सांगली कोल्हापुरातल्या पूरग्रस्तांच्या घरांसाठी 222 कोटींचा निधी - मुख्यमंत्री : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून केंद्राकडे 6,800 कोटींची मागणी
पूरग्रस्त भागासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे 6 हजार 800 कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली आहे. यातून पूरग्रस्त भागातील पडलेली घरं बांधून दिली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.
सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला. या भागासाठी 4 हजार 700 कोटी रूपये, तर कोकण, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 2 हजार 105 कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केलीय.
पूरपरिस्थितीचा अहवालही लवकरच केंद्राला पाठवला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जोपर्यंत केंद्राची मदत मिळत नाही, तोपर्यंत राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
नवीन घरं किंवा घरांची दुरुस्ती करण्यासाठी 222 कोटींचा निधी दिला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतच नवं पोर्टल उघडून घरं बांधणीसाठी मदत केली जाणार आहे.
2) लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला : संभाजी भिडे
लवासासारख्या प्रकल्पांमुळे निसर्गाचा मुडदा पडला, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली. कोल्हापुरात ते बोलत होते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली.

फोटो स्रोत, RAJU SANADI
"निसर्गाचा माणसानेच मुडदा पाडला असून, त्याचं रौद्ररूप आता पाहायला मिळतंय. कोल्हापूर, सांगलीत 2005 पेक्षा शंभर पटीने भीषण स्थिती आहे. फक्त लवासाच नाही, गावोगावी असाच निसर्गाचा मुडदा पडतोय," असं संभाजी भिडे म्हणाले.
आता आईच्या मायेनं हे सगळं सावरायला हवं, असंही ते म्हणाले.
दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पूरग्रस्तांना मदत करत आहेत. सरकारकडूनही परिस्थिती सावरण्यासाठी योग्य दिशेने पावल उचलली जात असल्याचं ते म्हणाले.
3) ऑटो सेक्टरमधील उत्पादन घटलं, हजारो नोकऱ्यांवर गदा
देशातील वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सलग नवव्या महिन्यात वाहन विक्रीच्या आकडेवारीत घसरण झालीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
प्रवासी वाहनांची विक्री 30.98 टक्क्यांनी घसरलीय. म्हणजे, यंदा जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीची संख्या 2 लाख 790 एवढी राहिली, मात्र गेल्या वर्षी जुलै महिन्यात हीच संख्या 2 लाख 90 हजार 931 एवढी होती.

फोटो स्रोत, Reuters
सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.
वाहन विक्री घटण्याचा फटका ऑटो सेक्टरमधील हजारो नोकऱ्यांना बसला आहे. सुमारे 15 हजार जणांवर नोकरी गमावण्याची वेळ आलीय.
4) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांचं वाटप केलं. लोकसभा निवडणुकीत राज्यात तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला 'गॅस सिलेंडर' हे चिन्ह देण्यात आलंय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, FACEBOOK/@OFFICIAL.PRAKASHAMBEDKAR
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला कायमस्वरूपी चिन्ह मिळालं नव्हतं. त्यावेळी कप-बशी या चिन्हावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढली होती.
पक्षनिहाय चिन्हा :
- वंचित बहुजन आघाडी - गॅस सिलेंडर
- संभाजी ब्रिगेड पार्टी - शिलाई मशीन
- महाराष्ट्र क्रांती सेना - हिरा
- टिपू सुलतान पार्टी - किटली
- भारतीय जनसम्राट पार्टी - टेलिफोन
- हम भारतीय पार्टी - ऊस घेतलेला शेतकरी
5) 'हिंदू पाकिस्तान'वरून शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. 'हिंदू पाकिस्तान'संदर्भातील कथित वक्तव्यावरून थरूर यांच्याविरोधात कोलकात्यातील न्यायालयाने वॉरंट जारी केला. एनडीटीव्हीने ही बातमी दिलीय.
भाजप पुन्हा सत्तेत आल्यास हा पक्ष पुन्हा राज्यघटना लिहील आणि 'हिंदू पाकिस्तान' निर्माण करेल, असं कथित वक्तव्य शशी थरूर यांनी तिरुअनंतपुरममध्ये केल्याचा आरोप होता.
शशी थरूर यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपनं या कथित वक्तव्यानंतर केली होती. या प्रकरणावर 24 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








