डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ज्यांनी जातिव्यवस्थेला महिलांच्या नजरेतून पाहिलं आणि समजून घेतलं

1942 मध्ये आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील घरी महिला सामाजिक कार्यकर्त्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

फोटो स्रोत, Vijay Surwade's collection, courtesy Navayana

फोटो कॅप्शन, 1942 मध्ये आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील घरी महिला सामाजिक कार्यकर्त्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
    • Author, अदिती नारायणी पासवान
    • Role, सहाय्यक प्राध्यापक, दिल्ली विद्यापीठ
    • Author, निखिल अडसुळे
    • Role, पीएचडी संशोधक, आयआयटी दिल्ली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक अशी व्यक्ती आहेत, ज्यांना आजही पूर्णपणे समजून घेता आलेलं नाही.

भारताची संकल्पना आणि त्याची पायाभूत रचना समजून घ्यायची असेल, तर आपल्याला डॉ. आंबेडकर यांचं कार्य जाणून घेणं गरजेचं आहे. केवळ अस्मितेच्या आधारावर होणाऱ्या घोषणाबाजीकडे पाहून ते समजणार नाही.

डॉ. आंबेडकर यांनी कधीही वसाहतवादी व्यवस्थेला आपल्या विचारांचं, शैक्षणिक आयुष्याचं किंवा सामाजिक-राजकीय चळवळीचं केंद्र मानलं नाही. त्यांनी जातिव्यवस्थेवर आपलं मत मांडताना 'वंश' आणि 'कुळ' यांसारख्या सिद्धांतांना ठामपणे नाकारलं.

त्यांच्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी अमेरिकेची निवड करणं सामान्य नव्हतं.

ब्रिटिशांच्या वसाहतवादी शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळा दृष्टीकोन तयार करता यावा यासाठी डॉ. आंबेडकर यांनी आपल्या शिक्षणाच्या सुरुवातीलाच अमेरिकेची निवड केली.

ब्रिटिश शिक्षण पद्धतीवर धर्मशास्त्र आणि सौंदर्यशास्त्राचा प्रभाव आहे. तसेच ज्ञान किंवा शिक्षण देण्याची त्यांची पद्धतही वसाहतवादी आहे, असं त्यांना वाटत होतं.

जात ही वंशावर आधारित आहे, की लिंगावर?

ऑगस्ट 1947 मध्ये संविधान मसुदा समितीच्या सदस्यांसोबत बसलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मध्यभागी).

फोटो स्रोत, Vijay Surwade's collection, courtesy Navayana

फोटो कॅप्शन, ऑगस्ट 1947 मध्ये संविधान मसुदा समितीच्या सदस्यांसोबत बसलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मध्यभागी).

डॉ. आंबेडकर यांनी जातिव्यवस्था आणि तिचा दैनंदिन जीवनावर होणारा सामाजिक परिणाम आयुष्यभर अनुभवला. 1913 ते 1916 या काळात ते कोलंबिया विद्यापीठात शिकत होते. त्या वेळी जॉन ड्युई, फ्रांझ बोआस, जेम्स शॉटवेल आणि एडविन सेलिग्मन यांच्यासारखे मोठे विचारवंत तिथे होते.

या वातावरणात त्यांनी जातिव्यवस्थेच्या विचारांवर आणि पद्धतींबद्दल एक सर्जनशील आणि समीक्षात्मक दृष्टिकोन तयार केला. कोलंबिया विद्यापीठात असताना त्यांना जवळपास एका मैलावर असलेल्या हार्लेम परिसराला जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांची वांशिक प्रश्नांवरील समज वाढली.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यामुळेच डॉ. आंबेडकर यांनी जातिव्यवस्थेला वसाहतवादी किंवा वांशिक दृष्टीने पाहणं नाकारलं. आपला पहिला शोधनिबंध 'भारतातील जाती'मध्ये (कास्ट्स इन इंडिया) त्यांनी हर्बर्ट रिस्ले यांची वसाहतवादी विचारसरणी फेटाळली. यात जातीला उत्क्रांतीवाद आणि युजेनिक्सशी जोडलं जात होतं.

इतकंच नाही, त्यांनी सेनार्ट, नेसफिल्ड आणि भारतीय समाजशास्त्रज्ञ एस. व्ही. केतकर यांचे जातीविषयक सिद्धांतही नाकारले. त्याऐवजी त्यांनी जातिव्यवस्थेला लिंग (लैंगिक) आणि सांस्कृतिक-मानसिक दृष्टीकोनातून समजावून सांगितलं.

समाजशास्त्रज्ञ गॅब्रिएल टार्डे यांच्या 'अनुकरणाच्या नियमां'च्या आधारावर त्यांनी सांगितलं की, जातिव्यवस्थेची मुळं एंडोगॅमीमध्ये म्हणजेच फक्त आपल्या जातीतच विवाह करण्याच्या प्रथेत आहेत. ही प्रथा महिलांच्या शरीरावर मानसिक आणि सांस्कृतिक नियंत्रणाद्वारे काम करते.

आपल्या व्यावहारिक अर्थशास्त्राच्या जाणिवेमुळे त्यांनी हे समजावून सांगण्यासाठी पुरुष आणि स्त्री यांच्या मेहनतीने तयार होणाऱ्या उत्पादनांची मदत घेतली.

महिलांना केंद्रस्थानी ठेवून जातिव्यवस्था समजून घेणं, त्या काळात एक क्रांतिकारी विचार होता. या विचाराने जातीला वंशावर आधारित पाहण्याच्या पद्धतीला आव्हान दिलं.

अशाप्रकारे डॉ. आंबेडकर यांनी वसाहतवादी, पुरुषप्रधान आणि व्हिक्टोरियन नैतिकतेवर आधारित जातिव्यवस्थेला आव्हान दिलं. 'निष्क्रिय स्त्री' ही कल्पना मोडून काढत महिलांना आपला आवाज उठवण्याची ताकद दिली.

भारतीय नजरेतून जात समजून घेणं

डॉ. आंबेडकर यांनी जात समजून घेताना मानसशास्त्राची भूमिका महत्त्वाची मानली.

फोटो स्रोत, POPULAR PRAKASHAN

फोटो कॅप्शन, डॉ. आंबेडकर यांनी जात समजून घेताना मानसशास्त्राची भूमिका महत्त्वाची मानली.

डॉ. आंबेडकर यांचे लिंगविषयक विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या मनोवैज्ञानिक परिमाणांकडे पाहणं महत्त्वाचं आहे.

हे विचार थोडक्यात, पण स्पष्टपणे, त्यांच्या इतर लेखनांतही आढळतात, जसं की 'जातीचे उच्चाटन किंवा निर्मूलन' (ॲनिहिलेशन ऑफ कास्ट 1936), 'शूद्र कोण होते' (हू वेअर द शुद्राज- 1946) आणि 'अस्पृश्य- कोण होते आणि ते अस्पृश्य का झाले' (द अनटचेबल- हू वेअर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल?- 1948).

'जातीचे उच्चाटन'मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की, जातीला वंशाशी जोडणं म्हणजे 'तथ्यांचं मोठं विकृतीकरण' करणं आहे आणि 'जातिव्यवस्था वंशीय विभागणी करत नाही.'

या लेखात त्यांचे शिक्षक जॉन ड्युई यांचे विचार दिसून येतात. प्रोफेसर स्कॉट आर. स्ट्रॉउड यांनी आपल्या पुस्तकात डॉ. आंबेडकर यांनी ड्युई यांच्याकडून बौद्धिक प्रेरणा घेतल्याचं सांगितलं.

व्यवहारवाद म्हणजेच वर्तनवादाचे मुख्य विचारवंत डॉ. आंबेडकर व्यक्तीच्या स्वातंत्र्य, सामाजिक अनुभव आणि शिक्षणाने प्रभावित होते. ते मानसशास्त्राला सामाजिक बदलाची गुरुकिल्ली मानत होते.

म्हणून डॉ. आंबेडकर यांनी मानसशास्त्राला महत्त्व दिलं. 'जात ही एक कल्पना आहे; ही मनाची अवस्था आहे,' हा त्यांचा विचार प्रसिद्ध आहे.

डॉ. आंबेडकर यांनी आपले गुरु महात्मा जोतिबा फुले यांना समर्पित 'शूद्र कोण होते?' या पुस्तकात सांस्कृतिक संघर्षाला ऐतिहासिक दृष्टिकोनातून समजावून सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, जात वंशावरून आल्याचा दावा वैज्ञानिक शोधांशी जुळणारा नाही. ही कल्पना वांशिक आक्रमणाच्या सिद्धांताला योग्य ठरवण्यासाठी आणि वसाहतीच्या वांशिक संरचनेला टिकवण्यासाठी वापरली गेली आहे.

महिलांविषयीच्या जुन्या समजुती मोडल्या

डॉक्टर भीमराव आंबेडकर

फोटो स्रोत, Dhananjay Keer

'अस्पृश्य- कोण होते आणि ते अस्पृश्य का झाले' या पुस्तकात त्यांनी सांगितलं की, अस्पृश्यता हा जातिव्यवस्थेचा एक भाग आहे, जो मानसिक आणि व्यवस्थात्मक गुलामीसारखा आहे. यात जातीचा प्रभाव जाणीवपूर्वक वापरून ही गुलामी कायम जपली गेली.

ड्युई यांच्या शिक्षणावर भर देण्याच्या तत्त्वांचा वापर करून, डॉ. आंबेडकर यांनी वसाहतवादी शिक्षण व्यवस्थेने जातिविश्वासांना नवीन रूप आणि शब्दांत मजबूत केलं. त्यामुळे लोकांच्या मनात गुलामीची विचारसरणी टिकून राहते, असं स्पष्ट केलं.

डॉ. आंबेडकर हे स्पष्ट विचारांचे व्यवहारवादी होते. लैंगिक, मानसिक किंवा सांस्कृतिक असो, सर्व प्रकारच्या अन्यायांविरुद्ध ते ठाम राहिले.

वसाहतवादी राजवटीच्या काळातच त्यांनी आपले नवे विचार विकसित केले. कधी-कधी त्यांनी वसाहती व्यवस्थेच्या पद्धती आणि ज्ञान प्रणालींचा धोरणात्मक वापरही केला.

डॉ. आंबेडकर यांनी इंग्रजी भाषा हुशारीने वापरली. लोकांना शिकवण्यासाठी आणि वसाहतवादी राजवटीविरोधात लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्याचा वापर केला.

त्यांच्या सामाजिक चळवळींमध्ये महिलांविषयीच्या जुन्या समजुती मोडून काढणं आणि त्यांना नव्याने तयार करणं यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.

त्यांनी आपले हे विचार महिलांसमोर मराठीत भाषण देऊन थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून हे स्पष्टपणे दिसून येते.

डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणावर भर दिला. शिक्षण लोकांचं मन मोकळं करू शकते आणि समाजात कोणती व्यवस्था आणि विचारधारा सुरू आहे, हे समजून घेण्यास मदत करते.

आयुष्याच्या उत्तरार्धात, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या विचारांमध्ये नेहमी बंधुत्वावर आधारित विचार आणि लोकशाहीत जगण्याच्या मार्गाचा समावेश होता.

(या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)