अनुसूचित जमातींच्या 22 योजनांचा लाभ आता धनगर समाजाला मिळणार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. अनुसूचित समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू
अनुसूचित समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एसटी प्रवर्गाला असलेल्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू होतील. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी सवलती द्याव्यात या मागणीसाठी धनगर समाजातील लोकांनी शासनाकडे अनेकदा विनंती केली होती. परंतु आरक्षणाबाबत शासनाने अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला होता. त्यामुळे शासनाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय घेतला.
2. राज ठाकरे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार
ईव्हीएमच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत.
'सकाळ'ने याबाबत बातमी दिली आहे. लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विरोधी पक्षातील नेतेमंडळीची भेट घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी राज यांनी ईव्हीएमच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली होती. निवडणूक आयोगाने त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत.
3. कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही- मुख्यमंत्री
कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळी नावं येतात. ते वाचून अमुक आपल्या पक्षात येणार आहेत हे कळतं असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चिमटा काढला.
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी कोपरखळ्या लगावल्या. 'लोकसत्ता'ने बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter
दरम्यान छोटी शस्त्रक्रिया होऊनही कार्यक्रमाला आलो. नाहीतर गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेलो असा समज झाला असता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हाणला.
विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, विनोद तावडे, दिवाकर रावते, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्यासंदर्भात हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.
4. परदेशातील मालमत्तेवर कारवाई करू नका- मल्या
देशातल्या माझ्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून देणीदारांची सर्व देणी देऊ शकता येतील, तेव्हा आता माझ्या परदेशातील मालमत्तेवर कारवाई करू नका, असा दावा करत विजय मल्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने मल्या यांच्या मागणीला विरोध केला आहे. 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मल्या यांची भारतामधील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. त्यांच्यावर विविध बँकांचं सुमारे 900 कोटी रुपयांचं कर्ज आहे. ईडीने वसूल केलेल्या मालमत्तेमधून सर्व देणीदारांची देणी देता येऊ शकतात, संबंधित मालमत्तेच्या समभागांचे भावही वाढत आहेत.
न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली.
5. देशभरातल्या खाजगी वैद्यकीय सेवा आज बंद राहणार
लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे देशभरातील खाजगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. या बंदमध्ये राज्यभरातील 45 हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. 'द हिंदू'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यास मान्यता देणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकाला आयएमएने विरोध दर्शवला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








