उर्फी जावेदनं चेहऱ्यावर केलेली फिलर सर्जरी काय आहे? या सर्जरीत काय धोका असतो?

उर्फी जावेद

फोटो स्रोत, Uorfi/ANI

फोटो कॅप्शन, उर्फी जावेद
    • Author, डिंकल पोपली
    • Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी

(सूचना: या लेखातील काही फोटो आणि माहिती तुम्हाला विचलित करू शकते)

उर्फी जावेद, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध आहे. अलीकडंच उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात तिचा चेहरा बराच सुजलेला दिसतो आहे.

व्हीडिओ पाहिल्यावर प्रथमदर्शनी वाटतं की व्हीडिओला इन्स्टाग्रामचं एखादं फिल्टर लावण्यात आलं असावं. मात्र प्रत्यक्षात त्यामागचं कारण काही वेगळंच आहे.

उर्फीनं या पोस्टमध्ये सांगितलं आहे की काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या ओठांचा आकार वाढवण्याची 'लिप फिलर' नावाची एक कॉस्मेटिक सर्जरी केली होती.

मात्र, उर्फीच्या नंतर लक्षात आलं की ओठांना अधिक ठळक आणि मोठे दाखवण्यासाठी लावण्यात येणारे हे 'लिप फिलर' चुकीच्या जागी टाकले गेले आहेत.

उर्फीनं इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे, "हे फिलर्स योग्यप्रकारे लावण्यात आले नव्हते, त्यामुळे मी हे फिलर्स काढण्याचा निर्णय घेतला."

उर्फीनं हे लिप फिलर्स काढण्याची प्रक्रिया केली असता, त्या दरम्यान तिचा चेहरा सुजला.

ती म्हणते, "यापुढे देखील मी ही शस्त्रक्रिया करेन. मी फिलर्सना पूर्णपणे नाकारत नाही. मात्र, ते काढणं खूपच त्रासदायक असतं."

अर्थात नंतर उर्फीनं माहिती दिली की आता तिचा चेहरा चांगला झाला आहे. तिनं तिचा फोटोदेखील पोस्ट केला.

उर्फी जावेदचं म्हणणं आहे की तिनं तिच्या ओठांचा आकार वाढवण्यासाठी 'लिप फिलर' नावाची कॉस्मेटिक सर्जरी केली होती.

फोटो स्रोत, Uorfi

फोटो कॅप्शन, उर्फी जावेदचं म्हणणं आहे की तिनं तिच्या ओठांचा आकार वाढवण्यासाठी 'लिप फिलर' नावाची कॉस्मेटिक सर्जरी केली होती.

उर्फी जावेदनं इन्स्टाग्रामवर एक नवीन पोस्टदेखील टाकली आहे.

या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे, "सर्व ट्रोलिंग आणि मीम्स पाहिल्यावर खरं सांगायचं तर मला खूप हसू आलं. हा पाहा फिलर्सशिवाय किंवा सूज नसलेला माझा चेहरा. मी इथे लिप प्लम्परचा वापर केला आहे."

मात्र, हे फिलर्स असतात तरी काय? ते कसं काम करतात, त्याच्या शस्त्रक्रियेसाठी किती खर्च येतो आणि आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?

फिलर्स काय असतात?

त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपमा रामपाल, लुधियानामध्ये 'स्किनिक' नावानं कॉस्मेटोलॉजी क्लिनिक चालवतात. बीबीसीनं यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

डॉ. अनुपमा म्हणतात, "फिलर्स हायलूरॉनिक ॲसिडचे अणू असतात. शरीराच्या कोणत्याही भागात ते इंजेक्शनद्वारे टाकता येतात. आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या देखील हायलूरॉनिक ॲसिड असतं."

उर्फी जावेदनं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून म्हटलं आहे की ती आता बरी आहे.

फोटो स्रोत, Uorfi

फोटो कॅप्शन, उर्फी जावेदनं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून म्हटलं आहे की ती आता बरी आहे.

"याचं मुख्य काम पाणी शोषून घेण्याचं असतं. जेणेकरून त्वचा मुलायम, नितळ आणि तजेलदार राहते."

"सर्वसाधारणपणे, शरीराचा जो भाग आपल्याला भरलेला किंवा जाड हवा आहे, त्या भागात हायलूरॉनिक ॲसिडचे अणू किंवा फिलर्स टाकले जातात."

"चेहऱ्याच्या बाबतीत, सर्वसाधारपणे, गाल, ओठ, नाक, डोळ्यांच्या खालच्या बाजूला, जॉ लाइन म्हणजे जबड्याची पट्टी, कपाळ आणि हनुवटीमध्ये हे फिलर्स टाकले जातात."

फिलर्सची शस्त्रक्रिया काय असते आणि त्याला किती खर्च येतो?

डॉ. अनुपमा रामपाल सांगतात की या शस्त्रक्रियेला जवळपास दोन तास लागतात.

त्या म्हणतात, "जिथे फिलरचं इंजेक्शन द्यायचं असतं, ती जागा क्रीम लावून आधी बधीर केली जाते. त्यानंतर फिलर इंजेक्ट केलं जातं."

डॉ. अनुपमा पुढे सांगतात की या शस्त्रक्रियेसाठी 25 हजार ते 35 हजार रुपये खर्च येतो. याचा प्रभाव सहा महिने ते एक वर्षापर्यंत राहतो.

लिप फिलर्सचा परिणाम सहा महिने ते एक वर्षापर्यंत राहतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिप फिलर्सचा परिणाम सहा महिने ते एक वर्षापर्यंत राहतो.

त्यांचं म्हणणं आहे की या प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे बहुतांश करून 25 ते 40 वर्षे वयोगटातील महिला येतात.

डॉ. अनुपमा यांना वाटतं की ही शस्त्रक्रिया लोकप्रिय होण्यासाठी वरवरच्या सौंदर्याबाबत सोशल मीडियाचा दबाव तसंच सामाजिक दबाव बऱ्याच अंशी जबाबदार आहे.

त्या म्हणतात, "अलीकडच्या काळात हे तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आलं आहे. जी व्यक्ती स्वत:च्या डोळ्यांचा आकार किंवा इतर एखाद्या गोष्टीच्या रंग-रुपाबद्दल समाधानी नाही, सोशल मीडिया किंवा मित्रमंडळींच्या गप्पांचा ज्याच्यावर प्रभाव पडला आहे, असे लोक ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सहजपणे तयार होतात."

फिलर्सला 'डिझॉल्व्ह' करणं म्हणजे काय असतं?

डॉ. अनुपमा रामपाल म्हणतात की, हायलूरॉनिक ॲसिडचं इंजेक्शन बहुतेकवेळा 'ब्लाईंड स्पॉट्स'मध्ये दिले जातात. म्हणजेच तज्ज्ञ त्यांच्या अंदाजाच्या आधारे हे इंजेक्शन देतात.

त्या सांगतात की जर हे इंजेक्शन एखाद्या प्रशिक्षित प्रोफेशनलशिवाय किंवा सावधगिरी न बाळगता देण्यात आलं, तर फिलर त्याच्या जागेपासून वर किंवा खाली सरकतं.

त्यामुळे चेहरा कुरूप दिसू शकतो.

अलीकडे वैद्यकीय उपचारांनी चेहऱ्याचा आकार बदलण्याचा ट्रेंड वेगानं वाढतो आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अलीकडे वैद्यकीय उपचारांनी चेहऱ्याचा आकार बदलण्याचा ट्रेंड वेगानं वाढतो आहे.

डॉ. अनुपमा म्हणतात, "उदाहरणार्थ, जर फिलर ओठांमध्ये टाकण्यात आलं. तर ते ओठांच्या वरच्या बाजूला पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे ओठांमध्ये असमानता येऊ शकते. अनेकदा ग्राहकांना जर शस्त्रक्रियेचे परिणाम आवडले नाहीत, तर ही शस्त्रक्रिया रिव्हर्सदेखील केली जाते."

तज्ज्ञ हायलूरोनिडेज नावाचं एक एन्झाईमचा वापर करून लिप फिलर्स विरघळवून त्याचं मिश्रण तयार करतात. हा पदार्थ फक्त हायलूरॉनिक ॲसिड असणाऱ्या फिलर्सलाच नष्ट करतो.

सर्वसाधारणपणे ही उलटी प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडते. मात्र, काहीवेळा या प्रक्रियेमुळे 'एम्प्टी पॉकेट्स' राहू शकतात. म्हणजे फुग्यांसारखी पोकळ किंवा लोंबकती जागा त्यामुळे राहते. जणूकाही ती जागा आधी फुगवून मग रिकामी करण्यात आली आहे.

या शस्त्रक्रियेशी निगडीत धोके कोणते?

डॉ. अनिल गंजू, स्किनोव्हेशन क्लिनिक्सचे संस्थापक संचालक आणि त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, जर ही शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आली तर ती खूपच सुरक्षित असते.

अर्थात त्यांचं म्हणणं आहे की याचा अर्थ असा नाही की त्यामुळे शस्त्रक्रियेशी निगडीत धोके पूर्णपणे संपुष्टात येतात.

फिलर्स हायलूरॉनिक ॲसिडचे अणू असतात, ते शरीराच्या कोणत्याही भागात इंजेक्शनद्वारे टाकता येतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फिलर्स हायलूरॉनिक ॲसिडचे अणू असतात, ते शरीराच्या कोणत्याही भागात इंजेक्शनद्वारे टाकता येतात.

डॉ. गंजू म्हणतात, "त्वचेच्या विविध थरांमध्ये फिलर्स टाकले जातात. मात्र, जर चुकून ते एखाद्या रक्तवाहिनीत (ब्लड व्हेसल) गेलं तर, त्यामुळे खूपच गंभीर समस्या उद्भवू शकते."

ते सांगतात की डोळ्यांच्या खाली आणि कपाळावर फिलर्स लावणं, सर्वात कठीण असतं. कारण तिथे काही चूक झाली, तर त्यामुळे दृष्टीदेखील जाऊ शकते.

ते सांगतात, "सर्वसाधारणपणे दुष्परिणाम झाल्यावर इंजेक्शनची जागा निळी पडणं, लाल होणं, सूज येणं, वेदना होणं आणि खाज येणं यांचा समावेश असतो. तर गंभीर दुष्परिणाम झाल्यास संसर्ग होणं, ॲलर्जिक रिॲक्शन येणं आणि दृष्टीशी संबंधित आजार होऊ शकतात."

चूक कुठे होते?

यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सरचिटणीस डॉ. रोहित रामपाल सांगतात की नॅशनल मेडिकल कमिशनच्या (एनएमसी) नियमांनुसार फक्त त्वचारोग तज्ज्ञ (डर्मेटोलॉजिस्ट) किंवा प्लास्टिक सर्जन यांनाच फिलर्स आणि इतर कॉस्मेटोलॉजी शस्त्रक्रिया किंवा प्रक्रिया करण्याची परवानगी आहे.

मात्र, असं असूनदेखील पार्लर, डेंटल किंवा इतर क्षेत्रांशी संबंधित असलेले अनेकजण आहेत, जे व्यावसायिक क्लिनिक सुरू करून या सेवा देऊ लागले आहेत.

फिलर्स

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. रोहित रामपाल म्हणतात, "असे वेगळ्या क्षेत्रातील लोक या विषयातील तज्ज्ञ नसले तरी, ते अनेकदा मार्केटिंग आणि कमी शुल्काचा मोह दाखवून लोकांना त्यांच्याकडे खेचून घेतात."

ते पुढे म्हणतात, "फक्त थोड्या पैशांची बचत करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीकडून हा उपचार किंवा प्रक्रिया करून घेणं महागात पडू शकतं. त्यामुळे उपचारादरम्यान किंवा नंतर अनेक समस्या उद्भवू शकतात."

कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?

त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपमा रामपाल म्हणतात की फिलर्स इंजेक्ट करून घेण्याआधी या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

  • मार्गदर्शन आणि माहिती: एखाद्या योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. डर्मल फिलर्सचा अनुभव असलेल्या सर्टिफाईड डर्मेटोलॉजिस्ट किंवा प्लास्टिक सर्जनकडे जावं.
  • प्रक्रिया समजून घ्यावी: वापरण्यात येणाऱ्या फिलरचा प्रकार, त्याचा प्रभाव किती काळ राहणार आणि संभाव्य दुष्परिणामांबद्दल माहिती घ्या.
  • तुमची मेडिकल हिस्ट्री किंवा वैद्यकीय पार्श्वभूमी डॉक्टरांना नक्की सांगा.
  • रक्त पातळ करणारी औषधं टाळा.
  • मद्यपान आणि धूम्रपान कमी करा.
  • डॉक्टरनं दिलेल्या सूचनांचं पालन करा.
  • कोणताही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांकडे जावं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)