सांगली-कोल्हापूर महापूर: शेती, जनावरं, भांडीकुंडी सगळं काही पाण्याने हिरावून नेलं

फोटो स्रोत, Swati patil rajgolkar/bbc
- Author, स्वाती पाटील-राजगोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात 200 हून अधिक गावांचं पुराच्या पाण्यानं नुकसान झालं. करवीर तालुक्यातल्या प्रयाग चिखली या गावाला मात्र पुराचा मोठा फटका बसला. पुराच्या पाण्याने इथली घरं पाण्याखाली बुडाली होती.
प्रयाग चिखलीचे दगडू पाटील यांनी 1989, 2005 आणि यावर्षीचा पूर पाहिला. पाटील यांचं आठ जणांचं कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करतं. पाटील यांच्याकडे अर्धा एकर जमीन आहे. त्यावर उसाची लागवड करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यात त्यांच्या सगळ्या शेतीचं नुकसान झाले आहे.
पूरपरिस्थिती नंतर पुनर्वसन करण्यासाठी पाटील यांना सोनतळी इथं एक प्लॉट देण्यात आला आहे. पाटील यांना दोन मुलं आहेत, एक जण तिकडे गेला, तरी दुसऱ्या मुलाला कुटुंबासह चिखली गावातच राहावं लागणार. या कारणानं पाटील कुटुंबीयांनी या जागेवर राहायला जाण्यास नकार दिला.
"पुराच्या पाण्याचा आता अंदाज येणार नाही. पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं हा प्रश्न आहे, त्यामुळे निदान पावसाळ्याचे 3 महिने तरी आमचं कुटुंब सोनतळी इथं राहायला जाणार आहे," असं पाटील यांनी सांगितलं.
कोल्हापूर शहरापासून अवघ्या 7 किमीवर वसलेल्या या चिखली गावाची लोकसंख्या सहा हजार इतकी आहे.
अख्खं गाव पाण्याखाली
प्रयाग चिखली हे गाव पंचगंगा नदीच्या उगमस्थानी वसलेलं आहे. कुंभी, कासारी, सरस्वती. तुळशी, भोगावती या पाच नद्यांचा संगम होऊन वाहणारी ही पंचगंगा नदी आहे. त्यामुळे या गावाला कायम पुराचा फटका बसतो. पण इथं पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही रखडला आहे.
पुरामुळे यंदा गावात अनेक घरं कोसळली तर काहींची पडझड झाली. युद्धपातळीवर बचावकार्य राबवत इथल्या लोकांना बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं. पण शेकडो दुभती जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने इथल्या लोकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या गावातील तब्बल 330 हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाली आहेत.

फोटो स्रोत, BBC/SwatiPatilRajgolkar
1989 साली आलेल्या पुरामुळे चिखली गावाला स्थलांतर करण्याचा निर्णय झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी चिखलीला भेट देत सोनतळी इथं स्थलांतर करण्यास सांगितलं होतं. मात्र गाव सोडून जायला ग्रामस्थ तयार नव्हते.
सोनतळी इथं जाण्यासाठी ग्रामस्थांचा नकार होता. त्यामागे कारण विचारलं असता रघू पाटील यांनी सांगितलं, "1989 पासून इथला पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. चिखली ग्रामस्थांना सोनतळी इथं जागा देण्यात आली. मात्र प्रत्येक कुटुंबाला केवळ एक जागा देण्यात आल्याने घरातील इतर सदस्यांची अडचण झाली. सोनतळी इथं जागा दिली मात्र मूलभूत सोयी सुविधा नसल्याने चिखली गावातील लोक त्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत."
'कायमस्वरूपी गाव सोडणार नाही'
चिखली गावात ऊसाची शेती केली जाते. या गावात शेतीपूरक उद्योग म्हणून गुऱ्हाळघरं सुरू करण्यात आली होती. ऑक्टोबर ते मे महिन्यादरम्यान इथं मोठ्या प्रमाणात गूळ बनवला जातो. इथल्या उच्च प्रतिच्या गुळाला राज्यासह देशभरात मोठी मागणी आहे.

फोटो स्रोत, BBC/SwatiPatilRajgolkar
पण पुराच्या पाण्याने यंदा खूप नुकसान झालं. शेतीचं तर 100 टक्के नुकसान झाले. 1989 आणि 2005 च्या पुरानंतर यंदा आलेल्या पुरामुळे आता पावसाळ्याचे तीन महिने गाव सोडून जायला तयार आहोत असं गावकरी सांगतायेत.
पण कायमस्वरूपी गाव सोडण्यास मात्र त्यांनी नकार दिला. याचं कारण सांगताना ते म्हणाले "आमची सर्व शेती चिखली गावात आहे. जर आम्ही गाव सोडलं तर खाणार काय, गावात राहिलो तर शेती करून पोट भरता येईल. पण सरकारने दिलेल्या मदतीच्या पैशावर काय करायचं असा सवाल ते करतात."
'असा पूर कधी बघितला नाही'
साठी ओलांडलेल्या शांताबाई पाटील लग्न होऊन या गावात आल्या तेव्हापासून असा पूर बघितला नाही असं या पुराचं वर्णन करतात. घरातील भांडीकुंडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं त्या सांगतात. पण किमान जीव वाचल्याने आता दरवर्षी पावसाळ्याचे तीन महिने सरकारने दिलेल्या जागेवर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

फोटो स्रोत, BBC/SwatiPatilRajgolkar
"रेशनकार्डनुसार प्रत्येक कुटुंबाला एक प्लॉट सोनतळी इथं देण्यात आला आहे. पण एका घरात चौघे भाऊ राहत असतील तर प्लॉट केवळ एकाला मिळणार असल्याने बाकीचे सदस्य गावातच राहत असल्याने पुनर्वसन होऊ शकत नाही," असं प्रकाश अस्वले यांनी सांगितलं. प्रॉपर्टी कार्ड असेल तर घर बांधण्यासाठी कर्ज मिळू शकेल. तरच घर बांधणं शक्य झालं असतं," असं ते सांगतात.
"2005 साली आलेल्या पुराचं पाणी घराच्या पायरीपर्यंत पोहोचलं होतं. यावेळी पाणी घरात येईल असं वाटलं नव्हतं, पण अचानक तासाभरात पाच फूट पाणी भरलं त्यामुळे घरातलं सामान पाण्याखाली गेलं. शेती, जनावरं सगळ पाण्याने हिरावून नेलं." पण आता किमान 3 महिने सोनतळी इथं जाणारच असा निर्धार सुनिता पाटील यांनी बोलून दाखवला.
सोनतळी इथं जागा देउन सरकारने पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र योग्य सोयीसुविधा दिल्या पाहिजेत जर असं झालं तर आम्ही सोनतळी इथं जायला तयार आहोत. असं गावकऱ्यांचं म्हणणंय. असं झाल तर आतापर्यंत ओढावलेल्या परिस्थितीतून चिखलीकरांची सुटका होण्यास मदत होईल असं गावकऱ्यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








