शरद पवार-राहुल गांधी यांची दिल्लीत बैठक, आघाडीवर चर्चा #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. शरद पवार-राहुल गांधी यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीत भेट झाली. राहुल गांधी हे पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी गेले होते. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते. 'न्यूज18 लोकमत'नं याबाबत बातमी दिली आहे.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं जागावाटप जवळपास निश्चित झालं असून फक्त आठ जागांचा पेच बाकी आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची झालेली ही पहिली बैठक आहे.
शरद पवार तिसरी आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासंदर्भातही चर्चा झाली. मंगळवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर बैठक झाली. भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याच्या दिशेने या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
2. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यासाठी पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वामध्ये हे घटनापीठ काम करणार आहे.
या घटनापीठात शरद बोबडे, एन. व्ही. रामन, उदय लळित, धनंजय चंद्रचूड या न्यायमूर्तींचा समावेश आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

29 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी केली जाईल, असं जाहीर केलं होतं.
याप्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी असणारा अर्ज हिंदू महासभेने केला होता. त्यामुळे आता या घटनापीठामार्फत 10 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. देशातील सर्वांत मोठया प्रकरणाचा निकाल मराठीबहुल असलेलं घटनापीठ देणार आहे.
3. सिक्कीममध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कम योजना राबवणार
युनिव्हर्सल बेसिक इन्कम या योजनेची अंमलबजावणी करणारं सिक्कीम हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. कोणत्याही अटीविना नागरिकांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी सिक्कीम राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं ही बातमी दिली आहे.
सिक्कीममध्ये सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्ष सत्तेत आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी या पक्षाने ही योजनेचा आपल्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे. 2022 पर्यंत संपूर्ण राज्यातील नागरिकांना या योजनेत सामील करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
2017 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कम योजनेचा उल्लेख केला होता. तात्विकदृष्ट्या संकल्पना भावणारी असं त्याचं वर्णन करण्यात आलं होतं. गरिबी दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना उपयुक्त ठरू शकते असं मत नोंदवण्यात आलं होतं.
4. पनवेलमध्ये गटारात गुदमरून ठेकेदारासह तिघांचा मृत्यू
पनवेल जवळ काळुंद्रेमध्ये भुयारी गटारद्वारात उतरून मलवाहिनीची सफाई करणाऱ्या दोन कामगार आणि ठेकेदाराचा बुधवारी गुदमरून मृत्यू झाला.
मलवाहिनी तुंबल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर ठेकेदाराने दोन सफाई कामगारांना साफसफाईसाठी पाठवलं. 'लोकसत्ता'नं ही बातमी दिली आहे.
भुयारी गटारद्वारात उतरून तीन तास होऊनही कामगार बाहेर न आल्याने ठेकेदार स्वत:च गटारद्वारात उतरला. तिघेही गटारात अडकल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना कळवलं.
अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिघांनाही बाहेर काढलं. त्यांना पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं दाखल करून घेण्याआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. विलास म्हसकर, संतोष वाघमारे अशी दोघांची नावं असून तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
5.हार्दिक पंड्याकडून दिलगिरी व्यक्त
कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह उद्गार काढल्याप्रकरणी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं नोटीस बजावली आहे.
या दोघांना आपली भूमिका मांडण्यासाठी 24 तासांचा अवधी देण्यात आला होता. हार्दिक पंड्याने ट्वीटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
करण जोहर सूत्रसंचालक असलेल्या या कार्यक्रमात हार्दिक आणि राहुल सहभागी झाले होते. हार्दिकचे उद्गार महिलांसाठी आक्षेपार्ह असल्याची चर्चा सोशल मीडियात झाली होती. याची दखल घेऊन बीसीसीआयनं त्यांना नोटीस बजावली. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून बीसीसीआय खेळाडूंना यापुढे रोखू शकतं.
"माझ्या उद्गारांमुळे कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो. कार्यक्रमादरम्यान वातावरण हलकंफुलकं होतं. त्यातूनच मी असं बोललो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा तसंच अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता," असं हार्दिकने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हार्दिक आणि राहुल हे दोघेही सध्या ऑस्ट्रेलियात आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








