आफ्रिकन कीटकामुळे भारतात खाद्यतेलाचं उत्पादन कसं वाढलं? तुमच्या किचनस्टारची गोष्ट

- Author, प्रवीण शुभम
- Role, बीबीसीसाठी
डोक्यातील उवांएवढा अगदी छोटा दिसणारा एक आफ्रिकन कीटक भारतात तेलबिया पिकांची उत्पादनक्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
हे ऐकून आपल्याला नवल वाटेल, पण हे सत्य आहे. या कीटकाचं नाव आफ्रिकन ऑइल (तेल) पाम भुंगा (एलाईडोबियस कॅमेरुनिकस) असं आहे.
या 'छोट्या पाहुण्या'ने भारतातील ऑइल पाम बागांमध्ये येऊन मोठा फरक घडवला. तो झाडांमधील नैसर्गिक परागीभवन (पॉलिनेशन) घडवून आणायला मदत करू लागला आणि त्यामुळे ऑइल पामची उत्पादनक्षमता आणि शेतीचं क्षेत्र दोन्हीमध्ये वाढ झाली.
भारत आतापर्यंत स्वयंपाकाच्या तेलासाठी पारंपरिक पिकांवरच अवलंबून होता. परंतु, लोकसंख्या मोठी असल्यामुळे आणि वर्षागणिक तेलाची मागणी वाढत असल्याने, ही गरज भागवणं देशासाठी मोठं आव्हान बनलं आहे.
भारत आजही खाद्यतेल (एडिबल ऑइल्स) आयात करणाऱ्या देशांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
इतर पिकांच्या तुलनेत ऑइल पामच्या फळांमधून पाचपट तेल जास्त मिळतं. आणि सर्वात विशेष म्हणजे हे पीक संपूर्ण वर्षभर उत्पादन देतं.

भारतामधील पारंपरिक तेलबिया पिकं म्हणजे तीळ, शेंगदाणे, मोहरी आणि नारळ ही हंगामी पिकं आहेत. पाऊस जास्त पडला किंवा दुष्काळ पडला, तर या पिकांचं उत्पादन कमी होतं.
त्यामुळे स्थिर उत्पादनाची हमी मिळणं कठीण आहे. अशा परिस्थितीत ऑइल पाम हे विश्वासार्ह आणि तेलटंचाईला उपाय ठरू शकणारं पीक मानलं जातं.
भविष्यातील गरज लक्षात घेऊन ऑइल पाम शेती मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 2021 मध्ये 'नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल्स - ऑइल पाम' (एनएमइओ-ओपी) सुरू केलं.
देशभरातील विविध राज्यांमध्ये सुमारे 28 लाख हेक्टर क्षेत्रफळावर ऑइल पाम पिकासाठी अनुकूल हवामान असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
1991-92 मध्ये भारतात ऑइल पाम शेती फक्त 8 हजार हेक्टर क्षेत्रावर होती, तर मार्च 2025 पर्यंत ही वाढून 5.56 लाख हेक्टरपर्यंत पोहोचली, असं केंद्रातील कृषी मंत्रालयाने लोकसभेत सांगितलं.
पुढील वर्षापर्यंत ही शेती 10 लाख हेक्टरपर्यंत वाढवणं हे एनएमइओ-ओपी मिशनचं मुख्य उद्दिष्ट आहे.
आफ्रिकन कीटकांमुळे भारतात उत्पादन किती वाढलं?
ऑइल पामचे जन्मस्थान असलेल्या पश्चिम आफ्रिकेत नैसर्गिक परागसिंचन होण्यामागे एलाईडोबियस कॅमेरुनिकस हा कीटक जबाबदार असल्याचे मलेशियाच्या कृषिशास्त्रज्ञांनी ओळखलं आहे.
पूर्वी भारत आणि मलेशियात, नर झाडांवरील फुलांमधून परागकण गोळा करून मादी झाडांवर हातानं टाकावं लागायचं.
1981 मध्ये हा कीटक आफ्रिकेतून मलेशियाला आणला गेला आणि तिथल्या ऑइल पाम बागांमध्ये सोडला गेला. त्यानंतर तिथली उत्पादनक्षमता अविश्वसनीय पद्धतीने वाढल्याचे दिसून आले.
मलेशियाच्या अनुभवावरून भारतानेही तोच मार्ग स्वीकारला.
तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या वेबसाइटवर म्हटलं आहे की, भारतात हा कीटक पहिल्यांदाच 1985 मध्ये केरळमध्ये आणण्यात आला.
यानंतर 1988 मध्ये, आंध्र प्रदेशच्या पेडावेगी येथील 'इंडियन ऑइल पाम रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या (आयआयओपीआर) क्षेत्रात ऑइल पाम बागांमध्ये या कीटकांच्या जीवनचक्रावर संपूर्ण संशोधन करण्यात आलं.

भारतात हा कीटक आल्यानंतर दोन वर्षांनी केलेल्या संशोधनात ऑइल पामची उत्पादनक्षमता वाढल्याचे स्पष्ट दिसून आले.
हॉर्टिकल्चर अधिकारी सांगतात की, झाडांवरील फळांच्या घडांमध्ये (बंच) आणि त्यातील फळांमध्येही वाढ दिसून आली आहे, आणि यामुळे चांगली गुणवत्ता आणि जास्त तेल मिळण्याची शक्यता वाढली आहे.
जगित्याल जिल्ह्याचे हॉर्टिकल्चर अधिकारी श्याम प्रसाद यांनी बीबीसीला सांगितलं की, हा कीटक येण्यापूर्वी फळांच्या घडांमधून फळं फक्त 25 ते 28 टक्के येत होती, पण हा कीटक आल्यानंतर ती 78 ते 85 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
तेलुगू राज्ये आघाडीवर
सध्या भारतात ऑइल पाम शेतीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्य आघाडीवर आहेत.
2020 च्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेशात 1.86 लाख हेक्टर आणि तेलंगणात 1.12 लाख हेक्टर क्षेत्रफळावर ऑइल पामची लागवड करण्यात आली आहे.
दोन तेलुगू राज्ये आणि केरळचा एकत्रितपणे देशातील एकूण उत्पादनाचा वाटा हा 98 टक्के इतका आहे
लोकसभेत अलीकडे जाहीर झालेल्या माहितीनुसार, या दोन राज्यांमध्ये ऑइल पाम शेतीच्या क्षेत्रफळात लक्षणीय वाढ झाली आहे.
पण, सध्याच्या कृषी वर्षासाठी राज्यनिहाय तपशील अजून उपलब्ध झालेला नाही.

एनएमइओ-ओपी अहवालानुसार, 2020–21 या आर्थिक वर्षात भारतात खाद्य तेलाचा वापर 25 दशलक्ष टनांपेक्षा जास्त झाला, पण उत्पादन फक्त 12.28 दशलक्ष टन इतकं होतं.
ही तूट भरून काढण्यासाठी भारताने 80 हजार कोटी रुपयांच्या 13.35 दशलक्ष टन तेलाची आयात केली. त्यात पाम ऑइलचे प्रमाण 56 टक्के इतकं होतं.
याच अहवालानुसार, प्रत्येक भारतीयाचा वार्षिक तेलाचा वापर 2012–13 मध्ये 15.8 किलो होता, तर 2020–21 मध्ये तो 19 किलो झाला आहे.
मागील सहा वर्षांच्या (2015–2021) उपलब्ध माहितीनुसार, भारताने आपल्या देशांतर्गत मागणीच्या निम्म्यापेक्षा जास्त तेल आयात केलं आहे.
ऑइल पाम भारतात कसा आला?
19व्या शतकाच्या उत्तरार्धात, ब्रिटिशांनी पहिल्यांदा ऑइल पामचे झाड कलकत्त्यातील 'नॅशनल बॉटॅनिक गार्डन'मध्ये आणले होते.
यानंतर देशातील काही भागांत ही झाडं दिसली, परंतु ती बहुतेक फक्त वनस्पती संशोधनासाठी लावलेली होती.
महाराष्ट्रात काही भागांत सिंचन कालव्यांच्या काठांना मजबूत करण्यासाठी ऑइल पामची लागवड करण्यात आली होती, असं 'सेंट्रल प्लांटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या (सीपीसीआरआय) 1992 च्या अहवालात नमूद आहे.
भारतामध्ये ऑइल पामच्या शेतीची सुरुवात करणारं पहिलं राज्य केरळ होतं. 1960 मध्ये, थोदुपुझा या भागात राज्य कृषी विभागाने 40 हेक्टर क्षेत्रात ऑइल पामची लागवड सुरू केली.

ऑइल पाम शेती भारतात पहिल्यांदा 1987 मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पातळीवर आंध्र प्रदेशच्या पूर्वी गोदावरी जिल्ह्यातील पेडावेगी भागात सुरू झाली. 86 शेतकऱ्यांसह 160 हेक्टर क्षेत्रात ही लागवड करण्यात आली.
यानंतर इथंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल पाम रिसर्चची (आयआयओपीआर) स्थापना करण्यात आली.
तेलंगणामध्ये सुरुवातीला काही स्थानिक शेतकऱ्यांनी खम्मम जिल्ह्यात ऑइल पाम शेती सुरू केली, आणि अलीकडच्या काळात उत्तर तेलंगणा जिल्ह्यांमध्ये या पिकाचं क्षेत्रफळ वाढत आहे.
जगित्याल जिल्ह्यात पहिल्यांदाच कापणी केलेल्या ऑइल पाम बागांमध्ये अलीकडे आफ्रिकन ऑइल पाम भुंगे सोडण्यात आले आहेत.
जगित्याल जिल्ह्याचे हॉर्टिकल्चर अधिकारी श्याम प्रसाद यांनी बीबीसीला सांगितलं की, "हा कीटक जरी परदेशातून आला असला तरी, स्थानिक पिकांना कुठलाही धोका नाही. त्याचे जीवनचक्र फक्त ऑइल पामच्या फुलांवरच पूर्ण होतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











