एसप्लनेड मॅन्शन : मुंबईतल्या ऐतिहासिक पण धोकादायक ठरलेल्या या इमारतीच्या विटा इंग्लंडहून आल्या होत्या

एसप्लनेड मॅन्शन, मुंबई
फोटो कॅप्शन, एसप्लनेड मॅन्शन
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईच्या फोर्टमधील काळा घोडा परिसरात, जहांगीर कलादालनासमोर, ए डिमेलो रोडच्या कोपऱ्यावर एसप्लनेड मॅन्शन उभी आहे. आज नाही, तर गेल्या दीडशे वर्षांपासून.

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नवख्या लोकांनाच काय, तर कित्येक मुंबईकरांनाही तिच्या गौरवशाली इतिहासाची कल्पना नसावी. इथंच मुंबईतला पहिला 'चित्रपटाचा शो' झाला होता.

काळाच्या ओघात पाय घट्ट रोवून, वर्षानुवर्ष उन्हा-पावसाचा मारा झेलत, मुंबईच्या बदलत्या रूपाची साक्षीदार बनलेली ही इमारत काही वर्षांपासून दुरवस्थेत आहे आणि गेल्या काही दिवसांत पुन्हा चर्चेत आली आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर ही इमारत धोकादायक असून, ती खाली करून दुरुस्तीसाठी १५ मे पर्यंत म्हाडाकडे देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता.

त्याविरोधात इमारतीतले जवळपास दीडशे भाडेकरू सर्वोच्च न्यायालयात गेले होते, जिथे त्यांना ३० मे पर्यंतची मुदतवाढ दिली मिळाली होती. त्यानंतर आता सर्व रहिवाशांनी इमारत खाली केली आहे आणि या प्रकरणी 4 जून रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

पण एसप्लनेड मॅन्शन दुरुस्तीच्या मुद्द्यावरून चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. २००७-२००८पासून म्हणजे गेली जवळपास बारा वर्षं या इमारतीच्या दुरुस्तीचं घोंगडं भिजत पडलं आहे. पण ही इमारत इतकी महत्त्वाची का आहे?

इतिहासाची साक्षीदार

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिशांनी मुंबईची सात बेटं एकत्र आणल्यावर हे शहर आकार घेऊ लागलं. त्यानंतर 1867-1871 दरम्यानच्या काळात बांधलेली ही इमारत म्हणजे मुंबईतलं त्या काळातलं एक आलिशान हॉटेल होतं. मालक जॉन हडसन वॉटसनच्या नावावरून त्याचं वॉटसन्स हॉटेल असं नामकरण झालं होतं. लंडन आणि पॅरिससारख्या शहरांमध्ये तेव्हा उभ्या राहात असलेल्या हॉटेल्ससारखंच हॉटेल मुंबईत उभारण्याचा वॉटसनचा मानस होता.

एसप्लनेड मॅन्शन, मुंबई
फोटो कॅप्शन, या हॉटेलचं पुढे काय होणार?

या काळात 'बॉम्बे' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या शहराला अनेक युरोपियन नागरीक भेट द्यायचे, तेव्हा याच वॉटसन्स हॉटेलमध्ये राहायचे.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठीही ही इमारत महत्त्वाची आहे, असं वास्तुविशारद आणि ज्येष्ठ शहररचनाकार हर्षद भाटिया नमूद करतात. "वॉटसन्स हॉटेलमध्येच ७ जुलै १८९६ रोजी ल्युमिएर बंधूंनी पहिला सिनेमॅटोग्राफ पिक्चर दाखवला होता. भारतीय सिनेजगताची सुरुवात मुंबईत झाली होती आणि तिची पाळंमुळं एकप्रकारे याच इमारतीत रोवली गेली होती."

१९२०च्या आसपास वॉटसन्स हॉटेल बंद पडलं आणि मग १९४४च्या सुमारास इमारतीचं नामकरण एसप्लनेड मॅन्शन असं करण्यात आलं. शेजारीच कोर्टाची इमारत असल्यानं अनेक वकिलांनी कार्यालय म्हणून इथल्या खोल्यांचा वापर करण्यास सुरूवात केली. आजही इथं जवळपास दीडशे भाडेकरू आहेत.

काळाच्या पुढची निर्मिती

एसप्लनेड मॅन्शनची आतील रचना स्वतः वॉटसननी तयार केली होती, पण प्रत्यक्ष निर्मितीचं काम ब्रिटिश इंजिनियर रोलँड मॅसन ऑर्डिशनी पार पाडलं होतं.

शेजारची डेव्हिड ससून लायब्ररी, मागच्या बाजूला उच्च न्यायालयाची इमारत अशा दगडी इमारतींच्या घोळक्यात एसप्लनेड मॅन्शन आजही वेगळी उठून दिसते. हर्षद भाटिया त्यामागचं कारण सांगतात.

एसप्लनेड मॅन्शन, मुंबई
फोटो कॅप्शन, एसप्लनेड मॅन्शन आता धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली आहे.

"संपूर्ण लोखंडी ढाचा आधी तयार करून मग उभारण्यात आलेली मुंबईतली ती पहिली इमारत आहे. वास्तुरचना तंत्रज्ञ आणि इतिहासकारांच्या भाषेत तिला पोर्टेबल बिल्डिंग म्हणता येईल.

या इमारतीचे स्तंभ कास्ट आयर्न म्हणजे ओतीव लोखंडापासून बनले आहेत. इंग्लंडच्या फिनिक्स फाऊंड्री कंपनीनं ते स्तंभ आणि लोखंडी गॅलरी तयार केल्या होत्या. इमारतीच्या 'Infill' प्रकाराच्या भिंती विटांनी बनल्या असून इंग्लंडमधील बर्नहॅमच्या वेबस्टर्स मॅन्युफॅक्चरीमध्ये त्यांची निर्मिती करण्यात आली होती."

या काळात मुंबईच्या फोर्ट परिसरात व्हिक्टोरियन, निओ-गॉथिक शैलीच्या इमारती उभ्या राहात होत्या. त्या सर्वांमध्ये ही इमारत वेगळी दिसायची.

"इतर निओ-गॉथिक शैलीच्या ऐतिहासिक इमारतींनी मुंबईच्या या भागाची वेगळी ओळख निर्माण केली, त्या सर्वांमध्ये वॉटसन्स हॉटेल वेगळं होतं. वास्तुरचनेच्या दृष्टीनं ते बरंच आधुनिक आणि काळाच्या पुढे होतं असं मी म्हणेन," हर्षद भाटिया सांगतात.

मुंबईचा वारसा जपण्याचे प्रयत्न

या कारणांसाठीच मुंबईच्या वारसा संवर्धन समितीनं एसप्लनेड मॅन्शनला Grade II A दर्जा देऊन वारसा म्हणून मान्यता दिली आहे.

एसप्लनेड मॅन्शन, मुंबई
फोटो कॅप्शन, एसप्लनेड मॅन्शनची आजची अवस्था अशी आहे.

ज्येष्ठ वास्तुरचनाकार प्रा. माधवराव देवभक्त या इमारतीचं संवर्धन करणं का गरजेचं आहे, हे स्पष्ट करताना म्हणतात, "अशा इमारती जुन्या काळाची आठवण करून देतात. म्हणून त्यांना जपणं महत्त्वाचं असतं.

आपण ताज महाल का जपला आहे, कारण त्यामागे काही इतिहास आहे, लोकांना तो माहिती आहे आणि त्यांना तो भावतो. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, त्यांचं जीवनमान कसं होतं याविषयी सर्वांनाच कुतूहल असतं. अशा वास्तू पुढच्या काळात पाहायला मिळणं कठीण आहे. फोटोमध्ये त्या पाहणं आणि प्रत्यक्ष अशा इमारतीत जाऊन तो अनुभव घेणं हे वेगळं असतं."

"म्हातारपाखाडी, खोताची वाडी अशा ठिकाणची जुनी घरं, फोर्टमधल्या जुन्या इमारती हे मुंबईचं वेगळं स्वरूप आहेस. या वैशिष्ट्य दाखवणाऱ्या इमारतींमुळेच मुंबईचं मुंबईपण टिकून आहे. ते काढून टाकलं, तर काय उरेल? फक्त स्कायस्क्रॅपर्स आणि काँक्रिटचं जंगल."

दुरवस्थेची कारणं

वारसा दर्जा मिळाल्यानं केवळ त्या जागेचं महत्त्व अधोरेखित होतं, पण एखादी वास्तू वाचवायची असेल, तर त्यासाठी योग्य आर्थिक तरतूदही होणं गरजेचं आहे, असं हर्षद भाटिया सांगतात.

"माणसानं निर्माण केलेल्या कोणत्याही गोष्टीची काळजी माणसानंच घ्यावी लागते. कोणत्याही इमारतीची देखरेख ही हवामान, वापरामुळं होणारी झीज, वर्षानुवर्ष वापरात होत गेलेले बदल, आर्थिक स्रोत या सर्वांवर अवलंबून असते."

एसप्लनेड मॅन्शन, मुंबई
फोटो कॅप्शन, एसप्लनेड मॅन्शची डागडुजी होणार का?

मुंबईत भाडे नियंत्रित करणारा कायदा आल्याावर अशा इमारतींच्या मालकांना त्यातून फारसं उत्पन्न मिळेनासं झालं आणि पर्यायानं इमारतींची देखरेख करणं परवडेनासं होऊ लागलं. त्याचाही फटका या इमारतीला बसला.

पुनरुज्जीवनाचे प्रयत्न

इमारतीची डागडुजी किंवा पुनरुज्जीवन करताना तिथं सध्या राहणारे किंवा वावर असणारे लोक, आसपासच्या परिसराशी तिचं नातं, परिसराचं बदलत जाणारं रूप तसंच देखरेख करणारी व्यवस्था याकडे लक्ष द्यायला हवं असं हरिश भाटिया सांगतात.

ही आहे अवस्था

"एसप्लनेड मॅन्शनविषयी काळाच्या बाबतीतही विचार करावा लागेल. वारसा दर्जा देताना केवळ इमारतीच्या ऐतिहासिक महत्त्वाकडे पाहिलं जातं, पण तिची आज नेमकी परिस्थिती काय आहे, तिचा कसा वापर होतो आहे, याकडे दुर्लक्ष होतं. एकेकाळी आसपास फारशा इमारती नसताना मोकळ्या भागात ही इमारत होती. आज हे मुख्य रस्त्यावरचं मोक्याचं ठिकाण आहे. फोर्टच्या परिसरात अनेक कार्यालयं असून हा भाग कायम वाहनांनी, गजबजलेला असतो."

त्यामुळेच ही इमारत पोर्टेबल असल्यानं ती इथून हटवून दुसरीकडे पुन्हा उभारण्याचाही पर्याय इमारतीच्या संरक्षणासाठी आजमावून पाहता येईल, असं हरिश भाटिया यांना वाटतं.

"जिथे आहे तिथेच ही इमारत ठेवायची असेल, तर तिला मालकीहक्कांच्या आणि सरकारी बंधनांतून मोकळं करायला हवं. एखाद्या संस्थेकडे तिची जबाबदारी देता येईल, पण तिचं पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर कसा केला जावा यावर मात्र बंधन ठेवायला हवं. मला वाटतं कलाकारांना येऊन राहता येईल, काम करता येईल, अशा एखाद्या हॉटेलमध्ये याचं रुपांतर करता येऊ शकतं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)