संजय साठे यांच्यावर नरेंद्र मोदींना मनीऑर्डर करण्याची वेळच का आली?

शेतकरी संजय साठे यांची मनीऑर्डर परत आली आहे.

फोटो स्रोत, BBC/pravin thakare

फोटो कॅप्शन, शेतकरी संजय साठे यांची मनीऑर्डर परत आली आहे.
    • Author, प्रविण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नाशिक

कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेली मनी ऑर्डर त्यांना परत पाठवण्यात आली आहे.

"29 नोव्हेंबरला मी 750 किलो कांदे विकले. त्यातून मला फक्त 1064 रुपये मिळाले. त्यामुळे कांद्याच्या पडलेल्या भावाकडे लक्ष वेधण्यासाठी मी ते पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनीऑर्डर केले. जिल्हा प्रशासनानं मनीऑर्डरची दखल घेत एक अहवाल तयार केला. तो अद्यापपर्यंत मला बघायला मिळालेला नाही. पण 10 डिसेंबरला ती मनीऑर्डर परत आली आणि मी ती स्वीकारली आहे. मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधावं, अशी माझी अपेक्षा आहे," असं साठे यांनी बीबीसीला सांगितलं.

संजय साठे हे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातले शेतकरी आहेत. त्यांनी 29 नोव्हेंबरला पंतप्रधान कार्यालयाच्या आपत्ती निवारण निधीला ही रक्कम पाठवून दिली होती.

नाशिक जिल्हा कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. पण कांद्याचे दर कमालीचे घसरल्याने शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं आहे.

साठे यांनी कांद्याची लागवड केली होती. त्यांच्या शेतात 750 किलो कांद्याचं उत्पादन झालं होतं. निफाडमधील बाजार समितीत त्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. पण एका किलोला 1 रुपये 40 पैसे इतका कमी दर मिळाला.

पोचपावती

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC

साठे यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "कांदा ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी दोन मजूर लागले होते. त्यांची मजुरीच 400 रुपये झाली. तर ट्रॅक्टरचं भाडं 700 रुपये झालं होतं. हा कांदा घेऊन जेव्हा मी लासलगावच्या बाजार समितीतील उपबाजार समिती आलो, तेव्हा कांद्याचे लिलाव सुरू होते. लिलावात कांद्यांना क्विंटलला 200 ते 300 रुपये दर मिळत होता. कांद्याला किलोसाठी दीड रुपये इतकाही दर मिळाला नाही. हिशोबपट्टी हाती घेतली तेव्हा मला धक्काच बसला."

"हे पैसे घेऊन मी तडक पोस्टात गेलो आणि हे पैसै थेट पंतप्रधान कार्यालयात पाठून दिले. हे पैसे मनीऑर्डरने पाठवण्यासाठी मला 54 रुपये खर्च आला. पंतप्रधान कार्यालयाचा जो पत्ता माहिती होता तो मनीऑर्डरसाठी वापरला, तर पोस्टातील कर्मचाऱ्याने पिन कोड नंबर शोधून दिला."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कोणाताही वैयक्तिक द्वेष नाही फक्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे त्यांचं आणि इतर राजकीय नेत्यांचं लक्ष जावं, म्हणून हे पाऊल उचललं असं त्यांनी सांगितलं होतं.

साठे यांचे मित्र देवीदास बैरागी यांनी त्यांचा निषेधाचा व्हीडिओ मोबाईलवर चित्रित करून सोशल मीडियावर टाकला. शेतकऱ्यांच्या अडचणी सर्वांपुढे जाव्यात, एवढ्यासाठीच ही खटाटोप केल्याचं त्यांनी सांगितलं. निषेधाचा एक फलकही त्यांनी ट्रॅक्टरवर लावला होता.

कांदा

फोटो स्रोत, Sanjay Sathe

फोटो कॅप्शन, कांद्याचे दर पडल्याचा निषेध करताना शेतकरी संजय साठे

साठे नैताळे गावचे रहिवाशी आहेत. त्यांचं शिक्षण 12पर्यंत झालं आहे. त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कारही मिळाला आहे. 2010ला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने काही शेतकऱ्यांची निवड केली होती. त्यात साठे यांचा समावेश होता. विविध शेतीतज्ज्ञांच्या ते संपर्कात असतात.

साठे पुढे म्हणाले होते की, "पूर्वीही दर पडत होते. पण आताची स्थिती फारच वाईट आहे. खतं, कीटकनाशकं, बियाणे यांचे दर गगनाला भिडले आहेत. तर एकाही पिकातून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत नाही. नगदी पिकातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा असते, पण तीही फोल ठरली आहे."

कांद्याचे दर का पडले?

नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी कांद्याचं यंदा उत्पादन जास्त झाल्याचं सांगितलं,

ते सांगतात, "पूर्वी फक्त 8 राज्यांत कांदा पिकायचा आज 26 राज्यांत काद्यांचं उत्पादन घेतलं जातं. मागील वर्षी कांद्याचं उत्पादन चांगलं झालं होतं. शेतकऱ्यांनी तो साठवून ठेवला होता आणि आता बाजारात आणला आहे. सध्या जुन्या कांद्याला मागणी नसून नवीन कांद्याला चांगली मागणी आहे."

शेतीमाल रस्त्यावर

काही दिवसांपूर्वी देवळामधले शेतकरी पंढरीनाथ मेधने यांनी एक ट्रॅक्टर कांदा पाच कंदील चौकात टाकून दिला होता. तर मालेगावमधील टेहरे इथं शेतकऱ्यांनी कांद्याला दर मिळत नसल्याच्या निषेधार्थ मुंबई-आग्रा हायवेवर रास्ता रोकोही केला होता. तर सटाण्याच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी कांद्यांची माळ गळ्यात अडकवून विधानसभेत आंदोलन केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)