अवनी वाघिणीचे दोन्ही बछडे नरभक्षक होऊ शकतात का?

forest department of maharashtra

फोटो स्रोत, forest department of maharashtra

अवनी वाघिणीचे 11 महिन्यांचे 2 बछडे हे उप-प्रौढ (Sub-Adults) असल्याचं वक्तव्य अवनीला ठार करणाऱ्या असगर अली खान यांचे वडील शफात अली खान यांनी केल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे. एका वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं त्यांनी हे वृत्त दिलं आहे. पण त्यांच्या या वक्तव्यानंतर हे 2 बछडे नरभक्षक होऊ शकतात का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे त्याचा घेतलेला हा आढावा.

line

टी१ म्हणजेच अवनी वाघिण ठार झाल्यानंतर तिच्या दोन बछड्यांचा शोध सुरू आहे. बोराटी गावच्या जंगलात 'स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स' आणि वनविभागाचे जवळपास 200 कर्मचारी या शोध मोहिमेत सहभागी आहेत. टी१ वाघिणीला जेरबंद किंवा ठार करण्याची जशी मोहीम होती तशीच मोहीम तिच्या बछड्याना शोधण्यासाठी सुरू आहे.

सकाळी पाच वाजल्यापासून वन विभागाची टीम फिल्डवर सक्रीय होती. जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या 100 ट्रॅप कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी होत आहे. पथक पगमार्कची म्हणजेच बछड्यांच्या पायांच्या ठश्यांचीसुद्धा पाहणी करत आहेत. ज्या ठिकाणी बछड्यांचा फोटो ट्रॅप होतो त्या दिशेनं पथक शोधमोहिमेला निघत आहे.

परिसरातल्या नदीनाल्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी पगमार्क किंवा ट्रॅप कॅमेऱ्यात फोटो आढळत आहेत त्याभागात पशु वैद्यकीय डॉक्टरांच पथकही रवाना होत आहे.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत या बछड्यांची डायरेक्ट सायटिंग झालेली नाही. मात्र लवकरच ही शोध मोहीम फत्ते होईल आणि या दोन्ही बछड्यांना पकडण्यात यश येईल अशी खात्री वन विभागाला आहे.

2 नोव्हेंबरच्या रात्री अवनी वाघिणीला ठार मारण्यात आलं. त्यानंतर तिच्या दोन बछड्याचा भूकबळीनं मृत्यू होण्याची भीती वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींना आहे. त्यामुळे युद्धपातळीवर दोन बछड्यांना पकडण्याची मोहीम वन विभागानं हाती घेतली आहे.

forest department of maharashtra

फोटो स्रोत, forest department of maharashtra

शिकारीसाठी तरबेज नसलेले टी१ वाघिणीचे दोन बछडे भूकेनं मरण्याची किंवा नरभक्षक होण्याचीही भीती काही वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली होती.

याबाबत सातपुडा फाउंडेशनचे किशोर रिठे यांनी सविस्तर माहिती दिली.

ते म्हणतात "अनेक वाघ माणसांना खातात, म्हणून ते नरभक्षक होऊ शकत नाहीत, जर तो प्राणी सोडून केवळ माणसावर हल्ला करत असेल, म्हणजे दर चार दिवसाने तो वाघ माणस मारत असला, म्हणजे सातत्याने तो माणस मारत असेल तर त्याला आपण नरभक्षक म्हणू शकतो. मात्र या वाघिणीला या भागात स्थायी व्हायचं असल्यामुळे तिथं प्राणी-माणूस संघर्ष निर्माण झाला, 13 जण याच वाघिणीने मारले असे काहीही पुरावे उपलब्ध नाहीत, त्यामुळे ठामपणे ही वाघिण नरभक्षक होती असं म्हणता येणार नाही."

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : मांडवात शिरला वाघ

पुढे बोलताना रिठे म्हणतात की "या बछड्यांच वय 11 महिने आहे, बछडे 6 महिनंतर मास खायला सुरू करतात. म्हणजे त्यांना मास खाण्यासाठी केवळ 5 महिन्याचा अवधी मिळाला आहे. एक किंवा दोन माणसाचं मास या बछड्यांनी खाल्लं असेल तर ते नरभक्षक होऊ शकत नाहीत. आई सोबत असल्यावर बछडे शिकार करू शकत नाहीत. ते केवळ आईला फॉलो करतात. शिकारीत त्यांचा वाटा नसतो"

वाघ कुठल्या परिस्थितीत माणसाची शिकार करतात याबाबत रिठे यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलं

forest department of maharashtra

फोटो स्रोत, forest department of maharashtra

"एखादा वाघ, म्हातारा किंवा जखमी असेल तर तो फार हालचाली करू शकत नाही. त्यामुळे त्याला आपसूक भक्ष मिळालं तर तो खातो, जंगली प्राणी चपळ असतात त्यामुळे त्यांची शिकार करणं कठीण असतं अशा वेळी माणसं त्याची सहज भक्ष्य होतात."

रिठे यांच्या म्हणण्यानुसार वाघीणच बछड्याना शिकारीच प्रशिक्षण देते. अश्या प्रशिक्षणाची अनेक उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. एकदा दोन बछड्यांनी प्राण्यावर हल्ला चढवला पण ते त्या प्राण्याला ठार करू शकले नाहीत. सरतेशेवटी सर्व उपाय संपल्यावर आई आली आणि तिनं शिकारीला ठार केलं. आईच असं प्रशिक्षण असतं.

"महत्त्वाचं म्हणजे हे दोन बछडे पाहिले शोधून काढणं गरजेचं आहे. मग या बछड्यांचं काय करायचं हे समिती ठरवेल. लहान पिल्लं मरू शकतात, एकदा अशाच एका बछड्याला पकडलं, त्याला सुरुवातीला कोंबड्या खाऊ घातल्या मग हळूहळू मटण खाऊ घातलं, काही कालवधीत तो शिकार करायला शिकला, त्यामुळे प्रत्येक वेळी आई शिकार शिकवण्यासाठी लागतेच असंही नाही.

व्हीडिओ कॅप्शन, 'जय' वाघाची शानदार फॅमिली !

अवनीचे बछडे नरभक्षक असतील या आरोपाला वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी पूर्णविराम दिला आहे.

"हे दोन्ही बछडे नरभक्षक नाहीत. हे आम्ही उपलब्ध पुराव्यांचा आधारे ठामपणे सांगू शकतो. या बछड्यांनी आईसोबत असताना मास खाल्लं असेल म्हणून आपण त्यांना नरभक्षक म्हणू शकत नाही. कदाचित त्यावेळी ते आपल्या आईच्या दुधावरसुद्धा असू शकतात. शफाहतने असं काही विधान केलं असावं असं वाटत नाही. कोणत्याही वाघाला नरभक्षक घोषित करतांना खूप प्रोसेस असतात, कायदेशीर प्रक्रिया असते ती पूर्ण करावी लागते. या बछड्याच्या बाबतीत असं काही झालेलं नाही.

"अवनी वाघीणीसंदर्भात संपूर्ण पुरावे तपासून, कायदेशिर बाबी, प्रक्रिया पूर्ण करून आम्ही या वाघिणीला नरभक्षक घोषित केल होतं. या दोन बछड्याच्या संदर्भात असे काहीही पुरावे आमच्याकडे नाहीत. सध्या आमचा फोकस या दोन बछड्यांना पकडण्यावर आहे.

हेही वाचलत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)