राजस्थान, तेलंगणात विधानसभा निवडणुकांचं मतदान संपलं: एक्झिट पोल काही वेळातच

फोटो स्रोत, Getty Images
राजस्थानात वसुंधराराजे शिंदे आणि तेलंगणामध्ये K. चंद्रशेखर राव यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानपेटीत बंद झाला आहे. आता विधानसभा निवडणुका झालेल्या पाच राज्यांमधले - तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम - मतदानानंतरचे पहिले कौल काही क्षणातच येतील.
राजस्थान आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांसाठी एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी मतदान झालं. राजस्थानातील एकूण 200पैकी 199 जागांवर तर तेलंगणामध्ये एकूण 119 जागांसाठी मतदान झालं.
राजस्थानात भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आहेत तर तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये चुरस रंगणार आहे. ज्या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत त्यातील छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि मिझोरमचा निकाल EVM मध्ये बंद झाला आहे.
या सर्व पाच राज्यांमध्ये मतमोजणी 11 डिसेंबरला होईल. मंगळवारी दुपारपर्यंत राजकीय चित्र स्पष्ट झालेलं असेल, असा अंदाज आहे.
राजस्थान विधानसभा निवडणूक 2018 : एक दृष्टिक्षेप
- राज्यात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. यातल्या 199 जागांवर शुक्रवारी मतदान होईल.
- अलवर जिल्ह्यातल्या रामगढ मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांच्या निधनामुळे निवडणूक रद्द केली आहे.

फोटो स्रोत, DIPRRAJASTHAN/BBC
- सर्व जागांवर मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारेच होईल.
- मतदान सकाळी आठ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येईल.
- निवडणुकीसाठी राज्यभरात एकूण 52 हजार मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत.
- भाजप आणि काँग्रेससह एकूण 88 पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
- या पक्षांचे 2247 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
- निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 4.75 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत.
- यातील जवळपास 2.47 पुरुष मतदार आहेत तर 2.27 कोटी महिला मतदार आहेत.
- या निवडणुकीत जवळपास वीस लाख तरुण मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावतील. यात सर्वांत जास्त संख्या जयपूरमधल्या मतदारांची आहे.
निवडणुकीशी संबंधित आणखी काही महत्त्वाचे मुद्दे
- 2013च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 75% मतदारांनी मतदान केलं होतं. राज्यात एकूण 47,223 मतदान केंद्रं उभारण्यात आली होती.
- 200 पैकी भाजपने 163 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला केवळ 21 जागा मिळाल्या होत्या.
- बहुजन समाज पक्षाचे तीन उमेदवार निवडून आले होते. तर सात अपक्ष उमेदवार विधानसभेची पायरी चढले.
- 2008च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 78, काँग्रेसला 96 तर इतरांना 26 जागा मिळाल्या होत्या.
पक्षांचे दावे आणि वास्तव
- 1998 नंतर राजस्थानात कुठल्याच पक्षानं दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलेलं नाही.
- हा इतिहास या निवडणुकीत बदलेल आणि भाजप सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असा दावा भाजपनं केला आहे
- तर जनतेमध्ये सरकारच्या कार्याबद्दल रोष आहे आणि याचा फायदा मिळून सत्ता स्थापन करू, असा विश्वास काँग्रेसला वाटतोय.

फोटो स्रोत, EPA
- काँग्रेसने कुणालाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेलं नाही. मात्र काँग्रेसला सत्ता मिळाली तर त्यांच्यासमोर दोन चेहरे असतील, असं मानलं जातंय, ते दोन चेहेरे म्हणजे - सचिन पायलट आणि अशोक गेहलोत.
- तर भाजपतर्फे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा पुन्हा एकदा वसुंधराराजे याच आहेत.
प्रचार सभा
प्रसार माध्यमाच्या वृत्तांनुसार सर्वच पक्षांनी राजस्थानात मॅरेथॉन प्रचार सभा घेतल्या आहेत. राज्यात भाजपने एकूण 223 सभा घेतल्या, ज्यात पक्षाचे 15 दिग्गज सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण 12 प्रचार सभा घेतल्या. तर अमित शहा यांनी 20, योगी आदित्यनाथ यांनी 24 आणि राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी 75 प्रचार सभा घेतल्या.
प्रचार सभांच्या शर्यतीत काँग्रेस भाजपपेक्षा खूप पुढे होती. काँग्रेसने राज्यात एकूण 433 प्रचार सभा घेतल्या. ज्यात पक्षाचे 15 बडे नेते सहभागी झाले.
नवीन खेळाडू, बंडखोर उमेदवार आणि मुद्दे
भाजप आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. यात भाजपच्या चार मंत्र्यांचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, EPA
नव्याने स्थापन झालेला राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आणि भारत वाहिनी पक्षाने एकत्र येत 123 उमेदवार उभे केले आहेत.
अपक्ष आमदार हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षामुळे काही मतदारसंघात निवडणूक तिरंगी झाली आहे. बेनीवाल प्रभावशाली जाट समाजातून येतात. त्यांच्या पक्षाने पन्नासहून जास्त उमेदवार रिंगणात उभे केले आहेत.
राज्याच्या सिंहासनावर आरूढ होण्याचं स्वप्न बघत निघालेल्या भाजप आणि काँग्रेस दोघांनीही आधी विकास हाच निवडणुकीतला मुद्दा असल्याचं सांगितलं. मात्र बघता बघता यात मंदिर, जात, धर्म आणि श्रद्धा असे मुद्दे सहभागी झाले. पुढे तर गोत्रचा मुद्दाही चर्चेत आला.
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018 : एक दृष्टिक्षेप
- जून 2014 मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळं तेलंगणा हे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात आलं.
- इथे दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक होत आहे. खरंतर ही निवडणूक मे 2019ला होणार होती. मात्र त्यापूर्वीच विधानसभा विसर्जित करण्यात आली.

फोटो स्रोत, AFP
- आता शुक्रवारी इथे दुसऱ्या विधानसभेसाठी मतदान होईल.
- राज्य स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने सर्वाधिक जागा जिंकत सरकार स्थापन केलं.
- तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव विराजमान झाले.
- राज्यात चंद्रशेखर यांची तेलंगणा राष्ट्र समिती, तेलुगू देसम पक्ष, काँग्रेस, तेलंगणा जन समिती, भाकप, एमआयएम आणि भाजप मैदानात आहेत.
- काँग्रेसने तेलुगू देसम पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मोट बांधत पिपल्स फ्रंट ही आघाडी स्थापन केली आहे. चंद्रशेखर राव यांच्यासाठी ही आघाडी मोठं आव्हान असल्याचं मानलं जात आहे.
- भाजप मात्र स्वबळावर निवडणूक लढत आहे. 2014मध्ये भाजप आणि तेलुगू देसम पक्ष यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती.
- यावेळी तेलंगणातील निवडणुकीत तिघांमध्ये चुरस आहे. यात भाजप तिसऱ्या आणि काँग्रेस आघाडी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष केवळ हैदराबादमधल्या 8 जागा लढणार आहे. यातील 7 जागांवर 2014मध्ये त्यांना विजय मिळाला होता. असं असलं तरी असदुद्दीन ओवैसी यांनी टीआरएससाठी मुस्लीमबहुल भागात प्रचार केला आहे.
- राज्यात जवळपास 2.73 कोटी मतदार आहेत. यातील 1.38 कोटी पुरुष मतदार आहेत तर 1.35 कोटी महिला मतदार आहेत. राज्यभरात एकूण 1164 मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत.
- 2014 मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने 63 जागांवर विजय मिळवला होता तर काँग्रेसला 21 आणि भाजपला 5 जागा जिंकता आल्या होत्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








