सांगलीत पुरामुळे शेतीचं नुकसान : 'आमच्या हातचा घास पुराने हिरावून नेला, अशी वेळ कुणावरही येऊ नये'

- Author, हलिमाबी कुरेशी
- Role, सांगलीहून, बीबीसी मराठीसाठी
पूर ओसरला तसा शेतात हाती काही येतंय का हे बघण्याची त्यांची गडबड सुरू होती. पाण्याखाली गेलेलं शेत बघून पंडित बाबर आवंढा गिळून शून्यात बोलत होते, " शेतीकडे बघण्याच धाडस नाही. मनाला वाईट वाटतं."
पंडित बाबर या शेतकऱ्याचं दोन एकरातलं हळदीचं पिक हातातून गेलंय.
त्यांनी हळदीचं कंद दाखवलं ते कुजायला सुरुवात झाल्याचं सांगितल. या हळदीला भौगोलिक संपदेचं म्हणजेच 'जी आय मानांकन' मिळाल्याने जागतिक बाजारपेठ सांगलीच्या हळदीला मागणी आहे.
पण, पुरामुळे हळदीची पेव सांगली जिल्ह्यात उरलीच नाही.
सांगली जिल्ह्यात हळदीची साठवणूक पारंपरिक पद्धतीने केली जायची. जमिनीत पेव तयार करून दोन दोन ट्रक हळद त्यात वर्षानुवर्षं साठवली जायची, यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण सुंगध आणि चकाकी हळदीला असायची.
पेव म्हणजे जमिनीपासून खाली 15-20 फूट खड्डा खणून त्यात हळदीची साठवण करायची. सांगलीमध्ये हरिपूर या ठिकाणी कृष्णेच्या तीरावर अनेक पेव होते. मात्र 2005 च्या पुराने सर्व पेव जमीनदोस्त झाल्याने शेतकरी कोल्ड स्टोरेजकडे वळले.

2019च्या या पुरात पेव नसलं तरी पीक मात्र हातचं गेल्याचं मिरजमधल्या कसबे डिग्रज गावात असलेल्या हळद संशोधक केंद्राचे अधिकारी डॉ मनोज माळी सांगतात.
सर्व शेतकऱ्यांची एकच व्यथा
संगीता मदने यांचं हाताशी आलेलं मिरचीचं पीक पुराने उद्ध्वस्त झालं. संगीता यांच्यासारखी अवस्था हजारो शेतकऱ्यांची आहे.
सध्या सांगली , कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातले लोक अस्मानी संकटाला तोंड देत आहे. या जिल्ह्यात अनेक गावांना मोठा फटका बसलाय. घरं वाहून गेली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. तिच गत शेतीची देखील, जनावरांचीही.
पूर जसजसा ओसरतोय तसतसे नागरिक घरी परत जात आहेत. ज्यांची शेती पाण्याखाली होती ते चिखल तुडवत शेताकडे जातायत. हवालदिल करणारं दृश्य इथं आहे. गावात जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा नजर जाईल तिथपर्यंत पाण्याखाली गेलेली पिकं दिसत आहेत.

अनेकांचं हळदीचं तीन ते चार महिन्यांच पीक हातातून गेलंय. पुराच्या पाण्याने कंद कुजत असल्याने या पिकाचा काहीच फायदा नाही. ऊसाचं देखील तेच अख्खा उस पाण्याखाली गेल्याने ऊसाच्या शेतीचही प्रचंड नुकसान झालंय. सांगली जिल्ह्यात 15 हजार हेक्टर पेक्षा जास्त उसाचं क्षेत्र आहे. पुराच्या पाण्यामुळे 90% उसाचं नुकसान झालंय.
"आमच्या हातचा घास पुरानं हिरावून नेला, अशी वेळ कुणावरही येऊ नये. नेहमी सारखी शेती नको प्रयोग म्हणून एकरभरात मिरचीचं पिक घेतलं होत. मलचिंग पेपर, ठिबक करून अतिशय काळजीने जपलं. वीज नव्हती, पाऊसाने ओढ दिली, तेव्हा पेल्याने पाच हजार मिरचीच्या रोपांना पाणी दिलं.
हिरव्यागार मिरच्या लगडल्या दोन तोड्यात जवळजवळ दोन टनापेक्षा जास्त मिरच्या झाल्या. पन्नास रुपये किलोचा चांगला भाव मिळाला. खूप आनंदी होतो. या पिकापासून खूप आशा होती, पण पुरामुळे झाडांना लगडलेल्या मिरच्या नासून गेल्या. आता काहीच मिळणार नाही बाजारात मोल.अजून सहा तरी तोड झाली असती. लईच नुकसान झालं,"संगीता मदने आपली कैफियत ऐकवत होत्या.

सांगली जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे. 2018 मधली हळदीची उलाढाल जवळपास 1500 कोटींपर्यंत झाली होती. एकट्या सांगली जिल्ह्यात हळदीची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींची असल्याचं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितल.
यंदा जूनपर्यंत लागवड उरकली होती. पावसाने मधल्या काळात ओढ दिली तेव्हा कृष्णेच्या पाण्यावर हळद वाढवली गेली होती. सांगली , मिरज, पलूस, वाळवा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन होतं. याच तालुक्यात पुराचा मोठा फटका बसलाय.
पलूस तालुक्यातील भिलवडी, खंडोबाचीवाडी, माळवाडी, ब्रम्हनाळ याभागात हळदीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
अल्पभूधारकांची बिकट स्थिती
ऊस, हळद, द्राक्ष, केळी, भुईमुग, सोयाबीन, पपई, मिरची ही पीकं सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. द्राक्षाचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
अजून यासंदर्भातली संपूर्ण माहिती पूर पूर्णपणे ओसरल्यावर पंचनामे झाल्यावर पुढे येईल. मात्र 3 हजार हेक्टरवर द्राक्षाचं पीक असल्याचा अंदाज दिनकर पाटील यांनी व्यक्त केला.
केळीच्या बागा पुरामुळे जमीनदोस्त झाल्यात. सततच्या पावसाने द्राक्ष पिकाला औषध फवारणी झाली नाही. पुराच्या पाण्यामुळे मुळ्या कूजल्यात परिणामी द्राक्षावर तांबेरा रोग पडण्याची शक्यता आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कंबरडं या पुरामुळे मोडलंय. "एक एकरभर भुईमुग, दोन एकर ऊस , इतर कडधान्य होतं, सगळं माती झालं, घाण वास येतोय त्याचा, त्या रानावर कर्ज होतं. काय करायचं आता ,कसं जगायचं आम्ही," शोभा मगदूम उद्विग्न होऊन बोलत होत्या.
आता शेताकडे जाऊन आलो अजून गुडघाभर चिखल आहे, शोभा पुढे सांगत होत्या.

मोहन पाचूंदे यांची केळीची शेती पुरामुळे आडवी झाली. उसात देखील 15 फुटांपर्यंत पाणी होतं. याचा उपयोग चाऱ्यासाठीसुद्धा होणार नाही, असं पाचुंदे सांगत होते.
भिलवडी, माळवाडी, खंडोबाची वाडी या परिसरात कृषिमित्र म्हणून काम करणारे माणिक पाटील यांच्या मते सर्व पीकं हातातून गेली आहेत. "सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्याला पुन्हा उभ रहायला 7-8 वर्ष जातील. जमीन अनेक ठिकाणी खरडून गेली आहे. काही ठिकाणी हाती आलेलं पीक गेलंय, अनेकांनी कर्ज काढून शेती केली होती," पाटील सांगत होते.
राज्य सरकार जरी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करत असालं तरी ती मदत पुन्हा शेत नीट करायला पुरेल इतकी नसल्याचं राहुल मदने सांगत होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








