भारतावर इतर देशांपेक्षा जास्त टॅरिफ का? BBC च्या प्रश्नावर ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे भारतावरचं टॅरिफ वाढवलं आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून भारतावर 25% टॅरिफची घोषणा केली, आता ते दुप्पट करत 50% वर नेलं आहे.
व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बीबीसी प्रतिनिधी अँथनी झर्कर यांनी ट्रम्प यांना विचारलं की इतरही देश रशियाकडून तेल खरेदी करत असताना केवळ भारतावर इतकं टॅरिफ का?
यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "फक्त 8 तास झाले आहेत. पुढं काय होतंय ते पाहूया. तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल. इतर अतिरिक्त निर्बंध देखील पाहायला मिळू शकतात."
ट्रम्प यांना विचारण्यात आलं की, "चीनवरही अतिरिक्त शुल्क लादण्याची तुमची काही योजना आहे का?"
डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिलं , "असं होऊ शकतं. आपण पुढे काय पावलं उचलतो यावर ते अवलंबून आहे."
भारतासोबत असं करण्याआधी, अमेरिकेनं ब्राझीलवरही 50% टक्के टॅरिफ लादला आहे. अमेरिकेनं लादलेला हा सर्वाधिक टॅरिफ आहे.






