'आम्ही ख्रिसमससाठी एका व्यक्तीला आमच्या घरी बोलावलं आणि तो आमच्याबरोबर 45 वर्षे राहिला'

 "ख्रिसमसला एक पाहुणा आमच्या घरी आला आणि 45 वर्ष आमच्या जीवनाचा भाग बनला"
    • Author, चार्ली बकलँड
    • Role, बीबीसी वेल्स

ख्रिसमस हा प्रेम आणि सद्भावनेचा काळ असतो. पण 50 वर्षांपूर्वी एका तरुण ब्रिटिश जोडप्याने केलेल्या छोट्याशा मदतीमुळे त्यांचं आयुष्य कायमचं बदललं.

23 डिसेंबर 1975 रोजी, ब्रिटनमधील वेल्स शहरातील कार्डिफ येथे रॉब पार्सन्स आणि त्यांची पत्नी डायने घरात ख्रिसमस साजरा करण्याची तयारी करत होते. त्याचवेळी अचानक कोणीतरी त्यांच्या दरवाज्याची बेल वाजवली.

दारात एक माणूस उभा होता. त्याच्या उजव्या हातात त्याची सगळी बचत होती – एक कचऱ्याची पिशवी, आणि डाव्या हातात एक गोठलेली कोंबडी होती.

रॉबने त्याच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिलं, त्याला ओळखणं त्यांना कठीण गेलं. तो रॉनी लॉकवुड होता- एक असा माणूस ज्याला त्यांनी लहानपणी संडे स्कूलमध्ये अधूनमधून पाहिलं होतं. त्यांना आठवत होतं की, लोकांनी त्याच्याशी चांगलं वागायला सांगितलं होतं, कारण तो 'थोडासा वेगळा' होता.

"मी त्याला विचारलं, 'रॉनी, हे चिकन कशासाठी आहे?'

तो म्हणाला, 'कोणीतरी मला ख्रिसमससाठी दिलं आहे.'

आणि मग मी एक असा शब्द बोललो, ज्यानं आमचं जीवन कायमचं बदलून गेलं."

"मला अजूनही समजत नाही की, मी असं का बोललो, पण मी त्याला म्हणालो- 'आत ये.'"

तेव्हा रॉब 27 वर्षांचे आणि डायने 26 वर्षांच्या होत्या. दोघांनाही रॉनीला त्यांच्या घरात राहण्यासाठी जागा द्यायला हवी, असं वाटलं. रॉनी ऑटिझमने ग्रस्त होता.

त्यांनी तेच चिकन शिजवलं, त्याला आंघोळ करायला सांगितलं आणि एकत्र ख्रिसमस साजरा करण्याचं ठरवलं.

ख्रिसमसच्या वेळी रॉनी, रॉब आणि डायने यांचा मुलगा लॉयडबरोबर.

फोटो स्रोत, Rob Parsons

फोटो कॅप्शन, ख्रिसमसच्या वेळी रॉनी, रॉब आणि डायने यांचा मुलगा लॉयडबरोबर.

त्यांनी उदारतेच्या दिशेनं उचलेलं हे एक छोटंसं पाऊल होतं, जे नंतर प्रेम आणि आपुलकीने भरलेल्या नातेसंबंधात बदललं. हे नातं रॉनीच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 45 वर्षे टिकलं.

आज रॉब 77 वर्षांचे आणि डायने 76 वर्षांच्या आहेत. जेव्हा रॉनीला त्यांनी आपल्या घरात राहायला जागा दिली, तेव्हा त्यांच्या विवाहाला फक्त 4 वर्षे झाली होती.

त्यावेळी रॉनी साधारण 30 वर्षांचा होता. तो 15 वर्षांचा असताना बेघर झाला होता. कार्डिफच्या गल्ल्यांमध्ये फिरायचा, कधी कधी काम करायचा. रॉब त्याला ते चालवत असलेल्या युवा क्लबमध्ये अधूनमधून पाहत असत.

रॉनीला आपलंसं वाटावं म्हणून त्या दाम्पत्याने आपल्या कुटुंबीयांना त्याच्यासाठीही ख्रिसमसचं गिफ्ट आणायला सांगितलं होतं- मग ते मोजे असोत, परफ्यूम असो किंवा एखादी क्रीम.

डायनेला तो दिवस आठवतो…

"तो (रॉनी) ख्रिसमसच्या टेबलवर बसला होता. आजूबाजूला भेटवस्तू होत्या आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला एवढं प्रेम मिळालं होतं."

"तो क्षण अविश्वसनीय होता."

"मी काही चुकीचं केलं आहे का?"

ख्रिसमसनंतर रॉनीला निरोप द्यावा, असं या जोडप्याला वाटलं होतं. पण जेव्हा तो दिवस आला तेव्हा त्यांना त्याला हे सांगताही आलं नाही. त्यांनी मदतीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली.

रॉब सांगतात, "आम्हाला सांगण्यात आलं की, रॉनीला नोकरी मिळवण्यासाठी पत्त्याची गरज आहे आणि पत्ता मिळवण्यासाठी नोकरी."

"हाच तो विरोधाभास आहे, ज्यात बहुतांश बेघर लोक अडकतात."

रॉनीला वयाच्या 8 व्या वर्षी एका केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आलं होतं आणि 11 व्या वर्षी तो कार्डिफमधून गायब झाला.

रॉनी लॉकवुड ऑटिझमने ग्रस्त होते आणि 15 व्या वर्षी त्यांना एका देखभाल केंद्रातून काढून टाकल्यानंतर ते बेघर झाले होते.

फोटो स्रोत, Rob Parsons

फोटो कॅप्शन, रॉनी लॉकवुड ऑटिझमने ग्रस्त होते आणि 15 व्या वर्षी त्यांना एका देखभाल केंद्रातून काढून टाकल्यानंतर ते बेघर झाले होते.

'ए नॉक ऑन द डोअर' या आपल्या पुस्तकासाठी संशोधन करताना रॉबला कळलं की रॉनीला सुमारे 300 किलोमीटर दूर एका शाळेत पाठवण्यात आलं होतं. रिपोर्टमध्ये त्या शाळेला 'मानसिकदृष्ट्या मागास मुलांची शाळा' (मतिमंद मुलांची शाळा) असं म्हटलं होतं. रॉनी तिथे 5 वर्षे राहिला.

रॉब सांगतात, "त्याचे कुणी मित्रही नव्हते, कुणी सोशल वर्कर नव्हता आणि असा कुणी शिक्षकही नव्हता जो त्याला खर्‍या अर्थाने ओळखतो."

रॉब यांना आठवतं की, मोठा झाल्यावर रॉनी अनेकदा विचारायचा,

"मी काही चुकीचं केलं आहे का?"

हा प्रश्न त्या वेदनादायक अनुभवाची सावली होती.

15 वर्षांचा झाल्यावर त्याला पुन्हा कार्डिफमध्ये पाठवण्यात आलं- म्हणजे 'कुठेही नाही', असं त्या दाम्पत्याचं म्हणणं आहे.

'अरे, हे तर माझे वकील आहेत'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सुरुवातीला रॉनी खूप लाजाळू होता- नजरेला नजर मिळवणंही त्याला कठीण जायचं आणि तो फार कमी बोलायचा.

पण हळूहळू त्यांनी रॉनीला जाणून घेतलं आणि ते खरंच त्याच्यावर प्रेम करू लागले.

त्यांनी त्याला कचरा उचलण्याची नोकरी दिली आणि नवीन कपडे दिले- कारण तो अजूनही त्याला शाळेत मिळालेले कपडेच घालायचा.

रॉब सांगतात, "त्यावेळी आम्हाला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे आम्ही एखाद्या मुलालाच शाळेसाठी तयार करत आहोत, असं वाटायचं."

दुकानातून बाहेर पडताना डायनेनं गमतीने म्हटलं, "त्याला कचरा उचलण्याची नोकरी मिळाली आहे आणि आम्ही त्याला डोर्चेस्टर हॉटेलच्या दरबानसारखं सजवलं आहे."

रॉब, व्यवसायाने वकील होते. दररोज सकाळी 1 तास लवकर उठून ते रॉनीला कामाच्या ठिकाणी सोडून येत असत.

एके दिवशी रॉबने विचारलं, "रॉनी, तू नेहमी हसत का असतोस?"

रॉनी म्हणाला, "कामाच्या ठिकाणी लोक विचारतात, 'तुला कोण सोडतं?"

आणि मी म्हणतो- "अरे, ते माझे वकील आहेत."

रॉब सांगतात, "कदाचित वकिलापेक्षा त्याला कोणीतरी आणतं आणि नेतं, याचाच जास्त आनंद होता."

रॉनीचे स्वतःचे काही नियम होते- जसं दररोज सकाळी डिशवॉशर रिकामं करणे. रॉनी नाराज होऊ नये म्हणून रॉब प्रत्येक वेळी आश्चर्य व्यक्त करत असत.

"45 वर्षे आम्ही हेच केलं," असं रॉब हसत सांगतात.

प्रत्येक ख्रिसमसला तो तेच मार्क्स अँड स्पेन्सरचं गिफ्ट कार्ड देत आणि तितकाच उत्साही तो दिसायचा.

डायने सांगतात की, क्रॉनिक फॅटीग सिंड्रोममुळे (एमई) जेव्हा त्या मुलांची काळजी घेऊ शकत नव्हत्या, तेव्हा रॉनीने त्यांना मुलांच्या कामात मदत केली.

फोटो स्रोत, Rob and Dianne Parsons

फोटो कॅप्शन, डायने सांगतात की, क्रॉनिक फॅटीग सिंड्रोममुळे (एमई) जेव्हा त्या मुलांची काळजी घेऊ शकत नव्हत्या, तेव्हा रॉनीने त्यांना मुलांच्या कामात मदत केली.

रॉनी आपला मोकळा वेळ बहुतांशवेळा स्थानिक चर्चसाठी देत असत. तो बेघर लोकांसाठी पैसे गोळा करायचा, प्रार्थनेसाठी जागा तयार करायचा आणि खुर्च्या व्यवस्थित रांगेत लावायचा.

डायने सांगतात की, एक दिवस रॉनी घरी आला, पण त्याच्या पायात वेगळे बूट होते. डायने यांनी रॉनीला विचारलं,

"रॉनी, तुझे बूट कुठे आहेत?"

रॉनीने एका गरजू बेघर माणसाला ते बूट दिल्याचे सांगितले.

डायने सांगतात, "तो असाच होता. पण तो खरंच अद्भुत होता."

सर्वात कठीण काळ तेव्हा आला, जेव्हा डायने क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमने आजारी पडल्या. अनेक दिवस त्या अंथरुणातून उठू शकत नव्हत्या.

डायने सांगतात, "आम्हाला 3 वर्षांची लहान मुलगी होती आणि रॉबला कामाला जावं लागत असे."

पण रॉनी मुलांसाठी अगदी खास ठरला. तो लॉयडसाठी दूधाच्या बाटल्या तयार करायचा, घरकामात मदत करायचा आणि मुलगी केटीसोबत खेळायचाही.

पण काही अडचणीही होत्या- जसं 20 वर्षांपर्यंत जुगाराची सवय- तरीही ते म्हणतात की, रॉनीशिवाय त्यांच्या जीवनाची कधी कल्पनाही करता येणार नाही.

एकदा त्यांनी रॉनीला वेगळं राहायला सांगावं, असा विचार केला. पण जसं त्यांनी बोलायला सुरुवात केली, त्याने तोच प्रश्न विचारला

"मी काही चुकीचं केलं आहे का?" हे ऐकताच डायने यांना रडू आलं.

काही दिवसांनी रॉनीने विचारलं, "आपण तिघे मित्र आहोत ना?" "आणि आपण नेहमी एकत्र राहू, हो ना?"

रॉबने उत्तर दिलं, "हो, रॉनी, आपण नेहमी एकत्र राहू."

आणि खरंच, ते एकत्र राहिले.

1988 मध्ये रॉब आणि डायने, रॉनी (उजवीकडे) आणि त्यांची दोन मुलं- लॉयड आणि केटी.

फोटो स्रोत, Rob Parsons

फोटो कॅप्शन, 1988 मध्ये रॉब आणि डायने, रॉनी (उजवीकडे) आणि त्यांची दोन मुलं- लॉयड आणि केटी.

2020 मध्ये, वयाच्या 75 व्या वर्षी रॉनीचा मृत्यू झाला. कोविडमुळे अंत्यसंस्काराला फक्त 50 लोकांना सहभागी होता आलं, पण रॉब हसत म्हणतात, "तिकिटांची मागणी कोल्डप्लेच्या कॉन्सर्टपेक्षाही जास्त होती."

त्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक, राजकारणी आणि बेरोजगार लोकांसह किमान 100 शोक संदेश कार्ड मिळाले.

त्यांच्या मृत्यूनंतर कार्डिफमधील ग्लेनवूड चर्चने 20 लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त खर्चाच्या नवीन वेलनेस सेंटरला रॉनीच्या स्मरणार्थ 'लॉकवुड हाऊस' असं नाव दिलं.

जुनी आणि नवीन इमारत एकमेकांशी पूर्णपणे जुळत नव्हती आणि नुतनीकरण पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता होती.

रॉब सांगतात, "पण काळजी करण्याची काही गरज नव्हती. ही रक्कम साधारणपणे तितकीच होती, जितकी रॉनीने आपल्या मृत्यूपत्रात सोडली होती."

"शेवटी, त्या बेघर माणसाने आम्हा सर्वांच्या डोक्यावर घराचं छप्पर दिलं."

डायने म्हणतात, "हे अविश्वसनीय नाही का? आता मला वाटतं, हेच त्याचं नशीब होतं."

"रॉनीने आमचं जीवन इतकं समृद्ध केलं आहे की, त्याची तुलनाच करता येणार नाही."

(ग्रेग डेव्हिस यांचं अतिरिक्त वार्तांकन)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)