सीमेपार 'सर्जिकल स्ट्राइक' करून जिवंत परत येणं किती कठीण होतं?

फोटो स्रोत, Huw Evans picture agency
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारताचे मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी 29 सप्टेंबर 2016ला पत्रकार परिषद घेतली आणि भारताने सीमेपार कट्टरवाद्यांच्या तळांवर 'सर्जिकल स्ट्राइक' केल्याची घोषणा केली. तेव्हा सगळं जग अवाक् झालं.
याआधी 'सर्जिकल स्ट्राइक' करण्यात आलेली नव्हता, असं नाही. पण भारतीय लष्कराने अशी कारवाई केल्याचं जगाला जाहीरपणे सांगण्याची ही पहिलीच वेळ होती.
या घोषणेच्या काही आठवड्यांपूर्वीच कट्टरवाद्यांनी भारतीय लष्कराच्या उरी तळावर केलेल्या हल्ल्यात 17 भारतीय सैनिक मारले गेले होते. दोघा सैनिकांचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला होता. या सर्जिकल स्ट्राइकमागचं हेच कारण होतं.
ही बातमी पसरल्यानंतर दिल्लीतल्या रायसीना हिल्सवर घडामोडींनी वेग घेतला. त्यानंतर अत्यंत गोपनीय अशा 'वॉर रूम'मध्ये एकापाठोपाठ एक भारताच्या संरक्षण विभागाच्या बैठका घेतल्या जाऊ लागल्या. त्यातल्या एका बैठकीला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह सहभागी झाले होते.

India's Most Fearless: True stories of Modern Military Heros या पुस्तकाचे सहलेखक राहुल सिंह सांगतात, "याविषयी आम्ही अनेक जनरल आणि स्पेशल फोर्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आम्ही मोठ्या विश्वासानं सांगू इच्छितो की, यातल्याच एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कर या युद्धाला शत्रूच्या क्षेत्रात घेऊन जाईल आणि या हल्ल्यानंतर भारत शांत नाही बसणार. या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल."
माइक टँगोवर ऑपरेशनची जबाबदारी
सीमेपार असलेल्या कट्टरवाद्यांची ठिकाणं उद्धवस्त करण्याची जबाबदारी प्रतिष्ठित पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस)चे सेकंड-इन-कमांड मेजर माइक टँगो यांच्यावर सोपवण्यात आली.
हे त्यांचं खरं नाव नाही. सुरक्षेच्या कारणास्तव या संपूर्ण पुस्तकात या ऑपरेशनदरम्यान त्यांना त्यांच्या रेडिओ नावानेच संबोधलं गेलंय.

फोटो स्रोत, Getty Images
'India's Most Fearless'चे सहलेखक शिव अरूर सांगतात, "स्पेशल फोर्सेसच्या अधिकाऱ्यांना creme de la creme of soldiers (सर्वोत्कृष्ट सैनिक) असं म्हटलं जातं. हे भारतीय लष्करातील सर्वांत फिट, शक्तिशाली आणि मानसिकरीत्या सजग असे सैनिक असतात. त्यांची निर्णयक्षमता सगळ्यांत जलद असते आणि जिथं जीवन आणि मृत्यूचा प्रश्न येतो, तिथं यांचा मेंदू फार वेगानं चालतो."
ते सांगतात, "जीवघेण्या परिस्थितीमध्ये जिवंत राहण्याची कला जेवढी यांना जमते तेवढी दुसऱ्या कुणाला जमत नाही. लष्कराचा वापर हा साधारणतः संरक्षणासाठी केला जातो. पण स्पेशल फोर्सेस हे शिकाऱ्याच्या भूमिकेत असतात. त्यांचा वापर हा नेहमी आक्रमणासाठी केला जातो."
गोपनीय सूत्रांशी संपर्क
यादरम्यान दिल्लीत या प्रकरणी अशा काही वातावरण निर्मिती झाली जसं जणू काही झालंच नाही. नरेंद्र मोदी यांनी कोळीकोडेमध्ये भाषण देताना उरीतील घटनेवर एकही शब्द उच्चारला नाही.
ते अर्थातच एवढं बोलले की, भारत आणि पाकिस्तानने गरिबी, निरक्षरता आणि बेरोजगारीविरोधात एकत्र लढायला हवं.

फोटो स्रोत, PTI
संयुक्त राष्ट्रामध्येही सुषमा स्वराज यांनी उरीवरून भारताची भूमिका घेणं टाळलं. सगळी परिस्थिती सामान्य आहे, असं पाकिस्तानसोर ठसवण्यात आलं. पण अंतर्गतरीत्या सर्जिकल स्ट्राइकची तयारी जोरात सुरू होती.
राहुल सिंह सांगतात, "मेजर टँगोंच्या टीमने पाकिस्तानमधील आपल्या चार गोपनीय सूत्रांशी संपर्क साधला. त्यातील दोन जण हे पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील ग्रामस्थ होते आणि दोन जण जैश-ए-मोहम्मदमध्ये भारतासाठी काम करणारे गुप्तहेर होते. कट्टरवादी त्यांच्या लाँचिंग पॅडवर आहेत, या माहितीला या चारही सूत्रांनी दुजोरा दिला."
रात्री साडेआठ वाजता कूच केलं
या मोहिमेसाठी आम्ही स्पेशल फोर्समधील सर्वश्रेष्ठ 19 भारतीय सैनिकांची निवड केली होती, असं माइक टँगोंनी शिव अरूर आणि राहुल सिंह यांना सांगितलं. अशा मोहिमेमध्ये अनेकांसोबत दुर्घटना घडण्याची शक्यताही तेवढीच होती.
खरंतर याचीच शक्यता 99.9999 टक्के होती आणि त्यांची टीम हे बलिदान देण्यास मानसिकरित्या सज्ज होती. या मोहिमेचा सर्वांत कठीण टप्पा हा परतीचा राहील, याची जाणीव टँगो यांना होती, कारण मोहिमेदरम्यान पाकिस्तानला त्यांच्या तिथं असण्याची माहिती एव्हाना मिळालेली असती.

टँगोंच्या हातात त्यांची M4 A1 5.56mm कार्बाइन होती. त्यांच्या टीममधील दुसऱ्या सदस्यांकडे M4 A1च्या शिवाय इस्रायलमध्ये तयार करण्यात आलेल्या टेवर TAR-21 असॉल्ट रायफली होत्या.
अखेर या सैनिकांनी 26 सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजता आपल्या ठिकाणावरून पायी चालायला सुरुवात केली. 25 मिनिटांमध्येच त्यांनी LOCला मागे टाकलं.
अचानक फायरिंगचा आवाज
चार तास सलग चालल्यानंतर टँगो आणि त्यांची टीम आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहचलेले होते. ते तिथून साधारणतः 200 मीटर दूर असताना त्यांना ज्याची अपेक्षा नव्हती, तेच झालं.

फोटो स्रोत, Getty Images
कट्टरवाद्यांच्या लाँच पॅडवरून अचानक फायरिंग सुरू झालं.पाकिस्तानला त्यांच्या येण्याची कुणकूण तर लागली नाही ना असंही त्यांना वाटून गेलं.
सगळे सैनिक एक सेकदांच्याही कमी वेळेत जमिनीवर झुकले. पण टँगो यांच्या अनुभवी कानांनी ताडलं की ही अंदाजेच करण्यात आलेली फायरिंग असून त्यांचा निशाणा आपल्या टीमऐवजी दुसरंच काहीतरी आहे. पण हा एकप्रकारे धोक्याचाही इशारा होता, कारण याचाच अर्थ लाँच पॅडमध्ये थांबलेले कट्टरवादी सावध होते.
टँगो यांनी निर्णय घेतला की ते याच भागात लपून बसतील आणि 24 तासांनंतर पुढच्या रात्री शत्रूवर हल्ला करतील.
"हा या मोहिमेचा सर्वांत संवेदनशील आणि धोकादायक भाग होता," शिव अरूर म्हणतात.
रात्रीच्या अंधारात शत्रूच्या परिसरात लपून बसणं कदाचित तेवढं अवघड नव्हतं, पण सूर्य उगवल्यानंतर या परिसरात थांबणं खरंच जोखमीचं होतं. पण यामुळे त्यांना एक फायदा नक्कीच होणार होता. या भागाला जाणून घेत रणनीती आखण्यासाठी 24 तासांचा अतिरिक्त अवधी त्यांना मिळणार होता.
टँगो यांनी आपल्या मुख्य अधिकाऱ्याशी एक शेवटचा संपर्क सॅटेलाइट फोनवरून साधला आणि त्यानंतर फोन ऑफ करून ठेवला.
150 फुटांवरून निशाणा साधला
28 सप्टेंबरच्या रात्रीला दिल्लीत भारतीय कोस्ट गार्ड कमांडर्सतर्फे वार्षिक स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. पण सगळे महत्त्वाचे पाहुणे, जसं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी उपस्थितांची माफी मागितली आणि सगळे लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन रूममध्ये पोहोचले. त्यावेळेस सीमेपार सुरू असलेल्या मोहिमेला दिल्लीतून नियंत्रित करता यावं, हे त्यामागचं कारण होतं.

फोटो स्रोत, PTI
मध्यरात्री दिल्लीपासून 1,000 किलोमीटर दूरवर टँगो आणि त्यांची टीम आपल्या लपलेल्या ठिकाणाहून बाहेर पडली आणि त्यांनी लाँच पॅडकडे हळूहळू सरकायला सुरुवात केली.
लाँचपॅडपासून जवळपास दिडशे फुटांवर टँगो यांनी नाइट व्हिजन डिव्हाइसच्या मदतीनं बघितलं की दोन जण कट्टरवाद्यांच्या ठिकाणावर पहारा देत आहेत.
राहुल सिंह म्हणतात, "टँगो यांनी दीडशे फुटांवरून निशाणा साधला आणि एकाच बर्स्टमध्ये दोन कट्टरवादी धारातीर्थ पडले. पहिली गोळी चालेपर्यंतच सैनिकांच्या मनात तणाव होता. गोळी चालल्यानंतर हा तणाव दूर पळाला."
38 ते 40 कट्टरवादी मारले
यानंतर गोळ्यांचा पाऊस पाडतच टँगोंचे कमांडो लाँचपॅडकडे गेले. अचानक टँगो यांची नजर जंगलाकडे पळणाऱ्या दोन कट्टरवांद्यावर पडली. भारतीय सैनिकांवर मागच्या बाजूने हल्ला करण्यासाठी त्यांनी हा पवित्रा घेतला होता.

फोटो स्रोत, Getty Images
टँगो यांनी आपलं 9mm बेरेटा सेमीऑटोमॅटिक पिस्तूल बाहेर काढलं आणि पाच फुटांच्या अंतरावरून त्या दोन कट्टरवाद्यॆंना यमसदनी धाडलं.
शिव अरूर म्हणतात, "माइक टँगो आणि त्यांची टीम तिथं जवळपास 58 मिनिटं होती. त्यांना आधीच सांगण्यात आलं होतं की मृतदेहांची मोजणी करण्यात वेळ घालवू नका. पण एका अंदाजानुसार, चार लक्ष्यांवर जवळपास 38 ते 40 कट्टरवादी आणि पाकिस्तान लष्कराचे दोन सैनिक मारले गेले. या सगळ्या मोहिमेदरम्यान रेडिओ पूर्णपणे सायलेंट ठेवण्यात आला होता."
कानाच्या बाजूनं गेल्या गोळ्या
आता टँगो समोरचं खरं आव्हान होतं ते भारतीय सीमेपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याचं, कारण तोवर पाकिस्तानच्या सैन्याला त्यांचा ठावठिकाणा कळला होता.
राहुल सिंग सांगतात, "माईक टँगो यांनी आम्हाला म्हणाले की, मी काही इंच जरी दूर असतो तर आता तुझ्यासमोर बसू शकलो नसतो. पाकिस्तानी सैनिकांनी डागलेल्या गोळ्या आमच्या कानांच्या बाजूनं जात होत्या. जेव्हा स्वयंचलित शस्त्रातून झाडलेल्या गोळ्या कानाजवळून जातात तेव्हा 'पुट..पुट..' असा आवाज येतो. आम्ही त्याच मार्गावरून परतू शकलो पण जाणीवपूर्वक परतीसाठी हा दूरचा रस्ता निवडला."

फोटो स्रोत, Getty Images
"आम्ही पाकिस्तानच्या भागात लांबवर घुसलो आणि मग परत येण्यासाठी वळलो. या मार्गावर 60 मीटरचा असा एक भाग होता जिथे लपण्यासाठी काहीच आडोसा नव्हता. तेवढ्या भागात कमांडोंनी पोटावर पडून रांगत रस्ता पार केला."
"सकाळी चारच्या सुमारास टॅंगोंचं दल भारतीय हद्दीत परतलं. अर्थात, तरीही ते पूर्णपणे सुरक्षित नव्हते. पण आता तिथे असलेल्या भारतीय सैन्यानं त्यांना कव्हर देत गोळीबार सुरू ठेवला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या संपूर्ण ऑपरेशनमध्ये टँगो यांच्या दलाच्या एकही सदस्य जखमीही झाला नाही."
सरळ व्हिस्कीची बाटलीच तोंडाला लावली
भारतीय सीमा ओलांडल्याबरोबर चिता हेलिकॉप्टरनं टँगोला 15 कॉर्पच्या मुख्यालयात नेण्यात आलं. तिथे ते थेट ऑपरेशन रूमच गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांना त्यांच्या कमांडिंग ऑफिसरनं मिठी मारली. कोर कमांडर लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांना पाहताच टँगोंनी त्यांना सॅल्यूट केलं.

राहुल सिंह म्हणतात, "जेव्हा जनरल दुआ टँगोंना भेटत होते तेव्हा एक वेटर एका ट्रेमध्ये ब्लॅक लेबल व्हिस्की भरलेलं ग्लास आणले. जनरलनी ते ग्लास घेऊन जाण्याचे आदेश दिले आणि म्हणाले, बाटलीच घेऊन ये. हे लोक ग्लासही खाऊन टाकतील. तेही बरोबरच होतं, कारण स्पेशल फोर्सच्या कमांडोंना ग्लास खाण्याचंही प्रशिक्षण दिलं जातं."
"वेटरने ताबडतोब ब्लॅक लेबलची बाटली आणली, जनरल दुआंनी हातात बाटली घेतली आणि टँगो यांना तोंड उघडायला सांगितलं. त्यानंतर, टँगो 'Stop' म्हणेपर्यंत दुआ त्यांच्या तोंडात व्हिस्की ओतत राहिले. मग टँगो यांनीही जनरल दुआंच्या तोंडात बाटली रिकामी केली."
संयुक्त राष्ट्रांचं प्रश्नचिन्ह
उत्तर कमांडचे चीफ लेफ्टिनंट जनरल डी.एस. हुदा यांना भेटण्यासाठी टँगो उधमपूरला गेले. तेव्हा तिथेही व्हिस्कीचाच एक राउंड झाला. राहुल सांगतात, "टँगो मनातल्या मनात विचार करत होते की, सगळे दारूच पाजताय, कुणीतरी खायला पण द्या."

20 मार्च 2017 रोजी सर्जिकल स्ट्राइक टीमच्या पाच सदस्यांना शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मेजर टँगो यांचाही कीर्ती चक्र देऊन सन्मान केला. त्यावेळी हे फारसं कुणाला माहिती नव्हतं की, कीर्ती चक्र मिळवणारे दुसरे कुणी नसून सर्जिकल स्ट्राइकचे हिरो मेजर माईक टॅंगोच आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








