गडचिरोलीच्या शारदाला 11 लाखांची शिष्यवृत्ती; शेतमजूर कुटुंबातील मुलीची संघर्षमय प्रेरणादायी कहाणी

शारदा रवींद्र दुगुनलावार आणि तिचे आई-वडील
    • Author, कोमल वखरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"आजही आमच्या गावात अनेक मुलींची लग्नं 18 व्या वर्षीच लावली जातात. इच्छा नसतानाही आई-वडिलांच्या दबावाखाली लग्न करावं लागतं. हे थांबवायचं आहे. मुलींना शिक्षणासाठी मदत करायची आहे."

हे शब्द आहेत गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी गावात राहणाऱ्या, 21 वर्षांच्या शारदा रवींद्र दुगुनलावार हिचे.

समाजात बदल घडवण्याच्या याच जिद्दीच्या जोरावर शारदाने देशातील नामांकित शिव नाडर युनिव्हर्सिटी, दिल्ली (एनसीआर) येथे एम.ए. इन रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.

या उच्च शिक्षणासाठी तिला तब्बल 11 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. आता ती दिल्लीत शिकत आहे. मला स्कॉलरशिप मिळाल्यानंतर अनेक मुलींनी माझ्याशी संपर्क साधून आम्हालाही शिकायचंय, असं सांगितल्याचं शारदा आनंदाने सांगते.

शारदाला शाळा-कॉलेजला जाण्यासाठी 10-12 किमी सायकलवरून प्रवास करावा लागायचा. आता ती ग्रामीण विकासात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. आपल्याप्रमाणे इतर मुलींनाही संधी मिळावी अशी तिची इच्छा आहे.

हा प्रवास केवळ शारदाचा वैयक्तिक संघर्ष नाही, तर दुर्गम आणि मागास भागातील मुलींच्या वास्तवाची बोलकी कहाणी आहे.

कॉलेजसाठी दररोज 12 किलोमीटर सायकल प्रवास

वाकडी गावात प्राथमिक शिक्षणाची सोय असली, तरी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गावापासून 12 किलोमीटर दूर चार्मोशी तालुक्याला जावं लागतं.

शारदा सांगते,"अभ्यासापेक्षा कॉलेजला जाऊन परत घरी कसं यायचं, हीच जास्त चिंता वाटायची. कारण बसची कोणतीही सोय नव्हती."

प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी शारदाच्या आई-वडिलांचा सुरुवातीला नकार होता. यामागे ये-जा करण्याच्या गैरसोयी आणि शिक्षणाचा खर्च हे मुख्य कारण होतं.

मात्र, शारदाचे वर्गशिक्षक डॉ. पंकज नरुले यांनी तिच्या आई-वडिलांचे समुपदेशन केल्यानंतर 8 दिवसांनी अखेर तिला शिक्षणाची परवानगी मिळाली.

शारदा रवींद्र दुगुनलावार

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून समाजकार्याची पदवी मिळवणं शारदासाठी सोपं नव्हतं. शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेच्या मदतीमुळे शक्य झाला.

2008 पासून कार्यरत असलेली ही ठाणेस्थित स्वयंसेवी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करते.

गरीब परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट राहू नये, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

गावातून थेट दिल्लीपर्यंतचा प्रवास

बीबीसी मराठीशी बोलताना शारदा सांगते, "समाजकार्याचं शिक्षण घेत असतानाही गावातली परिस्थिती सतत डोळ्यांसमोर असायची. आपल्या भागात लवकर बदल व्हावा, ही तीव्र इच्छा होती. कॉलेजमधील एका सीनियरकडून मला शिव नाडर युनिव्हर्सिटीबद्दल माहिती मिळाली."

यानंतर तिने प्रवेश परीक्षा, मुलाखत आणि गटचर्चेसाठी तयारी सुरू केली.

11 लाखांची शिष्यवृत्ती कशी मिळाली?

शारदाला ही शिष्यवृत्ती कशी मिळाली तसेच जर शारदाप्रमाणे इतर विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती हवी असेल तर काय निकष असतात हे समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने शिव नाडर विद्यापीठाशी संपर्क साधला.

शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या सहायक प्राध्यापक डॉ. गुरकिरत कौर सांगतात, "रुरल मॅनेजमेंट कोर्सला 3 वर्षे झाली असून सध्या तिसरी बॅच सुरू आहे. या कोर्समध्ये आदिवासी, दलित, मुस्लीम आणि अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं."

"विद्यार्थ्यांची निवड करताना केवळ शैक्षणिक गुणांपेक्षा ग्रामीण भागात बदल घडवण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची मानली जाते. शारदाची तिच्या गावासाठीची स्पष्ट दृष्टी आणि मेहनत यामुळे तिची निवड झाली," असंही त्या नमूद करतात.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी होते?

शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर रुरल मॅनेजमेंट कोर्ससाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे. हा फॉर्म हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये भरता येतो.

फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या भागातील समस्या, बदलाची दृष्टी आणि उपाय याबाबत प्रश्न विचारले जातात. अर्जानंतर सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

हा 2 वर्षांचा कोर्स सुमारे 12 लाख रुपयांचा असून शिष्यवृत्तीतून राहणं, जेवण आणि शैक्षणिक खर्च पूर्ण केला जातो. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना समाजसेवी संस्थांमध्ये प्लेसमेंटही दिली जाते.

शारदा रवींद्र दुगुनलावार

ग्रामीण भारतात जातीय भेदभाव, लिंगभेद किंवा महिलांवरील अत्याचार थांबवण्याची इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे अनेकांना ते शक्य होत नाही. काही विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्याची तळमळ असते. अशा विद्यार्थ्यांचा विचार शिष्यवृत्तीसाठी केला जातो, असं डॉ. कौर यांनी सांगितले.

प्रवेशासाठी नोंदणी कशी करायची?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शिव नाडर युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटवर रुरल मॅनेजमेंट या 2 वर्षांच्या अभ्यासक्रमाची माहिती उपलब्ध आहे. त्याच पेजवर या कोर्ससाठी ऑनलाइन अर्जाची लिंक देण्यात आली आहे. विद्यार्थी हा अर्ज हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये भरू शकतात.

या अर्जामध्ये विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात :

  • तुम्हाला हा कोर्स का जॉईन करायचा आहे?
  • तुमच्या परिसरातील कोणते सामाजिक प्रश्न तुम्हाला बदलायचे आहेत?
  • हे बदल घडवण्यासाठी तुम्ही कोणती दिशा आणि पद्धत अवलंबणार आहात?

प्राध्यापक डॉ. गुरकिरत कौर सांगतात, की या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देण्याचे आणि त्यांना सामाजिक नेतृत्वासाठी तयार करण्याचे काम केले जाते.

त्या पुढे सांगतात, "अर्ज आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचा विचार केला जातो. त्यानंतर त्यातील होतकरू विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड केली जाते. प्रवेशासाठी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि आदिवासी भागांतून मोठ्या प्रमाणात अर्ज येतात आणि या कोर्ससाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड तुलनेने अधिक होते."

रुरल मॅनेजमेंट या 2 वर्षांच्या कोर्सचा एकूण खर्च साधारणतः 12 लाख रुपये आहे. मात्र, विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांचे राहण्याचे, खाण्याचे तसेच इतर शैक्षणिक खर्च समाविष्ट असतात. या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना समाजकार्यासाठी विविध सामाजिक संस्थांमध्ये प्लेसमेंट देखील दिली जाते.

अनेक सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांच्या संपर्कातून समाजात बदल घडवण्याची क्षमता असलेले विद्यार्थी शोधले जातात.

भारतातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या परिसरात जातीय भेदभाव, लिंगभेद किंवा महिलांविरोधातील अत्याचार थांबवायचे असतील, मात्र आर्थिक अडचणींमुळे ते शक्य होत नसेल, तर शिव नाडर युनिव्हर्सिटी अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे त्या सांगतात.

'पोरीला शिकवलं, हेच आमचं भाग्य'

शारदाचे आई-वडील शेतमजूर आहेत. वडील शेतीची अवजारे आणि फर्निचर बनवतात; त्याच्या मोबदल्यात त्यांना धान्य मिळतं.

बीबीसी मराठीने शारदाचे वडील रवींद्र यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

मुलगी दिल्लीला उच्च शिक्षण घेत आहे याचा त्यांना अभिमान आहे. मात्र गरीब आणि अल्पसंख्याक कुटुंबातील मुलीला मोठ्या शहरात पाठवण्याचं आव्हानही ते मान्य करतात.

शारदा रवींद्र दुगुनलावार आणि तिचे आई-वडील
फोटो कॅप्शन, शारदा रवींद्र दुगुनलावार आणि तिचे आई-वडील

"गावातल्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून पोरीनं आमचं नाव मोठं केलं. पोरीला शिकवलं, हेच आमचं भाग्य," असं शारदाचे वडील अभिमानाने सांगतात.

भविष्यातील स्वप्नांविषयी शारदा सांगते, "माझ्या आयुष्यातला खरा बदल मेधाताई पाटकर यांच्या कार्यामुळे झाला. आदर्श गावाची संकल्पना माझ्या गावात प्रत्यक्षात उतरवायची आहे. पर्यावरण आणि समाजासाठीची त्यांची तळमळ मला कायम प्रेरणा देते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)