मोदींकडे आज एक 'जॉर्ज' असता, तर चित्र वेगळं असतं

जॉर्ज फर्नांडिस

फोटो स्रोत, ARKO DATTA/AFP/GETTY IMAGES

    • Author, सुनील गाताडे
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

'कामगार नेता हरपला,' माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी प्रतिक्रिया दिली.

२०१४च्या विजयाचा उन्माद ओसरू लागला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टर्मच्या शोधात आहेत. त्यांना एका गोष्टीची जबर कमतरता भासत आहे.

ती म्हणजे मित्रपक्षांची. दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांत एखादा चमत्कार घडला तरच भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे असे पक्षातले निष्ठावंत देखील मान्य करतात.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारावेळी मोदींनी जाहीरपणे नवीन साथीदारांचा शोध सुरू केला. भारत 'काँग्रेसमुक्त' करण्याकरता प्रादेशिक पक्षांच्या मदतीकरता त्यांनी जणू साकडे घातले होते. पण त्याचा परिणाम काय झाला तर शून्य. एक मोठा भोपळा. काही बरोबर असलेले साथीच सोडून चालले तर काहींचे ब्लॅकमेल सुरू झाले.

'भरमसाट आश्वासने दिली आणि ती पाळली नाहीत, खूप मोठी स्वप्ने दाखवली आणि ती पूर्ण केली नाहीत, तर जनता जनार्दन चपराक लगावते', असे मोदींच्या सरकारातील ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी म्हणत आहेत. 'हा लेकी बोले सुने लागे'चा प्रकार नाही तर साक्षात मोदींना संबोधून गडकरी असे म्हणत आहेत, असा विरोधी पक्षांचा दावा आहे. गडकरींच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे, ते काँग्रेस वर टीका करत आहेत, असे सांगता सांगता भाजपच्या वाचाळ प्रवक्त्यांचे घसे बसले आहेत. स्वतः गडकरी मात्र शांत आहेत.

धर्मनिरपेक्ष फर्नांडिस भाजपसोबत कसे?

शिवसेनेने वेगळाच राग आळवला आहे. 'मला परत मोठा भाऊ व्हायचं आहे', असा लकडा भाजपच्या सर्वांत पुराण्या साथीदाराने लावला आहे. 'आम्ही मोठे भाऊ होतो, आहोत आणि राहणार' असे सेना नेते संजय राऊत म्हणत आहेत. गेल्या लोक सभा निवडणुकीत 'मोदी लाट' आली आणि त्यात सेना-भाजपाची जुनी मैत्रीचं वाहत गेली. काय घडले तो ताजा इतिहास आहे. आता जोडायचे कसे आणि कोण मध्यस्थी करणार?

जॉर्ज फर्नांडिस

फोटो स्रोत, THE INDIA TODAY GROUP/GETTY

फर्नांडिस यांच्यासारखा नेता मोदींबरोबर असता तर असा प्रश्नच पडला नसता. फर्नांडिस यांचे सर्व पक्षांत मित्र होते. अगदी काँग्रेसमध्ये देखील. पन्नास वर्षांपूर्वी शिवसेनेचा उदय होण्याच्या अगोदरपासून त्यांची बाळ ठाकरेंशी मैत्री होती. शिवसेना प्रमुखांना 'बाळ' या एकेरी नावाने हाक मारणारा कदाचित फेर्नांडिस हा एकमेव राष्ट्रीय नेता असावा. ठाकरे यांच्याशी कितीही राजकीय मतभेद असले तरी 'मातोश्री'त जाऊन ते हक्काने जेवण करायचे, असे सेनेतील जुने जाणते सांगतात. शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे सूत जुळायचे. जनता परिवार हा त्यांचाच.

कट्टर काँग्रेसद्वेष्टे म्हणून ओळखले जाणाऱ्या जॉर्ज नि राम मनोहर लोहियांकडून बिगर-काँग्रेसवादाचा वसा घेतला होता आणि तो त्यांनी जन्मभर निष्ठेनं पाळला. १९७७ साली जनता पक्षाचे सरकार सत्तेत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. केंद्रातील ते पहिले बिगरकाँग्रेसी सरकार होते.

जवळजवळ २५ वर्षांपूर्वी भाजपच्या बरोबर गेल्यावर डावे नेते खचितच फर्नांडिसवर रागावले. पण त्याकाळात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली होती की जॉर्ज साहेबांपुढे कोणता राजकीय पर्यायच उरला नव्हता. तत्कालीन बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या लालू प्रसाद यांनी जॉर्जशी उभा दावा मांडला होता आणि लालू नाराज होतील म्हणून कोणताही धर्मनिरपेक्ष म्हणवणारा पक्ष त्यांना जवळ उभा करत नव्हता. अगदी 'शेवटचा पर्याय' म्हणून आपल्याला भाजपबरोबर जावे लागले, असे जॉर्ज यांनी एकदा प्रसिद्ध लेखक अमिताभ घोष यांना सांगितले होते.

भाजपची अस्पृश्यता मोडून काढली

जॉर्जमुळे १९९२च्या बाबरी मशिदीच्या विध्वसानंतर तीव्र झालेली भाजपाची अस्पृश्यता नष्ट होण्यास मदत झाली होती. १९९६ साली वाजपेयींचे पहिले सरकार अवघे १३ दिवस टिकले. भाजपच्या अस्पृश्यतेमुळे त्याला मित्र मिळत नव्हते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी वाजपेयींची पंतप्रधान म्हणून नेमणूक केल्याचे पत्र दिले होते, पण डाळ शिजत नव्हती. त्यावेळचे काँग्रेस प्रवक्ते विठ्ठलराव गाडगीळ यांनी त्याला 'थर्टीन डे वंडर' असं टोपणनाव ठेवून भाजपाची शोभा जगभर केली होती.

जॉर्ज फर्नांडिस

फोटो स्रोत, WWW.GEORGEFERNANDES.ORG

१९९९ साली वाजपेयी सरकारचा लोकसभेत एका मताने पराभव केल्यानंतर सोनिया गांधी या पंतप्रधान बनण्यास उतावळ्या झाल्या होत्या. राष्ट्रपतींना भेटून 'मला २७२ खासदारांचा पाठिंबा आहे' असे त्यांनी जाहीर केलं.

फेर्नांडिस यांनी तेव्हा कमाल केली. रातोरात ते कामाला लागले. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे त्यांनी जणू बौद्धिकच घेतले, असे म्हणतात. मुलायम फिरले आणि सोनियांचे स्वप्न संपुष्टात आले.

पुढे कारगिल युद्ध झालं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वाजपेयी परत सत्तेवर आले ते पूर्ण पाच वर्षांसाठी. फर्नांडिस यांना त्यामुळे काँग्रेस आणि सोनिया भक्तांनी कधीच माफ केले नाही. लढवय्या वृत्तीच्या फेर्नांडिस यांनी त्याची कधीच पर्वा केली नाही. कामगार नेता असताना फेर्नांडिस यांनी मुंबईवरची आपली पकड दाखवली होती आणि देशव्यापी रेल्वेचा संप घडवण्याची किमयादेखील.

जॉर्ज फर्नांडिस

फोटो स्रोत, GEORGE FERNANDES/FACEBOOK

रालोआ-१ सरकारात वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, फर्नांडिस आणि जसवंत सिंह यांच्यात असलेल्या समन्वयामुळे सरकार तसेच आघाडीचे काम सुरळीत चालले. या सरकारामध्ये फर्नांडिस यांनी संकट-मोचकाचे काम केले. कुठं काही खुट्टं झालं तिथे 'फायर फायटर' फर्नांडिस हजर! मग ते ओरिसामधील एका ख्रिस्ती मिशनरी डॉक्टरची हत्या असो वा कुण्या मित्रपक्षाची कैफियत.

१९९८मध्ये वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या जयललिता यांनी वारंवार धमक्या दिल्या होत्या. तेव्हा फर्नांडिस यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी चेन्नईचे भरपूर दौरे केले होते. जयललिता या लहरी स्वभावाच्या असल्याने फार थोड्यांचे त्यांच्याशी जमायचे. फर्नांडिस यांच्याशी त्यांचे जुळायचे.

त्याकाळी समता पक्षाचे असलेले फर्नांडिस हे त्यांच्या काँग्रेसविरोधाच्या राजकारणामुळे १०० टक्के आपले हितैषी आहेत असे वाजपेयी-अडवाणींना वाटायचं. म्हणूनच संकट-मोचक म्हणून त्यांचा वापर भरपूर केला गेला, असं त्यांच्या साथीदार राहिलेल्या जया जेटली यांनी 'लाईफ अमंग द स्कॉर्पिअन्स' या आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात लिहिले आहे. आघाडी सरकारे म्हणजे तारेवरची कसरत असते, कारण प्रत्येक घटक पक्ष आपले वजन वाढवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे प्रमुख पक्ष आणि समर्थक पक्ष यांच्यात एक सुप्त संघर्ष धुमसत असतो.

पहिलं बिगरकाँग्रेसी सरकार पाडलं

१९७९ साली जनता पक्षाचे सरकार पाडण्यात फर्नांडिस यांनी घेतलेली भूमिका ही वादग्रस्त राहिली होती. आदल्या दिवशी त्यांनी मोरारजी देसाई सरकारचे जोरदार समर्थन केले होते, पण दुसऱ्या दिवशी सरकारच्या विरोधी मतदान करून ते पाडण्यात ते सहभागी झाले होते. मधू लिमये या आपल्या पुराण्या समाजवादी साथीदाराने मैत्रीची जणू शपथच घातली म्हणून फर्नांडिस यांचा नाईलाज झाला होता, असा दावा जेटली यांनी केला आहे.

ते काहीही असो, पण पहिल्या बिगरकाँग्रेसी सरकारला पाडण्यात आपला असा सहभाग त्यांना नंतर बोचला होता आणि नंतरची अशी सरकारे टिकवण्यासाठी त्यांनी जिवापाड मेहनत केली होती.

जॉर्ज फर्नांडिस

फोटो स्रोत, WWW.GEORGEFERNANDES.ORG

खासदार आणि मंत्री असताना ते कृष्ण मेनन मार्गावरील बंगल्यात राहायचे. लोकांचा नेता असल्यामुळे फर्नांडिस यांनी आपल्या बंगल्याचे प्रवेशद्वार तोडले होते. कोणालाही त्यांच्या कडे मुक्तप्रवेश होता. संरक्षण मंत्री असताना देखील त्यांच्या बंगल्याला दरवाजा नव्हता.

वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या यशात ज्या कोणाचा मोठा वाटा होता, त्यात फर्नांडिस अग्रगण्य. स्वतातंत्र्योत्तर भारतातील एक अतिशय लढवय्या नेता आणि प्रभावी संसदपटू असूनदेखील शेवटपर्यंत त्यांना 'उत्कृष्ट सांसद' हा सन्मान मिळाला नाही, ही एक वेगळ्या प्रकारची शोकांतिका आहे.

फर्नांडिस हे संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये कधी फिरकले नाहीत. आक्रमक संसदपटू असूनही फर्नांडिस लोकसभेच्या वेलमध्ये कधी आले नाहीत, ना कधी त्यांनी कोणाच्या भाषणात कधी व्यत्यय आणला. सभागृहातील जागा देखील कधी त्यांनी सोडली नाही. जेव्हा बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा मात्र आपल्या विरोधकांवर फार विलक्षणपणे प्रहार केले. सभागृहाला मंत्रमुग्ध सोडले.

मोदी सरकारातून आणि रालोआमधून बाहेर पडणारा पहिला पक्ष म्हणजे राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष. शेट्टी हे त्यावेळी म्हणाले होते की या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न कळत नाहीत आणि या सरकारमध्ये कुणाशी बोलून काम होईल ते कळत नाही. फर्नांडिस यांच्यासारखा मोदींचा कुणी साथीदार असता तर असे घडले असते का?

(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)