सोशल - 'पंतप्रधान मोदींनी पुरावा द्यावा किंवा माफी मागावी'

फोटो स्रोत, Getty Images/Sean Gallup
"गुजरातमध्ये पराभव होईल या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी बिथरले असून, राजकीय फायद्यासाठी ते माजी पंतप्रधान आणि लष्करप्रमुखपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवीत आहेत", असं प्रत्युत्तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला दिलं.
विनानिमंत्रण पाकिस्तानला भेट देणाऱ्यांनी काँग्रेसला राष्ट्रीयत्वाचे धडे देऊ नयेत, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.
पंतप्रधान मोदींनी आदल्या दिवशी काँग्रेसमधून निलंबित झालेले मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या उपस्थितीत 6 डिसेंबरला झालेल्या बैठकीचा उल्लेख केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानच्या माजी लष्करी अधिकाऱ्याच्या ट्वीटचा संदर्भ देऊन मोदींनी गुजरात निवडणुकीमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. तसंच, काँग्रेस आणि पाकिस्तानचं संगनमत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.
मोदींच्या त्या आरोपाला सोमवारी सिंग यांनी प्रत्युत्तर देत पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. या मागणीबाबत आम्ही बीबीसीच्या वाचकांना आपलं मत विचारलं होतं. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
धनंजय साठे आणि मयुर सानेर म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही पुरावा असेल तर त्यांनी तो सादर करावा आणि त्याची सखोल चौकशी करावी. नाहीतर संपूर्ण देशाची माफी मागावी."

फोटो स्रोत, Facebook
विनित मयेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेत काँग्रेस नेते खोटारडे असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानबरोबर गुपचूप घेतलेल्या बैठकीची बातमी मीडियामध्ये उघड झाल्यानंतर आम्ही अशी कोणतीही बैठक घेतलीच नाही अशी वक्तव्यं काँग्रेसचे प्रवक्ते करतात, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.
तर शुभम धाने म्हणतात की, "खरं तर मोदींनी माफी मागितली पाहिजे पण ते मागणार नाहीत." शुभम यांनी त्याचं कारणही दिलं आहे.
ते म्हणतात, "याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी अनेक खोटी विधानं केली आहेत, पण कधीच त्याबद्दल माफी मागितलेली नाही. नोटबंदीसारख्या फसलेल्या निर्णयाबद्दलही त्यांनी लोकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली नाही. त्यावरून पंतप्रधानांच्या राजकीय स्वभावाची जाणीव होऊ शकते."

फोटो स्रोत, Facebook
अनिकेत वाणी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत, "जर अशी बैठक झाली असेल तर मग त्या पाकिस्तानमधून आलेल्या मंडळींना व्हिसा तर परराष्ट् मंत्रालयाने दिला. मग हे भारत सरकारला माहिती नसेल का?" असा सवाल उपस्थित केला आहे.
मकरंद डोईजड यांनी हे लोकशाहीचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. 'काँग्रेस आणि भाजप दोघेही एकाच माळेचे मणी असून या दोघांच्या भांडणांमध्ये सर्वसामान्य जनता आणि शेतकरी भरडले जातात', असंही त्यांनी म्हटलं आहे.
तर मनीष कुलकर्णी म्हणतात, "मनमोहन सिंग बरंच बोलायला लागले आहेत. याचं क्रेडिट पंतप्रधानांना द्यायला हवं."
अनेकांनी होय... मोदींनी माफी मागायला हवी, असं मत नोंदवलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
"मनमोहन सिंग यांनी खूप चांगल्या प्रकारे देश चालवला असं नाही पण त्यांनी देशाला एवढं बेजार केलं नाही", असं मत श्रीकांत कदम यांनी व्यक्त केलं आहे.
"त्यांच्या काळात जग आर्थिक मंदीमध्ये असताना भारताची प्रगतीच्या दिशेने वाट होत होती. आज मंदी नसताना देशाला बेरोजगारी, भ्रष्टाचार या गंभीर विषयांना तोंड द्यावं लागत आहे", असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








