'कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू,' सक्षमसाठी आचलचा आत्मदहनाचा प्रयत्न

फोटो स्रोत, shrikant bangale
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, नांदेड
(या घटनेतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)
नांदेडच्या सक्षम ताटेची 27 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. सक्षम ताटे आणि आचल मामीडवार यांचं एकमेकांवर प्रेम होतं. सक्षम ताटे हा दलित होता, तर आचल ही पद्मशाली समाजातली आहे.
जात वेगळी असल्यामुळेच घरच्यांचा आमच्या प्रेमाला विरोध होता आणि त्यातून त्यांनी सक्षमची हत्या केल्याचं आचलचा आरोप आहे. या प्रकरणी आता आचल सह सक्षमच्या कुटुंबियांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
सक्षम ताटेच्या हत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या दोन पोलिसांवर अद्यापही कारवाई न झाल्याने कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
या दरम्यान कुटुंबीय आणि पोलिसांमध्ये झटापट झाली, तसेच कुटुंबीयांकडून घोषणाबाजीही करण्यात आली.
'कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू,' असा इशारा दिल्यानंतर आचलने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.
याप्रकरणी बीबीसी मराठीने पोलिसांशी संपर्क साधला पण अजून प्रतिक्रिया मिळाली नाही.

नेमकी घटना काय होती?
नांदेड शहरातील जुना घाट (जूना गंज) परिसरात घडलेल्या एका अमानुष हत्येनं परिसर हादरून गेला आहे. प्रेमसंबंधाचा विरोध करणाऱ्या कुटुंबानं तरुणाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर घडलेल्या घटनाक्रमानंतर उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली आहे.
नांदेड शहरातील इतवारा परिसरात राहणाऱ्या सक्षम ताटे ( वय वर्ष-20) आणि आचल मामीडवार (वय वर्षे -21) यांचे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. मात्र आचलच्या कुटुंबाला या नात्याचा तीव्र विरोध होता.
सक्षम ताटेची आणि आचलची जात वेगळी होती. सक्षम हा दलित समाजातील होता.
सक्षमची हत्या झाल्यानंतर त्याची प्रेयसी आचलने त्याच्या मृतदेहाला हळदी कुंकू लावले आणि नंतर स्वतःच्याही कपाळावर हळदी कुंकू लावून घेतले. त्यानंतर आता आपण सक्षमच्याच घरी राहणार असल्याचे तिने म्हटले.
'माझा प्रियकर मरुनही जिंकला आणि माझे आई-वडील त्याला मारुनही हरले,' असे तिने नंतर म्हटले.
'आमच्या दोघांची जात वेगळी होती त्यामुळे घरच्यांचा विरोध होता,' असे आचलने म्हटले.
आचलने माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. त्यावेळी आचलने सांगितले की "सक्षम काही काळापूर्वी तुरुंगवास भोगून बाहेर आला होता आणि त्यानंतर माझ्या कुटुंबाकडून त्याला सतत धमक्या दिल्या जात होत्या. गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आचलच्या कुटुंबाने सक्षमला जाळ्यात ओढून त्याच्यावर हल्ला केला."
आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल यांनी सक्षमवर गोळी झाडली आणि नंतर तीव्र प्रहार करून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत आणि आरोपी या दोघांचाही पूर्वी गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहितीही समोर आली आहे.
हत्या होण्यापूर्वीची धमकी
हत्येच्या दोन तास आधी आचलची आई जयश्री मामीडवार सक्षमच्या घरी गेली आणि त्याला उघडपणे धमकावून गेली होती. मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
आचलने माध्यमांना सांगितले, "सक्षम आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. परंतु, माझ्या कुटुंबाला हे मान्य नव्हतं. सक्षम जेलमधून सुटल्यानंतरच त्याच्या हत्येची योजना आखली गेली. मला देखील धमक्या देण्यात आल्या. माझ्या आई-वडिलांना आणि भावांना फाशी द्या. ही हत्या जातीयतेतून आणि द्वेषातून करण्यात आली आहे."

आचलनं पुढे सांगितलं की, "सक्षम आता नाही, पण मी त्याच्यावर अजूनही प्रेम करते. मी त्याच्या घरातच राहणार आहे."
सक्षमच्या आईच्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी गजानन मामीडवारसह सहा जणांवर खून आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती दिली.
आरोपी म्हणजेच आचलची आई, वडील आणि भाऊ हे सर्व अटकेत आहेत. आरोपींच्या कुटुंबीयांची किंवा वकिलांची बाजू मिळवण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला पण अद्याप ती उपलब्ध झाली नाही. ती आल्यावर अपडेट करण्यात येईल.

ती उद्वेगानं म्हणाली की, "माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावानं मिळून माझ्या सक्षमला (प्रियकर) ठार मारलंय. मात्र, ते त्याला मारून पण हरले आहेत तर सक्षम मरून पण जिंकला आहे. कारण आमचं प्रेम अजूनही जिंवत आहे."
तिनं या संपूर्ण घटनाक्रमाबाबत माहिती देताना सांगितलं की, "गेल्या तीन वर्षांपासून सक्षम ताटेसोबत माझे प्रेमसंबंध होते. माझ्या घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे, त्यांनी त्याचा असा घात केला आहे."

"आमचं प्रेम होतं, पण त्याची जात वेगळी असल्याने माझ्या वडिलांना ते मान्य नव्हतं. तू दुसऱ्या कुणासोबतही बोल, मी तुझं लग्न करून देतो, पण याच्याशी बोलणं थांबव, असं त्यांचं म्हणणं होतं," असं आंचल सांगते.
एफआयआरनुसार, आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना अशी गोपनीय माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील फरार आरोपी गुन्हा करून परभणीतील मानवत येथे नातेवाईकांकडे गेले होते.
पोलिसांनी त्यांना मानवतहून अटक केली. आरोपी गजानन मामीडवार (वय वर्षे 45) आणि साहिल गजानन मामीडवार (वय वर्षे 25) या दोघांनी संगनमत करून आणि कट रचून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
नांदेडचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सक्षम ताटे (20 वर्षे) या मुलाला मारहाण करून, तीव्र प्रहार करुन त्याची हत्या करण्यात आली होती. त्यातील आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."

या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, कलम 61 (2), कलम 189, कलम 190, कलम 191 (2), कलम 193 (3) याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
पुढे पोलिसांनी सांगितलंय की, "या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. त्यामध्ये जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामीडवार, साहिल मामीडवार, सोमेश सुभाष लके, वेदांत अशोक कुंदेकर आणि एक अल्पवयीन आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











