इस्रायल हमास युद्ध: गाझामध्ये दर दहा मिनिटाला होतोय एका चिमुकल्याचा मृत्यू

इस्रायल

फोटो स्रोत, EPA

    • Author, अमीरा महादबी
    • Role, बीबीसी अरेबिक सेवा

पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासनं 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलवर झालेला हा हल्ला अभूतपूर्व होता.

हमासच्या हल्ल्यात सुमारे 1400 लोक मारले गेल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, तर हमासनं 200 पेक्षा अधिक लोकांना ओलिस ठेवून सोबतही नेलं.

या घटनेला आता एका महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. प्रत्युत्तराची कारवाई करताना इस्रायलद्वारे हवाई हल्ले केले जात आहेत.

गाझा पट्टीमध्ये इस्रायलनं नुकत्याच केलेल्या जमिनीवरील हल्ल्यात हजारो लोक मारले गेले असून तिथं प्रचंड मोठी हानी झाली आहे.

हमास आणि इस्रायलचा हा संघर्ष सुरू झाल्यापासून दोन्ही बाजूचे हजारो लोक मारले गेले आहेत. तसंच मोठ्या संख्येनं लोक जखमीही झाले आहेत.

मोठी जीवित-वित्त हानी

हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात 1400 हून अधिक इस्रायलचे आणि विदेशी नागरिक मारले गेल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.

ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियनने हमासवर बंदी घातली आहे.

इस्रायलने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांपैकी 1159 जणांची ओळख जाहीर केली आहे. त्यात 828 सामान्य नागरिक आणि 31 लहान मुलांचा समावेश होता.

दरम्यान, पॅलेस्टाईनमध्ये प्रत्युत्तराच्या कारवाईचा पाचवा आठवडा सुरू आहे. वेस्ट बँक आणि गाझामध्ये मृत्यू होणाऱ्यांचा आकडा यापूर्वीच्या सर्व आकड्यांपेक्षा खूप अधिक आहे.

इस्रायल

गाझामध्ये आरोग्य सुविधांची जबाबदारी हमासकडे आहे. सहा नोव्हेंबरला गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीत इस्रायलच्या कारवाईत 10 हजाराहून अधिक लोक मारले गेल्याचं म्हटलं आहे.

या आकड्यांमध्ये 4100 पेक्षा अधिक चिमुकल्यांचा समावेश आहे. म्हणजे गाझामध्ये दर दहा मिनिटाला सरासरी एका लहान मुलाचा मृत्यू होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह काही नेत्यांनी मात्र पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या या आकड्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांना हे आकडे विश्वासार्ह वाटत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दर दहा मिनिटाला चिमुकल्याचा अंत

इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी या संघर्षात त्यांचे सुमारे 5400 नागरिक जखमी झाल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडं पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत गाझा आणि वेस्ट बँक परिसरात आतापर्यंत 25,400 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

गाझामध्ये सुमारे 2260 जण बेपत्ता असून त्यात 1270 लहान मुलं आहेत.

यापैकी बहुतांश लोक इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांमध्ये कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेले असू शकतात, असा अंदाज आहे.

अभूतपूर्व बंधक संकट

हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यामुळं अभूतपूर्व असं बंधक संकटही निर्माण झालं आहे.

इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, सुमारे 242 इस्रायली आणि विदेशी नागरिकांना हमासनं बंधक बनवलं आहे. त्यात 30 लहान मुलं आहेत.

बंधकांपैकी 57 जणांचा गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला असल्याचं, हमासचं म्हणणं आहे.

हमासनं 20 ऑक्टोबरनंतर चार बंधकांना सोडलं आहे. सोडण्यात आलेल्या चौघांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश होता. त्यात एक 17 वर्षांचा मुलगा होता.

इस्रायलच्या लष्करानं त्यांच्या एका महिला सैनिकाला 29 ऑक्टोबरच्या ऑपरेशनमध्ये सोडवल्याचं सांगितलं. ती 7 ऑक्टोबरपासून हमासच्या ताब्यात होती.

इस्रायल हमास संघर्षामुळं गाझातील अर्ध्याहून अधिक लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.

इस्रायल

अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला फटका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गाझापट्टीमध्ये 22 लाख लोक राहतात. त्यात अर्ध्याहून अधिक लहान मुलं आहेत.

13 ऑक्टोबरला इस्रायलनं सामान्य नागरिकांना इशारा दिला होता. उत्तर गाझामधला वादी गाझा हा परिसर रिकामा करावं असं या लोकांना सांग्यात आलं होतं. हा नदीला लागून असलेला भाग होता.

इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांच्या महिनाभरानंतर असं म्हटलं जात आहे की, गाझामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक रहिवासी इमारतींचं नुकसान झालं आहे, किंवा त्या पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.

गाझाच्या पॅलिस्टिनी प्राधिकरणाच्या मते, गाझापट्टीमध्ये जितकी घरं आहेत, त्यापैकी हा जवळपास अर्धा आकडा आहे.

संयुक्त राष्ट्र आणि पॅलेस्टाईनच्या आकड्यांनुसार पाच नोव्हेंबरपर्यंत गाझामध्ये सुमारे 15 लाख लोक बेघर झाले होते. त्यांनी शाळा, चर्च, रुग्णालयं, सार्वजनिक इमारती किंवा नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला आहे.

गाझाच्या नागरिकांसाठी गाझा सोडणं हा पर्यायच शिल्लक नाही. कारण इस्रायल आणि गाझाला जोडणारं इरेज क्रॉसिंग बंद आहे. तसंच इजिप्तमध्ये दाखल होण्याचा मार्ग रफाह क्रॉसिंग केवळ विदेशी नागरिक आणि इतर काही जखमींना तिथून बाहेर काढण्यासाठी उघडला जातो.

इस्रायल

स्वयंसेवकांची हत्या

गाझामधील आरोग्य मंत्रालयानं 5 नोव्हेंबरपर्यंत गाझापट्टीमध्ये 35 पैकी 16 रुग्णालयं आणि 76 पैकी 51 मेडिकल सेंटर्स वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत, असं सांगितलं.

त्यासाठी इस्रायलचे हल्ले आणि इंधनाचा तुटवडा ही कारण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पॅलेस्टाईच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 50 अॅम्ब्युलन्सचं नुकसान झालं आहे. त्यापैकी 31 आता वापरायोग्य राहिल्या नाहीत. तसंच 175 आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार मदतकार्य करणारे स्वयंसेवक आणि आरोग्य सेवांशी संबंधित लोकांना कोणत्याही परिस्थितीत वाचवणं गरजेचं असतं.

संयुक्त राष्ट्रांनीही त्यांची सहकारी संस्था 'युनायटेड नेशन्स रिलिफ अँड वर्क्स एजन्सी' साठी काम करणाऱ्या किमान 88 कर्मचारी आणि सिव्हिल डिफेन्सच्या 18 स्वयंसेवकांचा या संघर्षात मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्यूमनिटेरियम अफेअर्स (यूएनओसीएचए) नुसार, 5 नोव्हेंबरपर्यंत इस्रायल हमास संघर्षामध्ये 46 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.

1949 च्या जिनिव्हा कनव्हेंशन अंतर्गत, पत्रकारांचं संरक्षण आणि काम यांचा समावेश करण्यात आला आहे.

पण, 'कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्स' या सार्वजनिक संस्थेनुसार इस्रायल गाझाच्या दरम्याचं सध्याचं युद्ध, गेल्या तीन दशकांपासून या संघर्षाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी जीवघेणं ठरलं आहे.

पाण्याचं भीषण संकट

गाझामधील जीवन दिवसेंदिवस कठिण होत आहे. ज्या लोकांना जीव वाचवण्यात यश आलं आहे, त्यांच्यासमोर अन्न-पाण्याचं संकट उभं राहिलं आहे. आरोग्य सुविधांचाही तुटवडा झाला आहे.

गाझामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना आणि मुलांना रोज प्रतिव्यक्ती केवळ तीन लीटर पाण्यात काम भागवावं लागत असल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेनं 15 ऑक्टोबरच्या दरम्यान म्हटलं होतं.

विशेष म्हणजे याच पाण्यात त्यांना पिण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी पाणी वापरावं लागतं. तर एका व्यक्तीला रोज किमान 15 लीटर पाण्याची गरज असते, असं म्हटलं जातं.

गेल्या काही दिवसांमध्ये रफाह क्रॉसिंगद्वारे गाझाला पाण्याचा खूप कमी प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे. पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधाही या संघर्षामुळं पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या यूएनओसीएचए या एजन्सीनं 5 नोव्हेंबरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, गाझामध्ये युद्ध सुरू होण्याच्या आधीच्या तुलनेत पाण्याचा वापर हा 92 टक्क्यांनी घटला आहे.

तसंच त्याठिकाणचे जवळपास 65 सीवेज पंपिंग स्टेशनही आता पूर्णपणे बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.

गाझामध्ये लोकांचं मोठ्या प्रमाणावर विस्थापन होण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं 31 ऑक्टोबरला दिला होता. काही ठिकाणी लोकसंख्येची घनता वाढू शकते. तसंच पाणी आणि आरोग्य सुविधांच्या पायाभूत सुविधांचं नुकसान होईल त्यामुळं सार्वजनिक आरोग्य सुविधांची वाईट अवस्था होऊ शकते.

यूएनओसीएचए संस्थेनं इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करून

खात्री केली नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)