Mahatma Gandhi: नथुराम गोडसेने महात्मा गांधींना 55 कोटींसाठी मारलं होतं का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
10 फेब्रुवारी 1949 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या रस्त्यावर गाड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.महात्मा गांधी हत्या प्रकरणाचा त्यादिवशी निकाल येणार होता. लाल किल्ल्याच्या आतच विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं.
सकाळी बरोबर 11.20 मिनिटांनी नथुराम गोडसेसह इतर आठ आरोपींना कोर्टात आणण्यात आलं. यापैकी केवळ सावरकरांचा चेहरा गंभीर होता. नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि विष्णू करकरे हसत हसत कोर्टात आले.काळा कोट घातलेले न्यायमूर्ती आत्माचरण 11.30 मिनिटांनी कोर्टात आले. आपल्या खुर्चीत बसताच न्या. आत्माचरण यांनी नथुराम गोडसेचं नाव घेतलं आणि गोडसे उठून उभे झाले. त्यानंतर एकापाठोपाठ एक सर्वांची नावं त्यांनी घेतली.
न्या. आत्माचरण यांनी गांधीहत्येसाठी दोषी ठरवत नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना देहदंडाची शिक्षा सुनावली. विष्णू करकरे, मदनलाल पाहवा, शंकर किस्टया, गोपाळ गोडसे आणि दत्तात्रय परचुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायमूर्तींनी सावरकरांची निर्दोष मुक्तता करत त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने निकाल सुनावताच आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर येताना नथुराम गोडसेसह सर्वांनीच 'हिन्दू धर्म की जय, तोड के रहेंगे पाकिस्तान आणि हिन्दू हिन्दू हिंदुस्तान' अशी घोषणाबाजी केली. न्यायालयात घोषणाबाजी करण्याची नथुराम गोडसे यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती.
लाल किल्ल्यात सुनावणी सुरू असताना 8 नोव्हेंबर 1948 रोजी साक्ष पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने नथुराम यांना तुम्हाला काही म्हणायचं आहे का, असं विचारलं. त्यावर गोडसे म्हणाले की त्यांना त्यांनी लिहिलेलं 93 पानी जबानी वाचायची आहे.
गोडसे यांनी 10.15 मिनिटांनी वाचायला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी सांगितलं की हे भाषण सहा भागात आहे. पहिल्या भागात कट आणि कटाशी संबंधित गोष्टी, दुसऱ्या भागात गांधींचं सुरुवातीचं राजकारण, तिसऱ्या भागात गांधींच्या राजकारचा शेवटचा टप्पा, चौथा भाग गांधीजी आणि भारताचा स्वातंत्र लढा, पाचव्या भागात स्वातंत्र्याचं स्वप्न भंगणं आणि शेवटच्या भागात 'राष्ट्र विरोधी तुष्टीकरण' असल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
गोडसे यांनी प्रसार माध्यमांना विनंती केली की त्यांची जबानी संदर्भ न देता कुणीही छापू नये. 45 मिनिटं वाचून झाल्यावर गोडसे भोवळ येऊन पडले. काही वेळानंतर त्यांनी पुन्हा भाषण वाचायला सुरुवात केली. संपूर्ण जबानी वाचायला पाच तास लागले. वाचत असताना ते वारंवार पाणी पीत होते. गोडसे यांनी त्याचा शेवट 'अखंड भारत अमर रहे' आणि 'वंदे मातरम' या घोषणांनी केला.
चीफ प्रॉसिक्युटरने गोडसे यांचं हे भाषण कोर्टाच्या रेकॉर्डमधून काढण्याची विनंती केली. हे भाषण अजिबात महत्त्वाचं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. यावर गोडसे कोर्टात म्हणाले की त्यांना भारताच्या वर्तमान सरकारवर अजिबात विश्वास नाही कारण हे सरकार 'मुस्लीम धार्जिणे' आहे. न्या. आत्माचरण यांनी गोडसे यांचं भाषण रेकॉर्डवरून काढण्यास नकार दिला आणि न्यायालयात लिखित साक्ष गृहित धरली जाते, असं सांगितलं. त्या दिवशीदेखील कोर्टात अलोट गर्दी होती.
9 नोव्हेंबर 1948 रोजी न्या. आत्माचरण यांनी गोडसे यांना 28 प्रश्न विचारले. एका प्रश्नाच्या उत्तरात गोडसे म्हणाले, "होय. गांधीजींवर गोळी मी झाडली. गोळी झाडल्यावर एका माणसाने मागून माझ्या डोक्यावर वार केला आणि रक्त येऊ लागलं. मी म्हणालो मी जी योजना आखली होती त्यानुसारच काम केलं आणि याचा मला अजिबात पश्चाताप नाही. त्याने माझ्या हातून पिस्तूल हिसकावलं. पिस्तूल ऑटोमॅटिक होतं आणि चुकून कुणावर गोळी झाडली जाऊ नये, अशी काळजी मला वाटत होती. त्या माणसाने माझ्यावर पिस्तूल रोखलं आणि म्हणाला मी तुला गोळी घालेन. मी म्हणालो माझ्यावर गोळी झाड. मी मरायला तयार आहे."
महात्मा गांधी यांचे पणतू आणि गांधी हत्याकांडावर एक प्रामाणिक पुस्तक (Let's Kill Gandhi) लिहिणारे तुषार गांधी म्हणतात, "हा गोडसे यांचा कोर्टरूम ड्रामा होता. बापूची हत्या करून आपण हिरो बनू आणि त्याच्या कृत्याशी हिंदू सहमत होतील, असं त्याला वाटलं होतं. जेव्हा त्याला दिसलं की असं होत नाहीय तेव्हा त्याने कोर्टात नाट्य उभं करण्याचा प्रयत्न केला."
30 जानेवारी 1948
खूपच अशुभ दिवस होता तो. नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि विष्णू करकरे दिल्ली रेल्वे स्टेशनजवळच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून बिरला मंदिराकडे जायला निघाले.
गोडसेने बिरला मंदिराच्या मागच्या भागाला असलेल्या जंगलात तीन-चार राउंड फायर करून पिस्तल नीट चालतंय ना, याची खातरजमा करून घेतली. सकाळी साडे अकरा वाजता गोडसे पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनकडे निघाले तर करकरे मद्रास हॉटेलला गेले.
दुपारी दोन वाजता करकरे पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनला पोचले. तिथे गोडसे आणि आपटे भेटले.संध्याकाळी साडे चार वाजता तिघेही टांग्याने बिरला मंदिराकडे रवाना झाले. गोडसे यांनी बिरला मंदिराच्या मागच्या आवारात असलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन केलं.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
आपटे आणि करकरे तिथून चार किमी. दूर असलेल्या बिरला भवनकडे रवाना झाले. बिरला भवन अलबुर्कक रोडवर होतं. हा रस्ता आज 'तीस जनवरी रोड' म्हणून ओळखला जातो.
आज 'गांधी स्मृती भवन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरला भवनात प्रार्थना स्थळाकडे जाणाऱ्या महात्मा गांधींवर गोडसे यांनी संध्याकाळी 5.10 मिनिटांनी गोळी झाडली. गोडसेंना अटक झाली. मात्र, आपटे आणि करकरे दिल्लीतून पसार झाले.
चौकशी आयोगाची स्थापना गांधी हत्येच्या 17 वर्षांनंतर का करण्यात आली, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर फार अवघडही नाही. गांधींची हत्या अचानक झालेली नव्हती. स्वतंत्र भारतात पोलिसांच्या हलगर्जीपणाची कहाणी गांधी हत्येपासूनच सुरू होते, असं आपण म्हणू शकतो. अनेकांचं तर असं म्हणणं आहे की गांधींची हत्या होऊ देण्यात आली.
बापूंच्या हत्येच्या 17 वर्षांनंतर 22 मार्च 1965 रोजी या हत्येच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांची नियुक्ती करण्यात आली.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
12 ऑक्टोबर 1964 रोजी नथुराम गोडसेंचं धाकटे बंधू गोपाळ गोडसे यांच्यासह विष्णू करकरे आणि मदनलाल पाहवा आजन्म कारावासाची शिक्षा भोगून बाहेर आले.
गोपाळ गोडसे आणि विष्णू करकरे पुण्यात पोचले तेव्हा त्यांच्या मित्रांना त्यांचं जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्याची योजना होती. या कार्यक्रमात त्यांचं कृत्य म्हणजेच गांधी हत्येत त्यांनी बजावलेल्या भूमिकेचं समर्थन आणि त्याचा उत्सव साजरा करण्याचं ठरवण्यात आलं.
12 नोव्हेंबर 1964 रोजी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली. या पुजेला येण्यासाठी मराठीत आमंत्रणं वाटण्यात आली. या आमंत्रण पत्रात लिहिलं होतं की देशभक्तांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी या पुजेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण सर्वांनी येऊन त्यांना शुभेच्छा द्याव्या. या कार्यक्रमात जवळपास 200 लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात नथुराम गोडसे यांनाही देशभक्त म्हणण्यात आलं.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू गजानन विश्वनाथ केतकर यांचं वक्तव्य सर्वात आश्चर्यकारक होतं. ग. वि. केतकर लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या 'केसरी' आणि 'तरुण भारत' या दोन वर्तमानपत्रांचे संपादक होते. हिंदू महासभेचे विचारक अशी केतकर यांची ओळख होती.
स्वतः केतकर हेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. पुजा झाल्यानंतर गोपाळ गोडसे आणि करकरे यांनी आपले तुरुंगातले अनुभव सांगितले. याचवेळी केतकर म्हणाले की त्यांना गांधी हत्येच्या कटाची माहिती आधीच होती आणि स्वतः नथुराम गोडसे यांनीच त्यांना त्याबद्दल सांगितलं होतं.
टिळक यांचे नातू ग. वि. केतकर म्हणाले, "काही आठवड्यांपूर्वी गोडसे यांनी आपला इरादा शिवाजी मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात स्पष्ट केला होता. गोडसे म्हणाले होते की 'गांधी म्हणतात मी 125 वर्षं जगणार आहे. मात्र त्यांना 125 वर्ष जगू कोण देईल? त्यावेळी आमच्यासोबत बाळूकाका कानेटकरदेखील होते आणि गोडसे यांच्या भाषणातला हा भाग ऐकून ते अस्वस्थ झाले होते. आम्ही कानेटकरांना सांगितलं की आम्ही नाथ्याला (नथुराम गोडसे) समजावू आणि असं करण्यापासून रोखू. मी नथुरामला विचारलं होतं की त्याला गांधींना ठार करायचं आहे का? त्याला होकार देत नथुरामने म्हटलं की गांधींमुळे देशात आणखी समस्या निर्माण होऊ नये, असं त्याला वाटतं."

फोटो स्रोत, NAvjeevan publlication
केतकर यांचं हे भाषण प्रसार माध्यमांमध्ये वणव्यासारखं पसरलं. इंडियन एक्सप्रेसने ग. वि. केतकर यांची सविस्तर मुलाखत घेऊन बातमी दिली. या बातमीत तो फोटोही छापण्यात आला ज्यात नथुराम गोडसेंच्या फोटोला हार घालून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती आणि ते देशभक्त असल्याचं म्हटलं होतं.
ग. वि. केतकर यांनी 14 नोव्हेंबर 1964 रोजी इंडियन एक्सप्रेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "तीन महिन्यांपूर्वीच नथुराम गोडसेने गांधी हत्येची योजना मला सांगितली होती. 20 जानेवारी 1948 रोजी मदनलाल पाहवाने गांधीजींच्या प्रार्थना सभेत बॉम्ब फेकला होता. त्यानंतर बडगे पुण्यात माझ्याकडे आला होता आणि त्याने पुढच्या योजनेविषयी मला सांगितलं होतं. गांधींची हत्या होणार आहे, हे मला ठावुक होतं. याची वाच्यता मी कुणाकडेही करू नये, असं गोपाळ गोडसेने मला सांगितलं होतं."
यानंतर केतकर यांना अटक झाली होती. गोपाळ गोडसेलाही पुन्हा अटक झाली. यानंतरच गांधी हत्येच्या चौकशीसाठी कपूर आयोगाची स्थापना करण्यात आली. गांधींची हत्या सुनियोजित कट होता आणि म्हणूनच त्याचा योग्य तपास करून यात कोण-कोण सहभागी होतं, हे शोधलं पाहिजे, असं सांगण्यात आलं.
गांधी हत्येची तात्कालिक कारणं
13 जानेवारी 1948 रोजी दुपारी जवळपास 12 वाजता महात्मा गांधी दोन मागण्यांसाठी उपोषणाला बसले. त्यांची पहिली मागणी होती की भारताने पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावे आणि दुसरी मागणी होती की दिल्लीत मुस्लिमांवर होणारे हल्ले थांबवावे.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानला तात्काळ 55 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे कट्टर हिंदू गांधीजींवर खूप चिडले, विशेषतः हिंदू महासभा.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
महात्मा गांधींनी उपोषण सोडलं आणि प्रार्थना सभेनंतर केलेल्या भाषणात ते म्हणाले, "मुस्लिमांना त्यांच्या घरातून बाहेर काढलं जाऊ नये आणि हिंदू शरणार्थींनी कुठल्याही प्रकारच्या हिंसेत सहभागी होता कामा नये."
मात्र, तुषार गांधी यांचं म्हणणं आहे की गांधींच्या उपोषणाचा मुख्य उद्देश पाकिस्तानला 55 कोटी रुपये देणं, हा नव्हताच. "बापू पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याची मागणी करत होते. मात्र धार्मिक सलोखा कायम राखणं, हादेखील त्यांचा उद्देश होता," ते सांगतात.
नेहरू आणि पटेल पाकिस्तानला 55 कोटी रुपये देऊ इच्छित नव्हते? याचं उत्तर देताना तुषार गांधी म्हणतात, "दोन्ही देशांमधला फाळणीचा मुद्दा निकाली निघत नाही तोवर पाकिस्तानला 55 कोटी रुपये देऊ नये, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. खरंतर फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये भारत पाकिस्तानला विनाअट 75 कोटी रुपये देणार, असा करार झाला होता. यातले 20 कोटी रुपये पाकिस्तानला मिळाले होते. 55 कोटी रुपये देणं बाकी होतं.
"पाकिस्तानने पैशांसाठी तगादा लावणं सुरू केलं होतं आणि भारत करार मोडू शकत नव्हता. दिलेलं वचन मोडता कामा नये, असं गांधीजींचं म्हणणं होतं. कारण तसं केल्यास द्विपक्षीय कराराचं उल्लंघन झालं असतं."
सरकारने गांधींच्या उपोषणाच्या दोन दिवसानंतरच पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आणि या घोषणेसोबतच गांधी कडव्या हिंदुत्त्वाद्यांसाठी खलनायक बनले. पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावे, या गांधींच्या मताशी सरदार पटेलही सहमत नव्हते. कपूर आयोगाच्या चौकशीत पटेल यांची मुलगी मणीबेन पटेल साक्षीदार क्रमांक 79 म्हणून हजर झाल्या होत्या.
मणीबेन यांनी कपूर आयोगाला सांगितलं, "मला आठवतं की माझे वडील पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या महात्मा गांधी यांच्या मताशी सहमत नव्हते. पाकिस्तानला ही रक्कम दिल्यास जनता नाराज होईल, असं माझ्या वडिलांना वाटायचं आणि पाकिस्तानसंबंधीच्या सर्व मुद्द्यांचं निराकरण झाल्यानंतरच ही रक्कम देण्यात यावी, असं आम्हाला वाटायचं."
पटेलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मणीबेन पटेल म्हणाल्या, "माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की पाकिस्तानला ही रक्कम दिल्यास भारतातले लोक याचा चुकीचा अर्थ घेतली आणि पाकिस्तानही याचा उपयोग आपल्याविरोधातही करू शकतो. अशात आपल्या देशवासीयांच्या भावना दुखावतील. माझ्या वडिलांनी महात्मा गांधींनाही हे सांगितलं होतं की हे उपोषण योग्य आहे, असं जनतेला वाटणार नाही. पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न म्हणून याकडे बघितलं जाईल, असंही सांगितलं."
तुषार गांधी सांगतात की नेहरू आणि पटेल 55 कोटी रुपये देण्यावर सहमत नव्हते, कारण त्यांच्यासाठी लोकभावना महत्त्वाची होती. तुषार म्हणतात, "योग्य काय आणि अयोग्य काय, याच आधारावर बापू निर्णय घ्यायचे. त्यांच्यासाठी मानवता सर्वोच्च होती. दिलेलं आश्वासन न पाळणं, त्यांना मान्य नव्हतं. लोकभावनेच्या दबावामुळे ते चुकीच्या निर्णयाचं समर्थन करू शकत नव्हते.

फोटो स्रोत, kalpit bhachech
"भारताने जे आश्वासन दिलं बापूंनी तेच पाळायला सांगितलं. नेहरू आणि पटेल निवडणुकीच्या राजकारणात उतरले होते. मात्र, बापू स्वातंत्र्यानंतरही आपल्या तत्त्वांचं पालन करत होते. बापूंना लोकभावनेची भीती नव्हती आणि मरणाचीही नाही," ते म्हणाले.
महात्मा गांधी उपोषण करत असताना बिरला भवनमध्ये लोक त्यांच्या विरोधात निदर्शनंही करायचे. पाकिस्तानला 55 कोटी देण्यासाठी ते सरकारवर दबाव टाकत आहेत आणि दिल्लीतली मुस्लिमांची घरं हिंदू शरणार्थींना देण्यास मज्जाव करत आहेत, यामुळे ते नाराज होते.
दिल्लीतील धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे मुस्लिमांनी घर सोडून पळ काढला होता. पुराना किला आणि हुमायू किल्ल्यात त्यांना शरण देण्यात आली होती.हिंदू शरणार्थी मुस्लिमांच्या घरावर ताबा मिळवू इच्छित होते. याविरोधात गांधी उपोषणाला बसले. या उपोषणामुळे भडकलेले हिंदू शरणार्थी घोषणाबाजी करत होते - 'गांधी मरता है तो मरने दो'.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
महात्मा गांधी यांचे आजीवन सचिव असलेले प्यारेलाल आपल्या 'महात्मा गांधी द लास्ट फेज' या पुस्तकात लिहितात, "या उपोषणामुळे दिल्लीत हिंदू आणि मुस्लीम यांच्यातली दरी कमी करण्यात खूप मदत झाली."
18 जानेवारी 1948 रोजी एका शांतता समितीची स्थापना करण्यात आली. महात्मा गांधी यांना आश्वासन देण्यात आलं की दिल्लीतील महरौलीमध्ये सुफी संत कुतुबउद्दीन बख्तियार काकी यांचा उर्स दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येईल.
मुस्लीम दिल्लीतल्या आपल्या घरात परत जाऊ शकतील. हिंदू आणि शीखांनी काबीज केलेल्या मशिदी सोडवण्यात येतील. मुस्लीम भागांना करण्यात आलेला अवैध कब्जा सोडवण्यात येईल. घाबरून ज्या मुस्लिमांनी आपली घरं सोडली ते परतल्यावर हिंदू आक्षेप घेणार नाहीत.
या आश्वसनांनंतर महात्मा गांधींनी 18 जानेवारी रोजी दुपारी 12.45 वाजता मौलाना आजाद यांच्या हस्ते संत्र्याचा रस घेत उपोषण सोडलं.
...तर मारेकरी गोडसे नसता?
यानंतर हिंदू महासभेने एक बैठक बोलावली. यात पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्याचा आणि हिंदू शरणार्थिंना मुस्लिमांची घरं बळकावू न दिल्याचा निषेध करण्यात आला. या बैठकीत महात्मा गांधी यांच्याविरुद्ध अपमानजनक शब्दांचा वापर करण्यात आला. त्यांना हुकूमशाह म्हणत त्यांची तुलना हिटलरशी करण्यात आली.
19 जानेवारी रोजी हिंदू महासभेचे सचिव आशुतोष लाहिडी यांनी हिंदूंना संबोधित करत एक पत्रक जारी केलं.
मुस्लिमांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी महात्मा गांधी उपोषणाला बसल्याने शीख धर्मीयही नाराज होते, असं पोलीस अहवालात म्हटलं आहे. गांधींनी हिंदू आणि शीखांसाठी काहीच केलं नाही, अशी त्यांची भावना होती. पोलीस अहवालानुसार मुस्लिमांनी 19 आणि 23 जानेवारी रोजी दोन प्रस्ताव मंजूर करत गांधींनी आपली निस्वार्थ सेवा केल्याचं म्हटलं.
गांधी हत्येच्या पार्श्वभूमीवर या घटना तात्कालिक होत्या. गांधी हत्येचा कट रचणारे आणि हत्या करणारे 17 ते 19 जानेवारी दरम्यान ट्रेन आणि फ्लाईटने दिल्लीत दाखल झाले होते. ते दिल्लीतील हॉटेल आणि हिंदू महासभेच्या भवनांमध्ये राहत होते. कट रचणारे काही जण 18 जानेवारी 1948 रोजी बिरला भवनमध्ये संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या गांधींच्या प्रार्थना सभेतही गेले होते. गर्दी आणि जागेची रेकी करण्यासाठी हे लोक तिथे गेले होते.
19 जानेवारी रोजी हिंदू महासभा भवनात त्यांची बैठक झाली आणि महात्मा गांधी यांच्या हत्येचा संपूर्ण प्लॉट तयार करण्यात आला. 19 जानेवारी रोजी या सातही जणांपैकी नथुराम विनायक गोडसे, विष्णु करकरे आणि नारायण आपटे हे तिघे बिरला हाऊसला गेले आणि प्रार्थना सभास्थळाची रेकी केली. त्याच संध्याकाळी चार वाजता हे पुन्हा प्रार्थना सभेच्या मैदानात गेले आणि रात्री 10 वाजता सर्व हिंदू महासभा भवनात भेटले.
20 जानेवारी रोजी नथुराम गोडसेची प्रकृती बिघडली. मात्र चौघं पुन्हा बिरला हाऊसला गेले. बिरला भवनमधून हे चौघे सकाळी साडे दहा वाजता हिंदू महासभा भवनात पोचले. त्यानंतर भवनाच्या मागे असलेल्या जंगलात पिस्तूल तपासलं.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
त्यानंतर फायनल प्लॅन सेट करण्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधल्या मरिना हॉटेलमध्ये भेटले. संध्याकाळी पावणे पाच वाजता सर्व बिरला हाऊसला पोचले. बिरला भवनच्या भिंतीमागून मदनलाल पाहवाने प्रार्थना सभेत बॉंब फेकला.
मदनलाल याला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली. त्याच्याकडे हँडग्रेनेडही सापडला. इतर तिघे प्रार्थन सभेत होते आणि ते गर्दीचा फायदा घेत तिथून पळून गेले. गांधींचे पणतू तुषार गांधी सांगतात की गांधी हत्येची खरी तारीख 20 जानेवारीच होती. मात्र त्या दिवशी त्यांचा कट फसला आणि दहा दिवसांनंतर गांधीजींचा शेवट दिवस अखेर आला.
तुषार गांधी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "स्फोटानंतर अफरातफरी माजेल आणि गर्दीचा फायदा घेत दिगंबर बडगे बापूंवर गोळ्या झाडेल, अशी त्यांची योजना होती. मात्र, मदनलाल यांनी बॉंबस्फोट केल्यावर बापूंनी सर्वांना समजावून खाली बसवलं. त्यामुळे चेंगराचेंगरी झालीच नाही. त्यामुळे दिगंबर बडगेला गोळी झाडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्याला तिथून पळून जावं लागलं. त्यादिवशी गोळी झाडण्याची जबाबदारी बडगेला देण्यात आली होती. 20 जानेवारी रोजी कट यशस्वी झाला असता तर खुनी गोडसे नाही तर दिगंबर बडगे असता."

फोटो स्रोत, Piyush Nagpal
हत्येचे दोन मुख्य दोषी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे त्याच दिवशी दिल्लीच्या मुख्य रेल्वे स्टेशनवरून अलाहाबाद, कानपूर करत मुंबईला पळून गेले. हे दोघे 23 जानेवारीच्या संध्याकाळी मुंबईत पोचले.
नथुराम गोडसेंचं धाकटे बंधू गोपाळ गोडसे त्या रात्री दिल्लीतील फ्रंटियर हिंदू हॉटेलमध्ये थांबले आणि 21 जानेवारी रोजी फ्रंटियर ट्रेनने मुंबईसाठी रवाना झाले. चौथे विष्णू करकरे 23 जानेवारीच्या दुपारपर्यंत दिल्लीतच होते.
23 जानेवारीच्या दुपारी ते निघाले आणि ट्रेन, बस बदलत 26 जानेवारी रोजी कल्याणला पोचले. दिगंबर बडगे आणि शंकर किस्टया 20 जानेवारी रोजी बॉम्बे एक्सप्रेसने कल्याणसाठी निघाले होते आणि 22 जानेवारीच्या सकाळी ते मुंबईला पोचले. त्याच दिवशी ते पुण्याला रवाना झाले. अशाप्रकारे गांधी हत्या करणारे लोक दिल्लीतून पळाले आणि कुणाला कळलंही नाही.
पोलिसांचा ऐतिहासिक हलगर्जीपणा
20 तारखेला बॉंब फेकल्याची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमधून छापून आली. टाइम्स ऑफ इंडिया, द स्टेट्समन, बॉम्बे क्रॉनिकलमध्ये ही बातमी बॅनरवर छापण्यात आली. त्यावेळी एका पोलीस निरीक्षकाने टाइम्स ऑफ इंडियाला म्हटलं होतं, "बॉंब शक्तिशाली होता आणि याने लोकांचा जीवही जाऊ शकला असता. हँड ग्रेनेड महात्मा गांधी यांना मारण्यासाठी होता."
बॉंबे क्रोनिकलमध्ये बातमी आली की मदनलाल पाहवा यांनी बॉंब फेकल्याचा गुन्हा कबूल केला आहे आणि आपण महात्मा गांधी यांच्या शांतता मोहिमेमुळे नाराज असल्यामुळे हल्ला केल्याचंही म्हटलं.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
मदनलाल पाहवा यांची सर्वांत आधी बिरला भवनमध्येच चौकशी झाली. त्यानंतर त्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्याला नेण्यात आलं.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहवाची चौकशी केली आणि त्याने साक्ष दिली. त्याच्या साक्षीवरून पुढे वादही झाला होता. पाहवाने करकरेचं नाव घेतलं होतं आणि आपले इतर साथीदार दिल्लीत कुठे कुठे थांबलेत, हेदेखील सांगितलं होतं.
मरिना हॉटेल आणि हिंदू महासभा भवनावर धाडी टाकण्यात आल्या. चौकशीत कळलं की गोडसे आणि आपटे नाव बदलून एस आणि एम देशपांडे या नावांनी थांबले होते.
या धाडीत हिंदू महासभेची काही कागदपत्रंही जप्त करण्यता आली. 21 जानेवारी रोजी पाहवाला 15 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं. संसद भवन पोलीस ठाण्याहून त्याला सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथे 24 जानेवारीपर्यंत त्याची चौकशी सुरू होती.
पोलिसांना दिलेल्या जबानीत पाहवाने 'हिंदू राष्ट्र' वृत्तपत्राच्या मालकाचं नाव घेतलं. मात्र, मोठ्या वृत्तपत्राचं नाव घेतलं नाही. ज्याचे संपादक नथुराम गोडसे होते आणि मालक होते नारायण आपटे. 23 जानेवारी रोजी मरिना हॉटेलचा एक कर्मचारी कालीराम याने दिल्ली पोलिसांना काही कपडे दिले.
मात्र, तपासात त्या कपड्याची मदत घेण्यात पोलीस अपयशी ठरली. 25 जानेवारी रोजी पहावाला पोलीस मुंबईला घेऊन गेले. 29 जानेवारीपर्यंत पहवाची चौकशी सुरू होती. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

फोटो स्रोत, Piyush Nagpal
27 जानेवारी रोजी गोडसे आणि आपटे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. दोघेही ट्रेनने ग्वाल्हेरला गेले आणि रात्री डॉ. दत्तात्रय परचुरे यांच्या घरी थांबले. दुसऱ्या दिवशी तिथूनच इटालीयन बनावटीची काळ्या रंगाची ऑटेमॅटिक बॅरेटा माउजर विकत घेतली आणि 29 जानेवारी रोजी दिल्लीला पोचले. दोघेही दिल्लीच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्याच एका खोलीत थांबले. इथेच त्यांना करकरे भेटले.
30 जानेवारी रोजी त्यांनी बिरला भवनाच्या पाठीमागील जंगला पिस्तूल शूटिंगची प्रॅक्टिस केली आणि संध्याकाळी 5 वाजता बापूंवर गोळी झाडली.नथुरामला तिथेच अटक करण्यात आली. मात्र आपटे आणि करकरे पुन्हा एकदा दिल्लीहून मुंबईला पळून जाण्यात यशस्वी ठरले. दोघांनाही 14 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.
गृहमंत्री वल्लभभाई पटेलांवर आरोप
न्या. आत्माचरण निकाल सुनावल्यानंतर म्हणाले होते की पोलिसांनी 1948 साली 20 ते 30 जानेवारीदरम्यान अत्यंत हलगर्जीपणा केला. मदनलाल पाहवाच्या अटकेनंतर पोलिसांकडे गांधीजींच्या हत्येच्या कटाविषयी पुरेशी माहिती होती.
न्या. आत्माचरण म्हणाले होते, "मदनलाल पाहवाने कटासंबंधी बरीच माहिती दिली होती. रुईया कॉलेजचे प्राध्यापक जी. सी. जैन यांनी बॉम्बे प्रेसिडेंसीचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांना कटाविषयी सांगितलं आणि त्यांनीदेखील बॉम्बे पोलिसांना सर्व माहिती दिली होती. मात्र पोलीस अत्यंत वाईट पद्धतीने अपयशी ठरेल. पोलिसांनी योग्य रीतीने काम केलं असतं तर कदाचित गांधीजींची हत्या झाली नसते."
असं असलं तरी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याविरोधात कारवाई झाली नाही. तुषार गांधी यांनी लिहिलं आहे की मुख्य चौकशी अधिकारी जमशेद दोराब नागरवाला निवृत्त झाल्यानंतर महात्मा गांधी यांच्या हत्येविषयी बोलताना म्हणाले होते, "सावरकर यांची मदत आणि त्यांच्या सहभागाशिवाय गांधी हत्येचा कट कधीच यशस्वी झाला नसता, याच्याशी मी सहमत आहे." (Let's Kill Gandhi, पृष्ठ-691)
सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांच्यावरही टीका झाली. मौलाना आजाद यांनी लिहिलं, "जयप्रकाश नारायण यांनी म्हटलं होतं की सरदार पटेल गृहमंत्री या नात्याने गांधी हत्येत आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत."

फोटो स्रोत, kalpit bhachech
सरदार पटेल यांची कन्या मणीबेन पटेल यांनी साक्षीदार या नात्याने कपूर आयोगासमोर दिलेल्या जबानीत म्हटलं होतं की त्यांच्या वडिलांकडे मुस्लिमांचा विरोध करणारे म्हणून बघितलं जात होतं आणि त्यांच्या जीवालाही धोका होता, कारण ठार करण्याची धमकी त्यांच्या घरापर्यंत आली होती. मणीबेन पटेल यांनीही स्वीकारलं आहे की जयप्रकाश नारायण यांनी सार्वजनिकरीत्या त्यांच्या वडिलांना गांधी हत्येसाठी जबाबदार धरलं होतं.
मणीबेन यांनी म्हटलं होतं, "ज्या बैठकीत जयप्रकाश नारायण यांनी त्यांच्य वडिलांना गांधी हत्येसाठी जबाबदार ठरवलं होतं त्यात मौलाना आजाद हेदेखील होते. मात्र, त्यांनी कुठलाच आक्षेप नोंदवला नाही. याचं माझ्या वडिलांना खूप वाईट वाटलं होतं. "मणीबेन पटेल यांनी कपूर आयोगाला म्हटलं होतं, "पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याने माझे वडील खूप दुःखी होते. त्यांना वाटत होतं की ही रक्कम दिल्यामुळेच बापूंची हत्या झाली. नेहरूदेखील पैसे देण्यास राजी नव्हते. याच दरम्यान सरदार पटेल यांनी नेहरूंना म्हणाले होते की त्यांना कॅबिनेटमधून कमी करावं. कारण मौलानांदेखील ते नको होते."
गांधी हत्येनंतर नेहरूंनी पटेलांना एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीविषयी सांगताना मणीबेन म्हणाल्या की नेहरूंनी लिहितात, "मागचं विसरून आपण एकत्र काम केलं पाहिजे."
नेहरूंचं म्हणणं पटेलांनी मान्य केलं. मात्र जयप्रकाश नारायण यांनी पटेलांवर आरोप करणं सुरूच ठेवलं. 5 मार्च 1948 रोजी सरदार पटेल यांना हार्ट अटॅक आला. तेव्हा ते म्हणाले, "आता मरायला हवं आणि गांधीजींजवळ गेलं पाहिजे. ते एकटेच गेले आहेत."
गांधी हत्येच्या एका आठवड्यानंतर म्हणजे 6 फेब्रुवारी 1948 रोजी संसदेचं विशेष सत्र बोलवण्यात आलं आणि या अधिवेशनात खासदारांनी सरदार पटेलांवर प्रश्नांचा भडीमार केला. 'तेज' वृत्तपत्राचे संस्थापक खासदार देशबंधू गुप्ता यांनी संसदेत सरदार पटेलांना विचारलं, "मदनलाल पाहवाला अटक झाल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला होता आणि पुढच्या योजनेविषयीही सांगितलं होतं. यात कोण-कोण सहभागी आहे, हेदेखील सांगितलं होतं.
अशावेळी दिल्ली सीआयडी बॉंबेहून त्यांचे फोटो मिळवू शकली नाही? फोटो मिळाल्यानंतर प्रार्थना सभेत वाटले असते तर लोक सावध राहिले असते. यात अक्षम्य हलगर्जीपणा झाला नाही का?"
या प्रश्नाचं उत्तर देताना पटेल म्हणाले, "दिल्ली पोलिसांना त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळे वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यांचे फोटोही मिळू शकले नव्हते." महात्मा गांधी यांचे आजीवन सचिव असणारे प्यारेलाल चौकशीत साक्षीदार क्रमांक 54 होते. फाळणीनंतर पटेलांचे गांधींशी मतभेद होते. मात्र, गांधींविषयीचा त्यांच्या मनातला आदर कमी झालेला नव्हता, असं त्यांनी म्हटलं होतं. प्यारेलाल म्हणाले होते, "मुस्लिम इथे राहू शकतात आणि त्यांना सुरक्षाही मिळेल. मात्र, त्यांची निष्ठा भारत आणि पाकिस्तान यांच्यात विभागलेली असू शकत नाही."
मणीबेन पटेल यांनी सांगितलं आहे की त्यांच्या वडिलांना महात्मा गांधी यांच्या सुरक्षेची काळजी होती, कारण त्यापूर्वीही हल्ले झाले होते. मणीबेन यांनी म्हटलं आहे, "माझे वडील महात्मा गांधींकडे जाऊन म्हणाले होते की प्रार्थना सभेत येणाऱ्या लोकांची चौकशी करूनच त्यांना आत घेतलं जाईल. मात्र, गांधीजींना ते मान्य नव्हतं."
गांधी हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
गांधी हत्येमध्ये आपली कुठलीच भूमिका नव्हती, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे. त्यांनी राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा खटलाही दाखल केला आहे. मात्र हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही.
गांधी हत्येनंतर सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालत म्हटलं होतं, "गांधी हत्येसाठी समाजात कालवण्यात आलेलं धार्मिक विष कारणीभूत आहे."
प्यारेलाल लिहितात, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही ठिकाणच्या सदस्यांना आधीच सूचना दिल्या होत्या की चांगल्या बातमीसाठी रेडियो सुरू करून ठेवा. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी मिठाई वाटली होती." (Gandhi - The Last Phase - पृष्ठ-70)

फोटो स्रोत, Getty Images
गांधी हत्येच्या दोन दशकांनंतर संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'ने 11 जानेवारी 1970च्या अग्रलेखात लिहिलं होतं, "नेहरू पाकिस्तान समर्थक असल्यामुळे आणि गांधीजी उपोषणाला बसल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी होती. अशात नथुराम गोडसे लोकांचं प्रतिनिधित्व करत होते. गांधी हत्या जनतेच्या आक्रोशाची अभिव्यक्ती आहे."
कपूर आयोगाच्या अहवालात समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या पत्रकार परिषदेत त्या जबानीचा उल्लेख आहे. त्यात त्यांनी म्हटलं होतं की "गांधी हत्येसाठी कुणी एक व्यक्ती जबाबदार आहे, असं नाही. तर यामागे एक मोठा कट आणि संघटना आहे."
या संघटनेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीगचं नाव घेतलं होतं. गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीही घालण्यात आली होती. संघावर ही बंदी फेब्रुवारी 1948 ते जुलै 1949 पर्यंत होती. नथुराम गोडसे यांचे बधू गोपाळ गोडसे यांनी 28 जानेवारी 1994 रोजी 'फ्रंटलाईन'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "आम्ही सगळे भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होतो. नथुराम, दत्तात्रय, मी स्वतः आणि गोविंद. तुम्ही म्हणू शकता की आम्ही आमच्या घरता नाही तर संघात वाढलो. संघ आमचं कुटुंब होतं."

फोटो स्रोत, Piyush Nagpal
नथुराम संघात बौद्धिक कार्यवाहक बनला होता. नथुरामने दिलेल्या साक्षीत आपण संघ सोडल्याचं म्हटलं होतं. त्यांनी तशी साक्ष दिली कारण गोळवलकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अडचणीत आले असते. मात्र, नथुरामने संघ सोडला नव्हता."
याच मुलाखतीत गोपाळ गोडसे यांना विचारण्यात आलं की अडवाणी यांनी नथुराम यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे. त्यावर ते म्हणाले, "त्यांचं वक्तव्य भित्रेपणाचं आहे. तुम्ही असं म्हणू शकता की संघाने 'जा आणि गांधींची हत्या करा' असा कुठलाच प्रस्ताव पारित केला नव्हता.
"मात्र तुम्ही नथुराम आणि संघ यांचे संबंध नाकारू शकत नाही. हिंदू महासभेने असं म्हटलेलं नाही. नथुराम यांनी बौद्धिक कार्यवाहक असताना 1944 पासून हिंदू महासभेसाठी काम करणं सुरू केलं होतं."
नथुराम गोडसे एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. मात्र नंतर ते हिंदू महासभेत आले. मात्र, 2016 साली 8 सप्टेंबर रोजी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गोडसे कुटुंबीय जे म्हणाले, ते महत्त्वाचं आहे.
नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज सत्याकी गोडसे यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "नथुराम सांगलीत होते तेव्हा 1932 साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले. ते जिवंत असेपर्यंत संघाचे बौद्धिक कार्यवाहक होते. त्यांनी कधीच स्वतः संघ सोडला नव्हता आणि त्यांना कधीच काढण्यातही आलेलं नव्हतं."
आपल्याला 125 वर्षं जगायचं आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. हत्येच्या सहा वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 72व्या वर्षी बापूंनी ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र 37 वर्षाच्या एका मराठी ब्राह्मण व्यक्तीने त्यांचं जीवन अचानक संपवलं. गांधींची हत्या झाली त्यावेळी ते 78 वर्षांचे होते.

हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









