सोशल : 'शेवटी भाजप-शिवसेना एकत्र येतीलच'

फोटो स्रोत, TWITTER/UDDHAV THACKERAY
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांचा पक्ष स्वबळावर लढवेल, असं नुकतंच जाहीर केलं आहे.
त्यांच्या या घोषणेबद्दल बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं? हे जाणून घेण्याकरता आम्ही त्यांना या संदर्भातच प्रश्न विचारला.
2019च्या निवडणुका आपण स्वबळावर लढू, या शिवसेनेच्या घोषणेबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न आम्ही वाचकांना विचारला.

याविषयी बीबीसी मराठीच्या वाचकांनी दिलेल्या या काही प्रतिक्रिया;
राजाभाऊ नागरे यांनी त्यांच्या फेसबुकवरील प्रतिक्रयेत शिवसेनेच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या साडेतीन वर्षात शिवसेनेनं केलेल्या निर्णय आणि घोषणांचं काय झालं? असं त्यांनी विचारलं आहे. तसंच ऐनवेळी दोन्ही पक्षांची युती होईल असं त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, FACEBOOK
सनी थोरात यांनी शिवसेनेला या निर्णयाचा काही उपयोग होणार नाही असं म्हटलं आहे.
"2019च्या निवडणुकीत राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोघांमध्ये लोकांचा इंटरेस्ट बघायला मिळेल. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्या कंटाळवाण्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत," असं ते लिहितात.
दुसरीकडे शिवसेना पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये महिलांना काय स्थान देण्यात आले? महिलांची नेतेपदी निवड का करण्यात आली नाही? व्यासपीठावर एकही महिला का नाही? असे प्रश्न दीपक सोनवणे यांनी उपस्थित केले आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK
"शिवसेनेच्या या निर्णायामुळे देशपातळीवर इतर छोट्या पक्षांना त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यास पाठबळ मिळेल," असं उदय गांधी यांनी फेसबुकवरील प्रतिक्रियेत म्हटलं आहे. तसंच 2019ची निवडणूक मोदींना सोपी जाणार नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
"शिवसेनेची ही घोषणा म्हणजे बोलाचा भात, बोलाचीच कढी या म्हणीप्रमाणे आहे. तसंच या घोषणेत काही दम नाही. एकाबाजूला सत्तेत राहायचं आणि स्वबळाची भाषा करायची ही दुटप्पी भूमिका जनता स्वीकारणार नाही," असं अमोल सूर्यवंशी यांनी लिहिलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
"एकत्र लढल्यास फायदा होईल असं वाटत नाही. मात्र स्वबळावर लढल्यास नुकसान नक्कीच होणार आहे," असं पराग कोडग यांचं म्हणण आहे. त्यांनी सरकारबाबत ग्रामीण भागात असलेल्या असंतोषावर सुद्धा बोट ठेवलं आहे.
प्रशांत यांनी त्यांच्या ट्वीटरवरील प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, "सेना साफ खोटं बोलत आहे, निवडणुका आधी अथवा नंतर ते युती करणारच आहेत."

फोटो स्रोत, FACEBOOK
"लोक आता मूर्ख राहिले नाहीत, निवडणूक आली की वेगळे व्हायचं आणि निवडणूक झाली की सत्तेसाठी एकत्र यायचं, पटत नसेल तर कायमचं वेगळं व्हा," असं मत मधुकर कांबळे यांनी मांडलं आहे.
घनश्याम पाटील यांनी म्हटलं आहे की, "शिवसेनेचा निर्णय स्वागतार्ह आहे. असं झाल्यास ती बाळासाहेबांना आदरांजली ठरेल. पण खात्रीनं सांगू शकत नाही. हे येणारा काळच ठरवेल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








