साठणाऱ्या), वॉटरप्रूफ (पाण्याने खराब न होणाऱ्या) आहेत. यामुळे याच्याआत काहीही जाऊ शकत नाही."

पण गाद्यांची ही जाहिरात आता काढून टाकण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं, "मला कोणाचं नुकसान करायचं नाही. विरोध झाल्यानंतर आम्ही जाहिरात हटवली."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)