नयनतारा सहगल यांनी मराठी साहित्य संमेलनाला जरूर यावं - राज ठाकरे

नयनतारा सहगल

फोटो स्रोत, Getty Images

यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय साहित्य संमलेनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते करण्यावरून निर्माण झालेल्या वादाला आणखी नवीन वळण मिळालं आहे.

नयनतारा सहगल यांच्या येण्याला आमचा विरोध नाही, त्यांनी संमेलनाला जरूर यावं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

रविवारी संमेलनाच्या आयोजकांनीच सहगल यांना मेल पाठवून कार्यक्रमात सहभागी न होण्यासंबंधी कळवलं होतं.

"मी कार्यक्रमाला का येऊ नये, याचं कोणतंही स्पष्टीकरण आयोजकांनी पाठविलेल्या मेलमध्ये देण्यात आलं नाहीये," असं नयनतारा सहगल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. "अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमाला येऊ नये," एवंढच मेलमध्ये नमूद केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार असल्याच्या वृत्तानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अनेकांनी विरोधाचा सूर लावला होता. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन हे इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते करणं हा मराठी सारस्वतांचा अपमान आहे, अशी भूमिका मनसेनं घेतली होती.

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या यवतमाळमधल्या साहित्य संमेलनात लोकांना समजेल-उमजेल असा संवाद साधणाऱ्या साहित्यिकाऐवजी इंग्रजीमधून लिखाण करणाऱ्या लेखिकेला आमंत्रण का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली बाजू एका प्रसिद्धीपत्रकातून ट्वीट केली आहे. त्यात ते लिहितात, "नयनतारा सहगल यांना प्रमुख उद्घाटक म्हणून आमंत्रण होतं. याला जरी माझ्या सहकाऱ्याने विरोध केला असला तरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष या नात्याने माझा आजिबात विरोध नाही. "

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ते पुढे म्हणतात, "महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनाचं मराठीपण जपलं जावं, अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे, जी योग्य देखील आहे. पण नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल, आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील एक वाहक होणार असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारणच नाही. हीच भूमिक स्पष्ट शब्दांत पक्षाचे नेते-प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी परवाच मांडली होती. पण पक्षाचा अध्यक्ष या नात्याने तीच भूमिका पुन्हा एकदा मांडत आहे. नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो."

या पत्रकाद्वारे ठाकरेंनी आपल्या सहकाऱ्यांना संदेश दिला की "यापुढे अशा संवेदनशील विषयांवर माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये, याची तमाम महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी."

"इतकंच नाही तर संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे जो मनस्ताप झाला असेल, त्याबद्दल मी एक मराठी भाषाप्रेमी या नात्याने मनापासून दिलगिरी व्यक्त करतो," अशा शब्दांमध्ये त्यांनी भूमिका मांडली आहे.

कोण आहेत नयनतारा सहगल?

नयनतारा सहगल या जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित आणि रणजित सीताराम पंडित यांच्या कन्या आहेत.

त्यांनी कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. त्यामुळेच नेहरू कुटुंबाशी संबंधित असूनही त्यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीलाही विरोध केला होता.

नयनतारा सहगल
फोटो कॅप्शन, नयनतारा सहगल

नयनतारा सहगल यांनी इंग्रजी भाषेतून लिखाण केले असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या 'Rich Like Us' या कादंबरीला 1986 साली साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता.

"कोणताही विरोधी सूर दडपण्याचे प्रकार केवळ महाराष्ट्रातच नाहीत तर देशभर सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्यामधून असा नकार आल्यानं वाईट वाटतंय. मी अनेकदा साहित्यिक कार्यक्रमांच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात गेले आहे. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या भूमिकेमुळे निश्चितच मी व्यथित आहे," असं नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांवर टीका

नयनतारा सहगल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडव्या टीकाकार आहेत. जमावांनी केलेल्या हत्यांच्या घटनांनंतर सरकारचा निषेध म्हणून आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करून त्यांनीच 'पुरस्कार वापसी'ची मोहीम सुरू केली होती.

भारत सरकारच्या सांस्कृतिक विविधता जपण्यामध्ये सरकार अपयशी ठरल्यानं आपण हा सन्मान परत करत असल्याचं नयनतारा यांनी म्हटलं होतं.

बुद्धिजीवी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात असताना पंतप्रधानांचं मौन हे भीतीदायक असल्याची टिप्पणीही नयनतारा यांनी केली होती.

'आयोजकांनी सहगल यांची माफी मागावी'

या प्रकरणात संयोजकांनी सहगल यांची माफी मागावी अशी प्रतिक्रिया शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाकडून होऊ नये, अशी भूमिका मांडली होती. मात्र त्यामागे सहगल यांच्यासारख्या ख्यातनाम लेखिकेचा अशा प्रकारे अवमान व्हावा असा हेतू नव्हता. त्यांच्या कार्याप्रति आम्ही आदरच व्यक्त केला होता."

ते म्हणाले, "याबाबत आयोजकांनी आधीच विचार करायला पाहिजे होता. संमेलनाला काही दिवस उरले असताना पत्र पाठवून त्यांचा असा अपमान केल्याने जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. आयोजकांनी या चुकीबद्दल नयनतारा सहगल व महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे."

साहित्य संमेलन निर्विघ्न पार पाडण्यासाठी निर्णय : जोशी

महामंडळ लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करते, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "संमेलन उधळून लावण्याची धमकी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होऊन संमेलन निर्विघ्न पार पडावे यासाठी हा निर्णय घेतला. आयोजकांनी दिलेल्या 'अपरिहार्य कारण' याचा अर्थ महामंडळास एवढाच स्पष्ट झाला आहे. महामंडळाच्या निर्देशानुसार ही कृती केल्याचा अपप्रचार स्वत:च्या सोयीसाठी कोणीही करत असेल तर ते धादांत खोटे आहे. महामंडळ कोणालाही निमंत्रित करत नाही, तर आयोजक करतात. महामंडळ स्वत: कधीही नयनतारा सहगल सारख्यांना बोलावू नका असे म्हणणार नाही. महामंडळास तसे म्हणण्याचे कोणतेही कारण नाही."

"वस्तुस्थितीचा विपर्यास स्वतःच्या सोयीसाठी करून कोणी दिशाभूल करणारी विधाने करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावं," असंही या संदर्भात साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते म्हणाले.

"सहगल यांच्या भाषा लेखनाबद्दल अनेक लोकांनी आक्षेप घेतला होता आणि संमेलन उधळून टाकण्याची भाषा वर्तमान पत्रातून केली होती. आक्षेप घेणाऱ्यांच्या कृतीने संमेलनातील व्यवस्था विस्कळित होईऊ नये म्हणून ही माहिती महामंडळाच्या अध्यक्षांना दिली होती आणि सहगल यांचे निमंत्रण मागे घेतल्याचे पत्र दिले," ते म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)