उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेचा नेमका अर्थ काय?

'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' पुस्तकावरून झालेल्या टीकेनंतर आणि राजकीय वादानंतर शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी या सर्व प्रकरणावर आपली भूमिका व्यक्त केली.
उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी (14 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन म्हटलं, की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यायोग्य व्यक्ती भारतातच काय पण जगातही नाही. पण त्याचबरोबर जगात फक्त एकच 'जाणता राजा' आहे. जे लोक 'जाणता राजा' म्हणून कुणालाही उपमा देतात त्याचा मी निषेध करतो, असं वक्तव्य केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या व्यक्तींचाही मी निषेध करतो. जेव्हा तुम्ही शिवसेना हे नाव ठेवलं तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?" असा प्रश्नही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. "आजपर्यंत प्रत्येक वेळेस लुडबूड करणारे जे बिनपट्ट्याचे असतात. त्यांचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाहीये. त्यांची लायकी त्यांनी ओळखून घ्यावी. काहीही झालं तरी छत्रपतींच्या वंशजांना विचारा. शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं होतं का," असं उदयनराजे यांनी म्हटलं.
जयभगवान गोयल यांच्या पुस्तकावरून टीका करताना संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज कोठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला होता.
उदयनराजे यांनी या पत्रकार परिषदेत जयभगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' या पुस्तकावर फारसं भाष्य केलं नाही. मुळात पुस्तकप्रकरणी भाजपनं सारवासारव करत हे पुस्तक मागे घेतल्याचं जाहीर केल्यानंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय? मूळ मुद्द्याला बगल देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा हा भाजपचा प्रयत्न होता का? उदयनराजेंची टीका शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून होती की भाजपचे नेते म्हणून? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.
'शिवाजी महाराज कोणाची मक्तेदारी नाही'
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं, 'उदयनराजे हे भाजपची भाषा बोलत आहेत. त्यांचं म्हणणं किती गांभीर्याने घ्यायचं हे ठरवावं लागेल.
"शिवसेनेचे नाव काय ठेवायचं हे त्यांना विचारण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणा एकाची मक्तेदारी नाही," असंही अनिल परब यांनी म्हटलं.
शिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम कुणी शिकवण्याची गरज नाही, असा टोलाही परब यांनी लगावला.
"भाजपला आता दुसरं काही काम उरलं नाहीये. त्यांनी आता विरोधातच बसावं," असंही अनिल परब यांनी म्हटलं.
'उदयनराजेंची टीका असंबद्ध'
"उदयनराजे आपलं अधिकाधिक हसं करून घेत आहेत, एवढंच या पत्रकार परिषदेनंतर म्हणता येईल," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
"मूळ मुद्दा 'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' या पुस्तकाच्या संदर्भात होता. त्यावर ते फारसं बोलले नाहीत. या पुस्तक प्रकाशनानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. उदयनराजेंची पत्रकार परिषद ही त्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया देणारी होती. मूळ विषयावर त्यांनी स्वतःची भूमिका मांडलीच नाही," असं विजय चोरमारे यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, SAI SAWANT
दुसरं म्हणजे पत्रकार परिषदेमधील त्यांची भूमिका ही शिवाजी महाराजांच्या वंशजापेक्षाही राजकीय अधिक असल्याचंही चोरमारे यांनी म्हटलं.
"उदयनराजेंनी शिवसेनेच्या नावावरून टीका केली. पण शिवाजी महाराजांचं नाव हे कोणीही वापरू शकतं. सामान्य व्यक्तीही स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा अन्य काही कारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरू शकते. त्यामुळे उदयनराजेंनी शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेनेवर केलेली टीका ही तशी अस्थानीच आहे. या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी 'जाणता राजा' या विशेषणावरूनही शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. पण मुळात 'जाणता राजा' हे नाव नाहीये. त्यातून शिवाजी महाराज आणि शरद पवारांची तुलना नाहीये. शरद पवारांना महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांची जाण आहे, एवढ्याच मर्यादित अर्थानं त्यांना 'जाणता राजा' म्हटलं जातं. त्यामुळे उदयनराजेंच्या टीकेतून असंबद्धतेशिवाय काहीच दिसत नाही," असं चोरमारे यांनी म्हटलं.
'ही भाषा भाजपच्या मुशीतील नेत्याची'
"वादग्रस्त पुस्तक लिहिले भाजपच्या नेत्याने. प्रकाशन केले भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात. प्रकाशनाचे पाहुणे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम जाजू. म्हणजे पुस्तकावरून भाजपवर टीका व्हायला हवी होती. मात्र, उदयनराजेंनी शिवसेनेच्या नावाला, शिववडा उपक्रमाला आणि राष्ट्रवादीला टार्गेट केले. त्यांना पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप यायला हवा होता. तो त्यांनी व्यक्त करायला हवा होता. त्यांनी पुस्तकाबद्दल सौम्य शब्द वापरले आणि सेनाभवनाचे फोटो दाखवत शिवसेनेला आणि 'जाणता राजा' शब्दावरून राष्ट्रवादीला टार्गेट केले. केवळ भाजपच्या बचावासाठी एखादा नेता बोलत असल्याचं त्यांच्या पत्रकार परिषदेवरून वाटलं," असं मत 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
"ज्या भाषेत छत्रपती उदयनराजे बोलले, ती भाषा त्यांची वाटत नाही. भाजपच्या विचारांच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याची ती भाषा वाटली. उदयनराजे भावनिक आहेत. ते भावनाशील होऊन बोलतात. तरीही लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी शांतपणानं परिस्थिती स्वीकारली होती. आज मात्र ते कट्टर भाजप नेत्यासारखे बोलले," असं सम्राट फडणीस यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
छत्रपती शिवरायांच्या विचारांचे सारेच वारस आहोत, असे उदयनराजे बोलले असले, तरी प्रत्यक्षात ते ज्या पद्धतीने बोलत होते, ती पद्धत शोभणारी नव्हती असंही फडणीस यांनी म्हटलं.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी शरद पवार हे आपल्याला वडिलांच्या जागी असल्याचं सांगत अश्रू ढाळले होते. पण पत्रकार परिषदेत त्यांनी 'जाणता राजा' या विशेषणावरून नाव न घेता शरद पवारांवर टीका केली. उदयनराजेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल बोलताना सम्राट फडणीस यांनी म्हटलं, "शरद पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीत सातारा आणि कोल्हापूर संस्थानाच्या गादीला सन्मान दिला. त्याचवेळी ही लोकशाही असल्याचेही त्यांनी त्यांच्या कृतीतून नेहमी दाखवून दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी उदयनराजेंना उमेदवारीसाठी यापूर्वी घेतलेल्या निर्णयांमागे जशी सन्मानाची भावना होती तशीच उदयनराजेंविरोधात स्वतः प्रचारात उतरण्यावेळी लोकशाही मूल्यांची होती. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतर पवारांनी उदयराजेंवर सातत्याने भाष्य टाळले. मात्र, जी करायची ती कृती केली. त्याचा परिणाम उदयनराजेंच्या पराभवात झाला. पराभवाची सल उदयनराजेंच्या मनात स्वाभाविक असणार. त्यामुळेच आज निमित्त मिळाले, तेव्हा त्यांनी पवारांचे नाव न घेता टीका केली. नाव घेऊन केली असती तरी काही हरकत नव्हती."
उदयनराजे यांच्या पत्रकार परिषदेतले काही महत्त्वाचे मुद्दे
- पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच उदयनराजेंनी म्हटलं, "शिवरायांशी अनेकदा तुलना केली जाते. अशी तुलना करणाऱ्यांनी बुद्धी गहाण ठेवलीये का? देशातच काय पण जगातही त्या उंचीपर्यंत कोणी जाऊच शकत नाही. एक युगपुरुष कधीतरीच जन्माला येतो. असा युगपुरूष म्हणजे शिवाजी महाराज.
- "जाणता राजा असल्याची उपमा अनेकांना दिली जाते. 'जाणता राजा' फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच. तुम्ही कोणालाही 'जाणता राजा' म्हणून उपमा देता, त्याचाही मी निषेध करतो," असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.
- "थोडासा विचार करण्याची गरज आहे. जगामध्ये शिवाजी महाराज असे एकमेव योद्धा आहेत, ज्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो, नतमस्तक होतो. त्यामुळे तुलना तर सोडूनच द्या, त्यांच्या आसपासदेखील आपण जाऊ शकत नाही."
- "मी या घराण्यात जन्माला आलो, याचा मला अभिमान आहे. तुमच्या सगळ्यांपेक्षा मागच्या जन्मी मी कणभर जास्त पुण्य केलं होतं म्हणून मी या घराण्यात जन्माला आलो. हे मी माझं सौभाग्य समजतो. आम्ही कधीही महाराजांचे वंशज म्हणून नावाचा दुरुपयोग केला नाही. कधीही मिरवलं नाही. आम्ही लोकशाही मान्य केली."
- शिवाजी महाराजांच्या नावाचा सोयीप्रमाणे वापर केला जातो असं म्हणत उदयनराजे भोसलेंनी म्हटलं.
- "सोयीप्रमाणे राजांच्या नावाचा वापर होतो. हे कशासाठी? प्रत्येकवेळी सांगण्यात येतं वंशजांना विचारा. का? शिवसेना जेव्हा काढली, नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला तुम्ही आला होतात का? महाशिवआघाडी या नावातून 'शिव' का काढून टाकलं? सोयीप्रमाणे महाराजांच्या नावाचा वापर करायचा आणि सोयीप्रमाणे त्यांचा विसर पडतो. ही यांची लायकी. शिवाजी महाराजांना प्रत्येकाच्या अंतःकरणात स्थान आहे. तुम्ही वडापावला 'शिववडा' नाव दिलंत?"
- त्यांनी पुढे म्हटलं, "शिवसेना नावाला आम्ही कधी हरकत घेतली नाही. कारण आम्ही जरी महाराजांचे वंशज आणि वारस असलो, तरी त्यांच्या विचारांचा वारसा सर्व देशाला लाभलेला आहे. दादरला मोठं शिवसेना भवन आहे. तिथे इमारतीवर महाराज कुठे आहेत आणि वर कोण आहे, ते पाहा. वंशज म्हणून तुम्ही आमच्यावर सारखी टीका करता. काय केलं आम्ही मला सांगा. आजपर्यंत शिवाजी महाराजांची शिकवण पाळत आलोय. सत्तेच्या मागे कुत्र्यासारखे धावलो नाही."
- सत्ताधाऱ्यावर टीका करताना उदयनराजेंनी पुढे म्हटलं, "माझ्या हातात फक्त महाराजांच्या नावाचा दोरा आहे. आणि एका हातात वेळ पाहण्यासाठी घड्याळ. त्या लोकांना मला एक सांगायचंय. वेळ संपलाय. ब्र जरी काढला तर सांगतो आही बांगड्या घातलेल्या नाहीत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
- शिवसेनेने टीका करताना उदयनराजेंनी म्हटलं, "शिवसेनेने जेम्स लेनच्या वेळेस माफी मागितली होती. शिवाजी महाराजांच्या प्रति तेव्हा अस्मिता कुठे गेली होती? तेव्हा वंशजांना विचारायला आला होतात? सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचं नाव का घेता? काय लायकी आहे तुमची? त्यांचे विचार आचरणात आणले असते, तर आज ही परिस्थिती आली नसती, हे सगळ्या पक्षांना मला सांगावसं वाटतं. शेतकरी मरायला लागलेत आणि यांची फाईव्ह स्टार हॉटेलमधली पळवापळवी चाललीये. हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं. शिवसेना नाव काढून टाका. ठाकरेसेना करून टाका. सरकार तुमचं आहे. तुम्ही कराल ती पूर्व दिशा. मला पण पाहायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही नाव बदलाल तेव्हा महाराष्ट्रातले किती तरुण तुमच्यासोबत राहतात."
- वेगवेगळ्या वेळी साजरा केल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल उदयनराजेंनी म्हटलं, "महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी होते. पण त्यातही ह्यांनी बदल केला. 3 शिवजयंती? इतिहास संशोधकांनी भरपूर अभ्यास करून संगनमताने त्यांनी 19 फेब्रुवारी तारीख ठरवली. त्यात सुद्धा किती मानहानी करायची महाराजांची?"
- "महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही. काय झालं शिवस्मारक करणार होता त्याचं? स्वार्थाने लोकं जेव्हा एकत्र येतात, ते फार काळ राहात नाही. त्यांना एकत्र ठेवण्याकरता आमिषाचा वापर करावा लागतो. ज्यावेळेस त्यांचा स्वार्थ साध्य होतो, त्यावेळेस ते आपापल्या मार्गाने निघून जातात."
- "स्वातंत्र्य मिळून 60 वर्षांपेक्षा जास्त काळ गेला. काय मिळवलं तुम्ही? ही लोकशाही? राजेशाही असती तर एकही जण उपाशी राहिला नसता."
- "याद राखा...जर यापुढे महाराजांचं नाव काढलं तर त्या हिशोबाने वागा, नाहीतर महाराजांचं नाव घेऊ नका. तुमच्या कपटाचं, तुमच्या राजकारणाचं, गैरव्यवहाराचं खापर आमच्यावर फोडायचा प्रयत्न केलात तर याद राखा. परिणाम काय होतील ते मला सांगता येत नाही. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, की शिवाजी महाराज हे फक्त आमचे नाहीत तर तुमचे सगळ्यांचेही आहेत. ही केवळ माझी नाही तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण सगळे वारस आहोत. पुस्तकाचा निषेध तर मी करतोच. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं नसतं. पुन्हा जर बोललात तर लोकं तुम्हाला मारतील."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








