हातावर सुसाईड नोट लिहित आत्महत्या केलेल्या डॉक्टरबरोबर नेमकं काय घडलं होतं?
साताऱ्याच्या फलटणमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या डॉक्टरच्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिलेली आढळली ज्यात तिने एका पोलीस अधिकाऱ्यासह आणखी एका व्यक्तीवर लैंगिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. या घटनेनंतर राज्यात महिला सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सातारा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ही महिला डॉक्टर गुरुवारी फलटणमधल्या हॉटेलमध्ये गेली आणि तिथेच तिने आत्महत्या केली. तिने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती ज्यात एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा, तर दुसऱ्या व्यक्तीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे.
महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, तिच्यावर चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करण्यासाठी राजकीय आणि पोलिसांचा दबाव होता.
“गेल्या वर्षभरापासून तिच्यावर प्रचंड दबाव होता. ती वारंवार आपल्या बहिणीला याबद्दल सांगायची, पण एवढं टोकाचं पाऊल ती उचलेल असं वाटलं नव्हतं.”
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.
या महिलेने तिच्यावर येत असलेल्या दबावाबाबत तक्रार दिली होती असं कुटुंबीय सांगतात. तक्रारीच्या पत्रामध्ये या महिलेने म्हटलं होतं की,
"पेशंट (आरोपी) फिट नसतानाही तो फिट असल्याचा रिपोर्ट द्या, असा वारंवार दबाव माझ्यावर टाकतात आणि अपशब्दही वापरतात. यासंदर्भात मी पोलीस निरीक्षक यांना फोनद्वारे माहिती दिली असताना त्यांनी 'त्यामध्ये माझा काही संबंध नाही' असं म्हणत उडवाउडवीची उत्तरं दिली."
पोलिसांच्या तपासाबाबत आणि महिलेच्या तक्रारीबाबत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हे सांगितलं,
खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. तिच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की, “आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांना फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, महिलेने याआधी तक्रार केली असल्यास तिची दखल का घेतली गेली नाही, याचाही तपास होणार आहे.”






