महाराष्ट्र तुडुंब : धरणं भरू लागली, पावसामुळं दिलासा
राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. सप्टेंबरमधला हा पाऊस वर्षभराच्या पाणीसाठ्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरला आहे.
शहरांमध्ये धुवांधार कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी गाव-शिवारांमध्ये या पावसानं दिलासा दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात तर आहेच, पण दुष्काळप्रवण मराठवाडा, विदर्भातही पाऊस पोहोचला असल्यानं तिथले शेतकरी काहीसे सुखावले आहेत.

पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा
आतापर्यंत मराठवाड्यात सरासरी 71.76 इतका पाऊस झाला आहे. यंदाची अपेक्षित वार्षिक सरासरी 85.15 टक्के इतकी आहे, जूनमधील पेरणीनंतर 17 ऑगस्टपर्यंत पावसानं हुलकावणी दिली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला होता. आता पाऊस चांगला होत असल्यानं शेतकरी सुखावले आहेत.
आशियातलं मोठं धरण भरलं
आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीनं 90 टक्क्यांकडे झेप घेतली आहे.
हवामान खात्यानं 22 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यासह राज्यातील अनेक विभागात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरण 107 टक्के भरलं आहे. ही सोलापूरच्या दृष्टीनं सकारात्मक बाब आहे. या पाण्याचं वर्षभराचं नियोजन करण्यात येणार आहे.
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस
राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्यानं धरणाच्या सात दरवाज्यांपैकी 3, 5 आणि 6 या क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. धरणात 234 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. धरणातून 9340 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी 23 फुटांवर गेली. त्यामुळं राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील एकूण 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
नाशिक विभागात गेल्या 24 तासात पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे सर्व मोठी धरणे 90 टक्के भरली आहेत. नाशिक विभागात सरासरी पाणीसाठा 78.23 टक्के आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या तलावांतील पाणीसाठा समाधानकारक आहे.
पैकी तानसा आणि मोडकसागर ऑगस्टमध्येच भरून वाहू लागले होते.
नागपूर विभागातील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा चांगला आहे. गोसीखुर्दमध्ये 20.38 टक्के, बानवथडीमध्ये 34.66 टक्के, नांदमध्ये 100 टक्के , निम्न वर्धामध्ये 40.05 टक्के पाणीसाठा आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)









