तेलंगणा निवडणूक : राजकीय वाऱ्यांची दिशा अशी बदलत आहे

राव

फोटो स्रोत, AFP

    • Author, मोहम्मद उमर फारुक
    • Role, बीबीसीसाठी, हैदराबादहून

तेलंगणात निवडणुकांचा ज्वर तीव्र झाला आहे. 7 डिसेंबरला होणार असलेल्या निवडणुका राज्यातल्या सगळ्यांत बहुचर्चित निवडणुका आहेत. या निवडणुकांकडे पुढील वर्ष होणाऱ्या लोकसभेच्या महासंग्रामाची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे.

तीन महिन्यांपूर्वी निवडणुकीचा धुरळा उडाला तेव्हा मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा तेलंगण राष्ट्रसमिती पक्ष एकतर्फी बाजी मारेल असं चित्र होतं. मात्र आता निवडणुकांचा हा पट रंगतदार अवस्थेत आहे.

तेलंगण राष्ट्रसमितीच्या विरोधात भाजप वगळता सर्व पक्ष एकवटणं ही राजकीय पटलावरची सगळ्यांत मोठी घडामोड ठरली. काँग्रेस, तेलगू देसम पक्ष आणि इतर छोट्या पक्षांनी मिळून पीपल्स फ्रंट नावाची एक आघाडी स्थापन केली आहे. राज्याच्या राजकीय इतिहासातली अतिशय महत्त्वाची घटना आहे.

हा प्रयोग यशस्वी झाला तर राष्ट्रीय पातळीवर दुरगामी परिणाम होऊ शकतो. राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात आघाड्या स्थापन करण्याच्या हालचालींना वेग तर येईलच, पण त्याचबरोबर राज्य पातळीवर युती होण्याची शक्यता आहे.

इतकंच नाही तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी सुद्धा हा वैयक्तिक विजय असेल. 2019 मध्ये सर्व पक्षांना भाजपच्या विरोधात एकत्र करण्याची नायडू यांची योजना आहे.

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांवर सध्या तिहेरी लढत बघायला मिळते आहे. या लढतीच्या तिसऱ्या टोकाला भाजपचे आव्हान आहे.

या निवडणुका KCR यांच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे सर्वेक्षणातून कळतं. यापैकी एकाही सर्वेक्षणात KCR यांना बहुमत मिळेल असं दिसत नाही तर पीपल्स फ्रंट सत्ताधारी पक्षाला कडवं आव्हान देईल असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

इतकंच काय तर सट्टा बाजारातही सगळा माहोल हा तेलंगणा राष्ट्र समितीच्या विरोधात आहे.

सुरुवातीच्या काळात KCR असा दावा करत होते की त्यांचा पक्ष 100 पेक्षा अधिक जागा मिळवून पुन्हा सत्तेवर येईल. आता मात्र त्यांच्या दाव्यांतील हवा कमी होताना दिसत आहे.

मी निवृत्ती पत्करेन

ते स्वत:च्याच पराभवाची चर्चा करताना दिसत आहेत. एका प्रचारसभेत ते म्हणाले, "जर TRSचा पराभव झाला तर मला काही वाटणार नाही. मी निवृत्ती पत्करेन माझ्या फार्म हाऊसवर जाऊन आराम करेन."

त्यांनी गेल्या साडेचार वर्षांत उत्तम कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा सत्तेत आणणं ही जनतेची जबाबदारी आहे असंच ते लोकांना सांगत असावेत.

2014 मध्ये सगळ्यांत तरुण राज्याचे ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सूत्रं हातात घेतली होती. लोकांच्या कल्याणासाठी काम करणारं सरकार म्हणून त्यांची ख्याती आहे.

या सरकारने लोककल्याण योजनांसाठी 52 हजार कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे अनेक लोक या सरकारला लोकप्रिय सरकार म्हणतात.

राव

फोटो स्रोत, Getty Images

गरीब मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणं, विधवा, असहाय्य, विकलांग तसंच वृद्ध लोकांच्या पेन्शनमध्ये वाढ करणं अशा अनेक योजना या सरकारने आणल्या आहेत.

वीज समस्येवर तोडगा हे या सरकारचं सगळ्यांत मोठं यश आहे. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा करणारं तेलंगणा हे पहिलंच राज्य ठरलं आहे.

पहिली निवडणूक त्यांनी भावनेच्या लाटेवर स्वार होत जिंकली. त्यांनी स्वत:ला तेलंगणा राज्याचा रचनाकार आणि देवदूताच्या रुपात लोकांसमोर सादर केलं.

2018 मध्येही त्यांची अशाच प्रकारची रणनिती आहे. आपलं काम आणि भावनिक मुद्दे यांच्या जोरावर त्यांना निवडणूक जिंकायची आहे.

मात्र तीन गोष्टींमुळे लोकांमध्ये असंतोष असल्याचा विसर त्यांना पडला आहे.

त्यांनी रोजगारनिर्मिती करण्याबरोबरच रिक्त सरकारी पदं भरणं, गरीबांना दोन खोल्याचं घर देणं याशिवाय मुस्लिमांना 12 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन त्यांना अद्याप पूर्ण केलेलं नाही.

त्याचप्रमाणे राज्यात KCR कुटुंबीयांच्या वाढत्या घराणेशाहीबाबत लोक दबक्या आवाजात नापसंती व्यक्त करत आहेत. त्यांच्या पक्षातही या मुद्द्यावर नाराजी आहे.

त्यांचा मुलगा के. टी. रामा राव तसंच मुलगी आणि खासदार के. कविता, पुतण्या आणि मंत्री टी. हरिश राव यांच्याकडे सगळे अधिकार आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, तेलंगणा निवडणूक : हातमाग कामगारांमध्ये सरकारबद्दल का आहे नाराजी?

त्यांच्या आणखी एका पुतण्याला राज्यसभेचं खासदारपद बहाल करण्यात आलं आहे. त्यांचा मुलगा त्यांचा उत्तराधिकारी असेल ही गोष्ट कोणापासूनही लपून राहिलेली नाही.

राजकीय वाक्युद्ध

KCR आपल्या पक्षातल्या कोणत्याच नेत्यांना भेटत नाहीत. एकतर आपल्या प्रगती भवन या आलिशान शासकीय निवासस्थानात राहतात किंवा आपल्या मतदारसंघातील फार्म हाऊसमध्ये.

KCR यांनी तब्बल नऊ महिने आधी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी असं का केलं हे कोणालाच कळलं नाही. त्यांनी दिलेल्या कारणांशीही लोक सहमत नाहीत. या मुद्द्यामुळे सुद्धा त्यांचा पराभव होऊ शकतो.

विरोधी पक्षांनी त्यांच्या अनेक कल्याणकारी योजनांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

KCR यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी राव यांना 'खाओ कमिशन राव' असं नाव दिलं आहे. त्याच्या उत्तरदाखल राव यांनी राहुल गांधी यांना जोकर म्हटलं.

सत्तेत परत येण्याच्या KCR यांच्या दाव्याच्या तीन आठवड्यांतच हवेचा रोख बदलत आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, AFP/Getty images

निवडणूक जवळ आहे आणि काँग्रेस, TDP, कम्युनिस्ट पार्टी आणि तेलंगणा जन समितीच्या युतीला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.

ही युती निष्प्रभ करण्यासाठी KCR यांनीही आपल्या रणनितीत थोडा बदल केला आहे. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर हल्ला करत आहेत. ते नायडू यांना तेलंगणाचे शत्रू संबोधतात, जेणेकरून या युतीच्या विरोधात वातावरण निर्माण करता येईल.

KCR आपल्या रॅलीत म्हणतात, "ज्या व्यक्तीने तेलंगणाचा विरोध केला अशा व्यक्तीला तुम्ही तेलंगणाला येऊ द्याल का? काँग्रेस त्या व्यक्तीला आपल्या खांद्यावर बसवून इथे आणू इच्छिते."

जेव्हा राहुल आणि नायडू यांच्या युतीने KCR यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि राव यांचे पंतप्रधानांशी लागेबांधे आहे असा आरोप जेव्हा सुरू झाला तेव्हा KCR यांच्या वक्तव्यांमध्ये कमालीचा बदल झाला. त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करायला सुरुवात केली.

त्यांनी आरोप केला की मोदींनी तेलंगणाला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. तसंच ते मागासवर्गीय आणि मुस्लीम आरक्षणाच्या मध्ये अडथळा बनून राहिले आहेत.

निवडणुकीच्या चार पाच दिवसआधी म्हणजे रविवारी KCR यांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्याच्या विविध गटांना वेगवेगळ्या सोयीसुविधा देण्याचं आश्वासन दिलं. पराभवाच्या भीतीनेच ते मतदारांना भूलवण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांनी निवृत्तीचं वय 61 पासून 58 करणं, युवकांना 3016 रुपये बेरोजगारी भत्ता, सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत येणारं पेन्शन 2016 करण्याची आणि घरं बांधण्यासाठी पाच ते सहा लाख आर्थिक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं आहे.

रणनितीमध्ये केलेल्या या बदलांचा फायदा TRSला मिळेल की नाही हे आता पाहावं लागेल.

पीपल्स फ्रंटची गणितं

पीपल्स फ्रंटच्या रणनीतीबद्दल बोलायचं झालं तर ते स्वत:ला TRS आणि भाजपाला एक दुसऱ्याची टीम बी संबोधत निवडणूक जिंकू इच्छितात.

पीपल्स फ्रंट नं या दोन्ही पक्षांवर हल्ला चढवला आहे आणि TRS संसदेत भाजपला पाठिंबा देतं असं त्यांचं मत आहे.

दुसरं म्हणजे पीपल्स फ्रंट निवडणुकीच्या गुणाकार-भागाकारात अडकलं आहे. जर या युतीत सामील असलेल्या पक्षांचा 2014 च्या मतांची टक्केवारी पाहिली तर त्यांना 41% मतं मिळाली होती. तर TRSला 34.3% मतं मिळाली होती.

राव

फोटो स्रोत, Telangana CMO

नायडूसुद्धा तेलंगणाच्या मतदारांना भूलवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हैदराबादचा विकास केला होता आणि त्याला आयटी हब केलं होतं.

गेल्या चार वर्षांत TRSमध्ये अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेते सामील झाले होते. तरीही तेलुगू देसम पार्टीचे तेलंगणात अनेक समर्थक आहेत.

भाजप स्पर्धेत मागे

दुसऱ्या बाजूला भाजपचे अनेक नेते राज्यात सरकार स्थापनेचे जोरदार दावे करत आहेत. मात्र भाजपा या स्पर्धेत बरीच मागे पडली आहे.

भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांनी तेलंगणात फक्त तीन सभा घेतल्या आहेत. जिथं विजयाची शक्यता नाही तिथं ते जास्त जोर लावू इच्छित नाहीत असंच सध्याचं चित्र आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, AFP

तरीही भाजपनं तेलंगणामध्ये आपली प्रचारसाधनं मोठ्या प्रमाणात गुंतवली आहेत. त्यांचे अनेक नेते राज्याचा दौरा करत आहेत.

पक्षाध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांनी राज्यात मोठ्या सभा घेतल्या आहेत.

राज्यात ज्या आपल्या पाच जागा आहेत त्यांना निदान 12 पर्यंत नेण्यावर त्यांचा भर आहे. असं केलं तर ते त्रिशंकू विधानसभेत किंग मेकर होतील. याशिवाय आपल्या मतांचा शेअर वाढवण्याची त्यांना अपेक्षा आहे.

भाजपा त्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाची रणनीति इथेही आजमावण्याचे प्रयत्न करीत आहे. मुस्लीमांना 12 टक्के आरक्षण देण्याच्या आश्वासनात TRS अपयशी ठरली आहे. त्याचप्रमाणे हैदराबाद लिबरेशन डे सारखे अनेक मुद्दे तापवण्याच्या प्रयत्नात भाजप आहे.

स्थानिक भाजप नेते राजा सिंह यांनी एमआयएमचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा शिरच्छेद करण्याचीही धमकी दिली आहे.

इतके प्रयत्न करूनसुद्धा तेलंगणात वातावरणनिर्मिती करण्यात ते यशस्वी झाले नाही.

MIM फक्त आठ जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी सात जागांवर त्यांनी 2014 मध्ये विजय मिळवला होता.

MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी मुस्लीमबहुल भागात प्रचार करत आहेत.

भाजप

फोटो स्रोत, Reuters

त्यांच्यामते TRS ने एक चांगलं सरकार दिलं आहे. त्यामुळे ते पाठिंबा देत आहेत. सरकारने धार्मिक शांतता स्थापन करण्यात यशस्वी ठरलं आहे. त्यांच्या मते या सरकारने अल्पसंख्यांकासाठी चांगलं काम केलं आहे.

मात्र 13.5% मुस्लीम मतदार TRS आणि पीपल्स फ्रंटमध्ये विभागले गेले आहेत.

मुस्लीमांचं आरक्षण 4 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर नेलं नाही म्हणून मुस्लीम समाजाचा KCR यांच्यावर राग आहे. त्याचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे.

त्यामुळे तेलंगणात ही निवडणूक चुरशीची होणार आहे, बाकी सत्य परिस्थिती काय आहे ते 11 डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालातून समोर येईलच.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)