देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर सुप्रिया सुळेंसाठी बारामतीची निवडणूक कठीण?

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, CMOMaharashtra

    • Author, हलिमा कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून

"बारामतीमध्ये मागच्या वेळेस कमळ चिन्ह असतं तर बारामती आपली असती. आता गेल्या वेळची चूक पुन्हा करायची नाही," असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती जिंकण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे.

पुण्यात भाजपच्या 'शक्ती केंद्र प्रमुख' संमेलनात ते बोलत होते. यावेळी बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बूथ प्रमुखांना भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी भाषणात महाराष्ट्रात भाजप यंदा 43 जागा जिंकणार त्या 41 होऊ देणार नाही, असं म्हटलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात 43वी जागा ही बारामतीची असेल, असं म्हणत सुप्रिया सुळे यांना थेट आव्हान दिलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले हे पाहाण्यासाठी इथं क्लिक करा

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

त्यावर "बारामतीमध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल - नरेंद्र मोदी, अमित शहा की देवेंद्र फडणवीस?" असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया

फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलताना देताना म्हणाले, "माझ्या शुभेच्छा आहेत. भाजपने 48 जागांची का तयारी केली नाही? लोकशाहीमध्ये कोण काहीही बोलू शकतं. त्यांच्या तोंडाला लगाम घालू शकत नाही."

सुप्रिया सुळेंसाठी बारामती कठीण?

बारामती मतदारसंघाची 2014 ची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपच्या साथीनं सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती.

मात्र महादेव जानकरांना भाजपचं कमळ चिन्ह देण्यात आल नव्हतं, तेव्हा त्यांनी 'कपबशी' या चिन्हावर निवडणूक लढविली होती.

या अटीतटीच्या लढतीत जानकारांना 4 लाख 51 हजार 843 मतं मिळाली तर सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात 5 लाख 21 हजार 462 मतं पडली.

सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images

बारामती लोकसभा मतदार संघात खडकवासला भागातून सुप्रिया सुळेंना सर्वांत कमी मतदान झालं होतं.

नरेंद्र मोदींचा करिश्मा, मतदारांना हवं असलेलं परिवर्तन, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजलेलं धनगर समाजाचं आरक्षण आंदोलन, दौंड-इंदापूरमधील स्थानिक राजकारण आणि बारामतीच्या २२ गावांमधला दुष्काळ, अशा अनेक घटनांचा फायदा त्यावेळी महादेव जानकरांना झाला होता.

सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images

तेव्हा प्रचाराच्या काळात अजित पवारांचा एक व्हीडिओ सुद्धा व्हायरल झाला होता, ज्यात अजित पवारांनी मासाळवाडीमध्ये मतदारांशी बोलताना "माझ्या बहिणीला (सुप्रिया सुळेंना) मतदान नाही झालं तर गावाचे पाणी बंद" करण्याची धमकी दिल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी दिलं होतं.

याविरोधात आम आदमी पार्टीच्या उमेदवार सुरेश खोपडे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

बारामतीमध्ये सध्या काय समीकरण आहे?

2019च्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला तर यावेळी मतदार राजा नाराज असल्याचं वातावरण आहे. महादेव जाणकरांनी आपण बारामतीतून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पण गेल्या निवडणुकीत साथ दिलेला धनगर समाज यंदा मात्र जानकरांवर नाराज आहे. धनगरांच्या आरक्षणाचं त्यांनी दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही.

खासदार सुप्रिया सुळे यांचा शहरी भागातील मतदारांबरोबर जनसंपर्क वाढला आहे. मात्र मध्यमवर्गीय शहरी मतदारांवर भाजपची भुरळ अजूनही आहे, या परिस्थितीत शहरी मतदारांना राष्ट्रवादीकडे वळवणं हे सुप्रियासुळेंसमोर आव्हान असल्याचं पुण्यातले दैनिक सकाळचे प्रिन्सिपल करस्पॉन्डन्ट उमेश घोंगडे यांना वाटत.

Keyframe #6

बारामती, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा, मुळशी आणि खडकवासला या पट्ट्यांत स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आणि वाद आहेत. या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभं करण्यात त्यांना कितपत यश मिळतं, यावर बरंच अवलंबून असल्याचं स्थानिक जाणकार सांगतात.

तर बारामतीची निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी यंदा सोपी नाही. "बारामतीत तगडा उमेदवार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचं इतर लोकसभा मतदारसंघातलं लक्ष विचलित करण्याची भाजपची खेळी असेल," असं 'सामना'चे वरिष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"दर वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेवटची सभा बारामती मतदार संघात घेतात. यंदा मात्र मावळमधून पार्थ पवार तर स्वतः शरद पवार माढा मतदारसंघातून तर सुप्रिया सुळे बारामतीतून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे मावळ आणि माढामधलं राष्ट्रवादीचं लक्ष विचलित करणं ही व्यूहरचना भाजप ताकदीने करेल. भाजपने 2014ची बारामतीतली निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती," विठ्ठल जाधव आणखी माहिती देताना सांगतात.

पण असं असलं तरी सध्या भाजपकडे बारामतीसाठी मोठा आणि प्रभावी चेहरा दिसत नाही.

शिवसेना-भाजपा युती झाली तर बारामतीची जागा कुणाच्या वाट्याला येते, हे सुद्धा पाहावं लागेल. शिवसेनेला जागा मिळाली तर मंत्री विजय शिवतारे इच्छुक आहेत. विजय शिवतारे हे सुप्रिया सुळेंचे कट्टर विरोधक मानले जातात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)